भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल मराठी नाहीत म्हणून वादळ उठवण्यात आलं. लेखणीच्या स्वामिनीला केवळ भाषा या निकषावर नाकारलं. आंतरसांस्कृतिक संवाद अर्थात इंटरकल्चरल कम्युनिकेशनमधे भाषेचा खूप मोठा रोल आहे. भारतात आतापर्यंत जो संवाद झाला त्याला भाषेचा अडसर कधीच आला नाही.
आजवरचा महाराष्ट्राचा इतिहास पाहता, महात्मा बसवेश्वरांनी कन्नड भाषेतून जगण्याचं सोपं तत्त्वज्ञान दिलं. त्यांच्या लिंगायत धर्माचं पालन कन्नड न येणारे कितीतरी लोक कन्नडभूमीसह महाराष्ट्रात आणि बाहेरही करत आहेत. त्याचबरोबर कानडी आणि तेलुगू मुलखात असे लाखो लोक आहेत, जे त्यांच्या त्यांच्या लिपीतून ज्ञानोबा तुकोबांचे मराठी अभंग वाचत आणि गात असतात.
सर्वज्ञ चक्रधरस्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आलेत. त्यांनी मराठीला श्रीमंत केलं. समृद्ध केलं. मराठी औदार्यानं त्यांचा गौरव झाला. संस्कृत भाषेचं प्राबल्य असताना त्यांनी मराठीला आपली करून सर्वांची केली. महानुभावपंथांतील ग्रंथरचनादेखील त्यांच्या आदेशाने, प्रेरणेने मराठीतूनच लिहिली गेली. गुजरातमधील भरुचमधून ते आले होते. त्या काळातली गुजराती भाषा आणि मराठीचा संघर्ष झाला नाही. या दोन्ही भाषा वर्षानुवर्षं बहिणी बनून राहिल्या. एकमेकांच्या शब्दांची देवघेव केली. आजही आपण पाढ्यात बे एके बे म्हणतो. बे म्हणजे गुजरातीत दोन.
संत नामदेव तर भाषाप्रभूच होते. त्यांनी पंजाबीत लिहिलं. तेव्हाच्या हिंदीत म्हणजे खडी बोलीत लिहिलं. महाराष्ट्राच्या मराठी मातीतून ते पंजाबात गेले. संत नामदेव आजही पंजाबी लोकांच्या गळ्यातले ताईत आहेत. संत नामदेवांची रचना शिखांच्या पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथसाहिबमधे आहेच. त्यांच्या नावाचे गुरूद्वारे पंजाबमधे आहेत. मराठी मातीने कबीर, रोहिदास, मीरा या नॉन मराठी प्रतिभावंतांना आणि विचारतत्त्वांना अत्यंत प्रेमाने स्वीकारलं. या सगळ्यांवरच संत नामदेवांचा प्रभाव आहे.
आपलं एक अख्खं साहित्य संमेलन पंजाबात घुमानमधे झालंय. आपण सहगल या पंजाबी आडनावाच्या लेखिकाबाईंना विरोध करत असू. तर मग पंजाबवाल्यांनी आपल्याला उभंच करायला नको होतं. पण त्यांनी आपण नामदेवांच्या गावाहून आलो म्हणून स्वागत केलं. उभा पंजाब महाराष्ट्राच्या स्वागतासाठी उभा राहिला. बडोद्याला तर गेल्या वर्षीच संमेलन झालं. तिथेही आपलं स्वागत झालं. तिथे मुख्यमंत्र्यांपासून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी मराठी संमेलनांमधे हजेरी लावली. पण आम्ही करंटेपणा करत आहोत.
संत सेना न्हावी महाराज तर हिंदीभाषिक होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातला. ते महाराष्ट्रात आले. मराठीत लिहू लागले. मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठीसह अनेक भाषांचा नियमित व्यवहारात वापर केला. संभाजी महाराजांनी तर अमराठी भाषेत ग्रंथरचनाही केल्यात. परदेशातून भारतात आलेल्या फादर स्टिफन्स यांनी ‘ख्रिस्तपुराण’ हा ग्रंथ मराठीतून लिहिला. आधुनिक मराठी भाषेत अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपलं योगदान दिलं.
यवतमाळ येथील साहित्य संमेलन आणि नयनतारा यांच्या परभाषेतल्या साहित्यालेखनावरून चर्चा सुरू आहे. जगात भारताची ओळख विविधतेत एकता असलेला देश अशी आहे. इथल्या भाषा, वेश, आहार, कला, संस्कृती, मानववंशशास्त्रीय रचना वेगवेगळ्या आहेत. तरी भारतीय हे एक मुख्य तत्त्व या सर्वांचा आधार आहे.
मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवर गदारोळ माजवला जात आहे. पण हाच संकुचित विचार सातआठशे वर्षांपूर्वी असता तर? पंजाबमधे संत नामदेवांना प्रवेशच नाकारला गेला असता. सर्वज्ञ चक्रधरस्वामींनी दिलेलं वैभव आपल्याला मिळालं नसतं. महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकारक विचारांनी आपल्याला चेतवलं नसतं. कबिरांचा विज्ञानवाद, रोहिदासांचा कर्मवाद, मीरेच्या कवितेतला रसास्वाद या सर्वांना आपण मुकलो असतो.
व्यक्तीपेक्षा तत्त्व मोठं असतं. हे भारतीय संस्कृतीने दाखवून दिलं. या तत्त्वांमुळेच संवादाचा धागा जुळला. आपण मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेतोय. एलियन्ससोबत बोलण्याचा खटाटोप करतोय. मात्र आपल्याला आपल्या लोकांसोबतच संवाद साधणं अवघड झालंय. संत नामदेवांनी पंजाबामधे जाऊन संवाद साधला. सर्वज्ञ चक्रधरस्वामी, महात्मा बसवेश्वरांनी विविध माध्यमातून मराठी मातीशी संवाद साधला. विचार आणि तत्त्वांचं त्यांचं वर्ल्ड वाईड नेटवर्क होतं. आपण मात्र भाषा या आधारावर काय काय साधून राहिलो हा चिंतनाचाच विषय आहे.
पब्लिसिटी स्टंटचा भाग म्हणून काहीही करण्याचं फॅडच आहे. यवतमाळ इथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी काहीतरी हवा करतो. वाद ओढवल्यावर राज ठाकरेंना शेवटी पत्र लिहून सगळी सावरासावर करावी लागते. या राजकारणाने विचार थोडेच संपणार आहेत. संत नामदेव, संत कबीर, संत तुकोबाराय यांनाही संपवण्याचे प्रयत्न झालेत. मात्र आज शेकडो वर्षानंतरही ते जिवंत आहेतच. सर्वांना जागवत आहेत. प्रेरणा देत आहेत. महाराष्ट्राचा वारसा संकुचितपणाचा नाही. सर्वसमावेशकतेचा आहे. हेच आपला सांस्कृतिक इतिहास सांगत आहे. ते भाषेवरून कोती राजकारणं करणाऱ्यांना कोण सांगणार?