महात्मा फुलेः जितके मोठे समाजसुधारक, तितकेच यशस्वी उद्योजकही

११ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


महात्मा जोतीराव फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होतेच. आजच्या जागतिकीकरणाच्या कॉर्पोरेट जगण्यात आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे का? नक्कीच. कारण ते एक यशस्वी व्यावसायिकही होते. त्यांच्या या फारशा माहीत नसलेल्या कर्तृत्वावर हरी नरके यांच्या ब्लॉगवरच्या लेखांच्या आधारे टाकलेला हा झोत. 

महात्मा जोतीराव फुलेंना ६३ वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांनी आयुष्यभर विनावेतन आणि विनामानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलं. पण त्याहीपलीकडे जाऊन ते एक उत्तम व्यावसायिक होते.

बिल्डर म्हणून जोतीरावांचं काम महत्त्वाचं 

एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. त्यांनी धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते इत्यादींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. ते पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनीचे कार्यकारी संचालक होते.

जोतीराव खरंतर बिल्डर होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचं रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल इत्यादी बांधकामे उभारण्यात जोतीरावांचा काँट्रॅक्टर म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता. 

हेही वाचाः ग्लोबल लोकल मेळ घालायचा असेल तर महात्मा फुले हवेत

पुणे-नगर रस्त्यावरील येरवडय़ाचा बंडगार्डन पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या कंपनीला मिळालं होतं. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका जोतीरावांकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४१ वर्षांनंतरही मजबूत आहे.

त्यांच्या कंपनीनं केलेली कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही महत्त्वाची काम आहेत. यातून मिळवलेले पैसे जोतीरावांनी सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकले. त्यांच्या सत्यशोधक चळवळीत त्यांची बांधकाम क्षेत्रातली मित्रमंडळी तसेच त्यांच्या कंपनीतल्या भागीदारांचंही फार मोठं योगदान होतं.

जोतीरावांचे इतरही व्यवसाय होते

जोतीरावांच्या कंपनीमार्फत पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या ग्रंथावर आधारित पुस्तक तुकारामतात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. ते जोतीरावांनी ‘जातीभेद विवेकसार’ या नावाने प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री आणि पुरवठा यांचंही काम करायची.

जोतीरावांनी शाळेमधल्या विद्यार्थांना वयाच्या सहाव्या वर्षांपासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचं करावं, अशी मागणी केली होती. दीडशे वर्षांपूर्वी कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे खरे स्वप्नद्रष्टे ठरतात.

हेही वाचाः शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना उभारण्यासाठी जोतीरावांनी प्रोत्साहन दिलं. उद्योगात प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो, असा विचार जोतीराव आपल्या कवितेतून मांडतात.

सत्य उद्योगाने रोग लया जाती । प्रकृती होती बळकट ।।

उल्हसित मन झटे उद्योगास । भोगी संपत्तीस सर्व काळ ||

कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या या गोष्टींचा जोतीराव निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असं ते म्हणतात.

दिली यशस्वी शेतीउद्योगाची त्रिसूत्री

शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडतात. ती अशी,

१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.

२) शेतीला ठिबक सिंचनाचा पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत. कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणं वापरली पाहिजेत.

३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी उद्योग आणि व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचं संकल्पचित्र रेखाटलंय. त्यात त्यांनी व्यापारी पिकं, कॅनालचं पाणी आणि आधुनिक पीकपद्धती यांचा आश्रय घेणं कसं गरजेचं आहे, ते पटवून दिलय.

जोतीरावांनी केलं शेअर मार्केटवर काव्य

रोजगारासाठी पैसा नये गाठी । अज्ञान्यास गाठी नफा हल ।।

शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी । पावतीत सारी जडीबुटी ।।

पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद । सुका आशीर्वाद भटासाठी ।।

उचल्याच्या परी खिसे कातरिती । तोंड लपविती जोती म्हणे ।।

हर्षद मेहताने नव्वदच्या दशकात बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे, असा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.

हेही वाचाः 'हरी नरकेंच्या भाषणांवर बंदी आणा'

शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात,  

शेअर्स काढून उद्योग करणे । हिशोब ठेवणे रोजकीर्द ।।

खतावणी सर्व बिनचूक ठेवी । नफा तोटा दावी शोधी त्यांस ।।

जामीन देऊन नितीने वर्तावे । सर्वा वाचवावे अब्रूमध्ये ।।

शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा । जगा दाखवावा जोती म्हणे ।।

लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.

शेअर्स मार्केटात खप कागदाचा ।  नफा दलालाचा बूड धन्य ।।

शेअर्स कागदास पाहून रडती । शिव्याशाप देती योजी त्यास ।।

शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग । होऊन नि:संग मूढा लुटी ।।

आळशाचा खरा नित्य हाच धंदा । दुरूनच वंदा जोती म्हणे ।।

आजही शेअर बाजाराच्या वाटेला मराठी माणूस फारसा जात नाही. त्याविषयी फारसं लिहित नाही आणि बोलतही नाही. पण जोतीरावांनी शेअर बाजाराविषयी सव्वाशे वर्षांपूर्वी कविता लिहिल्यात. या विषयावर लिहिणारे ते पहिलेच भारतीय साहित्यिक असतील. पण ते करतानाही त्यांचा समाजाला सत्य सांगण्याचा उद्योग थांबत मात्र नाही.

हेही वाचाः 

बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला

फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत. )