जगाच्या ताणतणावांवर उपाय सुचवणाऱ्या पत्रकारांना आपल्यासमोरच्या ताणतणावांची कल्पनाच नसते. विशेषतः एखाद्या भयंकर प्रसंगानंतर मनावरचे ओरखडे आयुष्यभर त्रास देत राहतात. हा आजार आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियातल्या कोर्टाने एका मीडिया हाऊसला आदेश दिले की त्यांच्या एका पत्रकाराला या आजारासाठी १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची नुकसान भरपाई द्यावी.
पत्रकारिता हे प्रचंड दगदगीचं क्षेत्र आहे. जगभरात सध्या बहुतांश पत्रकारांच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. ती कायमच असते. वृत्तपत्र, टीवी चॅनल आणि ऑनलाईन यात स्पर्धा वाढलेय. त्यामुळे पत्रकारांवर चांगल्या बातम्यांसाठीचा दबाव वाढतोच आहे. शिवाय इतर संस्थांतर्गत दबाब असतातच. मीडियाच्या आर्थिक स्थितीमुळं सतत नोकरी जाण्याची भीती असते. यातून जगभरातल्या पत्रकारांमधे तणाव आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढीला लागलंय.
सतत युद्ध, खून मारामारी, बलात्कार, दुर्घटना असं सर्व काही कवर करत असताना त्या रिपोर्टरच्या मनावर या गोष्टींचा सहाजिकच परिणाम होत असतो. शास्त्रीय भाषेत याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर म्हणजेच पीटीएसडी म्हटलं जातं. जगभरातल्या ८० ते १०० टक्के क्राईम रिपोर्टर्समधे हा मानसिक आजार पाहायला मिळतो, असा रिसर्च आहे. युरोप अमेरिकेतल्या युनिवर्सिटींनी केलेले रिसर्च आपल्याला पाहायला मिळतात.
हेही वाचाः पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर
रोजचं गुन्ह्यांचं वार्तांकन करताना कधी आपण या मानसिक आजारांला बळी पडतोय हे समजत नाही. यातून मग अनेक इतर आजार होता. मन बोथट बनतं, घाबरणं, झोप न येणं, चिडचिड, काही सुटत तर नाही ना अशी सततची भीती अशी लक्षणं सर्रास आढळतात. यातून पुढे जाऊन अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. तसंच इतरही आजारांचे बळी पडतात. हा सर्व पीटीएसडी आणि मानसिक आजाराचा भाग आहे. हे पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवं. त्या दृष्टीने स्वतःवर काम करायला हवं. नाही तर मानसिक रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही.
मीडियासमूह पत्रकाराला पगार देतात. पण कामातून उद्भवणाऱ्या आणि सबंध आयुष्यभर राहणाऱ्या या व्याधींसाठी काहीही करत नाही. पत्रकार करियरचा भाग म्हणून एका पाठोपाठ एक संस्था बदलत जातात. नव्या संस्थेत स्वत:ला सिद्ध करायची शर्यत लागते. त्यातून आणखी धावपळ करायला लागतो.
हेही वाचाः पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच
पीटीएसडीने ग्रासलेल्या पत्रकारांनी गांभीर्यानं विचार करावा अशी घटना ऑस्ट्रेलियात नुकतीच घडलीय. 'द एज' या तिथल्या नावाजलेल्या वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या एका महिला क्राईम रिपोर्टरने आपल्याला झालेल्या पीटीएसडीसाठी कंपनीला कोर्टात खेचलं. तिला नुकसान भरपाई म्हणून १ लाख ८० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देण्याचे आदेश विक्टोरिया राज्यातल्या स्थानिक कोर्टाने दिले. मानसिक आरोग्य बिघडल्याने आजवर जगात कोणत्याही रिपोर्टरला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. ही अशाप्रकारची पहिलीच घटना आहे.
टीवी न्यूजसारख्या स्पर्धात्मक माध्यमात काम करताना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या टीवी न्यूजमधे फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचं सरासरी वय हे २० ते ४० इतकं आहे. आपल्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं हे पत्रकार फिल्डवर बातम्या शोधत प्रचंड तणावात घालवतात. यावेळी अजाणतेपणी ते पीटीएसडीकडे आणि मानसिक आजारांकडे ओढले जातात. पत्रकारांचा सर्व आटापिटा नोकरीत आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरू असतो. पण आत खोल मनात आणि शरीरात याचा परिणाम होत असतो, याचा विचार ते करत नाहीत.
हेही वाचाः पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन
गेल्या अनेक वर्षांमधे टीवी न्यूजला सिनेमासारखं लार्जर दॅन लाईफ पद्धतीनं मांडण्याचं प्रमाण वाढलंय. थेट बातमी न देता तिला सिनेमासारखं कसं बनवलं जाईल, त्यात नाट्य कसं आणलं जाईल, तिच्याकडे अधिकाधिक प्रेक्षक आपल्याकडे कसे ओढले जातील, याची स्पर्धा जगभरात सुरू आहे. या स्पर्धेत पीटीएसडीच्या लक्षणांकडे आणि तणावासारख्या कारणांकडे सहाजिकच दुर्लक्ष होतं.
रोमानियाचा 'ब्रेकिंग न्यूज' हा २०१७ला बनलेला सिनेमा पीटीएसडीबद्दल बोलतो. टीवी क्रू आगीची एक घटना कवर करायला गेलाय. एका कारखान्याला आग लागलेली असते. पीसीआरमधून दबाव आणला जातो. पत्रकार आणि कॅमेरामन चांगल्या विज्युअलसाठी आगीनं वेढलेल्या कारखान्यात जातो. तेवढ्यात मोठा ब्लास्ट होतो आणि कॅमेरामन मरतो. घटनेत रिपोर्टर जखमी होतो.
या घटनेचा रिपोर्टरच्या मनावर भयानक परिणाम होतो. तो आतून निराश झालाय. रोजच त्याच्यासोबत काम करणारा हाडामासाचा कॅमेरामन गेलाय. हे दु:ख भयानक आहे. ट्रॉमा आहे. पण तो काम करतोय, त्या संस्थेला त्याचं काहीही नाही. या संपूर्ण घटनेत त्यांना टीआरपी दिसतो. त्यासाठी या रिपोर्टरलाच मयत कॅमेरामनचं प्रोफाईल करण्यासाठी पाठवतात.
हेही वाचाः एमजे अकबर : कोण होतास तू, काय झालास तू?
अशावेळी तो पीटीएसडीचा कसा सामना करतो, याची गोष्ट या सिनेमात आहे. ही २०१७च्या कार्लोवीवॅरी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमधली सर्वात जास्त पाहिली गेलेला सिनेमा होता. शिवाय पीटीएसडीवरचंच मॅथ्यू न्यूमनचं 'हेल्थ एन्ड सोशल रिलेशनशिप' हे पुस्तकही वाचण्यासारखं आहे.
आपल्या भारतात पीटीएसडीच्या संदर्भात सर्वत्र आनंदी आनंद आहे. ही अशी काही गोष्ट असते, याबद्दल लोकांना माहीत नाही. खुद्द पत्रकारांना पण नाही. मुळात मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच दुषित आहे. त्याहीपेक्षा पत्रकारांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदीच उथळ आहे.
हेही वाचाः