महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं सेवाग्राम. पण तरीही गांधीजींच्या आयुष्यात मुंबईला खूप मोठं महत्त्व आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक निर्णायक घटना मुंबईत घडल्या. मुंबईच्या किनाऱ्यावरून सुटाबुटात इंग्लंडला गेलेल्या मोहनदासचा, उघडाबंब महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या शहराच्या साक्षीनं झालाय.
संध्याकाळचे साडेसहा वगैरे वाजलेले असतात… मुंबईच्या ओवल मैदानाच्या कडेकडेने अक्षरशः लाखो जण दररोज चर्चगेट स्टेशनात ट्रेन पकडण्यासाठी धावत असतात... समोर समुद्रात सूर्य अस्ताला जात असतो आणि गर्दीतल्या प्रत्येकाला आपलं घर दिसत असते... खरं तर गर्दीतल्या कुण्णाकुणालाच आजूबाजूला पाहायची फुरसत नसते…
प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ६.३२, ६.४७, ६.५३ अशा ट्रेनच्या वेळा आणि त्यातली तुटुंब गर्दी दिसत असते… त्या लाखो जणांसारखेच गांधीजीही संध्याकाळी याच चर्चगेट स्टेशनवरून सांताक्रूझला जाण्यासाठी ट्रेन पकडायचे… अगदी अस्सल मुंबईकरासारखे घड्याळ्याच्या काट्याच्या तालावर धावत!
हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते
१९०२ च्या सुमारास मोहनदास करमचंद गांधी नावाचे वकील दुसऱ्यांदा मुंबईत आले होते. फोर्टातल्या 'पेन, गिल्बर्ट अँड सयानी'च्या कार्यालयात त्यांनी एक चेंबर भाड्याने घेतलं होतं. आधी ते गिरगाव बॅकरोड इथल्या केशवजी तुलसीदास यांच्या बंगल्यातला काही भाग भाड्याने घेऊन इथं राहात. पण, गिरगावातल्या काहीशा कोंदट आणि कमी उजेड येणाऱ्या घरात त्यांचा मुलगा मणिलाल आजारी पडला.
त्यामुळे त्याच्यावर हायड्रोपॅथिक उपचार करण्यासाठी त्यांनी रविशंकर झवेरी यांच्या सल्ल्याने सांताक्रूझला घर घेतलं. सांताक्रूझवरून ते दररोज ट्रेन पकडून चर्चगेटला येत आणि संध्याकाळी तसेच परत जात. गर्दी टाळण्यासाठी त्यांनीही फर्स्ट क्लासचा पास काढला होता आणि तेही अनेकदा वांद्र्यापर्यंत येऊन मग फास्ट ट्रेन पकडत असत. होते की नाही गांधीजी कट्टर मुंबईकर?
खरं तर गांधीर्जीसारख्या वैश्विक माणसाला मुंबईकर म्हणणं संकुचित वाटतं. पण, मुंबईचं वैश्विक असणं समजून घेतलं, तर 'मुंबईकर गांधीजी' हे विधान पचवणं सोपं जातं. गांधीजीच्या मनात मुंबईविषयी 'स्पेशल फिलिंग' होतं. स्वतः गांधीजींनी ते अनेकदा व्यक्तही केलंय. त्यांनी मुंबईला 'फर्स्ट सिटी ऑफ इंडिया' म्हटलं.
एवढंच नाही तर, 'मुंबई हे शहर इथल्या संपत्तीमुळे किंवा उंच इमारतींमुळे सुंदर नाही, तर इथल्या माणसांच्या औदार्याने ते इतर शहरांपेक्षा वेगळं ठरलं आहे. मुंबई ही भारताच्या उज्ज्वल भविष्याचा विश्वास आहे.' असं स्वतः गांधींजी 'यंग इंडिया' मधे लिहितात. एखादं शहर एखाद्या महापुरुषाच्या आयुष्याला कसा आकार देतं, हे समजून घेणं म्हणूनच महत्वाचं आणि रोचक ठरतं ते यासाठीच.
मोहनदास गांधी नावाचा गुजरातमधला एक वकील आपलं भविष्य आजमावण्यासाठी आला तो या मुंबईच्या कोर्टात. याच मुंबईनं त्यांचं आफ्रिकेतून परतल्यावर मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. स्वातंत्र्यसंग्रामाची सूत्रं लोकमान्य टिळकांकडून गांधीजीकडे आली, ती याच मुंबईत. गांधीजी स्वदेशीची ओळख ठरलेला चरखा शिकले, तेही याच मुंबईत. सर्वात शेवटी गांधीजींनी ब्रिटिशांना 'चले जाव'चा इशारा दिला, तोही याच मुंबईतूनच. या सर्व घटना समजून घेतल्या, की मुंबई ही गांधीजींची राजकीय कर्मभूमी होती, हे पटत जातं.
हे नातं पाहताना, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून घडण्याची प्रक्रियाही त्याच वेळी घडते आहे. एकीकडे बंदर म्हणून मुंबईचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांची गर्दी मुंबईकडे येऊ लागली आहे. मूळच्या कोळी, आगरी यांच्यासोबत इतर भागातले हिंदू, पारशी, खिश्चन, मुस्लिम, ज्यू अशा नाना जातींच्या आणि नाना धर्माच्या लोकांनी या शहरात आपलं बस्तान बसवलं होतं.
सगळ्यांची मिळून एक नवी 'कॉस्मोपोलिटिन' संस्कृती यातूनच जन्माला येत होती. वाढत्या लोकसंख्येमुळे हे शहर हळुहळू महानगर झालेलं आहे. पूर्वेकडचा लंडन असा उल्लेख इंग्रजी लेखनामधे होत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशातील व्यापाराच्या आर्थिक नाड्या मुंबईकडे येत गेल्या. आधुनिक भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई नावारूपाला येते ती इथूनच. त्यामुळे हीच मुंबई देशातल्या अनेक सामाजिक, राजकीय चळवळींना पैसा पुरवू लागते आणि स्वातंत्र्यसंग्रामाचं मुख्य केंद्र बनते. गांधी-मुंबई नात्याच्या मुळाशी असलेली ही सामाजिक, आर्थिक प्रक्रिया समजून घेणं म्हणूनच आवश्यक ठरतं.
गांधीजी १८८७ मधे मॅट्रिक झाले. त्यावेळी ही परीक्षा देण्यासाठी गांधींजीकडे दोन पर्याय होते, एक अहमदाबाद आणि दुसरं मुंबई. गांधींनी अर्थातच अहमदाबाद निवडलं पुन्हा कॉलेजमधे प्रवेशाची वेळ आली तेव्हाही त्यांच्याकडे दोन पर्याय होते, भावनगर आणि मुंबई. पण, आर्थिक कारणांमुळे त्यांनी भावनगरची निवड केली. अखेर १८८८ मधे त्यांनी उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला.
समुद्र ओलांडून जाणार म्हणून जात-पंचायतीनं बंधनं घातली. तरीही गांधीजी मुंबईत आले आणि ४ सप्टेंबर १८८८ला 'क्लाइड' या बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. ही गांधींची पहिली मुंबई भेट. खरंतर, मुंबईच्या बंदरातून रवाना होणाऱ्या असंख्य बोटींपैकीच ती एक बोट होती. पण, त्या बोटीने गेलेला काठियावाडी मोहनदास भविष्यात राष्ट्रपिता होणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हतं.
१८९१ मधे गांधीजी लंडनमधून परत आले तेही मुंबईत. एस. एस. आसाम या बोटीने परत आलेल्या गांधीजींना नेण्यासाठी त्यांचा मोठा भाऊ बंदरावर आला होता. तेव्हाच त्यांना आई गेल्याचं कळलं. शिक्षणासाठी परदेशी असताना त्यांना धक्का बसू नये, म्हणून पत्र पाठवून कळवायचं नाही, असं त्यांच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं. त्यामुळे मुंबईच्या किनाऱ्यावर उतरताच गांधीजींना ही दुःखद बातमी कळली आणि त्यांना शोक अनावर झाला.
राजकोटला असताना आर्थिक अडचणी आल्या आणि पैसे कमवण्यासाठी मुंबईला जा, असा सल्ला त्यांना अनेकांकडून मिळाला. शेवटी सर्वांचं ऐकून, मुंबईत येणाऱ्या लक्षावधींप्रमाणे गांधीजीही 'पोट भरण्यासाठी' या शहरात आले. विलायतेतून शिकून आलेल्या गांधीजींनी नोव्हेंबर १८९१ मधे वकिली सुरू केली. तेव्हा ते गिरगावात राहायचे. तिथून बऱ्याचदा पायी कोर्टात यायचे. पण त्यांची वकिली काही चालत नव्हती. प्रत्येक नव्या मुंबईकराच्या वाट्याला येते ती स्ट्रगल काळातली निराशा गांधीर्जींनीही अनुभवली.
खर्च फार होत होता आणि उत्पन्न मात्र जवळपास नसल्यातच जमा. एका खटल्यात गांधीजींनी भर कोर्टात प्रतिवादच करता आला नाही आणि तिथून खजील होऊन बाहेर पडले. या प्रसंगानंतर त्यांनी कोर्टाला जो रामराम ठोकला तो दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत. दरम्यानच्या काळात त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्रात आलेली जाहिरात वाचून पार्टटाइम शिक्षकाच्या पदासाठी केला.
त्या नोकरीचे त्यांना प्रतिमहिना ७५ रुपये मिळणार होते. पण, पुन्हा मुलाखतीच्या वेळी माशी शिंकली. गांधीजींकडे पदवी नसल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना नोकरी नाकारली. आपल्याकडे असलेलं विलायतेतलं शिक्षण इथं बिनकामाचं आहे, ही भावना गांधीजींना खूप काही शिकवून गेली. इथं येणाऱ्या लाखोंप्रमाणे गांधीजीही शेवटी निराश झाले आणि काही महिन्यातच चंबुगबाळं गुंडाळून पुन्हा राजकोटला निघून गेले.
हेही वाचा: महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!
राजकोटला परतलेल्या गांधीजींना तिथंही काही करमत नव्हतं. शेवटी पुन्हा नव्याने शोधाशोध करताना त्यांना दक्षिण आफ्रिकेत संधी आहे असं कळलं. २४ एप्रिल १८९३ ला पुन्हा गांधीजी मुंबईला आले आणि आफ्रिकेकडे रवाना झाले. जी वकिली मुंबईत चालती नाही, ती आफ्रिकेत चालू लागली आणि गांधी नावाचा वकील स्थिरस्थावर होऊ लागला. याचवर्षी रेल्वेच्या पहिल्या दर्जाच्या डब्यातून बाहेर फेकण्याचा प्रसंग घडला आणि आत्मसन्मानाला नवी धार आली.
तीन वर्ष तिथं राहिल्यावर १८९६ मधे पुन्हा पत्नी आणि मुलांना नेण्यासाठी ते मुंबईवाटे राजकोटला आले. या वकिली दरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या मजुरांच्या प्रश्नाविषयी त्यांच्या मनात कणव निर्माण झाली. त्याबद्दल त्यांनी एक पत्रकही लिहिलं. 'ग्रीन पॅप्लेंट' म्हणून हे पत्रक प्रसिद्ध आहे. हे पत्रक घेऊन २६ वर्षाचे गांधीजी न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, बद्रुद्दीन तयबजी, फिरोजशहा मेहता आदी दिग्गजांना भेटले. त्यांना, मुंबईत सभा घेऊन दक्षिण आफ्रिकेतल्या प्रश्नाबद्दल बोलायचं होतं.
फिरोजशहा मेहता हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात. त्यांनी गांधीर्जीकडे भाषणाची प्रत मागितली. गांधीजींकडे ती नव्हती. 'हे असं मनाला येईल ते बोललेलं मुंबईत चालणार नाही' अशा शब्दात फिरोजशहांनी गांधींची खरडपट्टी काढली. तातडीने गांधीजींनी भाषण लिहून काढलं आणि फिरोजशाहांना दाखवलं.
२६ सप्टेंबर १८९६ला मेट्रो सिनेमासमोरच्या फ्रामजी कावसजी सभागृहात 'द बॉम्बे प्रेसिडन्सी'च्या बॅनरखाली गांधीजींची पहिली जाहीर सभा झाली. स्वतः फिरोजशहा मेहता या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. गांधीजींचा आवाज बारीक असल्याने तो शेवटच्या माणसापर्यंत ऐकू येत नव्हता. शेवटी वाच्छा यांनी गांधीजींचं भाषण वाचून दाखवलं. पण, ते लोकांना प्रचंड आवडलं.
या सभेनं गांधीर्जींना सार्वजनिक जीवनाची नवी कवाडं उघडून दिली. गांधी नावाचा वकील आता नेता झाला होता. त्यांच्यातलं हे नेतृत्त्व पहिल्यांदाच भारतीयांपुढे आलं ते या मुंबईत. या सभेनंतर ३० नोव्हेंबर १८९६ला गांधीजी मुंबई बंदरातून पत्नी कस्तुरबा आणि हरिलाल, मणिलाल या दोन मुलांना घेऊन आफ्रिकेला गेले.
पुढची वर्षे गांधीजींसाठी महत्त्वाची ठरली. १८९६ मधे आफ्रिकेत परतलेल्या गांधीर्जींना आता आफ्रिकेत राहायचं की भारतात असा प्रश्न पडू लागला होता. कारण भारताला त्यांची गरज आहे, असं गांधीजींचे गुरू असलेल्या गोपाळकृष्ण गोखलेंपासून अनेकांना वाटत होतं. पण, आफ्रिकेतलं त्यांचं आंदोलन आणि तिथला स्थिर झालेला व्यवसाय या साऱ्या कचाट्यात ते सापडले होते.
त्यामुळे या काळात त्यांनी भारतातही लक्ष घालण्याचं ठरवलं. गोखलेंशी त्यांचा संवाद सतत सुरूच होता. शेवटी १९०१ मधे गांधीजी पुन्हा एकदा मुंबईत आले. ते कोलकाता काँग्रेससाठी उपस्थित राहिले. दरम्यान गांधीर्जींनी पुन्हा एकदा मुंबईत वकिलीचा प्रयत्न केला. वकिलीच्या या दुसऱ्या प्रयत्नात त्यांना चांगलं यश मिळत होतं. लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेला लोकल प्रवासाचा अनुभव हा याच वेळचा. गांधीजी मुंबईत परतल्याचा गोखले यांना विशेष आनंद झाला होता, वकिलीसोबत ते आता राष्ट्रीय कार्यात मदत करू शकतील असं गोखले यांना वाटत होतं.
पण, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीयांचा लढा निर्णायक टप्प्यावर आला होता. नोव्हेंबर १९०२ ला गांधीजींना आफ्रिकेतल्या सहकाऱ्यांचं परतण्याचा आग्रह करणारं पत्र आलं. २५ नोव्हेंबरला गांधीजी पुन्हा आफ्रिकेत परतले. दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या या कामाने ऐतिहासिक यश मिळवलं.
आफ्रिकेतल्या आंदोलनाच्या यशानंतर ९ जानेवारी १९१५ला एसएस अरेबिया या बोटीने सकाळी साडेसातच्या सुमारास गांधीजी मुंबईत परतले. सकाळची वेळ आणि थंडीचे दिवस असूनही मुंबईच्या बंदरात गांधीजी आणि कस्तुरबांच्या स्वागतासाठी तुफान गर्दी जमली होती.
प्रचंड जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. सुटाबुटात गेलेले गांधीजी आफ्रिकेतील विजयानंतर पुन्हा परतले ते अस्सल काठियावाडी पेहरावामधे. 'मोहनदास गांधी' नावाच्या माणसाचा 'महात्मा गांधी' भारतातला प्रवास तिथून सुरू झाला.
१९१९ मधे रौलेक्ट कायद्याविरुद्ध गांधीर्जींनी त्यांचं देशातलं पहिलं राष्ट्रव्यापी आंदोलन छेडलं ते मुंबईतूनच. सत्याग्रहाची ती सुरवात होती. जिनं नंतर इंग्रजांना पळता भुई थोडी केलीय याच दरम्यान, गांधीर्जीच्या विविध ठिकाणी सभा होत्या. मोर्चे निघत होते. गांधी हे राष्ट्रीय आंदोलनात हळूहळू लोकप्रिय होऊ लागले होते.
हेही वाचा: बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
क्रॉफर्ड मार्केट म्हणजे आजच्या महात्मा फुले मंडईसमोरच्या सरदारगृहात झालेली टिळक गांधी भेट ही भारतीय इतिहासातल्या 'दोन युगांची भेट' आहे. १६ जून १९१८ ला गांधीजी टिळकांना भेटायला सरदारगृहात गेले. त्यावेळी या दोन महान नेत्यांनी मनसोक्त वाद घातला. विषय होता महायुद्धात बिटिश सत्तेला मदत करायची की नाही!
गांधीजींच्या मते, न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून हिंदी जनतेनं ब्रिटनला मदत करायला हवी. पण, भारतात लोकशाही स्थापन करण्याचं अभिवचन मिळाल्याशिवाय सहकार्य नाही, अशी टिळकांची भूमिका होती. हा वाद पुढे, 'गांधीजी तुम्ही संत आहात हो! पण राजकारणात संत नको असतात,' अशा टिप्पणीपर्यंत पोचला. या भेटीच्या वेळी जमनादास द्वारकादास उपस्थित होते. या ऐतिहासिक संवादाचं त्यांनी टिपण तयार केलं आणि ते अचूक असल्याचं गांधीजींकडून तपासूनही घेतलं.
जून १९१८ला गिरगावातल्या शांतारामाच्या चाळीत होमरुल चळवळीच्या समर्थनार्थ प्रचंड मोठी सभा झाली. या सभेला लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. १२,००० लोक या सभेला उपस्थित होते, असे संदर्भ सापडतात. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे तिन्ही नेते एकाच ठिकाणी उपस्थित असलेल्या या प्रसंगाचं छायाचित्र एम. बी. वेलकर यांनी आपल्या कॅमेरामधे बंदिस्त केलंय.
पुढे सरदारगृहात १ ऑगस्ट १९२०ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. लाखोंचा समुदाय अंत्ययात्रेत होता. रस्त्याच्या दुतर्फा लोक दाटीवाटीने उभे होते. इमारतींच्या गॅलऱ्यांतही माणसं उभी होती. पंडित नेहरू, बॅ. जिना, शौकत अली यांच्यासोबत गांधीजीही या अंत्ययात्रेला उपस्थित होते. एवढंच नाही तर महात्मा गांधींनी स्वत: टिळकांना 'खांदा' दिला. खरंतर, हा भारतीय स्वातंत्र्याचा लढा टिळकयुगाकडून गांधीयुगाकडे नेणारा ऐतिहासिक 'खांदेपालट' होता.
टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारलं. पण त्याची सुरवात टिळकांच्या मृत्यूच्या आधीच झाली होती. त्यांच्या या स्वदेशीच्या चळवळीला मुंबईतून तुफान प्रतिसाद मिळाला. स्वदेशीच्या आंदोलनात मुंबईत परदेशी कापडांच्या होळ्या पेटल्या. नुसतं परदेशी नको असं म्हणून चालणार नाही. त्याला पर्याय उभा करावा लागेल. म्हणूनच १८ जून १९१९ला मुंबईतल्या काळबादेवी इथं 'स्वदेशी भांडार' या एतद्देशीय कपड्याच्या दुकानाचं गांधीजींच्या हस्ते उद्घाटन झालं.
दुसरीकडे खिलाफत चळवळीने जोर पकडला होता. हा फक्त मुस्तिमाच प्रश्न नसून हिंदू-मुस्लिम एकतेचा प्रश्न आहे, अशी गांधीजींची धारणा होती. १८ ऑक्टोबर १९१९ला नागपाडा इथं गांधीजी खास अहमदाबादवरून आले होते. पहाटे दीडपर्यंत चाललेल्या या सभेला दहा हजाराहून अधिक माणसं उपस्थित होती.
पुढे टिळकांच्या मृत्यूनंतर या आंदोलनाला आर्थिक पाठबळाची मोठी गरज होती. गांधीजींनी यासाठी टिळक स्वराज फंडाची घोषणा केली. गांधीजीच्या या हाकेला मुंबईने भरभरून प्रतिसाद दिला. एक करोड रुपयांचा हा निधी गांधीजींनी सहज जमा केला. मुंबईतले व्यापारी, नोकरदार यांच्यासह कामगार, महिला यांनीही यात सहभाग घेतला. गांधीजींनी लोकांना 'एक्शन प्लान' दिला होता आणि लोक त्यात प्रचंड उत्साहाने सहभागी होत होते, हेच टिळक फंडाने सिद्ध केलं. 'बॉम्बे क्रॉनिकल' या नियतकालिकाने गांधीजींच्या या कर्तृत्वाचं कौतुक करण्यासाठी विशेष पुरवणीही प्रसिद्ध केली होती.
१९३० च्या दरम्यान गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह छेडला. समुद्रकिनारी असलेल्या मुंबईत तेव्हा अनेक मिठागरं होती. वडाळा, विलेपार्ले या भागात मोठ्या प्रमाणात हा सत्याग्रह झाला. गांधीर्जींच्या या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. हे आंदोलन त्यांना आपलं वाटत होतं.
देशसेविका नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महिला आंदोलक दारूची दुकानं बंद करत होत्या, परदेशी कपड्यांच्या दुकानासमोर आंदोलन करत होत्या. स्वातंत्र्याचं आंदोलन अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोचवण्यात गांधीजींना यश आलं होतं.
१९३१ मधे लंडनला गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी गांधीजींनी मुंबईच्या आझाद मैदानावर सभा घेतली. २९ ऑगस्टला एमएस राजपुताना या बोटीने गांधीजी लंडनकडे रवाना झाले आणि डिसेंबर १९३१ ला पुन्हा परतले. दोन्ही वेळी बंदरावर गर्दी जमली होती.
स्वातंत्र्याच्या या आंदोलनादरम्यान गांधीजींचं वास्तव्य गावदेवीच्या मणिभवन इथं असायचं. आज ही जागा मुंबईतलं गांधीजीचं स्मारक बनलंय. ४ जानेवारी १९३२ ला याच मणिभवनमधून गांधीजींना अटक झाली, साऱ्या देशभर संतापाची लाट पसरली. याच मणिभवनमधे गांधीजी सूतकताई करायला शिकले.
गांधीजींचं मणिभवनमधे वास्तव्य असताना, तिथून एक विणकर दादा नेहमी जात असत. गांधीजींनी त्यांना सूतकताई शिकवण्याची विनंती केली. त्यांनीही ही ती मान्य केली. गांधीजी त्यांच्याकडून नियमितपणे सूत बनवायला शिकू लागले. अशा रितीने चरखा चालवण्याचे वर्ग मणिभवनमधे सुरू झाले. चरखा आता स्वदेशी चळवळीची ओळख बनू लागला.
एवढंच नाही, चरख्यामधे सुधारणा व्हायला हवी म्हणून गांधीजींनी याच मणिभवनमधून राष्ट्रव्यापी स्पर्धा जाहीर केली. ज्यातून पुढे अत्याधुनिक पद्धतीचे विविध चरखे जन्माला आले. आजही आपल्याला मणिभवनमधे गांधी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पाहायला मिळतो. अमेरिकेच्या अध्यक्षांसह जगभरातल्या अनेक नेत्यांनी या वास्तूला भेट दिली आहे.
हेही वाचा: गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!
८ ऑगस्ट १९४२ला मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'चले जाव'ची घोषणा करण्यता आली. या सभेमधे ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. हा निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय १४ जुलै १९४२ला वर्धा इथं झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानंतर ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ला मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यावर अखेरचं शिक्कामोर्तब ८ ऑगस्टच्या गवालिया टँक मैदानावरच्या जाहीर सभेत झालं. त्यावेळी मैदानावरच्या मंडपात काँग्रेसचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि मंडपाच्या बाहेर लाखोंचा जनसमुदाय होता.
ब्रिटिशांना अखेरचा इशारा देणारं आंदोलन आणि त्यासाठी नेमके शब्द काय असावेत, याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यापैकी काहींनी गेट आऊट' हा शब्दप्रयोग सुचवला होता, तो उद्धट आहे या कारणामुळे गांधीजींनी तो नाकारला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 'रिट्रीट इंडिया' किंवा 'विथड्रॉ इंडिया' असे दोन पर्याय पुढे केले. पण सर्वसामान्यांपर्यंत ते पोचणार नाहीत, म्हणून गांधीजींनी तेही नाकारले. त्याच दरम्यान युसूफ मेहेरअली यांनी 'क्विट इंडिया' हा शब्दप्रयोग सुचवला आणि गांधीजींनी तो तत्काळ मान्यही केला. ‘चले जाव' हे त्याचं हिंदी भाषांतर जास्त लोकप्रिय ठरलं.
८ ऑगस्ट १९४२च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणं झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यांच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचं समर्थन करणारं भाषण केलं. त्यानंतर त्या ठरावाला अनुमोदन देणारं भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. आणि शेवटी महात्मा गांधी यांनी, 'हा ठराव सभेने मंजूर करावा' असं आवाहन करणारं प्रास्ताविक भाषण केलं.
तो ठराव उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून मंजूर केला. ठरावाच्या विरोधात ज्या १३ कम्युनिस्ट प्रतिनिधींनी मत नोंदवलं, ते सर्वजण काँग्रेसचेही सभासद होते. ठरावाला उपस्थित प्रतिनिधींची मंजुरी मिळाल्यानंतर गांधीजींनी लढ्यामागची कारणमीमांसा आणि पुढची दिशा यावर हिंदीतून मुख्य भाषण केलं आणि समारोपाचं भाषण इंग्रजीमधून केलं. ही तीन्ही भाषणं मिळून गांधीजी जवळपास सव्वादोन तास या सभेत बोलले. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली ती सभा रात्री १० वाजेपर्यंत चालली होती.
त्यानंतर गांधीर्जीसह सर्व नेत्यांना अटक झाली आणि आंदोलन पेटलं. ९ ऑगस्टला सकाळी सगळे रस्ते जणू या मैदानाकडे निघाले होते. सर्वच नेत्यांना पुण्याच्या आगाखान पॅलेसमधे बंदी करून ठेवल्याने आता सकाळी झेंडा फडकवणार कोण? याची साऱ्यांना उत्सुकता होती आणि २२ वर्षाच्या अरुणा असफअली त्या जमावातून धावत आल्या त्यांनी तिरंगा फडकावला. नेत्यांच्या अनुपस्थितही आंदोलन झालं. सामान्य माणसांनी हा लढा सुरू ठेवला.
१९४४ मधे एकीकडे स्वातंत्र्य टप्प्यात आलं आहे असं वाटत होतं, पण दुसरीकडे फाळणीची दुश्चिन्हं दिसू लागली होती. मोहमद अली जिनांनी स्वतंत्र पाकिस्तानसाठी हट्ट सुरू केला होता. जिनांना समजवण्यासाठी गांधींजींनी खूप प्रयत्न केला. त्या बैठका मुंबईतच झाल्या. गांधीजी अनेकदा बिर्ला हाऊसमधून जिनांच्या वाळकेश्वर इथल्या बंगल्यापर्यंत पायी जात असत.
या बैठकींमधे गांधीजींना जिना यांना पाकिस्तानच्या मागणीवर सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान, या इंग्रजांच्या चिथावणीला भूललेल्या जिनांना बापूंची साद कळलीच नाही. त्यामुळे जिना हट्टाला पेटले आणि त्यांनी फाळणीची मागणी लावून धरली. पुढे याच निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ जिनांवर आली.
स्वातंत्र्यानंतर झालेल्या वेदनादायी फाळणीनंतर गांधीजी आपल्या शेवटच्या कालखंडात फारच कमी वेळा मुंबईत आल्याच्या नोंदी सापडतात. १९४५, १९४६ मधे कस्तुरबा मेमोरेबल ट्रस्टच्या काही बैठकांसाठी ते मुंबईत आले होते. त्यावेळी ते वरळीतल्या हरिजन वस्तीत राहिले होते. त्यावेळी काही माथेफिरूनी त्यांची झोपडी जाळण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता.
गांधीजी त्यांच्या या शेवटच्या काही भेटींमधे १९४४ ला तब्येत सुधारावी म्हणून हवापालटासाठी जुहूच्या शांतिकुमार मोरारजी यांच्या बंगल्यात राहिले होते. जवळपास एक महिना तिथं त्यांचा मुक्काम होता. त्यांचा मुतगा देवीदास त्यांच्यासोबत होता. लाखो मुंबईकरांप्रमाणे गांधीजीही याच चौपाटीवर अनेकदा फिरायला येत. समुद्राचा अतिभव्य सहवास त्यांना नवी क्षितीजं दाखवत असेल.
आपल्यातल्या अनेकांनी एक मुलगा गांधीजींची काठी ओढत चालल्याचा फोटो पाहिला असेल. तो प्रसंगही मुंबईच्या याच जुहू चौपाटीवरचा आहे. गांधीजींची काठी पकडून चालणारा तो मुलगा म्हणजे त्यांचा नातू कनू गांधी. या प्रसंगावर नंतर अनेकांनी चित्रं फिल्म्सही केल्या. काळाच्या पडद्यावर अजरामर झालेले गांधीजीच्या आयुष्यातले असे कितीतरी क्षण या मुंबईत घडले. या क्षणांनी गांधीजी घडले, मुंबई घडली आणि स्वातंत्र्याचा इतिहासही घडला.
हेही वाचा:
गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात
प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट
(हा लेख महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशित मीडियावॉचच्या विशेषांकात पूर्वप्रसिद्ध झाला होता)