ग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'

३० जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या चर्चासत्रात डॉ. सदानंद मोरे, प्रा. अभय टिळक, प्रा. मुकुंद दातार, प्रा. हरी नरके, भास्कर हांडे, प्रा. रणधीर शिंदे, राजा शिरगुप्पे, राजाभाऊ चोपदार, ओमश्रीष दत्तोपासक, अमर हबीब, श्यामसुंदर सोन्नर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, संपत देसाई, संपादक सचिन परब आदी मान्यवर विविध परिसंवादात सहभागी झाले. आणि त्यांनी रिंगणचा प्रवास उलगडला. एखाद्या विद्यापीठाने एका वार्षिकावर घेतलेलं हे पहिलेच चर्चासत्र असावं.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाच्या वारीची सुमारे सातशे-आठशे वर्षांची दीर्घ परंपरा. ज्ञानेश्वर, नामदेव, निवृत्ती, सोपान, गोरोबा, चोखोबा, सावता, जनाई, मुक्ताई आदी संतांनी तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाची चळवळ उभी करून समतेची गुढी उभारली. आणि पंढरपूरच्या वारीला सुरूवात केली.

रिंगणसोबत नवोदीत लेखक जोडलेत

महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा म्हणून या पायी वारीकडे बघितलं जातं. संतांनी उभ्या केलेल्या या भक्ती चळवळीचा हा वारसा अविरतपणे कित्येक पिढ्यांकडे चालत आलेला आहे. विविध जाती, धर्माचे, पंथाचे, भाषेचे लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकाराम आणि विठू नामाचा जयघोष करत, आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला जातात. खरंतर ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना म्हणावी लागेल.

महाराष्ट्रातील याच संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा गेल्या आठ वर्षांपासून रिंगण हे वार्षिक ठळक आणि सखोलपणे घेतंय. संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार आणि संत सावता माळी हे रिंगणचे विशेषांक आतापर्यंत प्रकाशित झालेत. महाराष्ट्रातले वारकरी, वाचक, अभ्यासक, संशोधक आणि विशेषतः तरुणाईकडून रिंगण या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळालाय. विशेषतः नवोदित तरुण लेखक रिंगण सोबत जोडलेत.

हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

रिंगणची सुरुवात कशी झाली?

दिवाळी अंक हे फक्त मराठीतच निघतात. १९०९ ला आलेल्या मनोरंजन अकांपासून याची सुरवात झाली. आता दिवाळी अकांची परंपरा ११० वर्षांची झालीय. सध्या शेकडो दिवाळी अंक निघतात. पण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सोहळा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीवर एकही अंक निघत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन २०१२ साली सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या पत्रकारांनी रिंगण या आषाढी वार्षिकाची सुरवात केली. संत नामदेवांपासून सुरू झालेला हा प्रवास आज संत सावता माळी यांच्यापर्यंत पोचलाय. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात या अंकाचं प्रकाशन होतं.

दरवर्षी आषाढीला एका संताच्या विचारांवर, कार्यावर सखोल, सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील मांडणी हे रिंगणचं खास वैशिष्ट्यं. अंकासाठी निवडलेल्या संतांच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी देशभरात त्या-त्या ठिकाणी जाऊन पत्रकार, अभ्यासकांनी केलेलं वेगळ्या धाटणीचं सखोल आणि चिंतनशील रिपोर्ताज, संत साहित्याच्या अभ्याकांनी मांडणी केलेलं विश्लेषण, संतांच्या उपलब्ध साहित्यावरही अभ्यासपुर्ण समीक्षण आणि विविध ठिकाणी असलेल्या संदर्भखुणा शोधणारं दीर्घ टिपण अशी एकंदरीत रिंगणची मांडणी आतापर्यंत झालेली दिसते. यातून संत विचारांचं रिंगण उभं राहिलं आणि बहरत गेलं.

हेही वाचा: वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

रिंगणचं यश कशात आहे?

संत नामदेवांवरच्या पहिल्या अंकातून नामदेवांच्या जीवनातले अनेक पैलू नव्याने उलगडले. नामदेवांचा महाराष्ट्र ते पंजाब हा प्रवासही यातून वेगळ्या अंगाने वाचकांसमोर आला. २०१४ साली ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अटकेपार घुमान येथे झालं. या संमेलनाला रिंगणच्या संत नामदेव विशेषांकाची पार्श्वभूमी होती किंवा अंकाने पार्श्वभूमी तयार केली. त्यामुळे हे संमेलन सरहद्दने तिथे घेतलं, असं संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी रिंगणचा गौरव केला.

संत नामदेव विशेषांकानंतरचेही सर्वच अंक साहित्यमूल्य असलेले, दर्जेदार आणि वाचनीय झाले. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार हे सर्वच अंक या संतांना उलगडतात. किंवा या अंकातून हे सर्व संत आपल्याला पुन्हा भेटायला येतात. आपल्याशी बोलतात, संवाद साधतात. आपण पुन्हा संत साहित्याकडे वळलं पाहिजे, अशी भावना मनात जागी होते. खरंतर हेच रिंगणचं यश.

हेही वाचा: ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

संत परंपरेकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन

संत सावता माळी यांच्यावरील या वर्षीच्या अंकात मान्यवर अभ्यासकांसोबतच अनेक पत्रकारांनी, लेख, रिपोर्ताजच्या माध्यमातून सावतोबा नव्यानं मांडले. संत सावता माळी यांचं तत्त्वज्ञान, व्यक्तिमत्व आणि त्यांच्या प्रभावाच्या आजपर्यंतच्या खुणादेखील यात मांडण्यात आल्यात. 'संत सावता माळी यांनी दिलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. कालानुरूप हे विचार तरूण आहेत, बंडखोर आहेत. आणि आजच्या काळालादेखील नवं वळण देणारे आहेत. म्हणून सावता माळी आजही आपल्याला प्रभावित करतात, असं रिंगणचे सध्याचे संपादक सचिन परब म्हणतात.

संत जनाबाई या एकमेव महिला संतांवरील विशेष उल्लेखनीय अंक आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महिलांच्या त्या प्रतीक म्हणून पुढे येतात.

'डोईचा पदर आला खांद्यावरी।

भरल्या बाजारी जाईन मी'।।

असं तेराव्या शतकात निर्भीडपणे म्हणाऱ्या जनाबाई स्त्री मुक्तीच्या प्रथम उद्गात्या आहेत. हे जनाबाई विशेषांकातून ठसठशीतपणे जाणवतं. पिढ्यान् पिढ्या उपेक्षित, वंचित, दुःखी, भोगी, पिचत, खितपत पडलेल्या हे स्त्रियांचं प्रतिक. समाजातील सर्व घटकांना, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी जनाबाईंनी बंडखोरी करून वारकरी सांप्रदायाची आणि समतेची पताका खांद्यावर घेतली. आणि जाती-पातीच्या, धर्माच्या बेड्या तोडून माणूसकिची गुढी उभरली.

संत नामदेवांची दासी, पाठराखीण प्रसंगी मार्गदर्शक बनून राहणाऱ्या जनीने विठ्ठलाला जनसामान्यांत आणलं. पण शेवटपर्यंत जनाबाई ठाई ठाई उपेक्षित राहिली. अशी ही बंडखोर, विचारवंत, समन्वयवादी जनाबाईं 'रिंगण'ने उलगडून दाखवली. शिवाय त्यांचे ज्वलंत विचार, तत्वज्ञान, सामर्थ्य यांचाही अत्यंत समर्थपणे मागोवा घेतला. या अंकामुळे जनाबाईंच्याच काय संत परंपरेकडे आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे बघण्याचा नव्या पिढीचा दृष्टिकोन नक्कीच बदलाय. तो उदात्ततेबरोबर नक्कीच व्यापकही झालाय, असं तरुणाईबरोबर संवाद झाल्यावर जाणवतं.

हेही वाचा: ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव

रिंगण हे संशोधक अभ्यासकांसाठी ग्रंथच

अंकाच्या कवरविषयी मांडणं मुद्दाम गरजेचं वाटतं. कारण प्रत्येक वर्षीच्या अंकाचं कवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे हेच आपल्या कुंचल्यातून साकारतात. त्या त्या संतांचे वेगळ्या धाटणीचे रंगीत पेंटिंग ते कल्पकतेनं रेखाटतात. ते एक त्या संतांचं संकल्पना चित्र असतं. अत्यंत बोलकं, डोळ्यात भरणारं सर्वच कव्हर हांडे यांनी रेखाटलेत.

पेंटिंगची थीम वाचकांना उलगडून सांगण्यासाठी त्यावर लेखही अंकात लिहितात. हा कदाचित पहिलाच प्रयोग, म्हणून उल्लेख करता येईल. शिवाय त्यासाठी ते कुठलंही मानधन घेत नाहीत. हेच आपल्या या संत परंपरेचं संचित असल्याचं आवर्जून सांगता येईल.

कोणत्याही माध्यमाची भाषाच आपल्याशी संवाद साधत असते. त्यामुळे ती अत्यंत संवादी असणं गरजेचंच. रिंगणची भाषा अत्यंत साधी, सोपी, सरळ आणि बोलकी आहे. कुठेही प्रमाणभाषा आणि लालित्यपूर्ण भाषेचा भडिमार नाही. पारंपरिक साचा आणि बाज सोडून रिंगणनं नव्या भाषेची कास धरल्याचं पहिल्या अंकापासून जाणवतं. तरुणाईला संत विचारांशी जोडण्यासाठी, त्यांना संतांचे विचार पटवून देण्यासाठी त्यांची भाषा बोलणं गरजेचं होतं.

तरुणाईची भाषा रिंगणनं स्वीकारल्याचं पानोपानी जाणवतं. थोडक्यात काय तर, आजची पिढी तरुणाई जी भाषा बोलते, वापरते ती या अंकानं जशीच्या तशी उचलली किंवा घेतलीय. आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळातील बोली भाषा हे एक रिंगणचं वेगळेपण निश्चितच डोळ्यात भरणारं आहे. म्हणूनच रिंगणचे सर्वच अंक त्या-त्या संतांवरील महत्त्वाचे दस्तऐवज ठरलेत. तर संशोधक, अभ्यासकांसाठी ते संदर्भ ग्रंथ म्हणून उपलब्ध झालेत.

हेही वाचा: जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

संतांच्या विचाराने बदल घडेल

रिंगणचा प्रत्येक अंक वाचकांसाठी देणं आणि पर्वणीच आहे. हल्ली तरुणाई वाचत नाही, अशी ओरड केली जाते. वाचनसंस्कृती संपण्याची भीती व्यक्त केली जाते. रिंगणच्या पहिल्या अंकापासून लेखन, वाचक, चर्चा आणि एकूण निर्मितीप्रक्रियेशी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. रिंगणच्या माध्यमातून संत परंपरेकडे, संत साहित्याकडे, विचारधारेकडे तरुणाईचा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतोय. आपल्या संचिताकडे ते व्यापकपणे बघतात.

खरंतर हल्लीची तरुण पिढी विविध विचारधारांकडे सजगपणे बघते आणि बिनधास्तपणे व्यक्त होते. रिंगणच्या माध्यमातून नव्या पिढीत संत विचारांबद्दल चिंतन आणि मंथन घडून येत. ही नक्कीच सकारात्मक आहे. रिंगणने नक्कीच ही एक अवघड गोष्ट साध्य केली आहे.

वर्तमान परिस्थितीत देशाला, समाजाला संत साहित्य, विचार आणि सहिष्णुतेची गरज आहे. समाजासमाजाची दुभंगत चाललेली मनं सांधण्यासाठी आज खरंतर व्यापक आणि संत विचारांच्या विश्वात्मकतेची गरज आहे. अशा परिस्थितीत रिंगणच्या माध्यमातून संत साहित्याची नव्यानं आणि व्यापक दृष्टिकोनातून मांडणी होतेय. हे आशादायी चित्र आहे. तरुणांच्या विचाराला संत साहित्यातील विश्वात्मकतेची जोड दिली, तर नक्कीच हे चित्र बदलेल आणि संवादाचे धागे विणले जातील, यात तिळमात्रही शंका नाही.

हेही वाचा: 

नरसी नामदेव गावात भेटलेले संत नामदेव
डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी: इतिहास रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार
शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?

(लेखक हे अक्षरदान दिवाळी अंकाचे संपादक आहेत.)