व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो, पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला ब्रेन डेड असं म्हणतात. ब्रेन डेथ झालेल्या माणसाला मृत म्हणायचं की नाही हा भारतातला मोठा प्रश्न आहे. देशात पहिल्यांदाच केरळ सरकारने ब्रेन डेथवर नियमावली तयार केलीय. या निमित्ताने देशातही ब्रेन डेथबाबत कायदा व्हावा, अशी मागणी जोर धरतेय.
अगदी काल परवाचीच गोष्ट आहे. आपल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगावमधे राहणारा २५ वर्षांचा महेश येरूणकर त्याच्या आजोबांच्या स्मृतीदिनासाठी शेजारच्या गावात गेला होता. घरी परतायला रात्रीचा एक वाजला. किर्रर अंधारात टू विलरवरून घरी येत असताना महेशच्या दुचाकीला मोठा अपघात झाला. या अपघातात त्याच्या छातीला, पोटाला आणि डोक्याला जबर मार बसला. अपघात झाला तिथून त्याला माणगावच्याच एका हॉस्पीटलमधे नेण्यात आलं.
पण माणगावमधल्या डॉक्टरांना त्याचं निदान करता येईना. डॉक्टरांच्या सांगण्यावरून महेशला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमधे हलवण्यात आलं. तो पूर्णपणे बेशुद्धावस्थेत होता. त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. जे. जे. मधल्या डॉक्टरांनी त्याच्या काही टेस्ट करून त्याला ब्रेड डेड घोषित केलं. डेड म्हणजे मरण. महेशचा मेंदू मेला होता. पण हृदयाची धडधड चालूच होती. मग त्याला मरण कसं म्हणायचं? हा ब्रेन डेड प्रकार आहे तरी काय? महेशचे कुटुंबीय गोंधळून गेले होते.
वेंटिलेटर काढला की महेशचा श्वासही बंद होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आता वेटिंलेटर काढून आपल्याच मुलाला आपणच मारण्यासारखं होणार नाही का? हा पेच सोडवायचा कसा? शेवटी ब्रेन डेड म्हणजे नक्की काय हे महेश कुटुंबीयांना समजावून सांगितलं, त्याचं काऊन्सिलिंग केलं. आणि डॉक्टरांनी महेशच्या अवयवांचं दान करून काही लोकांना जीवनदान देता येऊ शकतं, असं कुटंबियांना सांगितलं. अवयवदान करण्याची विनंती केली. महेशच्या घरच्यांनीही या विनंतीला मान दिला या अवयवदानातून जवळपास १५ लोकांना नवजीवन मिळालं.
हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो पण इतर सगळे अवयव काम करत राहतात अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत ब्रेन डेड म्हणतात. अशी स्थिती एकदा आली की त्यातून बरा होऊन माणूस पुन्हा जिवंत होईल, ही शक्यता जवळपास नसते. आर्टिफिशिअल लाईफ सपोर्ट सिस्टीम किंवा वेंटिलेटरवर ठेवलं नाही तर काही तासांतच ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवयही निकामी होतात. असं असलं तरी ब्रेन डेड व्यक्तीची फुफ्फुसं, हृदय आणि शरीराच्या इतर अवयवांचं दान करता येतं.
तातडीची मदत मिळाली नाही तर अपघातात जागीच मृत्यूमुखी पडलेल्या माणसाचे अवयव दान करता येत नाहीत. कारण एकदा व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजेच ह्रदयाची धडधड थांबली की अवयवही निकामी होतात. या तुलनेत ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव दान करणं सोपं असतं. कारण, व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो पण अवयव काम करत असतात. त्यामुळे खरंतर, ब्रेन डेड व्यक्तीमुळे अनेकांचे प्राण वाचवता येतात.
पण भारतात ब्रेन डेड व्यक्तीचं वेंटिलेटर काढायचं की नाही हा पाप पुण्याचा प्रश्न मानला जातो. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांची परवानगी असल्याशिवाय डॉक्टर वेटींलेटर काढू शकत नाहीत किंवा परस्पर अवयवदानही करू शकत नाहीत. व्यक्तीचा श्वास चालू आहे याचा अर्थ ती जिंवत आहे आणि वेंटिलेटर काढून जिवंत व्यक्तीला मारायचं म्हणजे मोठं पापच! असा सामान्य माणसांचा समज असतो. कुटुंबिय ब्रेन डेड व्यक्तीचा मृत्यू झालाय हे स्वीकारू शकत नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलचा, वेंटिलेटरचा खर्च कुटुंबियांना उगाच सोसावा लागतो. शिवाय, अवयव दान न झाल्याने इतर अनेक रूग्णांचे प्राणही जातात.
म्हणूनच जानेवारी २०२० मधे घरच्यांची परवानगी न घेता ब्रेन डेड व्यक्तीचं वेंटिलेटर काढून टाकण्याचा अधिकार केरळ सरकारने डॉक्टरांना दिला. अर्थात, हे पाऊल उचलण्याआधी काही अटींची पूर्तता डॉक्टरांना करावी लागणार आहे. ब्रेन डेथ वर नियम बनवणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय.
ऑर्गन इंडिया या संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या वीडियोत न्युरोसर्जन म्हणून काम करणारे डॉ. संदीप वैश्य यांनी ब्रेन डेड काय असतं हे सांगितलंय. संदीप वैश्य म्हणतात, ब्रेन डेथ म्हणजे न्युरोलॉजिकल डेथ. या शब्दाचा अनेकदा गैरअर्थ घेतला जातो. अनेकांना कोम्यात जाणं आणि ब्रेन डेथ होणं एकच आहे असं वाटतं.’ कोम्यात गेलेला माणूस पुन्हा बाहेर येऊन बरा होऊ शकतो. पण ब्रेन डेथ झालेला माणूस परत जिवंत होत नाही.
डॉक्टर पुढे सांगतात, कॉर्टेक्स आणि ब्रेनस्टेम असे मेंदूचे दोन भाग असतात. कॉर्टेक्स म्हणजे मेंदूंचा मोठा भाग आणि ब्रेनस्टेम म्हणजे छोटा. ब्रेनस्टेम म्हणजे पाठीच्या कण्याचा वरचा भाग. कॉर्टेक्समुळे वाचणं, लिखाण, बोलणं अशा महत्त्वाच्या कृती आपण करू शकतो. या कॉर्टेक्सला काही झालं तर माणूस कोमात जातो. त्याची शुद्ध हरपते. पण कोमात गेल्यानंतरही त्या माणसाला वेदना जाणवतात. काही गोष्टींवर तो प्रतिक्रियाही देतो.
कोमात गेलेल्या व्यक्तीची शुद्ध कधी कधी परत येते. पण ब्रेन डेथ म्हणजे संपूर्ण मेंदूंचा कॉर्टेक्स आणि ब्रेनस्टेम दोघांचा मृत्यूच. ब्रेनस्टेममधून सगळ्या शरीराला संदेश दिले जातात. ब्रेनस्टेम बंद पडला की माणसाचा श्वास थांबतो. श्वास घेणं थांबलं की हृदय बंद पडतं. साहजिकच, हृदय बाकीच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे तेही बंद पडतात आणि संपूर्ण शरीरच मरतं.
हेही वाचा : सरकारने कायदा करून रूग्णांची लुबाडणूक थांबणार?
‘एखाद्या व्यक्तीला डोक्यावर जोराचा मार लागला तर ब्रेन डेथ होते. डोक्याला मार लागला की मेंदूला सूज येते. पण आपली कवटी ही खूप टणक असते. त्यामुळे मेंदूच्या प्रसरणावर मर्यादा येतात. औषधं देऊन किंवा ऑपरेशन करून ही सूज कमी केली जाऊ शकते. पण त्यात डॉक्टरांना अपयश आलं तर मेंदूंवर प्रचंड दाब येतो. हा दाब हृदयाच्या दाबापेक्षा अनेक पटीनं जास्त असतो. अशावेळी हृदयाला ऑक्सिजन असलेलं रक्त मेंदूपर्यंत पोचवता येत नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूतल्या पेशी म्हणजेच सेल्स मरायला लागतात. हळूहळू एक एक पेशी मरत जाते आणि गळून पडते,’ अशी माहिती संदीप वैश्य यांनी दिली.
एकदा पेशी गळून पडल्या की पुन्हा त्यांना जिवंत करता येत नाही. ब्रेनस्टेम बंद पडलं की हृदयाचा श्वास बंद पडतो आणि सगळं शरीर मरून जातं. त्यामुळे व्यक्ती ब्रेन डेड झालीय की नाही हे तपासण्यासाठी ब्रेनस्टेम चालतोय की नाही याची तपासणी करावी लागते. ब्रेन स्टेमकडून ज्या गोष्टी नियंत्रित केल्या जातात त्या गोष्टींना चालना देऊन हे परीक्षण केलं जातं.
ब्रेन डेड होण्याआधी व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वेंटिलेटरवर ठेवलं जातं. त्यामुळे ब्रेन डेड झाली आणि फुफ्फुसं काम करत नाहीत अशी स्थिती असली तरी वेंटिलेटरवरून मिळणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनमुळे हृदय धडधडत राहतं. इतर अवयवांसारखं हृदयाचं काम हे मेंदूच्या आज्ञेवर चालत नाही म्हणून हे शक्य होतं. हे हृदय इतर अवयवांनाही रक्त आणि ऑक्सिजन पुरवत राहतं. ऑक्सिजनच्या सहाय्याने हे अवयव व्यवस्थित राहतात. पण मेंदूची ऑर्डर नसल्यामुळे अवयव काम करत नाहीत. त्यामुळे असे अवयव दानासाठी फार चांगले असतात.
भारत सरकारच्या १९९४ च्या मानव प्रत्यारोपण कायद्यात ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचे कुटुंबिय अवयव दानाची परवागनी देत नाहीत तोवर व्यक्तीचं वेंटिलेटर काढता येणार नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे ब्रेन डेड व्यक्ती भरपूर काळापर्यंत वेटिंलेटरवर पडून असते. कुटुंबियही काहीही निर्णय घेत नाही. यावर मध्यममार्ग म्हणून केरळ सरकारने एक निर्णय घेतलाय.
केरळ सरकारच्या नव्या निर्णयामुळे ब्रेन डेड आणि अवयव दान या दोन प्रक्रिया वेगळ्या झाल्यात. त्यामुळे घरच्यांना ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचं अवयव दान करायचं नसेल तरीही त्याला वेंटिलेटरवरून काढण्याचा अधिकार केरळ सरकारने डॉक्टरांना दिलाय.
हिंदुस्तान टाईम्सच्या एका बातमीनुसार, केरळ सरकारने ब्रेथ डेड कुणाला म्हणायचं याचेही मापदंड घालून दिलेत. कोणत्याही रूग्णाला ब्रेन डेड घोषित करायचं असेल तर त्यासाठी दहा अटी पूर्ण करायला हव्यात असं या कायद्यात सांगितलंय. ४ डॉक्टरांच्या एका टीमला सहा तासांच्या अंतराने दोनदा ब्रेनस्टेमची तपासणी करावी लागणार. यातला निदान एक डॉक्टर सरकारी असावा. ब्रेन डेड घोषित केल्याची तारीख आणि वेळ डॉक्टरांना मृत्यूच्या दाखल्यावर नोंदवावी लागेल. त्यावर चारही डॉक्टरांच्या सह्या हव्यात. हा दाखला कुटुंबियांच्या हवाली केल्यानंतर लगेचच वेंटिलेटर काढून टाकता येईल.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लूएचओच्या अहवालानुसार पाकिस्तान आणि रोम सारख्या देशांमधे ब्रेन डेथला अजूनही मान्यता देण्यात आलेली नाही. अमेरिकेत मात्र ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीला मृत मानणं स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी अशा अनेक देशांत ब्रेन डेथबद्दल व्यवस्थित नियम आहेत.
भारतात मात्र असे कोणतेही नियम नाहीत. केरळ वगळता कोणत्याही राज्यात ब्रेन डेथची व्याख्याही केलेली नाही. अवयव दानाच्या कायद्यामुळे ब्रेन डेथचा फक्त ओझरता उल्लेख कायद्यात येतो. कायद्यात इतका मोघमपणा असल्याने ब्रेन डेड व्यक्तीचं काय करायचं याबाबत डॉक्टरांमधेही गोंधळ दिसतो. केरळ सरकारच्या निर्णयामुळे आता तरी या महत्त्वाच्या मुद्द्यावर देशपातळीवर कायदा होईल अशी आशा आहे.
हेही वाचा :
आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?
मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील
सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा