`सिंघम` सिनेमात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. बाजीराव सिंघमच्या गरजा कमी असल्यामुळे कोणताही जयकांत शिखरे त्याला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं. कारण त्यांच्या साधेपणामुळे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना परवडू शकला. आज १७ मार्चला त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.
संजय वालावलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातले प्रमुख पदाधिकारी. ते मनोहर पर्रीकरांचे म्हापशातले दोस्त. वर्गमित्रच. चार वर्षांपूर्वी त्यांच्या साठीचा कार्यक्रम म्हापशात झाला. तिथे पर्रीकरांनी आपल्या खुशखुशीत शैलीत एक किस्सा सांगितला. तो राजकीयदृष्ट्या वगैरे महत्त्वाचा नाहीच. तरीही सांगायला हवा असा.
मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये म्हापशाचा एकजण पर्रीकरांकडे काहीतरी काम घेऊन गेला. त्यांनी ते काम पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं. पण टॅक्सीतून परतताना तो माणूस भेटेल त्याला पर्रीकरांच्या नावाने शिव्या देतच होता. त्याला वाटलं, आपलं काम काही होत नाही. शिव्या ऐकणाऱ्या टॅक्सीवाल्याने मात्र पर्रीकरांना ते जाऊन सांगितलं.
लवकरच पर्रीकरांनी त्या माणसाचं काम केलं. त्या माणसाला पणजीला बोलावून घेतलं. आणि सांगितलं, मी तुझं काम केलं नाही, असं ज्यांना ज्यांना सांगितलंस, त्यांना जाऊन सांग की पर्रीकराने माझं काम केलंय. तो समोरचा माणूस वरमला. त्याने माफी मागत सांगितलं, तेव्हा मी रागाच्या भरात कोणाकोणाला सांगितलं ते आता कसे भेटणार?
पर्रीकर म्हणाले, मीदेखील त्यातून शिकलो. एकदा रागाच्या भरात तोंडातून गोष्ट बाहेर पडली की त्याचं स्पष्टीकरण कोणाकोणाला द्यायचं? तेव्हा मी ठरवलं, आपण आपल्या बोलण्यावर ताबा ठेवायचा, तसा मी आता ठेवतो आहे. एखादा नेता स्वतःला घडवत कसा प्रगल्भ बनवतो, त्याचं हे छोटं उदाहरण आहे.
पर्रीकर स्वतःला सतत बदलवत राहिले, हेच त्यांचं मोठेपण होतं. गोवा बदलत होता, त्याबरोबर ते बदलत राहिले. स्वतःतल्या बदलांबरोबर त्यांनी गोव्याला बदलवलं. म्हणून आज वयाच्या ६४व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. तेव्हा गोव्याच्या राजकारणात मोठी पोकळी तयार झाली. गोव्याचं राजकारण बहुतेक एका नव्या बदलाच्या उंबरठ्यावर उभं ठाकलंय.
गोवा मुक्त झाल्यानंतर भाई सातर्डेकरांच्या पाठोपाठ धर्मानंद नाडकर्णीं संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनून गोव्यात आले. आता ते संन्यासी बनलेत. पण तेव्हाही त्यांची मिशनरी जिद्द संन्याशॉचीच होती. त्यांनी पणजी म्हापशातली टीनेजर मुलं जोडली. त्यात म्हापशातल्या प्रभू पर्रीकरांच्या घरातला मनोहरही होता. संघाने त्याच्यावर कायमचं गारूड केलं. मुंबई आयआयटीतून शिकून परतल्यावरही संघाचं वेड अधिकच घट्ट झालं होतं.
ऐंशी साली भाजपची स्थापना झाली. तोवर संघाचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावरचं प्रेम आटलं होतं. संघाने आपले चार पदाधिकारी मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजेंद्र आर्लेकर भाजपला दिले. नव्वदच्या दशकात गोव्यात रोज विश्वासघाताची सत्ता सुरू होती. आयाराम गयाराम संस्कृतीचं राजकारण सुरू होतं. सरकारं सतत कोसळत असायची.
अशावेळेस ही तिशीच्या आसपास असणारी तरुण मंडळी नवी धडपड करत होती. एकेक माणूस जोडत होती. निवडणुका लढवून हरत होती. पण अयोध्येने त्यांना हात दिला. मनोहर पर्रीकर स्वतः रामलल्लाचा जयजयकार करत कारसेवक बनून अयोध्येला गेले होते.
पर्रीकरांच्या रूपाने देशातला पहिला आयआयटीयन १९९४मधे आमदार बनला तेव्हा भाजपच्या आमदारांची संख्या फक्त चार होती. श्रीपाद नाईक त्यांचे नेते होते. श्रीपाद भाऊ गोव्यात राहतील आणि पर्रीकर दिल्लीत राष्ट्रीय राजकारण करतील, असा तेव्हाचा प्लान होता. पण झालं उलटंच. पर्रीकर १९९१ आणि ९६ असे दोनदा लोकसभेच्या निवडणुकीत दणकून पडले. ते ९६ साली संसदेत पोचते, तर त्यांचं करियर वेगळ्याच उंचीवर गेलं असतं. पण झालं उलटंच. श्रीपाद नाईक १९९९ पासून सलग खासदार आहेत.
गोव्याचा इतिहास पाहता पर्रीकरांना दिल्लीला पाठवायचा प्लान रूढ अर्थांनी योग्यच होता. कारण आधुनिक गोव्याचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्याची राजकीय मशागत केली ती बहुजनवादाच्या नांगरानेच. वर्षानुवर्षं सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक सत्ता हातात असलेल्या सारस्वत समाजाच्या विरोधात गोव्याने राजकीय बंड यशस्वी करून दाखवलं होतं. त्यामुळे गोव्यात एखादा सारस्वत मुख्यमंत्री बनू शकेल, याचा कुणी विचारही करू शकत नव्हतं. पण मनोहर पर्रीकर गोव्याचे उच्चवर्णीय समाजातले पहिले मुख्यमंत्री बनले.
हेही वाचाः पर्रीकरांचं फोटोसेशन भाजपच्या अंगलट
हे अशक्य शक्य करून दाखवण्यामागे पर्रीकरांचा प्रामाणिकपणा होता, प्रचंड मेहनत होती आणि जातीपलीकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोनही होता. ९४ साली विधानसभेत आल्यावर गोव्याची विधानसभा जणू त्यांच्या प्रेमात पडली आणि पर्रीकर विधानसभेच्या. ते त्यांचं प्रेम अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शाबूत होतं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन ते बजेट मांडायला विधानसभेत आले होते, त्यामागची ओढ या प्रेमाचीच होती. ९९ला विरोधी पक्षनेते बनल्यावर तर सबंध गोवाच त्यांच्या प्रेमात पडला. नव्या शतकात नव्या गोव्याने आपलं नवं नेतृत्व निवडलं. गोव्याच्या तरुणाईने जातीची बंधनं झुगारली. पर्रीकर गोंयचे नवे पात्रांव बनले.
२०००, २००२, २०१२ आणि २०१७ असे चारवेळा पर्रीकर मुख्यमंत्री बनले. पहिल्यांदा एका भ्रष्ट मंत्र्याला काढून टाकल्यामुळे त्यांचं सरकार पडलं. दुसऱ्यांदा सहकाऱ्यांनी दगा दिला. तिसऱ्यांदा ते संरक्षणमंत्री बनून आणि आता चौथ्यांदा ते जग सोडून गेले. या चार टर्ममधे बदललेले पर्रीकर गोव्याने अनुभवले. काहींना तो प्रवास तत्त्वनिष्ठेकडून तडजोडीकडे जाताना दिसला. कधी लोककल्याणाकडून लोकानुयायाकडे जाताना दिसला. काहींना तो प्रचंड विश्वासार्हतेकडून तितक्याच अविश्वासाकडेही जातानाही वाटला.
विरोधात असताना पर्रीकर बहुजन मतदारांचा विश्वास कमवायचे. सत्तेत गेल्यावर विरोधक त्यांच्याविरोधात जातीचं कार्ड वापरायचे. त्यांच्या आसपासचं कोंडाळं कथित वरच्या जातीतल्यांचंच असल्यामुळे ते अनेकदा चालूनही जायचं. सत्ता गेली की पर्रीकर पुन्हा लोकांत घुसायचे. विश्वास जिंकायचे. मीच बहुजनांचा सगळ्यात मोठा नेता आहे, असं त्यांनी बोलूनही दाखवलं.
हेही वाचाः साधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय?
हा शापशिडीचा खेळ सुरूच राहिला. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत तर त्याचा उद्रेक झाला. बहुजनांनी विशेषतः ओबीसींनी भाजपला नाकारलं. पर्रीकरांच्या विश्वासार्हतेला तो जबर धक्का होता. पण त्यानंतर त्यांना आजारपणामुळे वेळच मिळाला नाही. आता तर तो विश्वास कमावू शकेल असा दुसरा पर्रीकर भाजपकडे नाही.
जातीचं गणित पुरेसं नाही, हे लक्षात आल्यानंतर पर्रीकरांनी सर्व धर्माच्या लोकांना विशेषतः ख्रिश्चनांना सोबत घेण्याचं यशस्वी राजकारण केलं. त्यांना सगळ्यात मोठं यश मिळवून देणाऱ्या २०१२च्या निवडणुकीत त्यांनी ६ ख्रिश्चन आमदार कमळाच्या चिन्हावर आणि आणखी तिघे भाजपसमर्थक ख्रिश्चन आमदार निवडून आणले. आज २०१७च्या निवडणुकीत भाजपचे १३ आमदार निवडून आले. त्यात फक्त दोघेच संघाचे स्वयंसेवक होते. तर तब्बल सात ख्रिश्चन होते. आज भाजपचा विधानसभेतला डोलारा याच ख्रिश्चन आमदारांवर टिकलाय.
