रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

१७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


१७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद युनिवर्सिटीत पीएचडी करणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली. 'विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरल्यामुळे प्रशासनाने माझी फेलोशिप रोखली. त्या ताणातूनच आत्महत्या करतोय' असं रोहितनं सुसाईड नोटमधे लिहून ठेवलं. रोहितच्या मृत्यूनंतर अनेकांनी वादग्रस्त बोलत उलटसुलट प्रश्न निर्माण केले. त्या सगळ्यांना उत्तर देत नवे प्रश्नसुद्धा उपस्थित करणारं केशव वाघमारे यांचं हे पत्र.

प्रिय रोहित,

मला माहीत नाही की, माझ्या भावना तुझ्यापर्यंत कशा पोचतील! ‘मृत्यूनंतरचं जीवन’ या भाकड गोष्टीवर तुझा विश्‍वास नव्हता. माझाही नाही. पण तुझ्याशी बोलण्याची माझी अनिवर इच्छा याक्षणी मी रोखूच शकत नाही. म्हणून हा पत्रप्रपंच!

तुझी-माझी ‘भेट’ कधीच झालेली नव्हती. शिवाय लौकिक अर्थाने तू माझा कोणत्याही अर्थाने रक्ताचा किंवा जैविक नातेवाईकही नाहीस. पण तुझ्या मृत्यूने मी अंतर्बाह्य हादरून गेलोय. खूप अस्वस्थ, असाहाय्य वाटतंय. तुझ्या ‘सुसाईड नोट’मधला एक एक शब्द आठवून हमसून-हमसून रडूनही झालंय. तरीही मनातला भावनांचा कल्लोळ काही केल्या शांत होत नाही. तुझ्या रूपाने मी माझा बंधू, चळवळीतला एक साथी गमावलाय. खूप रितेपण जाणवतेय!

पंधरा दिवसांपूर्वी एका हातात बिछाना आणि दुसर्‍या हातात डॉ. आंबेडकरांची भली मोठी प्रतिमा घेऊन हॉस्टेलबाहेर पडतानाचा तू, अनेक सामाजिक आंदोलनांत मुठी आवळून रस्त्यावर लढतानाचा तू, आत्मा आणि शरीर वेगळं झालंय म्हणून मृत्यूला कवटाळणारा तू, पुन्हा पुन्हा स्मृतीपटलावर येतोयस.

हेही वाचाः संसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?

तू कुठल्या जातीचा आहेस?

तुझ्या बलिदानाला घेऊन अनेकांनी आपल्या ‘कातडी बचाव’ कोडग्या संवेदनेसह भरपूर अक्कल पाजळायला सुरवात केलीय. आत्महत्येनं कुठं प्रश्‍न सुटतात का? हा काही मार्ग होऊ शकतो का? काही ‘संघी’ लोकांनी तर तुझ्या जातींचाच प्रश्‍न उपस्थित करत आपली जात दाखवायला सुरवात केलीय.

तू कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या प्रांताचा आहेस, कुठल्या भाषेचा आहेस, याच्याशी मला काडीमात्र देणंघेणं नाही. एका नव्या मानवीय जगाच्या निर्माणाचं स्वप्न पाहणारा तू एक सृजनशील माणूस आहेस, एवढंच माझ्यादृष्टीने पुरेसं आहे! काहींनी मात्र तुझ्या देशभक्तीवरही प्रश्‍नचिन्ह उभे करत तुला कायर, भेकड ठरवायला सुरवात केलीय. मी तुला कायर, नासमज, भ्याड असं काहीही समजत नाही.

आपल्या ‘आत्मसन्मानासाठी’ माणूसपणाच्या ओळखीसाठी तू कोणती किंमत चुकवलीस याची जाणीव, आपल्याच माणूसपणाची ओळख नसणार्‍यांना कशी समजू शकेल? आपल्या मृत्यूनंतर ‘मित्रांनाच नाही तर शत्रूनाही त्रास देऊ नका.’ असं सांगणार्‍या तुझ्या हृदयातल्या बुद्धाची अपार करुणा हजारो वर्ष वर्ण, जात, पितृसत्तेच्या मानसिक रोगाने ग्रस्त असलेल्यांना कशी अनुभवता येईल? तुझ्या संवेदना समजून घ्यायला वर्ण, जात, पितृसत्तामुक्त मन या समाजाकडे कुठंय? तुझ्या बलिदानाचं मूल्य हा समाज समजूच शकत नाही!

संसदेत बाँब टाकल्याप्रकरणात भगतसिंगाची चौकशी करणार्‍या गुप्तहेर अधिकार्‍याने ‘कसली तरी तीव्र व्यथा तुझ्या जीवनात आहे आणि अशा प्रकारचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्या आहे’ असा युक्तिवाद केला. तेव्हा भगतसिंग म्हणाला होता, ‘माझ्यासारखा ठाम विश्‍वास आणि ध्येय असलेला माणूस निरर्थक मरण पत्करण्याचा कधीच विचार करू शकत नाही.’ रोहित, मी तुझ्या बलिदानाची तुलना भगतसिंगांच्या बलिदानाशी करत नाही. पण मला तुझं बलिदान त्यापेक्षा कमअस्सल वाटत नाही.

तुझ्या जाण्याने काही प्रश्‍न निर्माण झालेत

१. धर्म, जात, प्रांत, लिंग यांच्या पलीकडे जाऊन माणूस कधीतरी केवळ माणूस म्हणून माणसाच्या आयुष्याची मूल्यं समजून घेईल का?

२. देशभरातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधून ब्राह्मणी विचारधारेने दलित, आदिवासी आणि स्त्रियांचा चालवलेला माइंड जिनोसाइड थांबेल का?

३. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढीची इच्छा, आकांक्षा, स्वप्न याचबरोबर त्याची कोंडी आणि घुसमट समजून घेऊन परिवर्तनाच्या चळवळी काही विधायक मार्ग शोधतील का?

याची उत्तरं मी कुणाला विचारू?

माणूस निसर्गापासून तुटल्यामुळे माणसांच्या बनावट प्रेमामुळे, गंजलेल्या विचारामुळे, माणसाचं मूल्य त्याच्या तातडीच्या ओळखीवर, जवळपासच्या शक्यतांवरून ठरवलं जातंय. त्यामुळे माणसांचा एक दैदिप्यमान वस्तू म्हणून कुठल्याही क्षेत्रात जगताना आणि मरतानाही विचार केला जात नाही. यामुळे तू दु:खी होतास, निराश होतास. पण या जात भांडवली पितृसत्तेच्या देशात कोणती व्यक्ती याला अपवाद आहे?

हजारो वर्षांच्या इतिहासात दलित आणि महिला रोजच अपमानाचं, मानखंडनेचं, लाचारीचं, हतबलतेचं जीवन जगत आलेत. तुझ्या ‘माणूस’ असण्याची ओळख नाकारली म्हणून तू दु:खी झालास. आदिम समाजात व्यक्तीची ओळख काय होती? जातीचा, जमातीचा घटक! पण आधुनिक समाजात व्यक्तीला तिच्या सामूहिकतेला न नाकारता अवकाश मिळायला हवा. पण सगळ्यांना तो मिळत नाही.

हेही वाचाः पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

या देशात ‘माणूस’ नाही तर ‘जाती’ राहतात

तुला ‘कार्ल सेगन’सारखं विज्ञानलेखक व्हायचं होतं. पण तुझ्या व्यक्तिगत आकांक्षेची किंमत इथं नाही! कारण तू दलित आहेस! आणि या देशात ब्राह्मणी व्यस्थेने दलित समूहाची ओळख परंपरेने चौथ्या पायरीवर केलीय. तिच्या वर जाण्याचा अधिकार तुला तथाकथित आधुनिक लोकशाही व्यवस्थेतही नाकारण्यात आलाय.

या देशात ‘माणूस’ नाही तर ‘जाती’ राहतात. जातीगत अस्मितेच्या ओळखीच राहतात. ज्यांच्या आदर्शातला समतामूलक समाज, अहिंसामुक्त समाज निर्माण करण्यासाठी तू शिकत होतास, संघर्ष करत होतास त्या डॉ. आंबेडकरांना तरी या देशाने कधी निखळ माणूस म्हणून पाहिलंय का? आजही त्यांची ओळख जातीत आणि पुतळ्यातच बंदिस्त नाही का?

रोहित, आज त्या डॉ. आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! त्याने अशी कोणती अस्मिता आपल्या रक्तात पेरलीय, ज्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगी ‘आत्मसन्मानाशी’ तडजोड करून जगताच येत नाही. रक्तविरहित क्रांती, संसदीय लोकशाही, बुद्धाचा धम्म ही त्याने दिलेली आपली विरासत आहे की, व्यवस्थेने केलेली कोंडी? काहीच समजत नाही रे!

तुला ‘व्यवहारी आंबेडकरवादी’ होता आलं नाही

तुझ्या पत्रात तू बालपणीच्या एकाकीपणाबद्दल लिहिलंस. त्याने फार गलबलून आलंय! तुझ्या शत्रूंनी फेलोशिप बंद करून, पोलीस केस करून, रेस्टिकेट करून तुला खूप एकाकी करण्याचा प्रयत्न केला. पण याला तू पुरून उरलास. त्याविरुद्ध मुठी आवळून रस्त्यावर लढत राहिलास. सर्वांच्या दु:खाबद्दल, त्यांच्या मानवी हक्कांबद्दल, गोडसेच्या आधुनिक वंशजांबरोबर पंगा घेत राहिलास. निर्भयाचा बलात्कार असो की, याकूबचा मृत्युदंड, न्यायाच्या बाजूने उभा राहिलास.

गेल्या पंधरा दिवसांपासून तर प्रचंड थंडीत विद्यापीठाच्या फुटपाथवर बसून तुझ्यावरच्या अन्यायाबद्दल बोलत होतास. सोशल मीडियावरून मदतीचं आवाहन करत होतास. सरकार दरबारी निवेदनं पाठवत होतास. कोर्टाची तारीख पे तारीख करत होतास. तेव्हा तुझ्या बाजूने कुणीच का उभं राहिलं नाही? मीडिया, समाज, चळवळ, बुद्धिवंत यांना तुझा आवाज का ऐकू आला नाही? की तुझ्यावरच्या अन्यायाचं गांभीर्य तुझ्या मृत्यूनेच समजणार होतं?

तुझा आत्मसन्मान ठोकरला गेला. तुझी माणूसपणाची ओळख नाकारली गेली. केवळ एवढीच अडचण नव्हती तुझी. विचार करणारे, प्रश्‍न विचारणारे, व्यवस्था बदलू पाहणारे, तिच्यासाठी केवळ पोपटपंची न करता रस्त्यावरचा संघर्ष करू पाहणारे, या व्यवस्थेला केव्हाही नको असतात. अन् तू तेच केलंस. तुला लवता आलं नाही. तुला चाटूगिरी करता आली नाही. शिवाय नको तेवढा पाठीचा कणा ताठ ठेवलास. तुला नाही जमलं ‘व्यवहारी आंबेडकरवादी’ व्हायला. तुला शरीर आणि आत्म्याचं वेगळं होणं नामंजूर होतं. म्हणून तू बलिदान केलंस.

हेही वाचाः भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण

स्वप्नआकांक्षेतून तू जिवंत राहशील!

हिटलरच्या नाझी फौजेने वंशश्रेष्ठत्वाच्या अहंगंडातून सुरू केलेला छळछावण्यांचा इतिहास या देशातल्या शिक्षणसंस्थांतून दलित विद्यार्थ्यांचं ‘वर्तमान’ बनून राहिलाय. म्हणूनच कुलगुरूला लिहिल्या एका पत्रात तू म्हणाला होतास, ‘कुलगुरू महोदय, कृपा करून प्रत्येक दलित विद्यार्थ्याला प्रवेशाच्या वेळीच १९ मिली ग्रॅम ‘सोडियम एजाइट’ देत जा. जेव्हा ते स्वत:ला आंबेडकरांसारखं समजू लागतील, तेव्हा त्यांना याचा उपयोग होईल. याशिवाय त्यांच्या खोलीत एक चांगली दोरीही पाठवत जा.’

युगायुगाची घोर नाकेबंदी करत या ब्राह्मणी व्यवस्थेने या देशातला नवा समाज घडवू पाहणारी, विषमतामुक्त समाजाची सृजनशील स्वप्नं पाहणारी क्रांतीमूलक तरुणाई भलेही संपवली असेल. तिच्या छळाचा, खुनाचा इतिहासही मोठा असेल. पण बुद्ध, चार्वाक, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, भगतसिंग ते दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या प्रतिकाराचा गौरवशाली वारसाही समृद्ध आहे.

‘उपेक्षा, अपमान, छळ सोसूनही विषमतामुक्त, जातीविहीन समाज निर्माण करण्याच्या ध्येयाप्रती अढळ रहा.’ हा डॉ. आंबेडकरांचा जीवनसंदेश रक्तात पेरून घेतलेल्या लाखो रोहितला ती व्यवस्था कसं संपवणार? त्यांच्या जातीविहीन समाज निर्माण करण्याच्या आभाळस्वप्नांना कसं संपवणार? रोहित तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. या लाखो रोहितच्या स्वप्नआकांक्षेतून तू जिवंत राहशील! ते तुझं जातिविहीन समाजरचनेचं स्वप्न पेरत राहतील! त्यामुळे रोहित तू मरा नही. रोहित कभी मरते नहीं!

तुझा साथी
केशव वाघमारे, पुणे

(केशव वाघमारे यांच्या खैरलांजी ते रोहित दशकाची अस्वस्थता या पुस्तकातून साभार. पुस्तकासाठी संपर्क हरिती प्रकाशन ९०६७०३५६५३)

हेही वाचाः 

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार