भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’

२९ जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.

भूगोलाच्या अभ्यासाची फार मोठी परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकापासून भूगोलाच्या अभ्यासाला सुरवात झाल्याचे दाखले सापडतात. या भूगोलाच्या अभ्यासाला वेग मिळाला तो काटरेग्राफी म्हणजे नकाशा तयार करण्याचं तंत्र शोधल्यामुळे. आधुनिक काळात सॅटेलाईटच्या, जीपीएसच्या तंत्रज्ञानाचा वापर शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

सध्या भौगोलिक इतिहास हा शाळेतला अभ्यासक्रम आणि स्पर्धा परिक्षेपुरताच मर्यादित झालाय. पण त्यापलीकडे जाऊन पाहिलं तर काही पुस्तकं अशी असतात जी भुगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातही रस निर्माण करतात. असंच एक पुस्तक म्हणजे प्रणय लाल लिखित आणि नंदा खरे अनुवादित 'इंडिका'. मधुश्री प्रकाशनाने हे प्रकाशित केलंय.

उल्कांमुळे खनिजं

‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. भौगोलिक इतिहासात एक सर्वात महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे कालमापनची. त्यात हे कालमापनाचे आकडे भयंकर मोठे असतात. पृथ्वीचं वय आहे ४६० कोटी वर्ष. इंडिकामधे त्याला ४६ वर्ष म्हटलंय. त्यला स्त्रीचं रुपक सोबत जोडल्यामुळे आकड्यांच्या जंजाळातून सुटका होते आणि समजायलाही सोपं जातं.

पृथ्वी आणि चंद्राच्या आयुष्यात सुरवातीची २ अब्ज वर्ष सतत उल्का सहन करण्यातच गेली. या उल्कापातामुळेच पृथ्वीला हिरे, पाणी, सोने वगैरे अनेक खनिजं मिळाली. पुढे सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली.

वातावरणातला ऑक्सिजन वाढू लागला सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ऑक्सिजनचं रूपांतर ओझोनमधे होऊ लागलं. ओझोनमुळे परत सूर्याची अतिनील किरणं अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडायला सुरवात झाली. ऑक्सिजन आणि कार्बन एकत्र झाल्याने कार्बन डायऑक्साईड तयार होऊ लागला.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

उत्क्रांतीचा अभ्यास

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर आणि सुर्यावर सुरवातीला बारा खनिजं होती. सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवर भू-रासायनिक क्रिया सुरु होऊन इतर खनिजांची निर्मिती झाली. काळाच्या पटावर थेट पुढे एकपेशीय सजीवांच्या निर्मितीपर्यंत आलो तर असं लक्षात येतं की, या एकपेशीय सजीवांच्या शरीररचना उलट जास्त गुंतागुंतीच्या असतात.

एकपेशीय सजीवांमधे मायटोकाँड्रीया ज्याला 'पावरहाऊस ऑफ सेल' असं म्हटलं जातं त्याची निर्मिती एकपेशीय सजीवात कशी झाली? या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. या एकपेशीयांनंतर पृथ्वीच्या आयुष्यात आल्या बुरश्या. त्यानंतर लगेचच काहीच काळात वनस्पतीही आल्या.

भारतीय उपखंडात एक पेशीय सजीव कसे तयार झाले?  त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? समुद्रात प्राण्यांची स्पोटक निर्मिती झाली तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशाप्रकारे झाली? भारतीय उपखंडातल्या सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला इंडिकात वाचायला मिळतो.

सुर्यामुळे मिळाला पाठीचा कणा

काही अद्भुत गोष्टीही इंडिकामधे दिल्यात. उदाहरणार्थ, कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याकडे आढळत होते? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले? कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? काही माशांमधे शारीरिक बदल कसे झाले ? याची उत्तरं आहेत. मोठ्या माशांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सायपसेलुरूस सायपेल्युरस जातीचे मासे समुद्रापासून चक्क काही फूट उंच उडू शकतात. लोब फिश प्रकारातले मासे आज जवळपास नष्ट झालेत.

भारतीय उपखंडातला जीवाष्म अभ्यास दाखवतो की सूर्यस्नान करणाऱ्या जीवांमधे हळूहळू मानेचं हाड आणि कवटी यांच्यातला सांधा बदलून लवचीक झाला. मान डावी-उजवीकडे वळवणं शक्य होऊ लागलं. याचा फायदा पाण्यात वावरताना भक्ष्य पकडणं, अन्न चावणं, गिळणं या क्रिया सोप्या होऊ लागल्या.

अकरावी बारावी सायन्सच्या बायलॉजी विषयात फर्न, सायकॅड या वनस्पती अभ्यासक्रमात आहेत. विद्यार्थ्यांना या वनस्पतींचा अभ्यास करायचा फार कंटाळा येतो. इंडिका वाचल्यावर लक्षात येतं की, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान ८० – ९० डिग्री सेल्सियसपर्यंत गेलं होतं तेव्हाही फर्न आणि सायकॅड यांच्या बिया मातीआड तग धरून राहिल्यात. पृथ्वीवर वनं रुजवण्यात या दोन वनस्पतींचा सिंहाचा वाटाय.

हेही वाचा: तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

डायनासॉरच्या राज्यात

'प्राणी मोठे आणि अजस्त्र' आणि 'भारत नावाचं बेट' या दोन प्रकरणात भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपूर्वी कसा तयार झाला? भारतात कोणकोणत्या प्रकारचे डायनासॉर राहत होते? त्यांचे जीवाश्म कुठे कुठे सापडलेत? गोंडवाना प्रदेश म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भागापासून भारत वेगळा कसा झाला, भारताची निर्मिती कशी होत गेली? भारतीय उपखंडात हिमालय पर्वत कसा तयार झाला? याच्या म्हटल्या तर चित्तथरारक गोष्टी वाचायला मिळतात.

गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्याचा वेग हा भारताचा इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त होता. सुरवातीला हा वेगळं होण्याचा वेग साधारणपणे आठ सेंटीमीटर प्रति वर्ष इतका जास्त होता. इतरांच्या तुलनेत हा नक्कीच जास्त होता.

६ कोटी वर्ष या डायनासॉरनी या पृथ्वीतलावर राज्य केलं. भारतात सापडणाऱ्या डायनासॉरबद्दल वाचताना वाटतं की, इतका भौगोलिक वारसा आपल्याकडे असताना शालेय अभ्यासक्रमात सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या टुंड्रा प्रदेशात तांदूळ पिकतो का गहू हे का शिकवतात?  त्याऐवजी भारतातला पुरातत्वांचा खजिना का उघडून दाखवला जात नाही मुलांना?

भारत आणि जगाचा संबंध

अंटार्टिकावर जेवढा जास्त बर्फ जमा होईल तेवढा भारतात पाऊस कमी पडतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अंटार्टिकावर जितका कमी बर्फ जमा होईल तेवढ्या जास्त क्षेत्रावरच्या पाण्याची वाफ होते. परिणामी भारतात मान्सून जास्त सुधारतो, हे इंडिकात लिहिलंय.

भारतातल्या नद्यांचा उगम कुठे कसा झाला, त्यात कोणकोणते बदल झाले, महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगा, नेवाशाला सापडलेली पुरातन हत्यारं याचा इतिहास वाचताना नकळत मराठी म्हणून आपला अहम सुखावून जातो.

पुस्तकात तांत्रिक माहिती आणि शास्त्रीय शब्दांची रेलचेल आहे. ही माहिती वाचायला नकोशी वाटली तर आपण काही पानं ओलांडून पुढे वाचू शकतो. त्यामुळे वाचनात कोणताही रसभंग होत नाही. अनुवादात मुद्रितशोधनाच्या बर्‍याच चुका झाल्यात. डीएनए हा शब्द डिएने असा तर चेन्नई शब्द चन्नै असा छापला गेलाय. या चुका सोडल्यास पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचनीय नक्कीच आहे.

पुस्तकाचे नाव - इंडिका
मुळ लेखक - प्रणय लाल
अनुवाद - नंदा खरे
प्रकाशक – मधुश्री प्रकाशन
किंमत - ६०० रुपये

हेही वाचा: 

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक