चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.
'चार चपटे' मासे हा कथासंग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल लेखक विवेक कुडू आणि शब्द प्रकाशनचे येशू पाटील दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी हे काम केलं त्याबद्दल आभार. कथालेखक आणि भाषा अभ्यासक म्हणून कुडू सर सगळ्यांना माहिती आहेतच. मुक्त शब्द, वसा, युगांतर, प्रतिष्ठान, मैत्र सारख्या चांगल्या चांगल्या दिवाळी अंकातून त्यांच्या कथा पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत त्या आता एकत्र वाचताना आनंद नक्कीच दसगुणा होणार हे नमूद करताना मला भरभरून आनंद होतोय.
विवेक त्याच्या पोतडीत भारंभर कथा घेऊन फिरणारा, शीघ्रकथाकरी लेखक नाही. जिरवून, मुरवून लिहिणारा निक्का म्हणजे अस्सल कथाकार आहे. २००६ला त्याची पहिली कथा ‘सात दिवसाचं मरण’ लिहीली त्यानंतर २०२१पर्यंत त्यात आणखी नऊ कथांची भर पडली. थोडक्यात काय तर पंधरा वर्षात दहा कथांचा उतारा. आणि म्हणूनच अतिशय बांधीव कातीव अशा या कथा झालेल्या आहेत हे कथासंग्रह वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईलच.
कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, त्याने कथेत केलेले प्रयोग या सगळ्यांबद्दल समीक्षक बोलतीलच आणि त्यांनी बोललं पाहिजे, याच्यावर लिहिलं पाहिजे अगदी जिथं कुठं लिहिता, बोलता येईल तिथ ते केलं पाहिजे म्हणजे हा चांगला, दणकट, जोमदार कथा असलेला कथासंग्रह सर्वदूर पोचेल आणि तो तसा पोचावा असं मला मनापासून वाटतं.
हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
मला या कथासंग्रहाबद्दल बोलताना हे विशेष करून सांगावंस वाटतं की, यात तीन तीन बोली भाषा येतात केमिकलच्या बोयमधे त्याने मांगेली वापरलीय, डब्बल डेकरमधे आदिवासी बोली येते बहुदा वारली आणि बाकी आठ कथांमधे त्याची बोली भाषा आगरी येते. विवेककडूनच मला मीठ आगरी आणि दसआगरी या दोन जातीबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल समजलं, त्याच्याकडूनच मला महिकावती राजाची राजधानी आधी या परिसरात होती हे कळलं आणि त्यामुळेच इकडेसुद्धा शीतलादेवी, माहीम वगैरे आहे हे कळलं त्याच्याकडे अशी बरीच भारी माहिती आहे.
'आंखो देखी' नावाचा एक सिनेमा आहे. त्यात संजय मिश्राचं पात्र म्हणतं ‘हां मै मेडक हुं, अपने कुवे से परिचित होने कि कोशिश कर रहा हुं’ फार मोठं अन खोलम खोल वाक्यय हे. विवेकच्या कथा वाचताना सतत जाणवत राहतं की, या माणसाला याचं आड, विहिर, बारव म्हणजे याचा परिसर, याची माणसं, इथला निसर्ग, इथलं राजकारण सगळं अगदी चोख माहिती आहे. कदाचित त्यामुळेच मी उदगीरचा असूनसुद्धा माझ्यापर्यंत याच्या कथा पोचतात.
मासे आणि पाणी या दोन गोष्टी सोडल्या तर इथल्या माणसांत मला माझी माणसं दिसायला लागतात. ते म्हणतात न 'इफ यु गो मोर & मोर पर्सनल इट विल बिकम मोर & मोर युनिवर्सल' हल्ली युनिवर्सल होण्याचा अर्थच हातचं सोडा असा घेतला जातोय.
तुम्हा आम्हा सारखे सामान्य गुणीजन मान वर करून लांबचंच बघणार आहेत, त्यामुळे समोर काय सुरुय ते दिसत नाही, खालचं पाहत नाही आणि आपण कितीही टाचा वर केल्या कितीही मान वर करून पाहिली तरी वरचं घंटा कळत नाही.
आपण त्या कुपातले मंडूक झालोय ज्याला त्याच्या किलकिल्या डोळ्यानं वरच टूचभर आकाश दिसतं पण त्याची स्वतःची मोठी विहीर दिसत नाही, तिथल्या पाण्याचं टेम्परेचर जाणवत नाही की, टेस्ट कळत नाही पाणी मरतंय हे सुद्धा कळत नाही.
केमीकलची बोय आणि सारिंगा, मामा आणि साक्षीची दुर्बीण सारख्या यातल्या कथांमधून याचा नेमका वेध घेतलाय विवेकनी. विवेकच्या कथांची अनेक वैशिष्ट्यं सांगता येतील जसं त्याच्या कथा पोज घेऊन लिहिलेल्या नसतात, त्याच्या प्रयोगात आशय पातळ होत नाही. खूप कमी लोकांना साधतं असं लेखन.
हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
दुसरं म्हणजे करुणा, करुणेचा आंतरिक झराच यात दिसतो आणि विवेकची भाषा अतिशय गोळीबंद आणि आटीव आहे. यात येणाऱ्या बोलीच्या तर प्रेमात पडतो माणूस. राहवत नाही म्हणून काही शब्द देतो गढूळलोट नदी, चोपी ताडाच्या खोडातून निघालेल्या फळीला चोपी म्हणतात. ती पूर्वी वीटभट्टीसाठी वापरत असत. लवकर जळत नाही लाकूड म्हणून, बखा वासून झोपणे म्हणजे ज्याला तोंड वासून झोपणे याला काय बखाव वासून रेलेस! म्हणतात.
खरपोशा म्हणजे अवलक्षणी, चून म्हणजे पापड बनवण्यासाठी मळून एकजीव केलेलं पीठ, झाडीपट्टीतसुद्धा चून शब्द वापरला जातो पीठल टाईप पदार्थासाठी, दनाफना म्हणजे दाणादाण उडणे, निवडुंगाला थेंगडा, पोटुशी किंवा गरोदरसाठी पुर्माशी, लोंगलवणे एखादा पदार्थ तव्यावर परतवने, पॅकर्स म्हणजे क्रिकेटच्या टीममधे इतर ठिकाणाहून पैसे देऊन खेळायला आणला जाणारा चांगला खेळाडू, हेंग्यात मेंग्यात म्हणजे अध्यात मध्यात.
जसं पारखी डोळे आंब्यात पाड शोधून आणतात तसं विवेक शब्द शोधून आणतो आणि या पुस्तकाच्या मागे अशा शब्दांची सूची आहे ही भारी गोष्टय. माझा पोरगा थकव्याची गुंडी वाळून झोपला आहे म्हणजे माझा पोरगा अंगांच मुटकुळ करून झोपलाय.
विवेक हत्तीचे कान असलेला लेखक आहे. पोलार्डचा नो बाल आणि पोलार्डची अर्धी इनिंग कथेत दिवसकार्याच्या दिवशी मागे मांडवात बसून पोरांच्या चाललेल्या चर्चा याचं उदाहरण म्हणून बघता येईल. लोकसमूहांचा अभ्यास असल्या शिवाय असं लिहिणं कठीण.
वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची इतकी सखोल नोंद मराठी साहित्यात आलेली माझ्यातरी वाचनात नाही. विवेक कुडूच्या कथांची शीर्षकंसुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारची आणि काव्यात्म आहेत उदाहरणार्थ ‘भीमा अबोल होण्याअगोदरचे काही दिवस दिवस’. विवेक कुडू यांचं मन असंच करुणेनं भरलेलं आणि हात लिहिते राहो.
हेही वाचा:
एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?
(चार चपटे मासे या कथासंग्रहाच्या प्रकाशनावेळी प्रसाद कुमठेकर यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश आहे)