हे परिवर्तन एका कट्टर संघवाल्या स्वयंसेवकाने घडवून आणला, हे आश्चर्य. अयोध्येत कारसेवेसाठी जाणारा स्वयंसेवक. पहिल्या टर्ममधे गुड फ्रायडेची सुटी रद्द करणारा मुख्यमंत्री. फ्रान्सिक झेवियर्सच्या फेस्तावर टीका करणारा हिंदुत्ववादी. ते थेट चर्चचा निवडणुकीत पाठिंबा मिळवणारा नेता. श्रीराम सेनेवर गोव्यात बंदी घालणारा किंवा गोमांसविक्रीवरून देशभर वादळ उठलं असताना गोव्यातली भाजप वेगळी आहे, हे सांगणारा सर्वांना आपलं म्हणणारा मुख्यमंत्री, हा पर्रीकरांनी स्वतःत घडवून आणलेला बदल होता.
आपण सहिष्णू आहोत, हे सांगण्यासाठी लालकृष्ण अडवाणी थेट पाकिस्तानातल्या मोहम्मद अली जिनांच्या कबरीवर माथा झुकवून आले. नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकासचा नारा देत राहिले. पण अल्पसंख्यकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. गोव्यात मात्र हे घडलं. त्याचं कारण पर्रीकरांनी आपल्या निष्कलंक चारित्र्याने कमावलेला विश्वास होता.
`सिंघम` गोव्यातला सिनेमा आहे. तिथलीच स्टोरी आहे आणि लोकेशनही तिकडचीच आहेत. त्यात एक डायलॉग आहे, ‘मेरी जमीर में दम हैं, क्यों कि मेरी जरुरतें कम हैं’. गरजा कमी असतील तो आपली प्रामाणिकपणाशी बांधिलकी टिकवून ठेवू शकतो, अशा शब्दांत बाजीराव सिंघम सांगतो ते आपल्याला पटतं. कुणीही जयकांत शिखरे सिंघमला विकत घेऊच शकत नाही, हे पटतं. तसंच पर्रीकर भ्रष्टाचार करणार नाहीत, हेही गोव्यातला लोकांला माहीत होतं.
पर्रीकरांचा साधेपणा आजच्या झगमगाटी राजकारणाला साजेसा नव्हता. पण तोच साधेपणा त्यांची सगळ्यात मोठी ताकद बनला. साधेपणामुळे असलेल्या कमी गरजांतून त्यांची भक्कम बांधिलकी उभी राहिली. ती कुणालाही विकत घेणं शक्य नव्हतं. एकाच वेळेस कर्तबगार आणि बुद्धिमान तरीही आपलं हे कर्तृत्व विकायला तयार नसणारा प्रामाणिक नेता म्हणून पर्रीकरांनी मिळवलेली ओळख त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली.
गोव्यासारख्या लोकसभेत अवघे दोन खासदार असणाऱ्या राज्याचा नेता संरक्षणमंत्री बनला. ते पद त्यांनी केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवलं होतं. आजवरच्या राजकारणात कुणीही गोमंतकीय इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचलेला नाही. फक्त राजकारणच नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रातदेखील गोव्यात लहानाचा मोठा झालेला कुणी अशा सर्वोच्च पदावर पोहोचल्याचं उदाहरण लगेच डोळ्यासमोर येत नाही.
असं असतानाही देशाची सेवा करण्याची सर्वोत्तम संधी असतानाही केवळ राजकीय तडजोड म्हणून मनोहर पर्रीकर गोव्यात परतले. नरेंद्र मोदी राफेल करारावर पॅरिसमधे सह्या करत असताना पर्रीकर पणजीत मांडवी नदीच्या किनाऱ्यावर मासे विकायच्या गाड्याचं उद्घाटन करत होते, तेव्हाच याची लक्षणं दिसू लागली होती.
ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले त्याला अगदी परवाच १४ मार्चला दोन वर्षं झाली. कधीकाळी भ्रष्ट मंत्र्याला काढून टाकण्यासाठी सत्ता गमावणारे पर्रीकर भ्रष्टाचाऱ्यांसोबत सत्तेसाठी तडजोडी करताना दिसले. हाती बहुमत नसताना आपल्या पूर्वपुण्याईच्या जोरावर लोकशाहीची चेष्टा करताना दिसले. त्यात त्यांचं आजारपण आलं. त्यात त्यांची झालेली परवड. त्यांचा संघर्ष. त्याचं झालेलं आणि आजही श्रद्धांजलीच्या नावावर सुरू असलेलं राजकारण हे पर्रीकरांविषयी प्रेम असणाऱ्या सगळ्यांसाठीच वेदनादायी ठरतंय.
हेही वाचाः