लातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच

१७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


भाजपचे सुधाकर शृंगारे असोत किंवा काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, दोघेही लातूरकरांच्या फारशा परिचयाचे नाहीत. तरीही त्यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे. कारण ही लढत या उमेदवारांमधली नाहीच. भाजपसाठी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख या दोघांनी आपले राजकीय खुंटे मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सगळी ताकद पणाला लावलीय.

अनुसुचित जाती अर्थात एससीसाठी राखीव असलेल्या लातूरमधे यंदा भाजप आणि काँग्रेसमधे थेट लढत होतेय. भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून जिल्हापरिषदेच्या वडवळ नागनाथ गटातले सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसने उद्योगपती आणि उदगीरचे रहिवासी मच्छिंद्र कामंत यांना रिंगणात उतरवलंय.

वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणलीय. दरवेळी तीसेक हजार मतं घेणाऱ्या बसपाने डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांना तिकीट दिलंय. एकूण १० उमेदवार रिंगणात असून यापैकी तिघे अपक्ष आहेत. लातूरमधे यंदा जवळपास १९ लाख मतदार आहेत. या मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि नांदेडमधल्या लोहा-कंधार या विधानसभांचा समावेश होतो. यापैकी लातूर शहर आणि ग्रामीणमधे काँग्रेसचा आमदार आहे.

हेही वाचाः सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत

सभांमधून भाजपची वातारवरण निर्मिती

आता आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्हा भाजपने पोखरून टाकलाय. जिल्हा परिषद, जवळपास सगळ्याच पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि लातूरची महापालिकाही भाजपच्या ताब्यात गेलीय. जवळपास कुठलीच सत्तास्थानं हाती नसलेल्या काँग्रेसचा यंदा मजबूत बूथ असलेल्या भाजपशी सामना होतोय. नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करत भाजपने ही सत्तास्थानं राखण्यासाठी शतप्रतिशत ताकद पणाला लावलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्या सभा घेत मतदारसंघ पिंजून काढलाय. प्रचाराची सगळी सुत्रं पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर यांनी आपल्याकडे घेत यंत्रणा कामाला लावलीय. त्यामुळे लातुरातला हा सामना संभाजीराव निलंगेकर विरुद्ध अमित देशमुख असा झालाय.

हेही वाचाः नांदेडः अशोक चव्हाणांच्या अस्तित्वाची लढाई

काँग्रेसचा भर जमिनीवरच्या समीकरणांवर

दुसरीकडे काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची सभा वगळता एकही मोठी रॅली आयोजित केली नाही. त्यामुळे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही काँग्रेस खूप पिछाडीवर असल्याचं चित्र होतं. पण शेवटच्या काही दिवसांत काँग्रेसचा सारा भर मोठमोठ्या रॅलींपेक्षा जमिनीवरच्या बेरीज-वजाबाक्यांमधे असल्याचं दिसतंय. भाजपवर नाराज असलेल्या लोकांना सोबत आणण्यावर भर दिलाय.

स्थानिक पत्रकारांच्या मते, विलासराव देशमुख यांचे जुने कार्यकर्ते सक्रिय करण्यासोबतच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्यातली प्रचाराची सुत्रं आपल्या हातात घेतलीत. अमित देशमुखही कामाला लागलेत. अहमदपूर, उदगीरच्या पट्ट्यात प्रभाव असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही महाआघाडीच्या उमेदवारासाठी एकदिलाने कामाला लागलीय. 

भाजपवर नाराज असलेला शेतकरी वर्ग, दलित, मुस्लिम समाजाला सोबत घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. पण यावेळी भाजपपुढे गेल्यावेळी मोदीलाटेत मिळालेलं मताधिक्य टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. यंदा कुठलीही लाट नाही. तसंच सरकारविरोधातही नाराजीचा सूर आहे.

हेही वाचाः नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?

गेल्या निवडणुकीत वाढलेली मतं यंदा कुणाला?

लातूरमधे २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयवंत आवळे यांनी ३ लाख ७३ हजार मतं मिळवत भाजपच्या सुनील गायकवाड यांचा ७ हजार ९७५ मतांनी पराभव केला होता. गेल्या वेळच्या तुलनेत २०१४ मधे काँग्रेसच्या मतांमधे दहा हजारांची घट झाली. मात्र मतांची टक्केवारी वाढल्याने भाजपचा उमेदवारी तब्बल अडीच लाखांनी निवडून आला. २००९ मधे ५५ टक्के असलेलं मतदान २०१४ मधे तब्बल ६३ टक्क्यांवर गेलं. वाढलेल्या या मतदानाने आपोआपच भाजपला विजयासोबतच मताधिक्यही मिळालं.

जिल्ह्यात लिंगायत समाज निर्णायक असून तो गेल्या काही काळापासून भाजपच्या पाठिशी राहिलाय. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी अजून पूर्ण झाली. त्यामुळे लिंगायत समाजाचे धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी भाजपला मत देऊ नका, असं आवाहन केलंय. पण त्यांच्या आवाहनाचा प्रत्यक्ष मतदानात काही विपरित परिणाम होईल, असं दिसत नाही.

हेही वाचाः वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?

मताच्या टक्केवारीवर यशापयशाचं गणित

गेल्यावेळी मोदीलाटेतही आपली मतं कायम राखणाऱ्या काँग्रेसला यंदा मात्र विजयासाठी आपली मतं वाढवावी लागणार आहेत. दुसरीकडे भाजपपुढे गेल्यावेळचं मताधिक्य कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे. या सगळ्यात दोन फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एक म्हणजे गेल्यावेळसारखं यावेळीही दणदणीत मतदान होणार का? आणि दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडी किती मतं मिळवणार?

मतदान कमी झाल्यास त्याचा सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसू शकतो. वंचितच्या मतांचा आकडा वाढल्यास काँग्रेसची सीट धोक्यात येईल. तसंच जातीचा मुद्दाही खूप कळीचा राहणार आहे. कारण भाजपने नवबौद्ध - महार उमेदवार दिलाय. तर काँग्रेस आणि वंचितने हिंदू धर्मातल्या मातंग समाजाला संधी दिलीय. प्रचार थांबल्यावर प्रत्येक पक्ष आपापली जातीची समीकरणं फीट्ट करण्याच्या कामाला लागेल. ही समीकरणं ज्याची जुळतील तो जिंकेल.

हेही वाचाः 

यवतमाळ-वाशिमः जिंकण्यासाठी हवा राळेगावमधला वाढलेला टक्का

जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?