‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
मी एका गांधीवादी कुटुंबात जन्माला आलो आणि गांधीजींच्या आश्रमात वाढलो. त्यांनी स्वतः सुरू केलेल्या शाळेतच मी शिकलो. वयाच्या अठराव्या वर्षी मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य या विषयाचाही अभ्यास केला. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर कार्य आणि संशोधन करतोय.
साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी माझी विज्ञानाशी ओळख झाली तेव्हापासून विज्ञानाच्या प्रश्नावर महात्मा गांधींशी माझं एक विचित्र नातं आहे. कधी त्यांच्या विचारांची मला लाज वाटली, कधी माझा गोंधळ झाला, तर कधी मला रागही आला. विज्ञानाच्या मुद्द्यावरून माझे त्यांच्याशी मानसिक पातळीवर अनेक वाद झालेत, मतभेदही झालेत.
आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की, प्रत्येक वेळी मी हरलोय आणि ते जिंकलेत! गांधींजींच्या सोबतचा हा पन्नास वर्षांचा संघर्ष, विज्ञान आणि गांधीजी यांच्या परस्पर संबंधांचा शोध घेण्याचा माझा प्रवास आज मी तुमच्या समोर मांडतोय. गांधीजी जर विज्ञानविरोधी नव्हते तर त्यांनी विज्ञानाचा कसा उपयोग केला? ते विज्ञानाशी कशी सांगड घालायचे?
गांधींचे रचनात्मक कार्यक्रम, ग्रामीण विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम आणि सामाजिक सुधारणांमधे त्यांनी केलेला विज्ञानाचा उपयोग आणि त्यांचं विज्ञानाशी असलेलं नातं आपल्याला दिसतं. गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमांमधे खादी आणि चरखा हे सर्वांत महत्त्वाचे होते. खेड्यातल्या सामान्य विणकराला जास्त चांगलं कापड तयार करता यावं, जास्त रोजगार मिळावा आणि लोकांनी जास्त खादी वापरावी म्हणून खादीत सुधारणा करण्यासाठी गांधीजींनी वैज्ञानिक पद्धती वापरल्या.
त्यासाठी अधिकाधिक चांगली तांत्रिक साधने शोधली. त्यांनी ‘खादी सायन्स’ असा शब्दही वापरलाय. चरख्याला ते एक उत्कृष्ट आणि उच्च प्रतीचं यंत्र म्हणत. आज यावर विश्वास ठेवणं अवघड आहे, पण सुमारे ८० वर्षांपूर्वी अधिक कार्यक्षम चरखा शोधून काढण्यासाठी गांधींनी एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला होता. कदाचित आज त्याची किंमत काही कोटी रुपये होईल.
विज्ञानाचा उपयोग गांधीजी भरपूर प्रमाणात करायचे असं आपल्याला आढळतं. तसंच ते आपल्या खादी क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांकडूनही वैज्ञानिक वृत्तीची अपेक्षा करायचे. ते म्हणायचे, ‘खादीच्या विज्ञानाला उच्च दर्जाचं तांत्रिक आणि यांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. सर जगदीशचंद्र बोस यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतल्या वनस्पतींच्या छोट्याशा पानांकडून निसर्गाची रहस्ये समजून घेण्यासाठी जितकी एकाग्रता वापरली तशा एकाग्रतेची आवश्यकता आहे.’
हेही वाचा: संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘माझ्या कल्पनेतल्या योजनेनुसार आपल्याकडे भरपूर उत्तमोत्तम ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असाव्यात. त्यात आपल्याकडे केमिस्ट, अभियंते आणि इतर तज्ज्ञांची फौज असली पाहिजे. ते राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि लोकांच्या वेगवेगळ्या आणि वाढत्या गरजांना उत्तरे देतील. त्यांनी मिळवलेलं ज्ञान ही सगळ्यांची सार्वजनिक मालमत्ता असेल.’
यातलं शेवटचं वाक्य महत्त्वाचं आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधनाच्या संस्था कशासाठी? ‘त्यांनी मिळवलेलं ज्ञान ही सार्वजनिक मालमत्ता असेल,’ हे गांधीजींचं वक्तव्य सध्याच्या बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंटपेक्षा अगदी वेगळं आहे. सध्या शास्त्रज्ञांचं ज्ञान हे त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानलं जातं. गांधीजींच्या दृष्टीने विज्ञानाचा, संशोधनाचा उद्देश आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाची मालकी हे प्रचलितापेक्षा वेगळं आहे.
गांधीजी म्हणायचे, ‘माझे आश्रम हे गावासाठीच्या आणि सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयोगशाळा झाल्या पाहिजेत.’ ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या सल्लागार मंडळातली सर सी.व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस आणि पी.सी. रे ही तीन नावं तुमच्या चांगल्याच परिचयाची असतील. हे त्या काळात भारतातले तीन सर्वोत्तम शास्त्रज्ञ होते.
त्यांना गांधीजींनी त्यांच्या ग्रामोद्योगाच्या सल्लागार मंडळावर काम करण्यासाठी आमंत्रित केलं. नंतर गांधीजींनी ‘सत्याग्रही वैज्ञानिक’ असा अतिशय अर्थपूर्ण शब्द तयार केला. त्यांचा विधायक कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक किंवा आश्रमवासी हा ‘सत्याग्रही वैज्ञानिक’ असावा असं त्यांना वाटायचं. त्याचा अर्थ काय होता? तर कार्यकर्ता हा सत्याग्रही म्हणजेच सत्याचा अहिंसक साधक असावा, पण त्याचबरोबर, त्याची वृत्ती, पद्धती आणि प्रयोग हे वैज्ञानिक असले पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती.
१९४०च्या व्यक्तिगत सत्याग्रह चळवळीसाठी त्यांनी केलेली पहिल्या सत्याग्रहीची निवड अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले सत्याग्रही म्हणून निवडलं नाही. त्यांची पहिली पसंती विनोबा भावेंना होती. त्या वेळी विनोबा फारसे प्रसिद्ध नव्हते. पण त्यांनी विनोबांची निवड फक्त त्यांच्या आध्यात्मिक गुणांसाठीच नव्हे तर त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीसाठीही केली. विनोबांनी खादी आणि चरख्यावर अभूतपूर्व काम केलं होतं. एका घटनेतून गांधींबद्दल आणि त्यांनी विनोबांची निवड करण्याबद्दल बरंच काही लक्षात येईल.
खादीतली सूतकताई करणाऱ्या कत्तिन कामगारांनी त्यांची मजुरी अत्यंत तुटपुंजी असल्याची तक्रार महात्मा गांधींकडे केली. खादी ही यंत्रनिर्मिती नव्हती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तसं होणं साहजिकच होतं. त्यात हाताने कताई आणि विणकामाचा समावेश होता. त्यामुळं उत्पादनाचा वेग कमी होता. त्यात प्रत्येकाला खादी परवडली पाहिजे म्हणून कापडाच्या किमती कमी ठेवाव्या लागायच्या.
त्यामुळे मजुरीचा दर कमी होता. पण जेव्हा मजुरांनी तक्रार केली तेव्हा गांधीजींना वाटलं की आपण मजुरांवर अन्याय करू शकत नाही. म्हणून त्यांनी विनोबांना बोलवून खादीतल्या मजुरांसाठी किमान वेतन सुचवायला सांगितलं. विनोबांनी थोडा वेळ मागून घेतला. विनोबा सहा महिन्यांनी परत आले, तेव्हा त्यांचं वजन ३० पौंडांनी कमी झालं होतं. ते पाहून गांधीजींना काळजी वाटली.
त्यांनी विचारलं, ‘विनोबा, काय झालंय?’ तेव्हा विनोबा म्हणाले, ‘मी गेले सहा महिने फक्त सूतकताई हेच काम करतोय. आपण स्पिनरला जे वेतन देतो त्या दराने मी दररोज दोन आणे कमवू शकतोय. दोन आणे म्हणजे रुपयाचा आठवा भाग! या दोन आण्यांत जेवढं अन्न येईल, तेवढ्यातच मी माझी भूक भागवतो. सध्याच्या वेतनामुळं माझं हे असं झालंय.’ विनोबांनी स्वतःवरच प्रयोग केला होता. ते स्वत:च एक प्रयोगशाळा बनले होते!
हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते
गांधीजी शास्त्रज्ञांपेक्षा कोणत्या अर्थाने वेगळे होते? आपल्यापेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे होते? तर गांधीजींकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता किंवा त्यांनी विज्ञानाचा उपयोग केला म्हणून ते महान ठरत नाहीत. आपण सगळे ते करतोच, पण त्यामुळे आपण गांधी बनत नाही. विज्ञानाचा वापर तर सगळे करतात, ते तर सामान्य आहे. मग, गांधीजींचे वेगळेपण कशात होतं?
एक म्हणजे, विज्ञान कोणत्या उद्देशासाठी उपयोगात आणलं जातं तो उद्देश हा विज्ञानाचं मूल्यमापन करण्याचा त्यांचा मापदंड होता. विज्ञानाला अर्थपूर्ण हेतू असायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. ते म्हणायचे, ‘आधुनिक शास्त्रज्ञांमधे धगधगत असणाऱ्या संशोधन वृत्तीला मी नम्रपणाने वंदन करतो. त्या संशोधन वृत्तीशी माझं भांडण नाही. पण त्या वृत्तीने जी दिशा निवडलीय त्याविरुद्ध माझी तक्रार आहे. कारण ते आपल्या ग्राहकांच्या निव्वळ ऐहिक प्रगतीला कारणीभूत असलेल्या निसर्गनियमांचा आणि पद्धतींचा शोध घेण्यात गुंतलेले आहेत.’
वैज्ञानिक त्यांची कौशल्ये आणि ज्ञान ते फक्त ग्राहकांच्या भौतिक प्रगतीसाठी वापरत आहेत, याबद्दल गांधीजींची तक्रार आहे. गांधीजींच्या मते हा खूप संकुचित आणि उथळ उद्देश होता. बऱ्याचदा ज्यांच्या हाती भांडवल असतं, विज्ञान त्यांच्या हातातलं एक साधन बनतं. तिथं विज्ञान नफा कमवायचं यंत्र बनतं. सरकारच्या हातात ते जुलूम आणि विनाशाचं हत्यार बनतं. त्यामुळे बऱ्याचदा विज्ञान आणि वैज्ञानिकांमुळे भांडवलदार किंवा सरकार जास्त बलवान बनतात. विज्ञान हे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायाचे साधन व्हायला पाहिजे असं गांधीजींना वाटायचं. ते म्हणायचे, ‘जोपर्यंत तुम्ही लावलेल्या सगळ्या शोधांमुळे गरिबांचं कल्याण होत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रयोगशाळा सैतानाच्या कार्यशाळेपेक्षा काही वेगळ्या नसतील.’ जनतेचं कल्याण हाच अंतिम उद्देश असला पाहिजे असं त्यांचं मत होतं. ते सांगताना गांधीजी जराही सौम्य शब्द वापरत नव्हते.
ते स्पष्टपणे म्हणतात, ‘असं केलं नाही तर तुमच्या सगळ्या प्रयोगशाळा सैतानाच्या कार्यशाळांपेक्षा वेगळ्या नसतील.’ ते आपल्याला अशा हादरवणाऱ्या शब्दांनी फटकवतात. ते आपल्याला आपलं विज्ञान, प्रयोगशाळा, वैज्ञानिक कारकिर्द कोणत्या उद्देशाने वापरली जातेय हे तपासायला भाग पाडतात. गांधी वेगळे होते. कारण त्यांनी विज्ञानाला सुखभोग आणि नफावृद्धीऐवजी सामाजिक परिवर्तन आणि न्यायाचं साधन मानलं.
स्वच्छता आणि शौचालयांची साफसफाई यांचं उदाहरण पाहू. १९१४मधे गांधीजी भारतात आले तेव्हा उच्च वर्गाच्या किंवा वर्णाच्या व्यक्ती शौचालयाकडे पाहतही नसत. समाजातल्या तथाकथित ‘घाणेरड्या’ म्हणजे भंगी लोकांकडून साफ केली जाणारी ती घरातली सगळ्यात घाण जागा होती. गांधींनी आपल्या आश्रमात शौचालय स्वच्छ करण्याची प्रथा सुरू केली.
आधी त्यांनी स्वतः ते काम केलं आणि मग ती एक सामान्य प्रथा बनवली. शौचालय स्वच्छ करण्यासाठी त्यांनी विज्ञानाचा अवलंब केला. अशा प्रकारे, त्यांनी स्वच्छता साधली, आरोग्य प्राप्त केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातिभेदापासून मुक्त होण्यासाठी एका मोठ्या सामाजिक सुधारणेला सुरवात केली. स्वत:च्या शौचालयाची स्वच्छता सुरू करणारे आणि त्यातून सार्वजनिक आंदोलन उभारणारे ते पहिले राजकीय नेते असावेत.
अगदी जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल जेव्हा त्यांच्या आश्रमात यायचे तेव्हा त्यांना स्वतःची शौचालये स्वच्छ करावी लागायची. गांधींच्या ह्या भंगीमुक्ती चळवळीत महाराष्ट्रातल्या भावे, बापट आणि पटवर्धन या ब्राह्मणांनीही स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही शौचालये साफ करायला सुरवात केली.
महाराष्ट्रातले आप्पा पटवर्धन नावाचे एक गृहस्थ गांधींच्या चळवळीत सामील झाले. ते सुवर्णपदक विजेते पदवीधर ब्राह्मण होते. त्यांना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा ते ब्राह्मण असल्यामुळे इंग्रजांनी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचं काम दिलं नाही. कारण तुरुंगाच्या नियमानुसार ब्राह्मणांना असं हलक्या दर्जाचं काम देता येत नव्हतं.
पण आप्पा पटवर्धन म्हणाले, ‘मी गांधींचा सैनिक आहे. स्वतःचं शौचालय स्वच्छ करणं हे माझ्या आयुष्यातलं एक धर्मकार्य आहे. तुम्ही मला भंगीकामाची परवानगी दिलीच पाहिजे. ते माझं स्वातंत्र्य आहे.’ ब्रिटिश सरकारने त्याला नकार दिल्यानं त्यांनी उपोषण केलं. लक्षात घ्या, भंगीकामासाठी उपोषण करणारा ब्राह्मण! शेवटी ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे गांधींनी शौचालयांची स्वच्छता या कार्यातून ‘स्वच्छ भारत’ हे उद्दिष्ट तर साधलंच, पण जातिभेदाचा अडथळाही पार केला. ही क्रांती होती!
गांधीजी आणखी एका बाबतीत वेगळे होते. त्यांनी विज्ञानाला नैतिकतेची कसोटी लावली. वैज्ञानिक प्रगतीमुळे युरोपच्या नैतिकतेमधे किंचितही भर पडलेली नाही. त्यामुळे समाजातला द्वेष आणि अन्याय कमी झालेला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. युरोपमधलं विज्ञान ज्याला आज आपण अमेरिकन विज्ञान म्हणू त्यावर गांधीजी विज्ञानाच्या प्रगतीमुळे युरोपची नैतिक पातळी मुळीच उंचावली नाही अशी टीका करतायत.
त्यामुळं द्वेष आणि अन्याय कमी झाला नाही. म्हणजे गांधीजींची अशी अपेक्षा आहे की विज्ञानामुळे समाजातला द्वेष, अन्याय कमी व्हावा आणि नैतिक दर्जा उंचावला जावा. विज्ञान तसं करत नाही ही तक्रार आहे. गांधीजी विज्ञानाला अशी नैतिक कसोटी लावतात. या दृष्टीने विज्ञान आणि वैज्ञानिक किमान त्या काळी तरी अपयशी ठरले होते. आज त्यांची कामगिरी कशी आहे, त्याबद्दल आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल.
हेही वाचा: महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!
जिवंत प्राण्यांचं विच्छेदन ही गांधींच्या दृष्टीने विज्ञानाच्या नैतिकतेची एक कसोटी होती. शरीरशास्त्र किंवा प्राणिशास्त्राच्या ज्ञानासाठी ते आवश्यक मानलं जायचं. गांधीजींना किशोरवयात डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण त्यांनी ते करिअर निवडलं नाही. याचं एक कारण म्हणजे त्या काळी वैद्यकीय प्रशिक्षणात जिवंत प्राण्यांचं विच्छेदन आवश्यक मानलं जायचं.
त्यानंतर ऐंशी वर्षांनी मी मेडिकल शिक्षण घेतलं तेव्हाही ते कायम होते. तो एक निर्दय, घृणास्पद अनुभव होता. गांधीजींचं मन याविरुद्ध बंड करून उठलं. गांधीजींचा विरोध दोन कारणांसाठी होता. अगदी प्राण्यांच्या आतल्या गोष्टींचं ज्ञान मिळवायच्या हेतूनेही जिवंतपणी विच्छेदन करायला त्यांचा विरोध होता. प्राण्यांना होणाऱ्या वेदना, दुःख आणि मृत्यू हे एक कारण होतं.
पण दुसरं कारण म्हणजे हे क्रूर कृत्य करण्यामुळे शास्त्रज्ञावर होणारा परिणाम. त्यांना मारण्याचं कृत्य हे मानवावर केल्या जाणाऱ्या क्रूरतेपेक्षा आणि मानवाची हत्या करण्यापेक्षा फार काही वेगळं नाही.गांधींनी व्हिव्हिसेक्शनचं समर्थन केलं नाही. सक्रियपणे त्याचा विरोधच केला. कारण त्यामुळे वैज्ञानिकाच्या मानवी हृदयात क्रौर्याला प्रोत्साहन मिळतं. आज प्राण्यांवरील क्रूरतेच्या विरोधात जागतिक चळवळ उभी राहिलीय.
पण शंभर वर्षांपूर्वी नेहरू, ऑल्डास हक्सले किंवा मेघनाद साहांसारखे विज्ञानवादी लोक गांधींना हसायचे. ते कदाचित म्हणत असतील की, ‘अरे, हा माणूस विज्ञानविरोधी आहे, त्याला विच्छेदन नकोय, तो वैज्ञानिक कुतूहलाला मान्यता देत नाही!’ गांधीजी मृतदेहांच्या विच्छेदनाच्या विरोधात नव्हते, पण ते जिवंत प्राण्यांच्या विच्छेदनाच्या विरोधात होते.
गांधीजींसाठी हा नैतिकतेचा प्रश्न होता, त्यांच्या दृष्टीने विज्ञान हे नैतिकतेपासून दूर असू शकत नाही. या नैतिक परिमाणाचा सारांश केवळ दोन शब्दांत सांगायचा तर, सत्य आणि अहिंसा.
शंभूप्रसाद यांनी हे अतिशय छान मांडलंय. ते म्हणतात, ‘त्यांचा विज्ञानावर मोठा विश्वास असला, तरी या विश्वातली विज्ञानाची भूमिका काय असावी याबद्दल त्यांना स्पष्टता होती. सत्य आणि अहिंसेपेक्षा त्यांनी विज्ञान वरचढ मानलं नाही. तथाकथित वैज्ञानिक तथ्यांपेक्षा सत्य आणि अहिंसा त्यांच्यासाठी जास्त खरं होतं.’
त्यामुळे गांधीजींनी विज्ञानाचा जो उपयोग केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना, गांधीजींचं वैशिष्ट्य विज्ञानात नसून सत्य आणि अहिंसेत आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
हेही वाचा:
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?