क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

२० जुलै २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


वर्ल्डकप होऊन आता आठवडा उलटला. फायनल मॅचची चर्चा अजून संपता संपेना. इंग्लंडला विजयी घोषित करण्याच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या टीमसाठी सहानुभुती व्यक्त केलीय. पण या सगळ्यांत खुद्द न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यम्सनची भूमिका खूप वेगळी आहे.

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेची फायनल मॅच गाजतेय. पंचांकडून झालेल्या काही चुका चर्चेत आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही टीमकडून धावांची बरोबरी झाली असताना चौकार कुणी अधिक मारले हा निकष लावून इंग्लंडला विजेता घोषित केलं गेलं याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.

पण खुद्द ज्या संघाला या निर्णयाचा फटका बसला त्या न्यूझीलंडने हुकलेल्या विजेतेपदाबद्दल गळा न काढता खिलाडूवृत्तीने हा निर्णय स्वीकारलाय. आणि याचं श्रेय जातं त्यांचा कॅप्टन केन विल्यम्सन याला.

पराभव पचवण्याचा संयमही

केन विल्यम्सनने पत्रकार परिषदेतसुद्धा संयमाने प्रश्नांची उत्तरं दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने चेहऱ्यावरचं स्मित कायम ठेवलं. आपल्याला वाईट जरूर वाटलं पण राग आलेला नाही असं त्याने बोलूनही दाखवलं. त्याने दाखवलेली ही परिपक्वता वाखाणण्याजोगी होती. विल्यम्सन आणि त्याच्या टीमने सर्वांची मनं जिंकलीत. त्यांनी मैदानावर तर जिगर दाखवलीच पण पराभव पचवण्याचा संयमही दाखवला.

विल्यम्सन हा तर इतका नम्र आणि खिलाडू आहे, की जेव्हा त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ‘मी’ असं त्याने चकित होऊन विचारलंसुद्धा. त्याचं हे सभ्य, सुसंस्कुत वागणं पुरस्कार देणाऱ्या निवड समितीने जमेस धरलं हे खूप चांगलं झालं. तसा विल्यम्सन मैदानावरच्या कामगिरीत काही कमी पडला नव्हताच.

हेही वाचाः वर्ल्ड कप फायनलमधे जिंकला तो क्रिकेट हा जेण्टलमन्स गेम

मॅन ऑफ द सिरिजसाठी निवड

विल्यम्सनने बॅट्समन म्हणून या स्पर्धेत ५७८ रन काढले. तो कॅप्टनने अधिक धावा काढण्याच्या विक्रमाचाही धनी बनलाय. त्याने नेतृत्वात तर चमक दाखवलीच. आपल्या टीमला एकत्र ठेवत फायनलपर्यंत नेलं. त्याची फिल्डिंगमधे चांगली कामगिरी आहेच. त्याने शालीन वागणूक मात्र संपूर्ण स्पर्धेत दिसली. ती महत्वाची ठरली. 

एरवी रोहित शर्माने पाव शतकं मारत ६४८ धावा काढल्या, तर बांगलादेशच्या शकीब अल हसनने ६०६ धावा आणि ११ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल स्टार्कने २७ बळी घेतले. ही कामगिरी चमकदारच. पण केवळ आकडेवारी न बघता मॅन ऑफ द सिरीज निवडण्यासाठी इतर बाबीही बघितल्या गेल्या हे उत्तम झालं.

टीमला जिंकण्याचं बळ दिलं

एकतर विल्यमसनची टीम बलवान, विजेतेपदाचा दावेदार मानली जात नव्हती. या टीममधले खेळाडू भविष्याच्या दृष्टीने चिंतेत होते. कारण न्यूझीलंडमधे क्रिकेटपटूंना भरघोस पैसा मिळतो असं नाही. काही माजी खेळाडू आज विपन्नावस्थेत आहेत. बेकारीशी झुंजताहेत. असं असताना खेळाडूंमधे जोश आणि उत्साह ठेवण्याची किमया विल्यम्सन करत होता. आपणही काही कमी नाहीत ही भावना त्याने त्यांच्यात पेरली होती.

तो स्वतः म्हणतो ‘माझ्या टीममधे बरेच कॅप्टन आहेत. मी त्यांचं म्हणणं ऐकतो. संघहितासाठी जो चांगला सल्ला असतो तो मी स्वीकारतो.’ विल्यम्सनचा हा मोठेपणा. एवढंच नाही तर तो त्याच्या स्तुतीने वाहून जाणाऱ्यामधलाही नाही. त्याला विचारलं गेलं, ‘सगळे जण विल्यम्सनसारखं असलं पाहिजे असं नाही का वाटत?’ यावर त्याने उत्तर दिलं, ‘नाही, ज्याने त्याने आपल्याला जे आवडतं, पटतं, जमतं तसंच वागावं. तरच मजा आहे.’

हेही वाचाः टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

जिंकलंस भावा!

विल्यमसनची ही विचारसरणी नक्कीच कौतुकास्पद आहे. जिथे बहुतेकवेळा नेतृत्व हाती आल्यावर मनमानी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. आपलंच सर्वांनी ऐकावं असा अहंपणा येतो. तिथे विल्यम्सनचा हा सभ्यपणा नक्कीच वेगळा ठरतो आणि भावतो.

मार्टिन गप्तिलचं उदाहरण देता येईल. तो बॅटिंगमधे सातत्याने अपयशी ठरला होता. पण त्याच्याकडून एक जबरदस्त कामगिरीही होईलच असा विश्वास एक कॅप्टन म्हणून विल्यमसन त्याला देत होता. एवढंच नाही तर सुपर ओवरसाठी त्याने गप्तिललाच धाडलं.

सचिन तेंडूलकरने या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट संघ निवडला. त्याचे नेतृत्व त्याने विल्यम्सनकडेच दिलंय. सलाम त्या केन विल्यम्सनला!

हेही वाचाः 

इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया