बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

२२ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो. 

लुईझ ग्लुकला २०२०चं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळाल्यानं ती आता प्रकाशात आली असली. तरी स्त्रीवादी कविता वाचणार्यान लोकांना ती फार पूर्वीपासून परिचित आहे. भारतात कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे जे काही गैरसमज पसरलेत, त्यातली एक म्हणजे अमेरिकेत सांस्कृतिक पातळीवर अभिजात असं काहीही घडत नाही हा. प्रत्यक्षात ज्याला आज आपण पोस्टमॉडर्न कला म्हणतो, तिच्या संदर्भातले सगळे पायोनियर कलात्मक आणि सांस्कृतिक घडामोडी अमेरिकेत घडल्यात.

फ्रान्स, इंग्लंडने अत्यंत जाणीवपूर्वक अमेरिकन लोकांचं योगदान नाकारायचा प्रयत्न केला. पण तो फसला आहे. त्यामुळेच एका अमेरिकन कवयित्रीला मिळालेल्या या पारितोषिकाने काहींच्या डाव्या भुवयीने आश्चर्य व्यक्त केलं असलं, तरी जगभर याचं स्वागतच होईल, याबद्दल शंका नाही.

अमेरिकेतल्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब

१९४३ मधे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधे ग्लुकचा जन्म झाला. ‘फर्स्टबॉर्न,’ ‘अव्हेरनॉ,’ ‘विलेज लाईफ,’ हे तिचे गाजलेले संग्रह. ‘द वाइल्ड ईरीस’ला पुलित्झर मिळाला आणि ती प्रकाशात आली. सुरवातीला उत्तम गीतांसाठी ती गाजली. पण हळूहळू तिच्या आत्मचरित्रात्मक कवितांनी अमेरिकन जगतात प्रतिष्ठा प्राप्त करायला सुरवात केली. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्‍या उत्तरस्त्रीवादी साहित्यिकांत तिचा समावेश होतो.

वैयक्तिक अस्तित्व वैश्विक करण्यासाठी तिला हा नोबेल पुरस्कार मिळाला आहे, असं जाहीर झालं असलं तरी ती मला आवडली तिच्या मातुल आणि कन्येय भावांच्यामुळे! माझी आई किंवा कन्या मॉडर्न कवियत्री असती, तर तिने कशा कविता लिहिल्या असत्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिच्या कविता!

अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब तिच्या कवितेत पडलेलं दिसतं. प्रतिमांचं अवडंबर न माजवता फिलिंगच्या सुईवर उभे केलेले नेमके शब्दप्रयोग हे तिचं वैशिष्ट्य. बोदलेयर रिल्के यासारख्या आधुनिक कवींनी अनेक जुने प्लॉट नवे करून दाखवले आणि या पायवाटेवरून अनेक कवी गेले. ग्लुकनेही हेच स्त्रीवादाच्या संदर्भात करून दाखवलं.

म्हणायचं होतं आय लव यू

‘मिथ ऑफ डिव्होशन’मधे हेडीसचा प्लॉट हे याचं उत्तम उदाहरण! हा मृत्यूचा देव प्रेयसीसाठी डुप्लिकेट पृथ्वी बनवल्यानंतरही तो त्याच्या प्रेयसीला मृत्यूलोकात घेऊन येतो. एका अर्थाने हे मूळ कथेचे विपरितिकरण. अमेरिकन समीक्षेत याला मॉक एपिक म्हणतात.


त्याला म्हणायचं होतं ‘आय लव यू’
आणि तो म्हणाला
तुझा आता मृत्यू झालाय
त्यामुळे तू सेफ आहेस,

या त्यातल्या खतरनाक ओळी! ‘अ फेबल’मधे ब्रेश्टने आपल्या नाटकात वापरलेला पूर्ण फिरवलेला क्लेम करणार्याक दोन आया आणि एक मूल याचा प्लॉट तिनं पूर्ण पुन्हा फिरवलाय. हे ती अनेकदा करते.

हेही वाचा : ...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

ती भोळसट रोमँटिक नाही

तिला अनेकदा पोस्टकन्फेशनल कवयित्रीही मानलं जातं. कारण साठोत्तरी घरेलू आयुष्याच्या अनेक प्लास्टिकल शोकात्मिका तिच्या कवितेत आढळतात, ज्यांना तिच्या आत्मचरित्राची जोड असते. अशा कविता लिहिताना ती अनेकदा वर्णनात्मक वाक्यांचा सढळ वापर करत मग कल्पनेचा वापर करत झेपावणे, हे ती सहज करते. उदाहरणार्थ,

You're stepping on your father, my mother said, 
and indeed I was standing exactly in the center of a bed of grass,
mown so neatly 

अशा वर्णनात्मक ओळींनंतर 

it could have been my father's grave,

अशी एक साधी ओळ सगळं बदलून टाकते आणि मग सहज 

although there was no stone saying so.

असं सांगत ती जणू वास्तव निर्देश करते. ज्यामुळे भाव घनदाट होतो. ही खास स्त्रैण शैली आहे आणि ती भोळसट रोमँटिक नाही. त्यामुळेच, 

This is my home, he said.
The city? the city is where I disappear.

स्वर्गातले नातेवाईक झाले रियल

तिची परदेशी पाहुण्यांविषयीची अनुवादित कविता इथं देतोय. 

‘परदेशी पाहुणे’

१. मी आयुष्याच्या त्या वळणावर कधीची पोहोचले होते,
जेव्हा माणसाला दुसर्या बद्दल भास व्हायला लागतात
स्वतः ऐवजी, मध्यरात्री
फोन वाजला आणि वाजतच राहिला
जगात माझी कोणाला गरज भासावी तसा;
पण सत्य नेमकं उलटं होतं
अंथरुणात पडल्या पडल्या मी
त्या घंटीचं पोत चाचपतेय. तिच्यात
माझ्या आईचं मागे लागणं होतं आणि वडिलांचं
दुःखाने झाकोळून जाणं.
मी फोन उचलला तेव्हा लाईन डेड झाली होती
की फोन चालू होता; पण करणारा डेड झाला होता?
की फोन नव्हता, कोणी दाराशी उभं होतं?

२. माझी आई आणि वडील उभे आहेत तशा थंडीत
पुढच्या पायर्यां वर. माझी आई रोखून पाहणारी
तू माझी लेक, माझ्यासारखीच एक बाई.
तू कधी आमचा विचारच नाही केला. आई म्हणते,
तुझी पुस्तकं स्वर्गात मिळतात तेव्हा वाचतो आम्ही.
आमचा कधी कुठे उल्लेखही नसतो आताशा, निदान तुझ्या बहिणीचा कधीतरी
आणि ते माझ्या मृत बहिणीकडे बोट दाखवतात, मी कधी न पाहिलेल्या
घट्ट गाठोड्यात बांधून आईने तिला उराशी धरलीये
आम्ही नसतो ना आई म्हणतेय तर तू जगात आलीच नसतीस
तुझी बहीण - तिचा आत्मा आहे तुझ्यात
आणि ते अदृश्य होतात, मोरमॉन मिशनर्यां सारखे

३. रस्ता पांढरा शुभ्र झालाय परत
सगळ्या झुडपांवर बर्फाचे थर
बर्फाच्या पेटीतून झाडं चमकताहेत
मी अंधारात पडून राहिले, रात्र संपायची वाट पहात
आयुष्यातली सगळ्यात लांब रात्र
माझ्या जन्माच्या रात्रीपेक्षाही लांबलेली.
तुमच्याबद्दलच तर लिहीत असते नेहमी,
मी मोठ्याने म्हणाले.
जेव्हा जेव्हा मी ‘मी’ म्हणते तेव्हा ते तुम्हीच असता.

४. बाहेर रस्त्यावर नीरव शांतता
पसरलेल्या चादरीच्या चोळ्यामोळ्यात
कुशीवर लवंडलेला रीसिव्हर
त्याची पिरपिर थांबून काही तास लोटले आहेत.
होता तसाच सोडून दिलाय मी
त्याची तार फर्निचरखाली लटकतेय
मी पडणारं बर्फ पाहत राहते
त्याने काही दृष्टीआड नेलं होतं, असं नव्हे
उलट गोष्टी आहेत त्यापेक्षा मोठ्या दिसायला
लागल्या होत्या
कोण करतं फोन असा मध्यरात्री?
त्रास करतो, निराशा करते
आनंद तर झोपलेला असतो, छोट्या बाळासारखा.
अनुवाद - अरुंधती देवस्थळे

दुसऱ्याबद्दल होणाऱ्या आभासाबद्दल बोलून ही कविता सुरू होते. पुढे घर आणि फोन यांच्या अस्तित्वाच्या ताणाबाण्यातून अनेक जीवघेण्या गोष्टींची घरात आणि मनात होणारी उलथापालथ येत राहते. मधेच स्वर्गातले नातेवाईक रियल असल्यासारखे येतात. नातं जुळतं. मी आणि आई-वडील एकच असं वाटतं आणि शेवटी कोणीही येत नाही आणि प्रश्न तसाच राहतो. कोण करतं फोन असा मध्यरात्री? खरंच कोण फोन करतं? असा प्रश्न सोडून कविता संपते.

हेही वाचा : लेखक कवींनो, कळपात नका राहू, माणसांत मिसळा

ही तर कवितेची कँडल

खरंतर ग्लुकला नोबेल मिळेल, असं मला वाटलं नव्हतं. पण मिळाला, हेही बरं झालं. मूळ प्लॉटच्या प्रोसेस बदलणार्याळ ज्या काही मोजक्या कवियित्री आहेत, त्यातील ती एक. हे पारितोषिक बहुदा त्यासाठी दिलेलं असावं. ‘विलेज लाईफ’मधल्या एका कवितेत तिनं म्हटलंय

मी बोटं उघडते
आणि सगळं जाऊ देते
दृश्य जग, भाषा,
रात्रीच्या पानांची सळसळ
उंच गवताचा वास लाकूडजळिताचा
मी सर्व जाऊ देते
आणि एक कँडल पेटवते
(विलेज लाईफ)

ही कवितेची कँडल आहे, हे उघडच आहे. सध्याच्या हायटेक जगात अनेक प्रकारच्या लाईट्स झगमगाट करत असताना ही कँडल पेटवणं महत्त्वाचं ठरतं. कारण ती बाहेर नाही, आत आहे काळजात! ग्लुक अशी कँडलसारखी रेंगाळत उजळत राहाते आतल्या आत. बहुदा त्या आत टाकलेल्या प्रकाशासाठी ग्लुकला हा सन्मान दिला असावा.

हेही वाचा : 

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!

८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला