लोकमान्य टिळक यांचा आज शंभरावा स्मृतिदिन. देशाच्या एकात्मतेसाठी टिळक देशभर फिरायचे. वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे. लोकांना भेटायचे. आता देवाधर्माच्या क्षेत्रात मोठा लौकिक असलेल्या साईबाबा आणि गजानन महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या ऐतिहासिक भेटींवर टाकलेला हा प्रकाश.
लोकमान्य टिळक जहाल विचारसरणीचे खरे. पण त्यांना संतदर्शनाची ओढ होती. त्यांचे आध्यात्मिक विचार प्रबळ होते. ते अंधश्रद्धावादी नव्हते. त्यांना समाजाला पुढे न्यायचं होतं आणि त्यासाठी देशाला स्वातंत्र्य हवं होतं. त्यांना समकालीन अशा दोन महान विभूतींच्या दर्शनाचा लाभ झाला हे विशेष. एक होते शिर्डीचे साईबाबा आणि दुसरे शेगावचे गजानन महाराज. या दोन्हींकडून त्यांना कृपाप्रसाद लाभला, त्याचबरोबर सावधगिरीचा इशाराही.
साईबाबांबद्दल सांगितलं पाहिजे की त्यांच्या अनुयायांमधे जातीभेद, धर्मभेद नव्हता. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातले त्यांचे अनुयायी होते. टिळकांना ही गोष्ट आकर्षक वाटली असेल तर त्यात नवल नाही. कारण देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनतेची एकजूट तेव्हा महत्वाची होती. जात आणि धर्म यावरून टोकाचे भेदाभेद होते.
एखादा अवलिया सहजपणे दोन भिन्न भिन्न धर्माच्या लोकांना एकत्र आणतो तेव्हा साहजिकच त्याच्या मनःशक्तीबद्दल शंका घ्यायची जागा राहत नव्हती. आणि अशा व्यक्तीची तेव्हा गरजच होती. जर का देशातली माणसे कुठल्या का कारणाने असेन एकत्र येत असतील तर ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट होती. टिळकांना म्हणून साईबाबांबद्दल कुतुहल होते. तसंच ते दत्त संप्रदायाचे असल्याने अशा विभूतीचा सहवास लाभला तर तो त्यांना हवा होता.
टिळकांचे स्नेही गणेश श्रीकृष्ण ऊर्फ दादासाहेब खापर्डे यांनी शिर्डीला जाण्याबद्दल सुचवलं. तेव्हा टिळक तत्काळ तयार झाले. खापर्डेसह टिळक अमरावतीवरून संगमनेरला आले. तेव्हा खापर्डेनी शिर्डी इथून जवळच असल्याचं सांगितलं. टिळकांना मग वाटलं आपलं कार्य, ज्ञान यांना अशा विभूतीकडून प्रोत्साहन मिळालं तर आणखी कार्य करायला हुरूप येईल. तेव्हा खापर्डे यांनी गाडी काढून टिळकांना शिर्डीला नेलं.
इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. ती म्हणजे, खापर्डे हे विद्वान वकील होते. ते व्यासंगी होते. प्रखर देशभक्त होते. चतुर होते. फर्डे वक्ता होते. पुढे त्यांची भाषणं इंग्लंडमधेही गाजली. टिळकांच्या विचारांनी भारावलेले होते. त्याचबरोबर त्यांचा परिचय साईबाबा आणि गजानन महाराज या दोघांशीही होता.
हेही वाचाः नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं
शिर्डीला पोचल्यावर टिळकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. बाबांनीसुद्धा त्यांना उदी लावली आणि फळांचा प्रसाद दिला. टिळक दीक्षित वाड्यात उतरले होते. टिळकांना त्यांनी दुपारी न निघता जेवूनच जायला सुचवलें. महत्वाचे म्हणजे टिळकांनी त्यांना पदस्पर्श केला.
साईबाबांनी त्यांना बजावलं, आता आपण आपल्या स्वतःकडे बघायची गरज आहे. देशसेवा करून आपण महान कार्य केलंय. आता आध्यात्मिक बळ वाढवण्याची गरज आहे. बाबांनी असे सांगण्याचे कारण त्यांना टिळक आणखी चार वर्ष जगणार नाहीत याची कल्पना आली होती, असं म्हटलं जातं. टिळकांना मधुमेह होता.
टिळकांनी नंतरही जेव्हा मन बेचैन होई तेव्हा शिर्डीला जायचा रिवाज ठेवला. पण टिळक बाबांच्या भजनी लागले होते असं नाही. तसंच आताचे राजकारणी एखाद्या बाबाबुवाचे भक्त होतात आणि त्याचं ऐकून निर्णय घेतात तसा हा प्रकार नव्हता. टिळक मनाने खंबीर आणि निश्चयी होते. ते प्रखर बुद्धिवादी होते. त्यांचे गीतारहस्य छापले जाऊ नये यासाठी ब्रिटीश सरकारने खूप प्रयत्न केले.
टिळक एवढे बुद्धिमान होते की तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा आठवून आपलं लिखाण पूर्ण केलं. साईबाबा यांचा कल सर्वांनी मिळूनमिसळून रहावं, मानवता हाच धर्म मानवाकडे होता. त्यांना कुणाचे राजकीय गुरु आणि धर्मगुरू होण्यात रस नव्हता ही गोष्टही महत्वाची आहे.
गीतारहस्य ग्रंथ लिहिला जाण्याचा संदर्भ गजानन महाराजांशी जोडला जातो. अकोला इथे शिवजयंतीसाठी टिळक गेले असता महाराजसुद्धा त्या व्यासपीठावर होते. टिळकांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध अत्यंत जहाल भाषण करायला सुरवात केली. तेव्हा महाराजांना जाणवलं अशा प्रकारच्या भाषणाने या व्यक्तीला मोठी शिक्षा नक्की होईल. आणि झालंही तसंच. टिळकांना पुढे काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पण महाराजांना हेही जाणवलं की या शिक्षेमुळे याच व्यक्तीकडून एक महान कार्यही घडेल आणि मंडाले तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य लिहिलं.
संत, विभूती याना पारखून घेण्याचं भान टिळकांकडे नक्कीच होतं. कुणाच्याही भजनी लागणारे ते कमकुवत मनाचे नव्हते.
एक बाकी खरं आजचे राजकारणी शिर्डीला जाऊन आपल्याजवळची माया काढतात. आपल्या नावाचे टीशर्ट वाटण्यापासून रहाण्या-जेवण्याचा खर्च उचलतात. पण त्यांचा हेतू निव्वळ प्रचारकी असतो. शिर्डीत तर आता हॉटेल, रेस्टॉरंटचं पेव फुटलंय. तिथल्या जागांचे भावही कडाडलेत. अनेक टोळकी बाबांच्या नावाने सहली काढतात. खुशाल मौजमजा करतात. या पवित्र स्थानाचं पावित्र्य बिघडवतात.
आज टिळक हयात असते तर ते नक्कीच या प्रकारांनी हताश झाले असते. साईबाबा आणि गजानन महाराज यांना मानणारी टिळकांसारखी माणसं होती हे केव्हा ‘सहल’ काढणाऱ्यांच्या लक्षात येणार आहे हे बाबाच जाणे!
हेही वाचाः
खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?
देशभरातले डॉक्टर संपावर जाण्याचं कारण की,
विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव
डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी: इतिहास रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार