सर ज्युलियन सॉरेल हक्सले. नोबेल विजेत्या अनेक शास्त्रज्ञांना घडवणारा अवलिया. त्यानी सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितलं, विज्ञान लोकप्रिय केलं. ऑक्सफर्डमधे प्राध्यापकी केली. प्रेमात पडले. ब्रेकअप झालं. डिप्रेशनमधे गेले आणि त्यातून बाहेरही आले. उत्क्रांती, जीवशास्त्र, मानवतावाद अशा वेगळ्यावेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांनी सांगितलेला मानवतावाद आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा होता.
उत्क्रांतीवाद आणि मानवतावाद यांना वेगळं काढता येत नाही. कारण एकदा तुम्हाला उत्क्रांतीचं तत्त्व समजलं की तुम्हाला कोणत्याही देव आणि धर्म संकल्पनेची गरज लागत नाही. सगळ्या माणसांचा पूर्वज एकच असल्याने वंश आणि प्रांतवादाच्या भिंतीही गळून पडतात.
मानवता हेच जीवनासाठी आवश्यक सुंदर मूल्य समजत असलेली व्यक्ती इतर बंधनं नाकारते. आज आपण एका खानदानी उत्क्रांती समर्थकाची आणि मानवतावाद्याची ओळख करून घेणार आहोत. 'खानदानी' यासाठी की आजोबा टी. एच. हक्सले यांनी उत्क्रांतीचा प्रचार केला आणि तोच वारसा ज्युलियन हक्सले यांनीही जपला.
हेही वाचा: कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
सर ज्युलियन सॉरेल हक्सले. एक शास्त्रज्ञ, एक लेखक, एक पक्षीनिरीक्षक, ऑस्कर विनिंग डॉक्युमेंट्री बनवणारा एक अवलिया. एक युजिनिक्सवादी जे पुढच्या काळात मानवतावादी बनले. एक शिक्षणतज्ञ ज्यांनी प्राणिमात्रांच्या संवर्धनासाठी वर्ल्ड वाइल्ड फंडची स्थापना केली.
युद्धकाळात लोकांची पत्रं सेन्सॉर करणारा एक अधिकारी. पुढं जाऊन ते युनेस्कोचे संस्थापक संचालक बनले. पण आपल्या नास्तिक विचारसरणीमुळे सहा वर्षासाठी असलेलं पद त्यांना दोनच वर्षात सोडावं लागलं. व्यक्ती एकच. पण त्याचे पैलू अनेक.
ज्युलियनचा जन्म २२ जून १८८७ ला इंग्लंडमधल्या सरे इथं एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. ग्रीक भाषेचे प्राध्यापक, प्रसिद्ध चरित्रलेखक, स्वतःच्या प्रयोगशाळेत वनस्पतीवर प्रयोग करणारे लिओनार्ड हक्सले हे वडील. ते कॉर्नहिल मासिकात सातत्याने लिहायचे. तर आई ज्युलिया ही शिक्षणतज्ञ होती. लिओनार्ड-ज्युलिया यांना झालेल्या चार मुलांपैकी मोठे ज्युलियन. जसं इंडियाचा इंडियन तसा ज्युलियाचा ज्युलियन.
२० जून १८८७ ला राणी विक्टोरियाच्या सिंहासनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती. या पन्नासाव्या वाढदिवसाला लिओनार्ड आणि त्यांचे वडील थॉमस उपस्थित होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा पुरस्कार करणारे शास्त्रज्ञ थॉमस हक्सले हे त्यांचे आजोबा, डार्विन स्वतः त्यांना माझा सेनापती म्हणायचा.
माध्यमांनी दिलेलं 'डार्विनचा बुलडॉग' हे विशेषण थॉमस कौतुकाने मिरवायचे. प्रसिद्ध रग्बी स्कूलचे ते मुख्याध्यापक. अज्ञेयवादी हा शब्दही थॉमस हक्सले यांनीच दिलाय. आस्तिक आणि नास्तिक याच्यामधे कुठेतरी असणारे अज्ञेयवादी. थॉमस यांचा या नातवंडावर चांगला प्रभाव पडला, म्हणूनच ज्युलियन आणि त्याचा धाकटा सावत्र भाऊ अँड्र्यू दोघे जीवशास्त्राकडे वळले. अँड्र्यूने त्याच्या संशोधनासाठी नोबेलही मिळवलं.
ज्युलियन यांचा जन्म त्यांच्या ऑगस्टा वार्ड या मावशीच्या घरी झाला होता. ज्युलियांच्या माहेरी साहित्यिकांची परंपरा होती. ऑगस्टा वार्डही प्रसिद्ध कादंबरीकार होती. ज्युलियनचा एक भाऊ अॅल्डस वडलांप्रमाणे साहित्यिक झाला, नंतर त्याने हॉलिवूडमधे खूप नाव कमावलं आणि पैसाही. पुढे जर्मनीमधून ज्यु लोकांना बाहेर काढण्यासाठी, आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी या पैशाचा सढळ हाताने उपयोग केला होता.
हेही वाचा: एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
घरच्याच प्रयोगशाळेत वयाच्या चौथ्या वर्षापासून वनस्पती आणि प्राण्यांचं निरीक्षण करत आठव्या वर्षी ज्युलियन इतरांना माहिती देऊ शकेल एवढे जाणकार बनले. पक्षीनिरीक्षणाची एकही संधी ते सोडत नव्हते. हीच आवड जोपासत त्यांनी जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इटॉन कॉलेजमधे प्रवेश घेतला.
जीवशास्त्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी जर्मन भाषेवर प्रभुत्व आवश्यक होतं. म्हणून त्यांनी जर्मन भाषा शिकून घेतली. १९०६ ला भर उन्हाळ्याच्या सुट्टीत जर्मनीतल्या हायडेलबर्ग शहरात हान्स ड्रीष या शास्त्रज्ञांच्या हाताखाली उमेदवारी करून संशोधनाच्या मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या.
सुट्टी संपवून ज्युलियन ऑक्सफर्डमधे दाखल झाले. इथं कविता आणि जीवशास्त्र या परस्परविरोधी वाटणाऱ्या गोष्टींशी एकाच वेळी गट्टी केली. ऑक्सफर्डमधल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लिखाणाला दर वर्षी 'सर रॉजर न्यूडीगेट बक्षीस' देण्यात येतं. १९०८ ला ते बक्षीस होलीरुड या दीर्घकवितेसाठी ज्युलियननी ते पटकावलं होतं.
जीवशास्त्रात पहिल्या क्रमांकाचे मार्क घेऊन ते १९०९ ला पदवीधर झाले. त्यांना नेपल्स स्कॉलरशिप मिळाली. प्रोटोझोआ आणि गर्भवाढशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय. १९०९ ला डार्विन जन्मशताब्दी आणि ओरिजिन ऑफ स्पेसिज प्रकाशित होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने केंब्रिज युनिवर्सिटीत कार्यक्रम आयोजित करण्यात जुलियनचा पुढाकार होता.
स्कॉलरशिपच्या पहिल्या वर्षात ज्युलियननी नेपल्स मरीन बायोलॉजिकल स्टेशन इथं समुद्री पक्षांवर संशोधन केलं. १९१० ला ज्युलियनची ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतच प्राणिशास्त्र आणि शरीरशास्त्र शिकवण्यासाठी नेमणूक झाली. तिथे त्यांनी लाल पायाचा बगळा आणि पाणबुड्या पक्ष्यावर संशोधन केलं. पाणबुड्या पक्षात नर-मादी समानता पाहायला मिळते, आपण म्हणतो ना प्रत्येक स्त्रीमधे पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषात स्त्री.
पाणबुड्या पक्षांमधे लक्षणीयरीत्या दोन्हीमधे नर मादी वृत्ती ५०-५० टक्के विभागलेली असते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी दोघांची समसमान. पाणबुडीवरच्या त्याच्या संशोधन पेपरचं नंतर १९१४ ला पुस्तकात रूपांतर झालं. ज्युलियननी अनेक पक्ष्यांच्या वर्तणुकीचा केलेला अभ्यास पुढे अनेक संशोधकांना उपयोगी पडला.
हेही वाचा: ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?
१९०८ ते १९१८ हा काळ ज्युलियनसाठी भावनिकरीत्या खूप कठीण गेला. १९०८ ला त्यांच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. चार वर्षानंतर २५ वर्षांच्या जुलियनला २५ वर्षाची सावत्र आई आली. १९११ ला लहानपणीची मैत्रीण आणि आईची माजी विद्यार्थिनी कॅथलीनच्या ते प्रेमात पडले. पण दोनच वर्षात त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप के बाद त्यांना नैराश्य आलं.
उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमधे ठेवण्यात आलं. त्यातच छोटा भाऊ ट्रेवेनन याचंही ब्रेकअप झालं, त्याला नैराश्य एवढं आलं की उपचारासाठी त्याच हॉस्पिटलमधे ठेवावं लागलं, आणि तिथंच त्याने आत्महत्याही केली. आणि त्यात भरीस भर म्हणून १९१४ ला जेव्हा पहिलं महायुद्ध चालू झालं तेव्हा जुलियन जर्मनीत होते.
प्रेमात अपयशी मात्र लग्नामधे ज्युलियन कमालीचे यशस्वी झाले. ज्युलिएट बय्यो ही फ्रेंच वकील त्याची आयुष्याची साथीदार बनली. ज्युलियाचा मुलगा ज्युलियन आणि ज्युलियनची बायको ज्युलिएट. भारी योगायोग आहे ना! १९१९ ला त्यांनी ज्युलिएटशी लग्न केलं. चंचल वृत्तीच्या ज्युलियनचा संसार ज्युलिएटने खूप जबाबदारीने केला.
ज्युलियनना लग्नाची बंधनं मान्य नव्हती, त्यांची अनेक प्रेमप्रकरणं चालूच राहिली. मात्र प्रत्येक वेळेस हात पोळल्यावर ते पुन्हा ज्युलिएटकडे यायचे आणि ती बिचारी त्याला पदराखाली घ्यायची. तिने त्यांना संशोधनात मदत केली. या जोडीला अँथनी आणि फ्रांसिस अशी दोन गोंडस मुलं झाली. दोघंही पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनले.
१९१२ ला ज्युलियनला अमेरिकेत टेक्सास इथं विल्यम राईस युनिवर्सिटीत प्राणिशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून बोलावण्यात आलं. त्याचा भाग म्हणून महायुद्धाच्या आधी काही महिने ते जर्मनीत तयारी करत होते. महायुद्ध सुरू झालं आणि पुन्हा अमेरिका गाठली. टेक्सासमधे पक्षीनिरीक्षणाची हौस चांगली भागत होती पण डिप्रेशन काही साथ सोडत नव्हतं.
शेवटी वैतागून १९१६ ला पुन्हा इंग्लंडमधे आले. सेन्सॉर विभागात रुजू झाले. महत्त्वाच्या व्यक्तींचा झालेला पत्रव्यवहार तपासण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. खरं तर त्यांना सैन्यात काम करायचं होतं. पण मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे त्यांना तिथं नाकारण्यात आलं. १९१७ ला त्याला सैन्याच्या इंटेलिजन्स विभागात काम करण्याची संधी मिळाली.
हेही वाचा: कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!
युद्ध संपलं. ज्युलियन यांचं आयुष्यही बदललं. संसार सुरू झाला आणि ऑक्सफर्डमधे प्राध्यापकीही. युद्धात मनुष्यहानी भरपूर झाली होती, त्यात ऑक्सफर्डमधे ज्यांनी ज्युलियनना शिकवलं त्या स्मिथसर यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या जागी ज्युलियनची निवड झाली. १९२७ पर्यंत त्याने पूर्ण वेळ प्राध्यापकी केली मात्र नंतर नोकरीचा राजीनामा देऊन संशोधनाला वेळ द्यायचं ठरवलं.
१९२७-१९३१ या काळात त्यांनी गेस्ट प्रोफेसर म्हणून काम केलं. प्राध्यापकी करताना कोनरॅड लरेन्झ सारख्या अनेक संशोधकांना मार्गदर्शन केलं. कोनरॅड लरेन्झने पुढे जाऊन १९७३ मधे नोबेल पारितोषिक मिळवलं. १९२७ ला त्यांनी त्याचा मित्र वेल्स याला विज्ञान विषयक संशोधन करेन आणि रोज किमान १००० शब्द लिखाण करेन असं वचन दिलं होतं.
त्याचं फळ म्हणून दोन वर्षात 'सायन्स ऑफ लाइफ' नावाचं पुस्तक तयार झालं. त्याचं 'रिलिजन विदआऊट रिविलेशन' हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ज्यात मानवाची उत्क्रांती कशी झाली, यासाठी कोणतीही दैवीशक्ती किंवा चमत्कार आवश्यक नाही याचा पुरस्कार केला. गॅनेट या समुद्रपक्षाच्या संपूर्ण जीवनाची माहिती देणारी डॉक्युमेंट्री त्याने बनवली, जिला १९३४ साली ऑस्कर मिळालं.
तिशीच्या दशकात त्याने खूप प्रवास केला. त्याने आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा ट्सेट्से माशीवर संशोधन केलं, ही माशी चावली, की व्यक्तीची झोप उडून जायची. योग्य उपचार नाही केले तर मृत्यूही. आफ्रिकेत संशोधन करत असतानाच त्याची मानवतावादी आणि भूतदयेची भावना जागृत झाली. पुढे युनेस्को आणि वर्ल्ड वाईड फंड स्थापन करण्यात झाली.
१९४३ ला पुन्हा आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांना काविळीची लागण झाली. मानसिक आजार झाला आणि पूर्णपणे बरं होण्यासाठी एक वर्ष द्यावं लागलं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, १९४१ ला व्याख्यान देण्यासाठी ज्युलियन अमेरिकेत गेले होते. तेव्हा त्यांनी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात सहभाग घ्यावा असं जाहीर व्याख्यानात मत व्यक्त केलं होतं.
युद्ध करणाऱ्या दोन्ही पक्षांना शस्त्र पुरवून गब्बर श्रीमंत होणाऱ्या अमेरिकेत वादळ उठलं. प्रचंड टीका झाली. त्यानंतर काही आठवड्यातच पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला आणि नाईलाजाने का होईना, अमेरिकेला उतरावं लागलं. पण ज्युलियनबद्दल त्यांची अढी राहीली ती कायमचीच.
युनेस्कोत त्यांना पहिलं संचालकपद देण्यात आलं, याच्या मिरच्या अमेरिकेला झोंबल्या होत्या. युनेस्कोची घटना लिहिण्यापासून संस्था स्थापन करेपर्यंत ज्युलियन यांचाच मोठा वाटा होता. मात्र १९३१ ला रशियन दौऱ्यावर असताना त्याने स्टॅलिनची स्तुती केली होती. एवढी गोष्ट आग लागण्यासाठी पुरेशी होती.
नाकाने कांदे सोडणाऱ्या अमेरिकेत ज्युलियनचं नास्तिक असणं अधोरेखित करून टीकेची झोड उठवली गेली. त्यामुळे सहा वर्षासाठी पद असलं तरी ज्युलियन हक्सले यांना दोन वर्षातच पायउतार व्हावं लागलं.
हेही वाचा: फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट
विसाव्या शतकातल्या इतर जीवशास्त्रज्ञांप्रमाणे हक्सले सुरवातीला युजिनिक्सचे समर्थन करायचे. चांगल्यात चांगली गुणसूत्र पुढच्या पिढीत संक्रमित होऊन अधिकाधिक चांगला मानववंश तयार व्हावा अशी त्यामागची प्रामाणिक भूमिका. पण युजीनिक्सच्या नावाखाली नाझी जर्मनीने केलेले भयंकर प्रयोग पाहता त्यांनी पुढील आयुष्यात मानवतावाद आणि ट्रान्सह्युमॅनिजम स्वीकारला.
ट्रान्सह्युमॅनिजम म्हणजे तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर केलेलं अतिक्रमण टाळण्यासाठी उभारलेली चळवळ. अणुशक्ती किंवा रासायनिक बॉम्बद्वारे मानवी जीवनाला केलेला धोका असो, स्वयंचलनामुळे रोजगाराला निर्माण झालेला धोका किंवा कृत्रिम प्रज्ञेमुळे मानवी बुद्धीवर झालेलं अतिक्रमण.
या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणारी चळवळ १९७३ ला मानवतेच्या जाहीरनाम्यावर सही करण्यात हक्सले आघाडीवर होते. हक्सले यांचा मानवतावाद आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा होता.
लायसेंको या रशियन राजकीय शास्त्रज्ञाने लामार्किझम नावाखाली उत्क्रांतीचा चुकीचा अर्थ काढून, इतर शास्त्रज्ञांचा छळ चालवला होता, अनेक शास्त्रज्ञांना नोकरीवरून कमी केलं होतं, काही तर कैदेत टाकले होते. याच्या घोडचुकीमुळे रशियात तीव्र अन्नटंचाई निर्माण होणार होती. त्याबद्दल आवाज उठवण्याचं, पुस्तक लिहून लामार्किझममधले दावे खोडून काढण्याचं काम हक्सले यांनी केलं.
उत्क्रांतीचे समर्थन करतो म्हणून या चार्डीन या विचारवंताला फ्रान्समधल्या चर्चमधे दुजाभाव करण्यात येत होता, मात्र स्वतः नास्तिक असले तरी चार्डीनच्या मदतीला हक्सले धावून गेले. ज्युलियन हक्सले यांनी आपल्या आयुष्यात उत्क्रांती, जीवशास्त्र मानवतावाद या विषयांवर ग्रंथसंपदा निर्माण केली.
हेही वाचा: काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा
हस्कले यांची देव आणि धर्म यांची चिकित्सा करणारी काही वाक्य अतिशय प्रसिद्ध झाली. उदा. 'ज्या बाबतीत पुरावा नाही, त्याबाबत आपण अज्ञेयवादी असलं पाहिजे.' किंवा 'काहीही नसण्याच्या पूर्वी काहीतरी होतं या कल्पनेपेक्षा काहीतरी असण्यापूर्वी तिथं काहीच नव्हतं ही कल्पना जास्त रास्त नाही का?'
तसंच 'लोक म्हणतात की, उत्क्रांती सिद्धांत देव आणि धर्म संकल्पना मोडीत काढतील, आणि जगभर अनैतिकतेचं राज्य माजेल, हे खरं नाही. पण नवं पीक काढण्यासाठी आधीच्या धसाटीवर नांगर फिरवावाच लागतो.'
ते म्हणतात, 'आज जगाला मानवता तत्वावर आधारित एका नव्या धर्माची गरज आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. मी धर्म म्हणतो त्यात कोणताही देव किंवा शक्ती अभिप्रेत नाही, त्यामधे केवळ नैतिकता आणि विज्ञान अभिप्रेत आहे. याच प्रकारचा धर्म सर्व मानवजातीला आवडेल आणि परवडेलही'
अज्ञेयवादासंदर्भात एक गॊष्ट सांगतात. एका अंधार्या खोलीत एका तत्त्वज्ञानी आणि एका ब्रह्मज्ञानी व्यक्तीला काळं मांजर शोधायला सांगितलं. खरंतर खोलीत मांजर नव्हतंच. दोघेजण शोधून थकले तेव्हा तत्त्वज्ञानी म्हणतो. 'खोलीमधे काळं मांजर असेलही, नसेलही, पण ब्रह्मज्ञानी माणसाला नक्की सापडेल.'
हक्सले म्हणायचे 'एकदा का तुम्ही जीवसृष्टीशी नातं जोडलं, मग जगात तुम्ही कुठंही असा, तुम्ही एकटे कधीच नसणार, तुमच्याभोवती तुमच्या गणगोतांचा गराडा असणारच' आयुष्यात त्यांनी मानवांशी आणि सृष्टीतल्या सगळ्यांशी आपली मैत्री जीवापाड जपली. मानवतेच्या प्रश्नासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली.
अगदी मृत्यूच्या काही महिने आधी, इस्रायलवर बहिष्कार टाकला म्हणून ज्या संस्थेची स्थापना स्वतः केली होती, त्या युनेस्कोवर कठोर शब्दात त्यांनी टीका केली होती. मानवतेवर प्रेम करणारा असा हा प्रेमवेडा १४ फेब्रुवारी १९७५ म्हणजे वॅलेंटाईन डेच्या दिवशी हे जग सोडून गेला.
हेही वाचा: तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ
त्यांना आयुष्यभर अनेक सन्मान मिळाले, मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली, सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितलं, विज्ञान लोकप्रिय केलं म्हणून त्यांना युनेस्कोचं कलिंगा पारितोषिक मिळालं. १९५८ ला त्यांना सर पदवीने गौरवण्यात आलं.
अनेक युनिवर्सिटीच्या मानद पदव्या मिळाल्या, रॉयल सोसायटीचं डार्विन पदकही मिळालं. पण प्रेमाच्या बाबतीत हक्सले अपयशीच. त्यांचे मानवतेवरचं प्रेम आणि प्रयत्न हे निष्फळ होताना दिसतात. जगाच्या सगळ्या भागांमधे धर्मवादी शक्ती प्रबळ होताना दिसत आहेत.
खरंच विज्ञानाचा प्रसार होतो तेव्हा धर्म कालबाह्य होणारं, अधिक लोक नास्तिक होणारं. व्यक्ती नास्तिक म्हणून जगायला लागतो, ज्याचा धोका पंडित, पाद्री, मुल्ला यांच्या दुकानांना होतो म्हणूनच उत्क्रांतीचं सूत्र मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना धर्म विरोध करत आला आहे. तरुण पिढीने ही मेख ओळखली पाहिजे.
आजची तरुण पिढी जात, धर्म, वंश, प्रांत यासारख्या अर्थहीन बाबींवर चर्चा करणार आहे की तिच्या बोलण्यात नॅनोटेक्नॉलॉजी, सायबरनेटीक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, ट्रान्सह्युमॅनिजम यासारखे विषय येणार, यावरच या देशाचं, या जगाचं आणि मानवतेचं भवितव्य अवलंबून असणारं आहे.
हेही वाचा:
दोनच कायद्यांचे अधिकार असूनही ईडी पॉवरफुल कशी?
टॉलस्टॉयची बायको मेल्यावर डायरीमुळे झाली जगप्रसिद्ध
लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?
(लेखक प्रसिद्ध ब्लॉगर असून डावकिनाचा रिच्या या नावाने ते फेसबुकवर लिहीत असतात)