लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

०७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. जगभरातले डिझायनर्स आपलं काम घेऊन इथे आलेत. टीवीवर, पेपरात रॅम्प वॉकवर आज हे झालं, ते झालं अशा बातम्या येतात. पण या शोमधे नेमकं काय घडतं, हा शो कशासाठी आहे, तुम्हा-आम्हाला यातून काय मिळतं या सगळ्या शंकांविषयी चर्चा करणार हा लेख.

फॅशन म्हटल्यावर चमचमणार्‍या सेलेब्रिटींचं विश्व आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण हे विश्व म्हणजेच काही फॅशन डिझायनिंग नाही. त्यापलीकडे जाऊन फॅशन डिझायनिंगचा एक कला म्हणून विचार केला पाहिजे. आणि हे नुसता फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून साधेलच असंही नाही. इथे घट्ट पाय रोवायचे असतील तर कलेतला सच्चेपणा आणि मेहनत महत्त्वाची ठरते. यासाठी अनेक जण धडपडत असतात.

फॅशन शो कशासाठी?

फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन याची सर्वसामान्य व्याख्या म्हणजे आकर्षक ड्रेस डिझायनिंग आणि त्या डिझाईन्सचे प्रदर्शन करणारे मॉडेल्स. आजची तरुणाई फॅशन डिझाईनकडे वळताना दिसत आहे. आपली क्रिएटिविटी आपण आपल्या डिझाईन्समधे दाखवावी असा प्रत्येकाचा अट्टाहास असतो.

कुठे तरी एक मोठी संधी मिळावी आणि आपली कला लोकांसमोर मांडता यावी म्हणून या क्षेत्रातला प्रत्येकजण वर्षानुवर्ष झटत असतात. या मेहनतीला एक आधार असतो तो म्हणजे विविध ठिकाणी होणारे फॅशन शो किंवा रॅम्प वॉक. यातलाच एक सर्वात मोठा आणि यशाची शिखरं गाठण्यासाठी मदत करणारा शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक.

लॅक्मेमुळे सगळ्यांना नामी संधी

२०१९ चा लॅक्मे फॅशन वीक सध्या मुंबईत सुरू आहे. या शोमधे मोठमोठ्या डिझायनर्सच्या कपड्यांचं शोकेसिंग मोठ्या दिमाखात सादर होतंय. सिनेमातले, टीवीतले अनेक अॅक्टर, अॅक्ट्रेस या शोसाठी वेगवेगळ्या डिझायनर्सनी तयार केले कपडे घालून रॅम्प वॉक करताना आपल्याला दिसतात. नवीन तसेच नावाजलेल्या डिझायनर्सच्या अनेक उत्तम डिझाईन या निमित्ताने पाहायला मिळतात.

भारतातले अनेक दिग्गज डिझायनर, नवशिके किंवा या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणारे हे सर्वच या शोकडे एक मोठी नामी संधी म्हणून बघतात. १९९९ मधे या सोहळ्याला सुरवात झाली. आता दोन दशकं पार केलेल्या हा सोहळ्याने आज भारतातच नाही तर जगभरात आपला नावलौकिक तयार केलाय. हा फॅशन मेळा अनेक डिझायनर घडवत आहे. तसंच हातात कला असलेल्यांना कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना संधी उपलब्ध करून देत आहे.

भारतात वर्षातून दोनदा हा शो होतो. एक समर शो आणि दूसरा विंटर. या शोमधे अनेक डिझायनर आपले कौशल्य सादर करण्यासाठी धडपडत असतात. या शोसाठी आपली निवड व्हावी म्हणून डिझायनर अथक परिश्रम घेत असतात. त्यासाठी खूप चढाओढ सुरू असते. लॅक्मे फॅशन वीकमधे आपली कला सादर करण्यासाठी अनेक पायर्‍या पार कराव्या लागतात. त्यातली एक आणि मुख्य म्हणजे निवड फेरी.

फॅशन वीकसाठी तयारी हवीच

फॅशन वीकमधे सहभागी होण्यासाठी त्यांची एक निवड प्रक्रिया असते. तुमची डिझाइन्स, पोर्टफोलिओ पाठवावा लागतो. तुमचं काम तिथे सिलेक्ट झालं की, त्यापुढची तयारी मोठी असते. त्यासाठी आपण उत्तम काम करत असल्याची खात्री स्वत:ला असली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या रॅम्पवरचं आपलं कलेक्शन नावाजलं गेलं तर ते बाजारात आणण्याची आपली आर्थिक क्षमता आहे का, हेही तपासून पाहायला हवं. आणि ही क्षमता नसेल तर त्यासाठीच्या वेगवेगळ्या पर्यायांवरही काम करायला हवं.

केवळ उत्तम कलेक्शन सादर करून भागत नाही. त्याला मागणी आल्यावर त्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. आपण हे करू शकणार नसू तर त्या एका शोनंतर तुमचं नाव कुणाच्याही लक्षात राहणार नाही. तुमच्या कामात सातत्य असलं पाहिजे. फॅशन शोमधे सहभागी होताना सर्वांगीण तयारी केली पाहिजे.

रिसर्चचा हुकमी एक्का

यासोबतच डिझायनिंग क्षेत्रात महत्त्वाचा असतो तो रिसर्च. एखाद्या कपड्यावर काम करायचे असेल तर त्यासाठी आधी खूप मोठ्या रिसर्चमधून आपल्याला जावं लागतं. त्या कपड्याचा प्रकार, त्यावर कोणते रंग पक्के बसतात, कोणते रंग सुटतात हे बघावं लागतं. तसेच कुठे काय बनतं, कसं बनतं, कशासाठी वापरलं जातं या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असावी लागते. हे सगळं करताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, साधारणतः आपण जिथे राहतो तिथल्या वातावरणाप्रमाणे कपडे वापरले जातात.

आता हेच बघा. मुंबईमधे हवामान नेहमीच दमट असतं. त्यामुळे अंगाला घाम येतो. अशा वातावरणात नेहमी सूती कपडे वापरले जातात. याउलट काश्मिरसारख्या प्रदेशात कायम लोकरीचे कपडे वापरले जातात, नाही तर वापरावे लागतात. त्यातही एक पॅटर्न असतो. हा पॅटर्न हवामान, आजूबाजूच्या गोष्टी ध्यानात घेऊन तयार करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे.

चांगल्यांच्या पाठीमागे स्पॉन्सर्सची रांग

यासारख्या मोठ्या मोठ्या शोमधे गेल्या काही काळात स्पॉन्सर्सनी उडी घेतलीय. टेक्सटाईल, कपड्याचे ब्रॅंड, फॅब्रिक कंपन्या स्वतःचा ब्रँड आणि नाव कपड्यांवर प्रसिद्ध करण्यासाठी डिझायनरला प्रायोजकत्व देऊ करतात. त्यातून डिझायनरला त्या कपड्यांसाठीच आवश्यक साहित्य हे प्रायोजक देतात. म्हणजेच आपलं डिझाईन चांगलं असेल तर असे स्पॉन्सर्सही आपल्या कामाला फंडिग करायला एका पायावर तयार असतात.

मसबा गुप्ता, अनुश्री रेड्डी यासारख्या डिझायनर्सची नावं यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमधे नावाजली गेली. फॅशन इंडस्ट्री हे सध्या सर्वात वेगवान अपडेट होणारं क्षेत्र आहे. खूप मोठ्या प्रमाणात भारतातल्या तरुणाईचा कल फॅशन आणि मीडियाकडे वळतोय. एकविसाव्या शतकात फॅशन आणि मीडिया एज्यूकेशनमधे झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे विद्यार्थ्यांना करियरच्या नवनवीन वाटा खुल्या झाल्यात. आपणही यामधे पाऊल ठेऊ शकतो. पण त्याआधी पक्का रिचर्स करायला पाहिजे.