सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत

१७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. 

`ही माझी शेवटची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी सोलापुरात येऊन सांगतात, शिंदे साहेबाने कोणताही टिकाऊ प्रोजेक्ट आणला नाही. माझा मोदी साहेबांना प्रश्न आहे, तुम्ही कोणता प्रोजेक्ट आणलाय गेल्या पाच वर्षांत? चार वेळा सोलापुरातून भाजपचा खासदार संसदेत गेलाय. त्यांनी कोणते प्रोजेक्ट आणले?`

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून अशी टीका ऐकण्याची सवय सोलापुरातल्या पत्रकारांना नाही. पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्याहीपुढे जाऊन टीका केली. भाजपने जात बघून जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांच्या विपरित वागत आहेत. असं ते बरंच काही बोलत आहेत. 

सुशीलकुमार ५ वर्षांत हवेतून जमिनीवर

२००९ ला केंद्रीय गृहमंत्री म्हणून लोकसभा निवडणूक लढवत असतानाचे सुशीलकुमार फारच वेगळे होते. त्यांचा सुसंस्कृत, सर्वसमावेशक चेहरा तेव्हाही होता आणि आताही आहे. पण तेव्हा ते हवेत होते. आपण हरणं शक्य नाही असं त्यांना वाटत होतं. शरद बनसोडे हे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्या जवळपासही फिरकू शकत नव्हते. पण आता त्याच्या पूर्णपणे उलट परिस्थिती आहे. त्यांची हवेतून जमिनीवर आलेली आवृत्ती सोलापूरकर अनुभवत आहेत.

हेही वाचाः लातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच

महिनाभरापूर्वी भाजपवाले सांगत होते की आम्हाला चमत्कारही हरवू शकत नाही. तेव्हा ते बरोबरच वाटावं, असंच वातावरण होतं. आधीच भाजपकडे २०१४च्या निवडणुकीत शिंदेंच्या विरोधात जवळपास दीड लाख मतांचा लीड आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा परिसरात फार मोठा भक्तपरिवार आहे. ते लिंगायतांचे मठाधिपती आहेत. त्यामुळे लिंगायत मतं एकगठ्ठा भाजपकडे जाऊ शकतात.

जयसिद्धेश्वर स्वामीही हवेतून जमिनीवर 

त्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी घोषित करून शिंदेंचे उरल्यासुरल्या संधीही संपवल्या. कारण आंबेडकरांबरोबर असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांनी गर्दीचा विक्रम केला होता. आता काँग्रेसकडचा हक्काचा दलित आणि मुस्लिम समाज गेलाच, असं कुणालाही वाटणं स्वाभाविक होतं. शिंदे आणि आंबेडकरांच्या भांडणात स्वामी दीड दोन लाखांनी निवडून येणार असं गणित सर्रास मांडलं जात होतं. 

पण दिवस उलटले तसं हे कागदावरचं समीकरण प्रत्यक्षात वितळताना दिसू लागलं. मुळात डॉ. जयसिद्धेश्वर हे राजकारणात येण्याआधी फारच मजबूत उमेदवार वाटत होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर मात्र त्यांचा दबदबा ओसरू लागला. त्यांची भाषणं राजकीयदृष्ट्या प्रभावी नाहीत. ते जवळपास प्रवचनच छापतात. त्यात त्यांची जीभ घसरू लागली. मी देव आहे, वगैरे विधानं वायरल झाली. 

हेही वाचाः नांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई

त्यात स्वामींनी गुरुवारचं मौनव्रत सोडलं. अनेक वर्षांचं हे व्रत राजकारणापायी सोडावं, हे सोवळ्या ओवळ्यात अडकलेल्या कट्टर धार्मिक लिंगायतांनाही आवडलं नाही. शिवाय त्यांचं बाहेरचं खाणंही त्यांना खटकत गेलं. त्यांनी मठ नीट सांभाळावा, राजकारणात कशाला यावं, असंही मत मांडलं जाऊ लागलं. असं असलं तरी लिंगायत मतं आजही मोठ्या प्रमाणात स्वामींच्याच पाठिशी आहेत.

लिंगायत ध्रुवीकरणाची प्रतिक्रिया उमटेल का? 

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी स्वामींना राजकारणात आणलंय. स्वामी जिंकले तर विजय देशमुख जिल्ह्याच्या राजकारणात डोईजड होतील, अशी भीती सर्वच पक्षांतल्या नेत्यांना वाटतेय. त्यातून भाजपचेच दुसरे मंत्री सुभाष देशमुख यांच्यात हाडवैर आहे. आता तर ते एकमेकांना विचारेनासे झालेत. त्यातून विजय देशमुखविरोधी गटाने घोषणाही बनवल्यात, `स्वामी तुझसे बैर नहीं, पालकमंत्रीकी खैर नहीं.` 

हेही वाचाः नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?

दुसरीकडे लिंगायतांचंही ध्रुवीकरण इतर समाजांना नकोसं वाटू शकतं. कारण लिंगायत हा शहरातला एक सर्वात मोठा जातसमूह आहे. कर्नाटकातले लिंगायत आमदार रवी पाटील यांनी १९९८ला सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा तसंच २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांच्या यशाच्या शक्यता दिसताच बाकीचे समाज त्यांच्याविरोधात एकत्र येताना यापूर्वी दिसले आहेत. तसं झालं तर त्याचा फायदा घेण्याची क्षमता आजतरी आंबेडकरांपेक्षाही शिंदेंकडेच जास्त आहे.

`आमचं मत बाबासाहेबांच्या नातवालाच`

मात्र मतदारसंघात नवबौद्ध मतांचं घट्ट ध्रुवीकरण झालंय. ती प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे. बाबासाहेबांच्या नातवाला जिंकून आणायचंच म्हणून गावागावातले दलित मोठ्या संख्येने राबत आहेत. इतकंच नाही तर पै पै गोळा करून बाळासाहेबांसाठी निधी उभारत आहेत. त्यांच्यासोबत एमआयएममुळे मुस्लिम आणि काही प्रमाणात धनगर आले, तर ते विजयी होऊ शकतात, असं गणित आहे. त्यांच्या सभा सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांच्याच नाही, तर नरेंद्र मोदींच्या तुलनेतही खूप मोठ्या होत आहेत. 

मात्र जातीय राजकारणात गुरफटलेल्या कथित उच्च जातींच्या मतदारांना हे ध्रुवीकरण त्रासदायक वाटू शकतं. विशेषतः सोलापुरातले सर्वपक्षीय नवबौद्ध नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी आंबेडकरांना पाठिंबा घोषित केल्याने हे ध्रुवीकरण अनेकांच्या डोळ्यांत भरू लागलंय. या ध्रुवीकरणामुळे सोलापुरातल्या मराठा मतांना अचानक महत्त्व आलंय. ते कुणाच्या पारड्यात जातात, इतपत ते महत्त्वाचं ठरू शकेल. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे तीन सोलापूर दौरे पाहता येतात.

हेही वाचाः वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?

दगडापेक्षा वीट मऊ म्हणून शिंदे परवडले, असा मेसेज मराठ्यांमधे पसरताना दिसतोय. पण जिल्ह्यातली मराठा मतं एकाच पक्षाकडे एकवटण्याचा नजीकचा इतिहास मात्र नाही. ती आंबेडकरांकडे जाण्याची शक्यता नाहीच. पण ती भाजपकडे नक्की वळू शकतात. विशेषतः विजयसिंह मोहिते पाटील. कल्याणराव काळे, बबनराव अवताडे, विजयराज डोंगरे ही काँग्रेस राष्ट्रवादीतली आपपल्या पट्ट्यात मजबूत असणारी नेतेमंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधे आणलीत. त्यांना आपली ताकद नव्या पक्षश्रेष्ठींकडे सिद्ध करावीच लागेल.

मराठा मतदार निर्णायक ठरू शकतो

प्रकाश आंबेडकरांचं शक्तिप्रदर्शन आणि पुलवामा हल्ला यामुळे सुशीलकुमार शिंदे तिसऱ्या नंबरवर घसरतील असं वाटत होतं. पण आता ते जिंकण्याच्या रेसमधे आलेत. एकतर उमेदवार म्हणून ते मतदारसंघात परिचित आहेत. ते जिंकले तर त्यांना कदाचित फार मोठं पद मिळू शकतं, अशा शक्यतेची चर्चा मतदारसंघात आहे. तिन्ही उमेदवारांत ते मतदारांना अधिक जवळचे वाटले, तर आश्चर्य नाही.

हेही वाचाः यवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का

गेल्या निवडणुकीतल्या पराभवाने शिंदे स्वतः जमिनीवर आलेत. अनुभवांतून धडा घेऊन त्यांनी प्रचाराची सूत्रं स्वतःच्या हातात ठेवलीत. पूर्वी दुखावलेल्या नेत्यांनाही त्यांनी जोडून घेतलंय. वैयक्तिक संपर्कातून ते स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत. मात्र मुस्लिम मतदार मोदीविरोधातून त्यांच्याकडे वळेल की ओवेसी त्यांना आपले वाटतील? मोठ्या संख्येने असलेला पद्मशाली समाज दरवेळेसारखा भाजपकडे जाईल की हातमागाचा धंदा बुडाल्याने त्यांच्याकडे येईल? छोट्या छोट्या समाजांना आपल्याकडे वळवण्याचं शिंदेंचं सोशल इंजिनिअरिंग कितपत फळेल? या प्रश्नांची उत्तरं निकालाची दिशा ठरणार आहे.

वंचित आघाडीमुळे भाजपलाही फटका?

प्रकाश आंबेडकरांनी आपली ताकद वारंवार सिद्ध करूनही अद्याप ते जिंकतील असा विश्वास एकंदर मतदारांत उभा करू शकलेले नाहीत. त्यामुळे नवबौद्ध वगळता इतर समाजांची मतं त्यांच्याकडे मोठ्या संख्येने वळण्यात मर्यादा येत आहेत. भाजपला हरवण्यासाठी होणारं मतदान वंचितकडे वळतं का, यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल. मात्र आंबेडकर फक्त काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. पत्रकारांनी प्रश्न विचारूनही ते भाजपविरोधात बोलायला तयार नाहीत. 

आंबेडकरांमुळे शिंदेंच्या मतांत फूट पडलीत, हे स्पष्टच आहे. पण त्यांच्यामुळे भाजपच्या स्वामींनाही धक्का बसू शकतो. कारण मतदारसंघातली नवबौद्ध मतं शरद बनसोडेंमुळे मागच्या निवडणुकीत भाजपकडे गेली होती. यावेळेस ती आंबेडकरांकडे जाण्याचीच शक्यता जास्त आहे. 

एकाच वेळेस तीन तीन दिग्गज उमेदवार. त्यात काम करणारे अनेक फॅक्टर. जातींच्या समीकरणामुळे तिन्ही उमेदवारांच्या एकमेकांत अडकलेल्या तंगड्या. यामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेला सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघात निकालाचे कयास परस्परविरोधी आहेत. मतदारही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे नेते आणि पत्रकारच नाही, तर राजकीय अभ्यासकही गोंधळलेले आहेत. १८ तारखेला मतदान झाल्यानंतर कदाचित थोडं स्पष्ट होऊ शकेल.

हेही वाचाः जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?