माधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या

१५ जुलै २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.

कोल्हापुरातल्या तपोवन आश्रमाची स्थापना होऊन शंभर वर्ष झालीत. उजाड माळरानावरची काटेरी झाडं झुडपं आणि घाणेरी वनस्पतींना हटवून त्या माळरानाचं एका नयनरम्य नंदनवनात कायापालट करणारे ऋषितुल्य दीक्षित गुरुजीही काळाच्या पडद्याआड गेलेत. १९१७ ला स्थापन झालेल्या या तपोवन आश्रमात शिकून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी बाहेर पडलेत.

या विद्यार्थ्यांचं नाचणं बागडणं, रुसवे फुगवे, आई-वडलांच्या आठवणीनं कासावीस होणं हे सगळं गुरुजींसाठी एक आव्हानच असायचं. मुलांना घरची फारच आठवण आली की ती ओक्साबोक्सी रडत. गुरुजींनी त्यांना आईच्या ममतेनं थोपटताना पाहून इथला सगळा परिसर भावनिक होऊन जायचा.

रामायण महाभारतातल्या ऋषी कुमारांचा असावा तसाच हा तपोवन आश्रम. करवीरच्या दुरदृष्टी असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या नवीन शैक्षणिक विचारांची प्रयोगशाळा म्हणजे हा तपोवन आश्रम. गुरुजींचा जटाभार, छातीपर्यंत रुळणारी पांढरीशुभ्र दाढी, बलोपासनेनं कमावलेलं शरीर, लोखंडाच्या कांबीसारखे पिळदार बाहू आणि आयुष्यभर फक्त कडुलिंबाचा रस, दूध आणि केळी यांच्या सेवनाने तेजःपुंज बनलेला चेहरा.

या सगळ्यांमुळे गुरुजी म्हणजे तपोवनाचे आदरयुक्त श्रद्धास्थान होते. गुरुजींनी अंमलात आणलेली आश्रमाची अलिखित नियमावली इतकी रुळलेली होती की, एखादा खराखुरा राजकुमार जरी आला असता असता तरी ती मोडण्याचं धाडस त्यानं केलं नसतं.

हेही वाचा: गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

फुलराणी अबी

अशा या पवित्र आश्रम परिसरात माधवी देसाई म्हणजेच पूर्वाश्रमीची अबी पेंढारकर आपल्या बहिण भावंडांसह राहण्यासाठी आली. ८ किंवा ९ वर्षांची असेल ती. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर आणि लीलाबाई पेंढारकर यांची ही मुलगी. सर्वांना 'अबीताई' या नावानेच ती प्रिय होती. गुरुजीही प्रेमानं तिला 'अबी' असंच म्हणत. डौलदार चाल, अत्यंत भावूक चेहरा आणि जगावेगळे बोलके डोळे असणारी निरागस अबी एखाद्या फुलराणीसारखी दिसायची.

आश्रमाची मुख्य वास्तू मध्यभागी होती. तर तिच्या दोन्ही बाजूंना लहान-लहान पर्णकुट्या होत्या. त्या पर्णकुट्यावर विवेकाश्रम, आनंदाश्रम, सदाचाराश्रम अशा लाकडी पाट्या लावल्या होत्या. आश्रमवासी गुरुजन वर्ग या पर्णकुटीत रहात असे. आश्रमाच्या पाठीमागे विस्तीर्ण खेळाचं मैदान होतं. परिसर निसर्ग सौंदर्यानं समृद्ध होता.

फळांनी लगडलेली मोठमोठी झाडं, गुलाबाचे ताटवे, रंगीबेरंगी फुलांच्या बागा, हवेतली शुद्धता वाढवणारी कडूलिंबाची झाडं, जाई-जुई, मोगरा, कृष्णकमळ यांच्या सुगंधित वेली, या सर्वांना आपल्या डोळ्यातून टिपून घेण्याचा प्रयत्न छोटी अबी करत होती. काय काय घेऊ आणि किती घेऊ अशी अवस्था त्या बाल जीवाची झाली. एखाद्या चिमणीला धान्याचं कोठार सापडावं तसं या छोट्या अबीला निसर्गसौंदर्याचं कोठार सापडलं. आपल्या इवल्याशा पण तेजस्वी डोळ्यांनी या निसर्ग सौंदर्याचं आकंठपान करण्यात अबी हरवून जायची.

बकुळ फुलांनी शिकवलेला धडा

पहाटे ५ वाजता अनंतराव कटकोळ मास्तरांच्या मनाच्या श्लोकाने आश्रम जागा व्हायचा. मास्टर विनायक आपल्या सुरेल आवाजात अभंग किंवा ओवी म्हणायचे. सकाळची 'परन्धाम' मधली आश्रमीय प्रार्थना सर्वांनाच सक्तीची होती. बाराही महिने थंडगार पाण्याने आंघोळ हा आश्रमाचा नियम. त्यामुळे थंडी वाजण्याची सबब आपोआप बाजूला पडत असे. रात्री धरलेलं मौन ओंकाराने सोडायचं असा गुरुजींचा दंडक होता.

आश्रमाच्या दारातच एक मोठं बकुळाचं झाड होत. आजही ते तिथं आहे. पहाटे केव्हातरी पांढऱ्याशुभ्र बकुळ फुलांचा सडा झाडाखाली पडलेला असायचा. बकुळीची ती नाजूक फुलं आपल्या नाजूक बोटांनी अलगद वेचून घेताना त्या फुलांच्या सुगंधाबरोबरच त्याचा भाव जाणून घेण्याचा प्रयत्न अबी करायची धुळीत मिसळलेलं फूल स्वतः चा सुगंध इतरांना देतच राहतं हे तिनं प्रत्यक्ष अनुभवलं. समर्पणाची भावना लहान वयातच तिच्यात रुजली ती या बकुळ फुलांमुळेच.

तपोवनाच्या माळावरचे हिरवेगार गालिचे, त्यावर श्रावणात अवचित येणारे लाल गोप किडे, हिरव्या गवतावर फुलणारी पिवळी, पांढरी, जांभळी रानफुलं, पिवळ्या पंखाची फुलपाखरं, पहाटे आणि संध्याकाळी रंगून जाणारं आकाश, भर दुपारी आभाळात उतरणारे पांढरे ढग, रस्त्याच्या कडेनं सावली देणारी वडाची, पिंपरणीची झाडं, गावाकडून येणारी वळणदार वाट, पहाटेच्यावेळी गाडीवानानी गायलेली गाणी, बैलांच्या गळ्यातील घुंगरू माळांचा आवाज या सगळ्यांच्या सान्निध्यात अबी मोठी झाली. या निसर्गानं अबीच्या शुभ्र मनावर खोल खोल ठसा उमटवला आणि अबी जणू निसर्गकन्याच बनली.

हेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं?

आश्रमाची वनकन्या

मुख्य रस्त्यावरून आश्रमात वळल्यावर लगेचच ताडमाड वाढलेले बुचाच्या झाडाचे दोन डेरेदार वृक्ष सर्वांचं स्वागत करायचे. त्यांच्या फांद्यातून आवाज करत जाणारा वारा एक अनोख संगीत निर्माण करायचा.पण अबीचं लक्ष संगीताऐवजी त्या झाडाखाली पडणाऱ्या बुचाच्या फुलांच्या पांढर्‍याशुभ्र रांगोळीकडे असायचं. फुलांचा मंद आणि गोड सुवास सघळ्या परिसराला सुगंधित करायचा.

परकराच्या ओच्यात भरपूर फुलं गोळा करून त्याची वेणी गुंफण्याचं कसब अबीनं प्राप्त केलं होतं. बुचाची पांढरी शुभ्र फुलं आणि त्याची लांबसडक फिकट पोपटी देठं यांची एक सुंदर कमनीय वेणी ती केसात माळायची. बुचाच्या फुलांचे कानातले आणि नाजूक अंगठी घातलेली अबी माळभर फिरताना जणू वनकन्याच वाटायची.

फुलांसारखं प्रसन्न राहिलं म्हणजे परिसरही प्रसन्न राहतो आणि तो सुगंधित होतो हे जीवन सत्य बुचाच्या फुलांकडून अबीनं आत्मसात केलं. रायआवळे,  चिंचा, सीताफळं, जांभळं,  कैऱ्या, रानबोरं, भुईमुगाच्या शेंगा हा अबीचा आवडता चिमणचारा होता. या रानमेव्याचा रसास्वाद तिच्या मनाच्या खोल गाभार्‍यात कधी उतरला हे तिचं तिलाच समजलं नाही.

एकादश व्रताचा प्रभाव

महात्मा गांधींच्या तपोवन आश्रम भेटीमुळे त्यांनी सुचवलेल्या एकादश व्रताचा पुरस्कार आश्रमात केला होता. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, भयवर्जन, सर्वधर्मीय समानत्व, स्वदेशी आणि स्पर्श भावना या अकरा व्रतांचं पालन गुरुजी अत्यंत काटेकोरपणे करत होते. आश्रमातल्या मुलांनाही या व्रतांचं पालन करण्यास प्रवृत्त करत होते.

आश्रमात पशुहत्येला पूर्ण बंदी होती. अगदी अस्सल जातिवंत नागालाही अभय होतं. त्यामुळे फुलपाखरामागे पळणारी अबी त्या फुलपाखराला पकडण्याचा आणि त्याला काडेपेटीत बंद करून ठेवण्याचा विचारही करू शकत नव्हती. प्रत्येक जीवाला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, हे शाश्वत जीवनसत्य तिला आश्रमातच समजलं.

रंगीबेरंगी फुलपाखरांचं निरीक्षण करताना आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता अबी घेत असे. आश्रमातील अहिंसा तत्त्वामुळे तरल मनाची अबीही आपल्या एखाद्या शब्दाने कोणी दुखावणार तर नाही ना, याची काळजी घेऊ लागली. अबीचं जीवन अगदी साधं आणि पारदर्शक बनलं ते या आश्रमातील एकादश व्रतांमुळे.

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ

तपोवनात पहाटे प्रार्थना असायची, तशीच संध्याकाळीही असायची. सात वाजता घंटा वाजली की सगळी मुलंमुली, शिक्षक वर्ग आणि स्वतः गुरुजी परन्धाममधे यायचे. बलाचे प्रतिक असणारा मारुती हे तपोवनाचं दैवत. विनोबांच्या गीताईमधल्या दुसऱ्या अध्यायातल्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणारे श्लोक सर्वांनाच तोंड पाठ असायचे. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेच्या १२,१५ आणि १६ व्या संस्कृत अध्यायाचं पठण असायचं. गीतेचं सततचं पाठांतर.

न समजणाऱ्या संस्कृत श्लोकांचं गुरुजींकडून अर्थ समजावून घेण्याची वृत्ती यामुळे अबीला एक आत्मिक बळ प्राप्त झाले. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते आणि ते निरपेक्ष बुद्धीने केलंच पाहिजे याचा संस्कार अबीने परन्धाममधे घेतला.

निखळ मैत्रीचं नातं

अबीच्या जीवनावर तिच्या आश्रमीय मित्र-मैत्रिणींचा ही प्रभाव होत होता. बी. जी. कुलकर्णी मास्तरांच्या पमा, कुंदा, टिंगुताई, बाळाबाई तसेच गबाले सरांच्या नंदा आणि मंदा या मुली तर आश्रमात शिक्षणासाठी राहणारे नानासाहेब यादव, त्यांचे बंधू लालासाहेब, बाबा यादव, तसेच उदयसिंगराव गायकवाड संभाजीराव देसाई, शामराव माने, जगदाळे या रांगड्या सरदार घराण्यातल्या मुलांच्या संगतीत अबी वाढली.

पंचगंगेच्या सुरंगीवर पोहायला जाताना, कात्यायनी- कळंबा, ज्योतिबा याठिकाणी भ्रमंती करताना, आश्रमातली शेती नांगरताना किंवा आश्रमाच्या एक्क्यातून विद्यापीठ शाळेत येजा करताना अनेक वेळा ही एकटी मुलगी त्या रांगड्या कळपात असायची. सारी पौगंडावस्थेतली मुलं, पण या साध्या भोळ्या मुलीचा गैरफायदा घ्यावा असं त्यांच्या मनात कधीही आलं नाही. उलट गवत पात्यावरच्या दवबिंदूप्रमाणे त्यांनी अबीला जपलं.

या सगळ्याचं कारण होतं आश्रमाचे संस्कार. स्त्री-पुरुषांचं शुद्ध मैत्रीचं नातं किती पवित्र असतं हे आश्रमातल्या या भावंडांनी आचरणातून दाखवलं. या भावंडांमुळेच अबीला कोल्हापूर हे हक्काचं माहेर मिळालं, अगदी अखेरपर्यंत.

हेही वाचा: पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

आश्रमातल्या जीवनपद्धतीचा गंध

अबीचं लग्न नरेंद्र काटकर यांच्या बरोबर ठरला. अबी पेंढारकर सौ. काटकर झाली. पण नरेंद्र काटकरांच्या दुख:द निधनानंतर काही वर्षांनी ती कोवाडकरांची सौ.माधवी रणजित देसाई झाली. जीवनातल्या सुख-दुःखाचे उन्हाळे-पावसाळे पहात कालांतराने गोव्याच्या 'बांदिवडे' गावी राहून तिथल्या लोकांशी एकरूप झाली.

जीवनात 'बरं-वाईट' अनुभवत असताना 'नाच गं घुमा' असं म्हणत साहित्य क्षेत्राची जमेल तशी सेवा करत राहिली. कालचक्राचे काटे उलट फिरवता येत नाहीत पण जीवनातले बरे-वाईट अनुभव सृजनशीलतेने आणि मोकळेपणाने साहित्यातून मांडत गेली. म्हणूनच आश्रमातल्या शुद्ध जीवनपद्धतीचा गंध तिचे लेखन वाचताना येतो.

हिरव्या गालिच्यासारखं रसरशीत लेखन

माधवी देसाई या नावाने जवळजवळ ४० पुस्तकांचं लेखन तिनं केलं. प्रत्येक पुस्तकातला निसर्ग हा तिच्या लहानपणातला निसर्ग आहे. आपल्या लेखन कौशल्यातून अनेक व्यक्तींची चित्रणं तिनं साकार केली. पण या प्रत्येक व्यक्ती चित्रणाला आश्रमीय वातावरण, इथला निसर्ग, इथली साधी भोळी रांगडी माणसं यांच्या सहवासाची झालर आहे.

तिच्या लेखनात येणारे डोंगर, दरी, नदी, अरण्य या सर्वांचं वर्णन तपोवन आश्रमातल्या प्रत्यक्ष अनुभवांशी निगडित आहे. म्हणूनच तिच्या लेखनातील किलबिलणारे पक्षी, झुळझुळणारे झरे मुग्ध बालिकेसारखे आपल्याशी बोलतात असा भास होतो.

तिच्या लेखनात सूक्ष्म निरीक्षणाचा ताजेपणा, कोमल फुलांच्या भावनेचा ओलावा आणि सौम्य सुगंधित रसिकता जागोजागी आढळते. नैसर्गिक आहे, सुंदर आहे, त्यावर प्रेम करावं, त्याची पूजा करावी आणि प्राप्त जीवन सुंदर बनवावं असा साधा पण मौलिक संदेश तिच्या लेखनातून मिळतो. एक साधी भोळी आश्रम कन्या ते एक प्रथितयश लेखिका या जीवन प्रवासात आश्रमीय राहणीचा प्रभाव खूप मोठा आहे. म्हणूनच तिचं लेखन हिरव्यागार गालिच्यासारखं रसरशीत वाटतं. हवंहवसं वाटतं.

हेही वाचा: 

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

(लेखक कोल्हापूरमधल्या विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत)