काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर: पंतप्रधानांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट', निवडणूक स्ट्रॅटेजी?

२१ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमधे दिला जायचा. आपल्या या तीन शक्‍तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी इथल्या मोहिमा भाजपने पूर्ण केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीमधे जे काही काम केलंय, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करत असल्याचं दिसतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘काशी-विश्‍वनाथ कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या अजेंड्याला धार देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केलीय. या कॉरिडॉरचा लोकार्पण सोहळा जागतिक पटलावर आणून उत्तर प्रदेश सरकारनं हिंदूंना एक संदेश दिलाय. हा हिंदुत्वाचा संदेश देण्यासाठीच सोहळ्यानंतर सुमारे महिनाभर वेगवेगळे कार्यक्रम सुरू राहणार आहेत.

८ मार्च, २०१९ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्‍वनाथ प्रकल्पाच्या शिलान्यास सोहळ्याला आपण बाबा विश्‍वनाथ यांना चिंचोळ्या गल्ल्यांपासून मुक्‍त करत आहोत, असा संदेश संपूर्ण देशाला दिला होता. ८०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता साकार झाला असून, आपण आपला वायदा पूर्ण केला असल्याचा संदेश केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकार देऊ इच्छितंय.

१३ डिसेंबरला झालेल्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यापुरती ही गोष्ट मर्यादित राहिली नाही. त्यापाठोपाठ महिनाभर महाभियान सुरू राहणार आहे. देशभरातल्या हिंदूंना या काळात काशीमधे आमंत्रित करून भाजप त्यांना आपल्या या मोहिमेशी जोडून घेतंय.

हेही वाचा: बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?

काशीआडून हिंदुत्वाचा अजेंडा

‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है,’ असा नारा काही वर्षांपूर्वी भाजपच्या सभांमधे दिला जायचा. आपल्या या तीन शक्‍तिस्थानांपैकी अयोध्या आणि काशी इथल्या मोहिमा भाजपने पूर्ण केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काशीत जे काही काम केलंय, त्याच्या जोरावर जिंकण्याची व्यूहरचना हा पक्ष करत असल्याचं दिसतं.

काशी विश्‍वनाथ धाममधे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून काशीच्या माहात्म्याबरोबरच हिंदुत्वाचा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जगभरातल्या हिंदूंसाठी काशी हे पवित्र क्षेत्र मानलं जातं. महादेवाच्या या दरबारात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा संदेश द्यायचा आहे.

काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणानंतर महिनाभर चालणार्‍या कार्यक्रमात भाजपचे सर्व पदाधिकारी, मंत्री आणि प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुढचा महिनाभर भाजपचे कार्यकर्ते गावोगावी जातील. प्रत्येक गावात छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून आयोध्येनंतर आता काशीचा कायापालट हा लोकांमधे चर्चेचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.

मोदींच्या वाराणसी निवडीचं कारण

२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी जेव्हा वाराणसीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोचले होते, तेव्हा ‘माँ गंगा ने मुझे बुलाया है,’ असं म्हणाले होते. मोदी वाराणसीतूनच लोकसभा निवडणूक का लढवत आहेत, याचं मोठं कुतूहल लोकांना वाटलं होतं. कारण त्यांचं मूळ राज्य गुजरात असून, उत्तर प्रदेशाशी त्यांचा पूर्वी फारसा संबंध आलेला नव्हता.

धार्मिक आणि ऐतिहासिक नगरी असल्यामुळे वाराणसी हे भाजपच्या पारंपरिक मतप्रणालीशी सुसंगत वातावरणनिर्मिती करणारं शहर आहे. त्याचप्रमाणे पूर्वांचल हेही एक खास कारण होतं. शिवाय हा मतदारसंघ भाजपसाठी नेहमीच बालेकिल्ला मानला गेलाय. भाजपची व्यूहरचना खूपच लाभदायक ठरली आणि २०१९ला नरेंद्र मोदी यांनी इतर कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला नाही.

हिंदुत्व आणि पूर्वांचलचा विकास या दोन्ही गोष्टी भाजपला भविष्यात लाभदायक ठरणार आहेत, याची पक्षाला खात्री आहे. २०१४ला वाराणसीमधून निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या मतदारसंघात मोठमोठी विकासकामं केली.

हेही वाचा: ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त

पंतप्रधानांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’

काशी-विश्‍वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधानांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला गेला. वाराणसीला ज्या-ज्यावेळी पंतप्रधानांनी दौरा केला, त्या-त्यावेळी ते बाबा विश्‍वनाथाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्याचबरोबर या प्रकल्पाच्या कामातील प्रगतीची पाहणीही केली. २०१९ला या कॉरिडॉरची कल्पना मोदींनी बोलून दाखवली होती. या योजनेचा उद्देश मंदिराचं एकूण क्षेत्रफळ सुमारे ५० हजार चौरस मीटरपर्यंत वाढवणं हा आहे. या कॉरिडॉरसाठी ८०० कोटी रुपये खर्च आला आहे.

या कॉरिडॉरसाठी मंदिराच्या आसपासच्या सुमारे ४० हजार चौरस मीटर जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलंय. मंदिराच्या आसपास राहणार्‍या दाट लोकसंख्येला विस्थापित करावं लागणं, ही मुख्य समस्या होती. पण कौशल्यानं हे काम करण्यात आलं. २६० घरमालकांना या इमारतींमधे राहणार्‍या भाडेकरूंना कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी जमीन अधिग्रहण करण्यातच दोन वर्ष निघून गेली. अधिग्रहणानंतर जुन्या मंदिरांना संरक्षण देणं हा महत्त्वाचा मुद्दा होता.

अधिग्रहण केल्यानंतर घरं पाडली जाऊ लागली, तेव्हा त्यात अनेक जुन्या मंदिरांचा शोध लागला. १३५ छोट्या-मोठ्या मंदिरांची प्रतिष्ठापना या कॉरिडॉरमधे एका साखळीच्या स्वरूपात करण्यात आली आहे. संपूर्ण परिसराचं क्षेत्रफळ सुमारे ५५ हजार चौरस मीटर आहे.

काशीचं ऐतिहासिक महत्व

सर्वात महत्त्वाची एक गोष्ट अशी की, ज्ञानव्यापी मशिदीचं संचालन करणार्‍या समितीने मशिदीच्या परिसराबाहेर जमिनीचा एक तुकडा विश्‍वनाथ मंदिर ट्रस्टला दिला आहे. ही जमीन इतर एका जमिनीच्या मोबदल्यात दिली गेलीय. काशी विश्‍वनाथाचं मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, हजारो वर्षांपासून वाराणसीत हे मंदिर आहे. एकदा या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि गंगेत स्नान केलं की मोक्ष मिळतो, असं मानलं जातं.

प्रलयकाळातही या मंदिराचा लोप होत नाही, असंही मानलं जातं. अशा वेळी भगवान शंकर हे मंदिर आपल्या त्रिशुळावर धारण करतात. सृष्टीकाल आल्यावर ते खाली उतरवून ठेवतात. याच स्थानावर भगवान विष्णूने सृष्टी उत्पन्‍न करण्यासाठी तपश्‍चर्या करून आशुतोषाला प्रसन्‍न करून घेतलं होतं. त्यानंतर ते जेव्हा झोपले, तेव्हा त्यांच्या नाभीकमळातून ब्रह्मा उत्पन्‍न झाले. त्यांनी सर्व सृष्टीची रचना केली अशी श्रद्धा आहे.

स्कंदपुराणात या नगरीचं इतिहासात वर्णन केलंय. रामायण आणि महाभारतातही या नगरीचं वर्णन आहे. सध्याच्या मंदिराचं बांधकाम महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८०मधे केलं होतं. त्यानंतर महाराजा रणजितसिंह यांनी १८५३ला १ हजार किलो शुद्ध सोन्यानं हे मंदिर बनवलं. नेपाळच्या महाराजांनी इथं नंदीची विशाल मूर्ती स्थापित केली होती.

या शहरावर पहिल्यांदा मोहंमद घोरीने ११६३ला आक्रमण केलं होतं. नंतर सातत्याने ६०० वर्ष परदेशी आक्रमणं या शहराने सहन केली. १६६३ला औरंगजेबाने मंदिर नष्ट करून त्याजागी भव्य मशीद उभारली. १८५२मधे बाजीराव पेशवे यांनी इथं प्रसिद्ध काळभैरव मंदिर बांधलं.

हेही वाचा: आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ

वाराणसीसाठी हजारो कोटींच्या योजना

पंतप्रधान मोदी यांनी ७ नोव्हेंबर २०१४ला आपल्या पहिल्या दौर्‍यावेळी बडा लालपूर इथं ट्रेड फॅसिलिटी सेंटर आणि टेक्स्टाइल सेंटर तयार करण्याची घोषणा केली होती आणि वाराणसीच्या विकासाला गती द्यायला सुरवात केली. त्यानंतर वाराणसीच्या प्रत्येक दौर्‍यावेळी हजारो कोटी रुपयांच्या योजनांसह ते आपल्या मतदारसंघातल्या जनतेला भेटत राहिले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नोव्हेंबर २०२०ला पंतप्रधान मोदी यांनी वर्च्युअल माध्यमातून दोन हजार कोटींच्या असंख्य योजनांची सुरवात करून काशीची विकासयात्रा गतिमान केली. कोरोनासारख्या अडथळ्यांमुळेही काशीचा विकास थांबू शकत नाही, असा संदेश तेव्हा दिला गेला होता.

पंतप्रधान मोदी नोव्हेंबर २०२०ला देव दिवाळीच्या दिवशी बनारसला गेले होते आणि बनारसचं नवं स्वरूप संपूर्ण जगासमोर मांडलं. ७ वर्षांत बाबतपूर-वाराणसी रस्ता, रिंग रोड-1, लहरतारा-चौकाघाट फ्लायओवर, बीएचयूची सुपर स्पेशालिटी, एमसीएच विंग, कॅन्सर हॉस्पिटल, पॅरिसेबल कार्गो, जलपरिवहन अशा अनेक योजनांवर त्यांनी काम केलंय.

३५२ वर्षांनी जीर्णोद्धार

काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरमुळे गंगास्नान केल्यानंतर भाविक गंगाजल घेऊन थेट विश्‍वनाथ मंदिरात पोचू शकतील. ज्योतिर्लिंगावर गंगाजलाचा अभिषेक करतील आणि २७ देवळांच्या मणिमालेचं दर्शन घेतील. ही मंदिरं खूपच खास आहेत.

यातली अधिग्रहण केलेली घरं पाडल्यानंतर अनेक मंदिरं सापडलीत. अशा मंदिरांची संख्या सुमारे २५ आहे. अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्‍वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर सुमारे ३५२ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जीर्णोद्धार केला आहे आणि हे मंदिर आता भारताची ओळख बनणार आहे.

हेही वाचा:  

एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १

एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग २

एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ३

एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ४

६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)