आब, रुबाब असलेला टीवी पत्रकारितेचा ‘दुवा’

१५ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. त्यांच्या नजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. त्यांच्या चेहर्‍यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा.

हिंदी, इंग्रजीबरोबरच पंजाबी आणि उर्दुवरही दुआ यांचं प्रभुत्व होतं. सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत टीवी पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनोद दुआ. अँकर, बातमी विश्लेषण, चर्चा, मुलाखती आणि बातमीदारी अशा अनेक गोष्टींमधे मुशाफिरी करत प्रसिद्ध झालेला चेहरा म्हणजे विनोद दुआ.

विश्लेषण, संवादाची वेगळी शैली

राजकारण, अर्थकारण, समाजकारण, साहित्य आणि सांस्कृतिक घडामोडींचा त्यांचा अभ्यास होताच. भाषेवरची हुकूमत, शब्दांची अचूक निवड आणि त्या जोडीला टीवी माध्यमाची उत्तम जाण अशी शिदोरी घेऊन दिल्लीतला हा तरुण सत्तरच्या दशकात पत्रकारितेत आला आणि ऐंशी-नव्वदच्या दशकात युवा मंच, युवाजन, आप के लिए, परख अशा कार्यक्रमांतून दूरदर्शनवर झळकला.

भारतात खासगी टीवीच्या प्रक्षेपणाला १९९२ला सुरवात झाली तरी १९८० ते २००० या काळात बातम्यांविषयीच्या कार्यक्रमात दूरदर्शनचीच मक्तेदारी होती. त्या काळात ज्या पत्रकारांची बातम्या देण्याची, बातमीचं विश्लेषण करण्याची आणि संवाद साधण्याची शैली सर्वसामान्य लोकांना सर्वाधिक भावली आणि भिडली त्यांत विनोद दुआ यांचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे.

१९८४ ते १९९६ दरम्यान लोकसभा निवडणूक निकालांचं त्यांनी केलेलं विश्लेषण अजूनही कित्येकांना आठवत असेल. त्यावेळी मतदान पत्रिका असल्याने सगळी मोजणी पूर्ण होण्यासाठी वेळ लागायचा. तेव्हा दोन-दोन दिवस हा माणूस प्रणव रॉयच्या साथीने अक्षरश:खिंड लढवायचा. इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं.

हेही वाचा: रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

दुआ यांचं वेगळेपण

स्पष्ट उच्चार, महत्त्वाचा शब्द ठसवण्यासाठी त्याला दिलेला हलकासा हेलकावा, आवाजातले चढउतार आणि अर्थपूर्ण पॉजेस हे त्यांचं वैशिष्ट्य. बोलण्याची सुरवात कायम खालच्या पट्टीतून व्हायची आणि कॅमेर्‍याच्या लेन्समधून ते आरपार इतक्या सहजपणे पाहायचे तेव्हा जणू आपल्यासमोर बसून थेट आपल्याशी बोलत आहेत असं वाटायचं. कधीकधी बोलता बोलता एखाद्या शब्दाचं किंवा वाक्याचं हिंदीतून इंग्रजीत किंवा इंग्रजीतून हिंदीत भाषांतर ते करत. त्यामुळे विषयाची परिणामकारकता वाढायची.

दुआ यांच्यानजरेत एक मार्दव होतं. कधी त्यात ठामपणाही असायचा. पण जरब नसायची. बोलण्यात आत्मविश्वास होता; पण आक्रस्ताळेपणा किंवा अभिनिवेश नव्हता. कधी उपहासाने बोलायचे;पण समोरच्याची खिल्ली नाही उडवायचे. थेट प्रश्नही विचारायचे पण त्यात समोरच्याची ‘जिरवतोच’ असा भाव नसायचा. त्यांच्या चेहर्‍यावरचा आब आणि बोलण्या चालण्यातला रुबाब समोरच्याला आपलंसं करून घ्यायचा.

उत्तम जनसंपर्क असलेला पत्रकार

हिंदी, इंग्रजीबरोबरच पंजाबी आणि उर्दुवरही दुआ यांचं प्रभुत्व होतं. त्यांचं कुटुंब मुळचं पाकिस्तानातलं. फाळणीनंतर डेरा इस्माईल खान इथून वडील दिल्लीत आले. दुआ यांचं बालपण दिल्लीत रेफ्युजी कॉलनीत गेलं. बहुधा त्यामुळेच ‘आय बिल्लाँग टू मोहल्ला’ असं ते म्हणायचे. समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला. पुढे पत्रकारितेत गेल्यावरही एखाद्या रिक्षावाल्याशी ते जितक्या सहजपणे संवाद साधायचे तितक्याच सहजपणे बड्या नेत्यांबरोबर बोलू शकायचे.

उत्तम जनसंपर्क, समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेण्याचं कसब आणि टीवी माध्यमाची अचूक जाण हे सगळं एका प्रसंगातून दिसलं. १९९२ला नरसिंहराव मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत, अशी माहिती त्यांना सूत्रांकडून कळली. बुटासिंग यांच्याकडे संरक्षण खातं किंवा नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता होती.

दुआ थेट बुटासिंग यांना भेटले. त्यांनी त्यांच्या दोन मुलाखती घेऊन ठेवल्या. पहिली, जर बुटासिंग संरक्षणमंत्री झाले तर दाखवण्यात येणार होती. आणि दुसरी ते जर नागरी पुरवठा मंत्री झाले तर प्रसारित होणार होती. बुटासिंगही त्याला तयार झाले. त्यांनी दोन मुलाखती देऊन ठेवल्या. पुढे दुसरी मुलाखत प्रसारित करण्यात आली.

हेही वाचा: बातम्या कवर करतानाचा ताण पत्रकारांना आजारी पाडतोय

विनोद दुआ शो

दूरदर्शन, झी टीवी, सहारा टीवी असा प्रवास करत ते पुन्हा ‘एनडीटीवी’कडे आले. प्राइम टाइमला ते अर्ध्या तासाचा ‘विनोद दुवा शो’ लाहव करायचे. स्क्रिप्ट त्यांचं, वॉइस ओवरही त्यांचा, गेस्टही बहुधा तेच ठरवायचे आणि पडद्यावरही तेच. सबकुछ विनोद दुवा.

त्यात दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्यांचं ते विश्लेषण करायचे. एखाद दुसरं पॅकेज, एक्स्पर्टबरोबर चर्चा आणि कार्यक्रमाच्या शेवटी विनोद दुआ यांच्या पसंतीचं हिंदी सिनेमातलं गाणं असा हा कार्यक्रम असायचा. हे गाणं बहुधा ते साठ किंवा सत्तरच्या दशकातलं असायचं.

विषयांचा नीट अभ्यास

२०११ला वर्ल्ड कपची सेमी फायनल मोहालीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाली. भारतात त्यावेळी काही राज्यांनी सुट्टी जाहीर केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान मॅच बघायला येणार होते. विनोद दुआ यांनी आपल्या शोमधे क्रिकेट डिप्लोमसीवर केलेलं भाष्य अजूनही आठवतं.

त्याच भागात ज्या गेस्टबरोबर ते बोलत होते, त्यांच्याशी दोनदा संपर्क तुटला. पण विनोद दुवा अजिबातही विचलीत झाले नाहीत. कधी कधी अँकर्सच्या चेहर्‍यावर अशा वेळी उगाचच अपराधीपणा दिसतो. काही अँकर्स तर चक्क दिलगिरी व्यक्त करतात. पण हे अत्यंत नॉर्मल आहे असे भाव विनोद दुआंच्या चेहर्‍यावर होते.

पुढची दीड मिनिटं टेलिप्रॉम्प्टर न वाचता ते मुद्देसूद बोलत होते. त्यात ना त्यांचा वेग कमी झाला ना ते कुठे अडखळले. कारण त्या विषयाचा त्यांचा अभ्यास होता आणि मुळात ते एक उत्तम पत्रकार होते.

हेही वाचा: बाळशास्त्री जांभेकर : पत्रकारितेच्या पलिकडचे पत्रकार

भारतातली खाद्यसंस्कृती लोकांपर्यंत

गाणं आणि खाणं हा त्यांचा विक पॉइंट होता. तलत महेमूद गुलाम अली खाँ, पंडित जसराज हे त्यांचे आवडते गायक. त्यांना  स्वत:लाही गायला, गुणगुणायला आवडायचं. एनडीटीवीवर ‘जायका इंडिया का’ हा त्यांचा शो तर तुफान लोकप्रिय होता. वेगवेगळ्या गावात जाऊन तिथली खाद्यसंस्कृती ते दाखवायचे. जुनी, लोकप्रिय रेस्टॉरंट्स, ढाबे, खाऊ गल्ली यांना भेट द्यायचे.

एखादा पदार्थ आवडला की त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसायची. ‘बहुत उमदा’ हे त्यांचे उद्गार म्हणजे त्या पदार्थाला एका खवय्याने दिलेली उत्स्फुर्त दाद असायची. ‘हम देश के लिए खाते है और अपने पैसोंसे खाते है’ या वाक्याने अनेक भागाचा शेवट व्हायचा.

हैदराबादपासून दिल्लीपर्यंत आणि कोलकत्त्यापासून ते अहमदाबादपर्यंत अनेक शहरांना त्यांनी भेट दिली. ते पुण्यात आले होते, तेव्हा जोशी वडेवाले, शबरी, वैशाली अशा ठिकाणी आवर्जुन गेले. कँपमधल्या कयानी बेकरीत जाऊन श्रुसबेरी बिस्कीटसची चवही त्यांनी घेतली. तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, बडा शोर सुनते थे पहेलू मे दिलका.. मुझे वो बात नही लगी जो पहेले हुवा करती थी.

चॅनेलचा दुवा निखळला

एक पत्रकार म्हणून आपलं काम ते नि:पक्षपणे आणि निर्भिडपणे शेवटपर्यंत करत राहिले. त्याबद्दल त्यांचं कौतूकही झालं आणि त्यांच्यावर टीकाही झाली.१९९६ला त्यांना रामनाथ गोएंगा पुरस्कार मिळाला तेव्हा ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले टीवी जर्नालिस्ट होते. २००८ला त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं.

टीवी पत्रकारितेनंतर त्यांनी स्वत:चा युट्यूब चॅनेल सुरू केला. कोरोना काळात वेंटिलेटर्स खरेदीवरुन त्यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलाही दाखल झाला होता. पण  सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. अलीकडच्या काळात न्यूज चॅनेलच्या खालावलेल्या दर्जाबद्दल ते तीव्र नापसंती व्यक्त करायचे. या चॅनेलवर बातम्या कमी आणि सवंग लोकप्रियता मिळवणारे कार्यक्रम जास्त झाल्याचंही ते बोलून दाखवत.

आपल्याकडे दूरदर्शनवरच्या बातम्या वर्षानुवर्ष त्याच स्टाइलनं दिल्या जातात. चेहर्‍यावरचे अतिनियंत्रित हावभाव, आवाजाची एकच पट्टी आणि बातम्या वाचण्याचा काहीसा संथ वेग हा तसाच आहे. इतर चॅनलवरच्या अँकर्सनी त्याचं दुसरं टोक गाठलंय. सगळाच अतिरेक झालाय. या दोन्ही स्टाइल्समधला दुवा त्यांच्या जाण्याने निखळलाय.

हेही वाचा: 

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं