मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.
मनोरंजन ब्यापारी. त्यांनी आयुष्यात सगळं भोगलं. सोसलं. फाळणीनंतरच्या उलथापालथी पाहिल्यात. त्याचे भीषण अनुभवही घेतले. जातीभेदाच्या अत्याचाराचे चटके सहन केले. रोजीरोटीसाठी म्हणून अनेक शहरं पालथी घातली. ते करताना त्यांना स्वतःचीच नव्यानं ओळख झाली.
रिक्षा चालक एक वाचक झाला. आणि वाचता वाचता एक संवेदनशील लेखक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचं दलित असणं अनेकवेळा या सगळ्याच्या आड येत गेलं. प्रस्थापित साहित्याची नकारघंटाही ऐकायली मिळाली.
मनोरंजन ब्यापारी चालत राहिले. त्यांनी जे भोगलं तोच त्यांच्या साहित्याचा विषय ठरला. अनेक कथा, कादंबऱ्या लिहीत असताना त्यांनी कुक म्हणून काम करत आपल्या रोजीरोटीची सोयही केली. त्यांचं आयुष्य स्वप्नातल्या कथेपेक्षा कमी नाहीय. खाचखळग्यांनी भरलेली त्यांची कथा आहे. पण या कथेत मिर्ची मसाला नाहीय. रिक्षेतलं पुस्तक वाचणं आता थेट लायब्ररीत पोचलं. हा प्रवास साधा सोप्पा नक्कीच नाही. त्यामागची धडपड आजही कायम आहे.
हेही वाचा : सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?
मनोरंजन ब्यापारी यांचा जन्म बांगलादेश म्हणजेच तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातल्या बरिसाल या भागात झाला. ते अवघे तीन वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालमधे आलं. सुरवातीच्या काळात एका छावणीत त्यांच्या कुटुंबाला विस्थापित म्हणून राहावं लागलं. तिथलं बेहाल करणारं जगणं त्यांनी अनुभवलं.
वयाच्या चौदाव्या वर्षी आपलं घर सोडलं. गोहाटी, वाराणसी, दार्जिलिंग, लखनौ, दिल्ली आणि अलाहाबाद अशा शहरांमधे त्यांनी तुटपुंज्या पगारात काम केलं. पण मन काही रमत नव्हतं. शेवटी १९७३ मधे ते पुन्हा कोलकत्यात आले.
पाटणामधल्या एका लिटरेचर फेस्टिवलमधे त्यांनी आपल्या आयुष्याची चित्तरकथा सांगितलीय.त्यांचं बालपण चहा विकण्यात, बकऱ्या, गायी चारण्यात गेलं. लहानपणी भुकेमुळे आपल्या मोठ्या बहिणीचा जीव जाताना त्यांनी पाहिलं होतं. काही काळ ते छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे जवळपास २६ महिने त्यांना जेलची हवाही खावी लागली.
पण या काळात त्यांनी बंगाली अक्षरांची तोंडओळख जेलमधल्या आपल्या सहकाऱ्यांकडून करून घेतली. बाहेर आल्यावर त्यांना बऱ्यापैकी बंगाली लिहिता वाचता येत होतं. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांनी रिक्षा चालवली.
साल १९८०. तब्बल ४० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. कोलकात्याच्या यादवपूर भागात विद्यासागर ज्योतिष रॉय नावाचं एक कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या जवळ एक रिक्षा स्टँड होता. मनोरंजन ब्यापारी तिथेच भाडं नसलं की ते रिक्षात निवांत पुस्तक वाचत बसायचे. असंच एकदा एक पुस्तक वाचत असताना जिजिविषा या शब्दापाशी येऊन ते अडकले. त्याचा अर्थ त्यांना समजत नव्हता. आजूबाजूच्या इतर दोस्तांना त्यांनी शब्दाचा अर्थ विचारला. पण त्यांनाही काही कळेना. उलट यावरून त्यांची टिंगलटवाळी केली. पण त्यांना मात्र या एका शब्दानं स्वस्थ बसू दिलं नाही.
या शब्दाचा नेमका अर्थ काय याची उत्कंठा त्यांना सतावत होती. कॉलेजच्या आसपास त्यांच्या वारंवार फेऱ्या व्हायच्या. असंच एकदा कॉलेजच्या मेन गेटमधून एक मध्यम वयाची महिला त्यांना बाहेर येताना दिसली. सुती साडी नेसलेली आणि एक पिशवी खांद्यावर घेतलेली महिला काही तरुणींशी बोलत होती. ही महिला कुणीतरी प्रोफेसर असावी असं त्यांना मनातल्या मनात वाटलं असावं.
रिक्षा सुरू झाली. प्रश्न विचारावा की नाही या विचारात होते. शेवटी मनाची तयारी करून 'मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो?' असं त्यांनी विचारलंच. 'जिजिविषाचा अर्थ काय?' एका रिक्षाचालकाच्या या प्रश्नानं त्या अवाक झाल्या. त्यांनी उत्तर दिलं 'जगण्याची इच्छा'. या उत्तरानं त्यांचं समाधान झालं.
'तुला हा शब्द कुठं मिळाला?' रिक्षेत बसलेल्या त्या प्रवासी महिलेनं विचारलं. त्यानं आपल्या सीटखालच्या बॉक्समधून एक पुस्तक काढलं. ते दाखवत म्हणाला, 'मी अग्निगर्भ नावाची कादंबरी वाचतोय. यामधे हा शब्द सापडला. या शब्दानं मला इतकं अस्वस्थ केलं.' टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखात हा प्रसंग वाचायला मिळतो.
ज्या पुस्तकातल्या एका शब्दाच्या अर्थामुळे आपण अडलो त्याचा अर्थ थेट पुस्तकाच्या लेखिकेकडून मिळेल याची कल्पनाही रिक्षा चालक असलेल्या मनोरंजन व्यापारी यांनी तेव्हा केली नसेल. त्या लेखिका होत्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी. कार्यकर्ती लेखिका अशी एक वेगळी ओळख त्यांची भारतीय साहित्य विश्वात कायम आहे. वंचितांच्या जगण्यामरण्याचे प्रश्न त्यांच्या कथा कादंबऱ्यांचे कायम विषय राहिलेत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
साहित्य, साहित्य विश्व नेमकं काय असतं हे समजावं इतकं मनोरंजन व्यापारी यांचं वाचनही नव्हतं. तशी परिस्थितीही नव्हती. पण एक रिक्षाचालक म्हणून मनोरंजन व्यापारी यांच्या आयुष्यातला हा प्रसंग टर्निंग पॉईंट ठरला. महाश्वेता देवी यांनी आपल्या मॅगजीनमधे लिहिण्याची ऑफर दिली. तोपर्यंत एका मोठ्या लेखिकेची ओळख त्यांना व्हायची होती. थेट लिहायचा प्रस्ताव मिळणं ही गोष्ट त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
'मी अशिक्षित आहे. शाळेत गेलो नाही. आजपर्यंत वाचायला शिकलोय ते माझ्या प्रयत्नातून. आजही शब्दांशी मोडतोड करूनच वाचतोय. अशा स्थितीत लिहायचं काम कसं करू शकतो?' या त्यांच्या नकारात्मक उत्तरानं त्या विचलित झाल्या. आपलं
मॅगजीन समाजातल्या गरीब, आदिवासी आणि मागासलेल्यांच्या कहाण्यांवर असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय तू चांगलं लिहू शकतोस हा विश्वास त्यांनी दिला.
ब्यापारींनी त्यांच्याकडे पत्ता मागितला. त्यांनी पत्ता दिला आणि निघून गेल्या. पत्त्यावरचं नाव पाहून ते चकित झाले.
आजपर्यंत तोडकं मोडकं वाचन करणाऱ्या एका सामान्य रिक्षावाल्याला लिहितं होण्याची संधी महाश्वेता देवी यांच्यामुळे मिळणार होती. ही संधी आपल्याला पश्चिम बंगालचा सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार असलेल्या बंगाल अकादमी पुरस्कारापर्यंत पोचवेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. त्यांनी आयुष्यातलं पहिलं मोडकतोडकं लिहिलं तेही रिक्षावाल्यांच्या जीवनावर. 'रिक्शा चालाई' या नावाचं. १५ पानांची ही कथा होती. ही छोटी सुरवात पुढं बंगाली साहित्यात वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली.
१९८१मधे लेखक म्हणून त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. रिक्शा चालाई या छोट्या कथेनंतर जिजिविषा या टोपण नावानं बंगालच्या साहित्य विश्वात ते ओळखले जाऊ लागले. मदन, कालिदास कथक, अरुण मित्र या नावानं त्यांनी लेखन केलं. यात महाश्वेता देवी यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा इंग्रजीत अनुवादही झालाय. २०१४ मधे त्यांना बंगाल साहित्य अकादमीने सुप्रभा मुजुमदार पुरस्कार दिला.
त्यांच्या पुस्तकांमधे प्रामुख्याने दलित वर्गाचं जीवन आणि नक्षलवाद यांचा उल्लेख विस्ताराने येत असल्याचं निरीक्षण बीबीसी हिंदीच्या एका लेखात वाचायला मिळतं. 'चांडाळ जीवन' या आत्मकथेत बंगालमधला दलित ज्या उपेक्षा आणि दडपशाहीला सामोरे गेलेत त्या अनुभवनांची नोंद यात आहे. हे पुस्तक आल्यावर त्याची जगभर चर्चा झाली. मात्र भारतीय साहित्य विश्वानं याकडे काहीसं दुर्लक्ष केलं. ते ज्या जात आणि वर्ग समूहातून आले त्या समूहाच्या हाल, अपेष्टा आणि उपेक्षेचं जीवन त्यांच्या कथा कादंबऱ्यांतून येतं.
हेही वाचा : ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?
हे सगळं सुरू असतानाच १९९७ पासून मनोरंजन व्यापारी हे कोलकत्याच्या एका मूकबधिर शाळेत मुलांसाठी जेवण बनवायचं काम करत होते. दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी हे काम केलंय. पण आता वय साथ देत नाही. तब्येतीच्या कुरबुरी आहेतच. शिवाय या वयात उभं राहून जेवण बनवणं त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राची दखल घेत त्यांना बंगालमधल्या विद्यानगर इथल्या जिल्हा वाचनालयात लायब्ररियन म्हणून पाठवण्यात आलंय.
'ही माझ्या स्वप्नांची जागा आहे. रोज हजारो पुस्तकांनी वेढलं जाणं हे स्वप्न साकार झाल्यासारखंच आहे. जितकी हवी तितकी पुस्तक मी वाचू शकतो.' असं एका मुलाखतीत मनोरंजन ब्यापारी म्हणतात.
आपली सर्वश्रेष्ठ कथा येणं अजून बाकी आहे असं म्हणत ते आपल्या भविष्याची दिशाही स्पष्ट करतात. इतके वर्ष किचनमधे रमणारे मनोरंजन व्यापारी आता खऱ्या अर्थाने चोवीस तास पुस्तकांमधे रमतील. त्यांचं वाचण आणि जगणं आता सर्वार्थाने समृद्ध होईल. ज्याची ओढ त्यांना होती.
हेही वाचा :
केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू
आपल्याला अग्निवेश यांच्यासारखे 'स्वामी' का नको असतात?
कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!
या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय