प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड

२२ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे बडोदा राज्य ओळखलं जातं. प्रजेच्या उत्थानासाठी आयुष्यभर परिश्रम करणं हेच त्यांनी जीवनाचं अंतिम ध्येय मानलं. आपल्या कार्यकर्तृत्वाने भारतातल्या समकालीन सगळ्या संस्थानांत पुढारलेलं बडोदा संस्थान निर्माण केलं.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

साहित्यप्रेमी सयाजीराव

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक गुणांचा भरणा होता. या गुणांत आणखी एका गुणांची भर टाकता येईल. तो गुण म्हणजे ते लिपीचा, भाषेचा, कलेचा, साहित्याचा, साहित्यिकांचा, प्रकाशकांचा विचार करणारे प्रज्ञावंत साहित्यिक आणि साहित्यप्रेमी राजा होते. त्यांनी देशातल्या नव्हे, तर परदेशातल्या साहित्यावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केलं. साहित्यनिर्मितीसाठी आर्थिक मदत केली.

सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांचं लेखन प्रामुख्याने वैचारिक असलं तरी त्यामधे प्रजेच्या सुधारणेचा ध्यास होता. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्याव्यासंगाचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या विचारात, लेखनात आणि चिंतनातही अनेक दिवसांची तपश्चर्या होती. त्यांचं साहित्य म्हणजे त्यांनी कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानाचा परिपाक आणि अभ्यासाचं फलित होतं.

त्यांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेमाची आणि त्यांच्या साहित्याची माहिती कमी प्रमाणात आहे. त्याचबरोबर बडोदा संस्थानातल्या ग्रंथालय चळवळ, देशी भाषांना त्यांनी दिलेलं अभय, प्राच्यविद्या प्रसारासाठी दिलेलं पाठबळ, परदेशी साहित्याचं देशी भाषेत भाषांतर करण्यासाठी केलेली मदत, संस्थानातली ग्रंथनिर्मिती, त्यांचं साहित्य आणि त्यांचा साहित्यविषयक विचार याची माहिती अत्यल्प प्रमाणात आहे.

१३ खंडातल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने ‘सयाजीराव महाराजांचे लेखन’ १३ खंडात प्रकाशित केलंय. सयाजीराव महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या एकूण २५ खंडांतून ६२ ग्रंथांचं समितीने लेखन प्रकाशित करताना महाराजांच्या या दुर्लक्षित पैलूला उजेडात आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं.

महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. आता त्यापुढच्या १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. बडोदा ही महाराजांची कर्मभूमी, तर नाशिक ही महाराजांची जन्मभूमी. या दोन्ही ठिकाणी महाराजांचं साहित्य प्रकाशित व्हावं, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

महाराजांनी लिहिलेला पहिला ग्रंथ

तेराव्या खंडात महाराजांनी लिहिलेले एकूण पाच मौल्यवान ग्रंथ समाविष्ट आहेत. मुळातच सयाजीराव महाराजांचं सर्व प्रकारचं लेखन हे वैचारिक आणि ऐतिहासिक आहे. यामुळे या लेखनाला संशोधकीय शिस्त आहे. ‘फ्रॉम सीजर टू सुलतान’ हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी महाराजांनी रोमच्या इतिहासाविषयीचे अनेक ग्रंथ वाचले होते. त्याचे त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रांतून उल्लेख आले आहेत.

त्यांचा सर्वांत आवडता इतिहासकार गिबन होता. त्यामुळे साहजिकच गिबनने लिहिलेले अनेक ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. गिबनच्या ‘Decline and Fall of the Roman Empire’ या पुस्तकावरून ‘फ्रॉम सीजर टू सुलतान’ हा ग्रंथ सयाजीराव यांनी लिहिला. महाराजांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. पण त्यांनी ज्या विषयावर हा ग्रंथ लिहिला, त्याविषयाची परिपूर्ण माहिती ग्रंथलेखनाच्या अगोदर घेतली.

रोमच्या इतिहासाचा त्यांनी सर्वंकष अभ्यास केला. प्रत्येक सत्ताधीशांच्या काळातल्या चांगल्या-वाईट गोष्टींचं सखोल अवलोकन केलेलं दिसतं. रोमच्या प्रत्येक कैसरने राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला; पण अनेक वर्ष ही सत्ता एकाकडून दुसर्‍याकडे जात होती. बाहेरून जरी ही सत्ता मोठी आणि अजिंक्य वाटत असली तरी, इसवी सन २४४च्या आसपास आतून त्याला कीड लागली होती. महाराजांचं याबद्दलचं निरीक्षण वस्तुनिष्ठ आहे.

त्यांच्या नोंदींचं ग्रंथरूप

बडोदा राज्यात १८९८-१८९९ला मोठा दुष्काळ पडला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सर्व भागांचा त्यांनी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी केलेल्या मदतीच्या विभागानुसार नोंदी घेतल्या. या नोंदी ग्रंथरूपाने ’NOTES ON THE FAMINE TOUR BY HIS HIGHNESS THE MAHARAJA GAEKWAR’ म्हणून १९०१ मधे प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

या दुर्मीळ ग्रंथात तत्कालीन दुष्काळ निवारणासाठी केलेल्या नोंदी आहेत. त्यांनी भविष्यातल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी या नोंदींचा उपयोग केला. आगामी संकट निवारणासाठी दिशादर्शक राजमार्ग तयार झाला म्हणून या ग्रंथाचं महत्त्व कालातीत आहे.

या मूळ ग्रंथाचं पुनर्प्रकाशन करून मराठी आणि हिंदी अनुवादही समितीने प्रकाशित केला आहे. महाराजांनी दुष्काळातल्या नोंदी सूक्ष्मपणे घेतल्या. त्यांच्या नजरेतून लहान-लहान गोष्टी सुटल्या नाहीत. त्याचीही अनेक उदाहरणं ग्रंथात दिसतात. महाराजांचा हा ग्रंथ फक्त एक नोंदींच्या स्वरूपात नाही, तर त्यामधे लालित्यपूर्णताही आहे.

त्यांनी घेतलेल्या एका नोंदीवरून त्यांच्यातला लेखक आणि प्रज्ञावंत साहित्यिकही समजतो. महाराजांचा हा ग्रंथ मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍यांना आजही मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारख्या दिशादर्शक आहे.

हेही वाचा: 

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ

परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण