महेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय?

१० सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.

ज्यावेळी धोनी टीम इंडियाचा मेंटॉर होणार अशी घोषणा झाली त्यावेळी धोनी चाहत्यांनी सोशल मीडियावर दिवाळीच साजरी केली. सगळेच जण फार आनंदले होते. कारण धोनी आहेच तितका खास. दोन वर्ल्डकप नावावर असलेल्या कर्णधाराचा अनुभवही तितकाच दांडगा असणार.

त्याचबरोबर त्याचे तीन आयपीएल टायटलही विसरुन चालणार नाहीत. असा टॅक्टिकल क्रिकेटमधला बाप माणूस टीमसोबत कुणाला नकोय? पण एम. एस. धोनी मेंटॉर होणं वरकरणी जरी गुडी गुडी दिसत असलं तरी त्याच्या मेंटॉर होण्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेत. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अनेक अर्थ, तर्क, वितर्क निघत आहे.

धोनीच्या नियुक्तीवर अनेक प्रश्न

भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जुलै २०१७ पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांना ज्यावेळी टीमचं मुख्य प्रशिक्षक केलं त्यावेळी अनिल कुंबळे यांच्यापेक्षा वर्षाला तब्बल दीड कोटी मानधन वाढ करुन देण्यात आली होती. बीसीसीआय त्यांच्यावर वर्षाला ८ कोटी रुपये खर्च करते.

विशेष म्हणजे बीसीसीआयने ऑगस्ट २०१९ ते २०२१ चा टी ट्वेन्टी वर्ल्डकप होईपर्यंत पुन्हा त्यांची नियुक्ती केली. त्यांना पुन्हा नियुक्ती मिळाली म्हणजे त्यांचं काम चांगलंच असणार असं आपण गृहीत धरू. मग पुन्हा मेंटॉर म्हणून एम. एस. धोनीची का नियुक्ती झाली? शास्त्री टीमला आपल्या अनुभवाच्या जोरावर मार्गदर्शन करण्यात सक्षम नाहीत का? जर असतील तर मग धोनीची नेमणूक करण्याची गरजच काय?

आता धोनीची नियुक्ती झाली आहे म्हटल्यावर बीसीसीआयला शास्त्रींच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास नाही असा संदेश जातो. मग कोणाच्या हट्टापाई शास्त्रींना एकदा एक्स्टेंशन आणि टी २० वर्ल्डकप पर्यंत पुन्हा नियुक्ती देण्यात आली? हे सर्व प्रश्न धोनीच्या नियुक्तीनंतर शास्त्रींच्या बाबतीत उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

विराटवर धोनीचा प्रभाव

एम. एस. धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला मला आता निवृत्त समजा असं म्हणत इन्स्टाग्रामवरुन भारतीय टीमचा निरोप घेतला होता. धोनी निवृत्त झाला त्यावेळी त्याच्याकडे टीमचं नेतृत्व नव्हतं. त्याने वनडे आणि टी ट्वेन्टी मधलं नेतृत्व २०१७ लाच विराट कोहलीकडे सोपवलं होतं.

त्यावेळी विराटकडे टीमचा नेता म्हणून २०१९ च्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम तयार करण्यासाठी दोन वर्ष होती. विराटने टीमचं नेतृत्व हातातही घेतलं. पण त्यावेळी टीममधे एम. एस. धोनी त्याचा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होता. त्यामुळे विराटच्या नेतृत्वावर धोनीचा प्रभाव असणं सहाजिकच आहे.

'विराट' नेतृत्वावर शंका?

मात्र ज्यावेळी धोनीने २०१९ च्या वर्ल्डकप सेमी फायनलनंतर टीमची ड्रेसिंग रुम सोडली त्यानंतर विराटच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरु झाली. दरम्यान, आयपीएलमधे रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाचे दमदार दाखले देत होता. त्याने आयपीएल टायटल जिंकण्यात धोनीलाही मात दिली होती. या शर्यतीत विराट कुठेच दिसत नव्हता.

काही काळानंतर विराटच्या नेतृत्व करण्याच्या शैलीवर, त्याच्या टीम निवडीवर टीका होऊ लागली. त्यातच कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मॅच प्रमुख खेळाडू नसताना जिंकून दाखवली. त्यामुळे तीन्ही प्रकारच्या टीमचे कॅप्टन वेगवेगळे असावे अशी चर्चा सुरु झाली.

आता टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी मेंटॉर म्हणून धोनीला अचानक पाचारण करण्यात आलं. याचा अजून एक अर्थ निघतो की विराट कोहली टॅक्टिकल गेम प्लॅनमधे कमी पडतो त्यामुळेच ही कमतरता पूर्ण करण्यासाठी धोनीला बोलावण्यात आलंय. टीम निवडीतही विराटने इतिहासात अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळे टी ट्वेन्टी वर्ल्डकप सारख्या मोठ्या स्पर्धेत याचा फटका बसू नये म्हणून धोनीला टीमसोबत राहण्याची विनंती केली की काय अशी शंका मनात येते.

हेही वाचा: क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

धोनीच्या आडून रोहितवर निशाना

टी ट्वेन्टी वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी आयपीएल होणार आहे. त्याआधीही सध्या भारतीय टीम इंग्लंडमधे पाच सामन्यांची कसोटी मॅच खेळत आहे. या मालिकेत भारताकडून सर्वात चांगली बॅटिंग करत आहे तो रोहित शर्मा. त्याने चौथ्या कसोटी मॅचमधे १२७ धावांची खेळी करुन कसोटी टीममधलं आपलं स्थान अढळ केलंय.

रोहित वनडे आणि टी ट्वेन्टी प्रकारात टीमचा उपकर्णधार आहे. आता त्याने कसोटी टीममधलं आपलं स्थान बळकट केल्यानं त्याचं टीममधलं महत्व वाढलंय. याचा थेट अर्थ रोहितने आता विराट कोहलीच्या कॅप्टन्सीला धोका निर्माण केला आहे. रोहितने आयपीएल आणि संधी मिळेल त्यावेळी टीम इंडियाचं यशस्वी नेतृत्व करुन आपले नेतृत्वगुण सिद्ध करुन दाखवले आहेत.

मात्र विराट कोहली वेळोवेळी नेतृत्वाच्या बाबतीत कमी पडतोय हे जाणवत आलंय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मॅचवेळी त्याची सदोष टीम निवड प्रकर्षाने जाणवली. आता आयपीएल आणि पुढे टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे विराट आणि रोहितच्या नेतृत्वाची थेट तुलना होणार हे नक्की आहे. मात्र आता मेंटॉर म्हणून धोनी टीमसोबत आल्याने रोहित-विराटच्या थेट तुलनेची धारच कमी झालीय.

बीसीसीआय कुणाला पाठीशी घालतयं?

विराट कोहलीवर त्याच्या बँटिंगवरून किंवा फॉर्मवरून फारशी टीका होत नाही. याला इंग्लंड दौऱ्याची कसोटी मॅच अपवाद आहे. पण विराटच्या नेतृत्वाची कायम चर्चा असते. विराटचं नेतृत्व वादातीत आहे असं नाही. त्याच्या कॅप्टन्सीला कधी रोहित शर्माने तर कधी अजिंक्य रहाणेने आव्हान दिलंय.

आता बीसीसीआयने धोनीच्या छत्रछायेखाली नेतृत्व स्विकारलेल्या विराट कोहलीच्या मदतीला पुन्हा धोनीलाच पाचारण केलं. याचा अर्थ विराट कोहलीचं नेतृत्व धोनीशिवाय खुजं आहे असा निघणं स्वाभाविक आहे. एम. एस. धोनी मेंटॉर झाला म्हणजे विराटचं हे खुजं नेतृत्व झाकून जाईल.

हेही वाचा: 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण