मांडूळ : लढणाऱ्या माणसांच्या कथा

२७ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ३ मिनिटं


अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरतायत. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार. याच समस्येला कथाविषय बनवून लेखक जयवंत बोदडे यांनी 'मांडूळ' हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आणलाय. त्यातून शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. तसंच अनेक लढाऊ नायिकाही या कथांमधून आपल्याला भेटत राहतात.

जयवंत बोदडे हे खानदेशातले एक धडपडणारे लेखक! सतत त्यांची लेखनासंबंधी धडपड सुरू असते. तसा तर त्यांचा पिंड शिक्षकाचा. उमदा उपक्रमशील आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. असा हा उपक्रमशील शिक्षक संवेदनशील मनाचा आहे. त्यांच्या ह्या संवेदनशील मनाला सर्जनाचा आणि नवनिर्मितीचा नाद आहे. या नादापायी ते सतत लिहिते असतात.

‘घुंगराची गाडी’ बालकविता संग्रह आणि ‘टिच्चू आणि बिल्लास’ बालकथासंग्रह त्यांचे मुलांसाठी प्रसिद्ध आहेत. सोबतच ‘पोर्ट्रेट’ नावाचा कवितासंग्रहही प्रकाशित झाला आहे. त्यांचा  ‘मांडूळ’ हा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे.

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

खितपत पडलेल्या समाजाचं चित्रण

मांडूळ हे शीर्षक वैशिष्ट्यपूर्ण आहे. लेखक ज्या प्रदेशातून येतो तो मुक्ताईनगर तालुका आणि त्याच्या आजूबाजूला लागून असलेला जंगल प्रदेश हा नेहमीच मांडूळ तस्करी आणि वन्य प्राण्यांच्या अवैध शिकारींमुळे चर्चेत राहिलेला आहे. विशेषकरून इथले आदिवासी, ग्रामीण शेतमजूर, शोषित, वंचित, दलित समाज -  भूलथापा, अनिष्ट प्रथा-परंपरांचा बळी ठरलेला आहे.

अजूनही तो पराकोटीच्या दारिद्र्यात आणि अज्ञानात जगताना दिसतो. राजकीय नेतृत्वाकडून विकासाच्या वल्गना केल्या जात असल्या तरी इथला समाज कष्ट, यातना, दुर्दैवाच्या खाईत कसा खितपत पडलेला आहे, याचं मूर्तिमंत चित्रण म्हणजे मांडुळ हा कथासंग्रह होय!

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्यामुळे लेखकाचा ग्रामीण भागाशी, तिथल्या जनसामान्यांच्या जगण्याशी जवळचा संबंध येतो. त्यांची बहुतेक सेवा मुक्ताईनगर परिसरात गेल्यामुळे लेखकाने या प्रदेशातलं लोकमानस सजगपणाने आपल्या कथालेखनातून चित्रित केला आहे.

‘वढोडा-डोलारखेडा राखीव वनक्षेत्र’ असेल किंवा ‘पूर्णाकाठची वेदना’ असेल - लेखक लिलया तिथल्या भूप्रदेशासह चितारतात आणि सजीव पात्रांची निर्मिती करत जातात. पूर्व खानदेशातल्या तावडी बोलीकथांना अनोखं कथन रूप प्रदान करतं.

मांडूळांची शिकार हाच कथाविषय

अनेक वन्यजीव लोकांच्या अज्ञान, खोट्या प्रलोभनांचे बळी ठरत आहेत. वाघांची, हत्तींची किंवा हरणांची शिकार अनेक कारणांनी केली जाते. बहुतेक शिकारी अज्ञानातून आणि लालसेपोटी घडत असतात. मांडूळांची शिकार हा त्यातलाच एक प्रकार.

या समस्येलाच कथाविषय बनवून लेखकाने शिकारीआडून चालणाऱ्या विविध अनिष्ट प्रकारांची भांडाफोड केली आहे. त्यातून लेखकाने वन्यप्राण्यांची बाजू समाजासमोर मांडलेली दिसते. ही मोठीच कामगिरी म्हणायला हवी. जंगल किंवा मुके प्राणी यांच्या व्यथा वेदना मांडणारा हा लेखक म्हणूनच महत्वाचा ठरतो.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

ग्रामीणांच्या अधोगतीची कारणमीमांसा

लेखकाचा मन:पिंड हा शोषित, वंचित, दलितांच्या बाजूने आहे हे उघडच आहे. म्हणूनच तो त्यांच्या उत्थानाच्या गोष्टी सांगतो. या घटकांच्या अवनतीला कारणीभूत असलेल्या कथावस्तूंची मांडणी करतो. ग्रामीणांच्या अधोगतीची कारणमीमांसा करणारी ही कथा आहे.

व्यसन हा कुठल्याही कुटुंबाला गर्तेत नेऊन सोडणारा घटक आहे. व्यसनापायी अनेक कुटुंबं धुळीला मिळालेली आपण पाहिली आहेत. व्यसन हा कुटुंबाच्या प्रगतीतला प्रमुख अडथळा आहे हा धागा पकडून लेखकाने या संग्रहात ‘दारूबंदी’ ही कथा लिहिली आहे.

दारूमुळे सुखासमाधानाने नांदणारं कुटुंब कसं रसातळाला जातं याचं वर्णन ही कथा करते. व्यसनाचा हा विळखा तोडून टाकण्यासाठी सरसावलेल्या रणरागिणींचीही ही कथा आहे. या कथेतल्या भागाबाई वाड्यातल्या आपल्या भगिनींचा संसार सावरण्यासाठी पुढे सरसावताना दिसते.

कथेतल्या लढाऊ नायिका

अशीच लढाऊ स्त्री ‘राक्षस’ या कथेतून भेटते. या कथेतली नायिका जेवली ही सोशिक आहे. नवऱ्यासाठी आणि कुटुंबासाठी ती सतत झटत असते. काबाडकष्ट करत असते. मुलाबाळांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास, घरातली कामं आवरून शेत शिवारात राबत असते. एवढं सारं करूनही नवरा तिला मारझोड करत असतो. शिवाय संशयाची पालही त्याच्या मनात चुकचुकत असते.

व्यसनाच्या आहारी गेलेला हा धनराज टोकाचा निर्णय घेत बायकोला संपवायला निघतो; पण जेवली यातून आपली सुटका कशी करून घेते, याची ही कथा आहे. या कथेतल्या नायिकासुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबाला सावरताना दिसते. अशा लढाऊ नायिका निर्माण करून लेखकाने चांगला संदेश दिलेला आहे.

कथासंग्रह : मांडूळ
लेखक : जयवंत बोदडे
प्रकाशन :  अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव
पानं : १०८ किंमत : १७५

हेही वाचा: 

एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?

(साभार - कर्तव्य साधना)