जगण्याचा शोध घेत मनात रेंगाळणाऱ्या गोष्टी

०५ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.

'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी' या जयंत पवार यांच्या पुस्तकातून आलेलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. लेखनाच्या प्रदीर्घ पायवाटा तुडवतं, उच्चतम प्रवासाच्या दिशेशी जोडून घेताना मृत्यूची खिडकी आपल्या घरात उघडल्यावर, मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुखदुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी आपल्या कथांमधून मांडला. त्याचे दीर्घ परिणाम वाचणाऱ्याच्या मनावर झालेत.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

जगण्यातलं अंधारलेपण

महानगरीय हतबलतेला तोंड देणारा सामान्य माणूस त्याची मुलं आपल्या चाळीत वाढलेली झाडं तोडली गेली, त्यात अनेक गोष्टी निघून गेल्या. नव्याने आपल्या आत काही उगवून येताना पोरांना आठवण झालेले परंपरागत वैरधारी माकडं समोर बसून पोरांना पाहत आपल्या आणि समोरच्यांच्या जगण्यातले फरक वेगवेगळ्या भाव मुद्रेने टिपताना आपल्या आत होत जाणारे बदल माकडांबरोबर पोरंही स्विकारतात.

आता त्यांना एकमेकांचा राग येत नाही. युद्ध शांतीचा तह केला जातो. एकमेकांच्या दुःख भरल्या जाणिवेची ओली कातरता जगण्यातल्या उदासीची तार दूर लोटत मनाचा ताबा घेते. जगण्याचं अंधारलेपण अनुभवताना, इथल्या नैसर्गिक जीवन जाणिवांची ओल आपल्या आत झिरपत जावून, परिवर्तनाची अपरिहार्य जाणीव स्विकारून आपल्या आतली कणव जागी ठेवता यायला पाहिजे.

'चौकशी'कथेमधून येणारी 'पारी' जिच्या आयुष्याची घुसमट कोणाच्याच लक्षात येतं नाही. स्वार्थी मनोवृती, वरवरच्या दिखाऊपणाला आलेला उत या सगळ्या बकाल जगण्यातून निघून जाणारी पारी होणाऱ्या रस्त्याच्या खड्यात मरून पडते. त्यावर रस्ता तयार होतो. स्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होते, कंत्राटदाराची न्यायालयीन चौकशी होते पण त्या रस्त्याच्या आत चिनून गेलेल्या सदेह मानवी जीवाची साधी चौकशीही केली जात नाही. या भयावह सत्यातून वाढत जाणारी सामाजिक दरी अधोरेखित होते.

मनाचा ताबा घेणाऱ्या कथा

या हव्यासाचे वाढते शृंखलाबद्ध रस्ते मानवी जीवन जाणीवा-भावभावना पायदळी तुडवून यंत्रवत जगण्याला यंत्रवत परिमाण प्राप्त करून देताना, यंत्रवत राबणारे हात त्यांना त्यांच्या मुलांशी बोलण्या-खेळण्यासाठी नसलेला वेळ, मनावर परिणाम करणारी वाढती दृकश्राव्य दृश्य लहानमुलांचे लहानपणीचे खेळ संपून मालिकांमधे पाहिलेल्या वेगवेगळ्या दृशांना खेळ समजून खेळत असताना दिसतात, जसं की 'रेप' हा खेळ समजून खेळणारी मुलं कापूस या गोष्टीतून येतात. त्यांच्यातल्या झटापटीतून दिसणारी हिंस्रतेची चुनुक मानवी समुदायाचं वाढतं भयावह रूप दाखवत राहते.

माणूस-प्राणी-पक्षी या सगळ्यांच्या प्रवृत्तींना आपल्या निरीक्षणाच्या कप्यातून उकलत जावून त्याचा प्रवाही अर्थ शोधून काढत त्याचे परस्पर संबंध जोडत एक महत्वपूर्ण अन्वय निर्माण करत जाणारी जयंत पवारांची कथा वाचणाऱ्याच्या मनपटलाचा ताबा घेते. 'हॅरी हसू' या कथेतून येणाऱ्या शहकाटशहाच्या राजकारणात कांगोच्या जंगलातून आणलेला पाणघोडा ज्याच्या हसण्यावरून चाललेले खेळ मनाला उद्विग्न करत जातात. तो हसत नाही म्हणून नाना प्रयत्न केले जातात. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी टोचल्या जाणाऱ्या सळ्या, अणकुचीदार लोखंडी गोळ्या असे वेगवेगळे प्रयोग हॅरी आणि त्याची सोबती  'मेसी'वरही केले जातात.

एका रात्री पाण्यात घुसलेल्या मेसीला बाहेर काढण्यासाठी प्रखर विजेचा प्रवाह पाण्यात सोडला जातो. त्यात ती मरते. तिच्या दुःखात व्याकूळ हॅरी जोरजोरात हसतो. हॅरी हसला म्हणून पाहायला येणाऱ्यांची प्रचंड संख्या त्याच्या सोबतीनं सेल्फी काढण्यात दंग होत जाते. पण त्याच्या हसण्यातलं दुःख कोणालाही कळत नाही. दोन हसण्याला, जगण्यातला फरक लेखक एका वेगळ्या शैलीने आपल्यापर्यंत पोचवतो.

'असंतोषाचे जनक' या कबुतरांच्या कथेतून तिरकसपणे लेखकाने मानवी जगण्याची भिन्न रूप मांडली आहेत. समजूतीची गफलत करून बुद्धीभेद करणाऱ्या कबुतरांची परंपरा किती प्राचीन आहे पहा या धोकेबाज पक्ष्यापासून सावध राहा असं सांगत लेखक कबुतरं आणि माणूस यांचे परस्पर संबंध सांगत यातून झालेल्या मानवी दुष्मणीचे आणि युद्धाचे परिणाम सुचित करतात. मुखवटे परिधान करण्याच्या आणि ते खरे भासवण्याच्या काळावर भाष्य करताना लेखक जे म्हणतात ते असं 'हिंसकाला प्रेमळ आणि हिंसाविरोधकाला संशयित समजणाऱ्यांच्या आजच्या काळात माझ्याच मुसक्या आवळल्या जाण्याची भीती आहे.'

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी

दुःखाचे डोंगर अंगाखांद्यावर घेऊन जगण्याला भिडताना 'पोकळी' कथेचा नायक भाई तायशेट्ये कंपनीने घेतलेला काही पैसे देऊन कामगारांना कमी करायचा निर्णय कामगारांच्या विरोधी आहे म्हणून त्या विरुद्ध लढायचं ठरवतात. चौदा लोक एकत्र येऊन केस लढवतात, पण बलाढ्य व्यवस्थेच्या पुढे काही चालत नाही. फक्त तारखावर तारखा पडत जातात.

जवळचे पैसे पुंजी संपत आली, अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. लढाई लढणारे शिलेदार धारातीर्थी पडत राहिले पण या व्यवस्थेत न्याय मिळाला नाही. आधी नऊजन गेले होते. आज दहावा या चळवळीची धुरा खांद्यावर घेणारा भीडू तायशेट्ये न्यायाच्या प्रतिक्षेत न्याय मिळेल अशी स्वप्न बघत निघून गेला. उरलेल्या चौघांच्या मनातली पोकळी भाई तायशेट्येच्या आठवणीनं व्यापली गेली.

अशा कितीतरी खऱ्याखुऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतील. घडत राहतील. त्यावर लेखक म्हणतो. 'गोष्टी तश्या संपत नसतात. त्या सांगायला मात्र निमित्त लागतं आणि ऐकणाऱ्याला रस असावा लागतो. बाकी कोण कुणाला शेवटपर्यंत पुरलंय!'

समाजविघातक मनोवृत्तीवर बोट

जगण्याचे असंख्य पदर लिहिलेल्या शब्दांच्या पलीकडे आणि धूसर झालेल्या गर्भित आशयापलीकडे शोधता यायला पाहिजे. ते शब्दात सापडतील असं नाही. काही पोकळ वाटणाऱ्या नोंदी एखाद्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असू शकतात. गजानन राशिवडेकरांनी अनेकांचे अल्पपरिचय लिहिले. निवृत्त झाल्यावर 'स्व'चा शोध घेताघेता जाणवलेलं जगणं खूप मोठ्या नोंदीच होत्या. पण शब्दात सारं वाचायची सवय असणाऱ्यांना भावनेची दारं कशी खुली होतील शंकाच आहे?

मानवी मनाचे, जीवन जाणिवांचे खोल कपारीत लपलेले जगण्याचे गडद रंग आपल्या कवेत घेताना लेखकाच्या आत गोष्टी साठत जातात. जगण्याच्या भर दुपारी उन्हाच्या कडक पहाऱ्यात आपल्या आत उगवून आलेलं उदासपण आणि भोवतालाला जखडून राहिलेलं खरेखोटेपण जातपात-धर्म-पंथ या सगळ्याचे निकष लावून शिकवल्या जाणाऱ्या शाळा, मुलांच्यामधे जातीपाती-धर्मावरून त्यांच्या शिक्षणाचे निकष ठरवणाऱ्या आणि ते कसे खरे आहेत हे सांगणारे संचालक या सगळ्यातून येणारी समाजविघातक मनोवृत्तीवर बोट ठेवतं लेखक आपल्या आत उमटून येणाऱ्या भावनांना जागा मोकळी करून देतात.

प्रचंड विश्वास असणाऱ्या माणसांकडूनही चुका होवू शकतात. पण दुसऱ्याच्या नजरेत आपल्याबद्दल असलेलं अपार श्रद्धेपण तुटत जावू नये म्हणून धडपडताना आपल्याला चूक कबूल करता न येणं आणि त्या चूकीचं ओझ आयुष्यभर आपल्याला वाहवं लागणं, साक्षात्कार होवूनही काही न करता येणं सगळं जडजड होत जाणारं रणकंदन आपल्या आत साठवून चालण्यापलीकडे काही हातात नसणं हे उर दडपवणारं सारं सोबत घेऊन लेखक 'साक्षात्काराच्या आधल्यामधल्या वेळा' बद्दल बोलत राहतात.

हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

जगण्याचं गूढ उकलणाऱ्या गोष्टी

मुळचे कोण उपरे कोण याच्या सीमारेषा फायद्यात धुंडाळणारा समुह, गटातटाच्या बेरजा मांडत जगणारी माणसं हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई हम सभ भाई भाईच्या घोषणा देणाऱ्या भागात धार्मिक दंगली उसळून एकमेकांना कापायला उठलेली माणसं पाहिली की बदलते अर्थ अंगावर उसळून येतात. या सगळ्या कथांमधे जगण्याचे आशय आणि मृत्यूच्या काठावरची उलघाल व्यक्त करताना लेखक आपल्याला आपली गोष्ट सापडण्याविषयी बोलताना आपली गोष्ट आपल्याला सापडू दिली जात नाही. अनेक गोष्टीच्या ढिगात आपली गोष्ट शोधत हाती काय येईल सांगता येत नाही.

इथं अनेकानेक माणसं संशयाच्या आणि जात-धर्माच्या भूतानं झपाटलेले आहेत. खालच्या-वरच्या जातीपातीतल्या माणसांच्या हत्या होतात. तेव्हा धर्मनिरपेक्ष जन ही उत्पन्न होताना दिसतात. जे समूहा समूहात दोष पेरू शकतात. स्वार्थासाठी कुठल्याही थराला गेलेली माणसं आपण महाभारतापासून पाहिली आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी पांडवांनी धोक्यानं निषांदाची हत्या केली त्या आरोप निश्चिती झाली नाही, कारण सत्ताधारी हेच आरोपी होते, हे अजूनही चालू आहे. लेखक सत्याची मुळं शोधू पाहतोय आणि हाती सर्वत्र असत्य पसरल्याच्या खूणा सापडत जातात.

लेखक मृत्यू विषयी बोलत राहतो. हरवलेल्या नात्यागोत्याच्या मृत्यूचं भयावह तांडव पाहिल्यावर प्रत्येक मृत्यू आपल्या नात्याच्या वाटत राहतो. लेखक अनेक शोध घेत कृष्णाच्या उदात्त हेतूचे महाभारताचे अनेक अर्थ शोधताना त्याचे मानवी जीवनाशी भावभावनाशी असलेले-घेतलेले अर्थ अधिक स्पष्ट मांडत तिरकस शैलीतून वाचणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालताना जयंत पवार जगण्याचं गूढ उकलत जातात.

लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी या पुस्तकातल्या गोष्टीतून प्रयोगाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. वाचताना कवितेच्या लयीत चाललेल्या गोष्टी मनावर परिणाम करत आपल्या आसपास रेंगाळतात.

पुस्तक: लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी
लेखक: जयंत पवार
प्रकाशन: शब्द पब्लिकेशन्स, मुंबई.
पानं: १५५ किंमत: २५५/-

हेही वाचा: 

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

बहिरं व्हायचं नसेल तर डब्ल्यूएचओचा कानमंत्र आताच ऐकायला हवा