उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल.
लवकरच भारतात 'फाईव जी' नेटवर्क येईल. त्यादृष्टीने कंपन्या कामाला लागल्यात. २९ ऑगस्टला रिलायन्स उद्योग समूहाची ४५वी वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढच्या दोन महिन्यांमधे भारतातल्या कोलकता, मुंबई, चेन्नई, दिल्लीत 'फाईव जी' नेटवर्क उभं करायची घोषणा केलीय. त्यासाठी २ लाख कोटींची गुंतवणूकही केली जाणार आहे. त्यालाच जोडणारी जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरची घोषणा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलीय.
जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी 'फाइव जी' नेटवर्क फारच मोलाची भूमिका बजावणार आहे. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या कंपन्या त्यादृष्टीने पावलं टाकत असताना रिलायन्सनही दोन महत्त्वाच्या घोषणा केल्यात. त्यातली एक होती 'जिओ एअर फायबर' आणि दुसरी 'जिओ क्लाऊड पीसी'ची. आपण वापरत असलेलं इंटरनेटचं जग या दोन गोष्टींमुळे पुरतं पालटणार आहे.
या दोन घोषणांमधे 'जिओ क्लाऊड पीसी'ची चर्चा अधिक होतेय. त्याचं कारणही तसंच आहे. आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधे खेळत असलेले गेम हे काही आधीच आपल्या गॅझेटमधे साठवून ठेवलेले असतात असं नाही. एखाद्या ऑनलाईन सर्वर ज्याला क्लाऊडही म्हणतात त्या माध्यमातून हे गेम आपल्याला खेळता येतात. आपला डेटा आणि ऍप्लिकेशन हे याच सर्वरवर ऑनलाईन असतात. क्लाऊड पीसी म्हणजे एकप्रकारचा वर्च्युअल कम्प्युटर असतो.
या क्लाऊड पीसीमुळे कोणतीही गोष्ट कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधे सेव करून ठेवायची भानगड राहत नाही. त्यामुळे स्टोरेजचं टेंशनही नसतं. एकच गोष्ट इथं महत्वाची असते ती म्हणजे तुमचं इंटरनेट. हे इंटरनेट फक्त जलद हवं. ते जितकं जलद तितकं तुमचं काम सोपं. त्यामुळेच 'फाइव जी' नेटवर्कसोबत 'जिओ क्लाऊड पीसी'ची झालेली घोषणा फार महत्वाची आहे.
हेही वाचा: यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण
मोबाइल आणि कम्प्युटरची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे डेटा स्टोरेजच्या भानगडीही वाढल्यात. आपले गॅझेटही हँग होणं कधीकधी फार कंटाळवाणं असतं. त्याने आपली चिडचिडही होते. त्यामुळे जगभरात क्लाऊड कम्प्युटिंगचा पर्याय आजमावला जातोय.
वीडियो एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंगसाठी आपल्याला भल्या मोठ्या किमतीचे लॅपटॉप, कम्प्युटर लागतात. ते सगळ्यांनाच परवडतील असंही नाही. क्लाऊड पीसी अशावेळी उत्तम पर्याय ठरेल. यामधे हार्ड डिस्क, रॅम वगैरेचं टेंशन राहत नाही. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरजही फार कमी असल्यामुळे हा वर्च्युअल प्लॅटफॉर्म अधिक फायद्याचा ठरतोय. शिवाय इथं कंपनीचाच सर्वर असल्यामुळे त्यासाठी लागणारा खर्चही कमी येतो.
तसंच सबस्क्रिप्शनची व्यवस्था इथं असते. त्यामुळे फार मोठ्या गुंतवणुकीची गरजही राहत नाही. कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या तुलनेत इथं मेंटेनन्सवर होणारा खर्चही कमी असतो. पूर्ण महिन्याच्या सबस्क्रिप्शनची गरज नसते. जितका वापर तितका खर्च करायची सुविधाही उपलब्ध असते. क्लाऊड पीसीमधे आपला डाटा लीक व्हायची शक्यताही फार कमी असते.
युट्युब हे असं माध्यम आहे जिथं आपण कोणत्याही विषयावर वीडियो सहजपणे बघू शकतो. तिथं सेवही करता येतो. पुरेसं नेटवर्क किंवा सर्वर डाऊन असेल तर तोच वीडियो आपल्या पुढं पाहता येतो. तसंच काहीसं क्लाऊड पीसीचं आहे. इथं आपल्याला आपला डेटा किंवा ऍप्लिकेशन ऑनलाइन सर्वरवर साठवून ठेवता येतं आणि हवं तेव्हा ते त्याचा वापरही करता येणं शक्य होतं. त्यामुळे पुढच्या काळात लॅपटॉप, कम्प्युटरचं काय असाही प्रश्न आहे.
आपल्याकडे 'टू जी' आलं त्यानंतर 'थ्री जी', 'फोर जी' आणि आता 'फाईव जी'. हे बदल झाले तसं इंटरनेटच्या स्पीडमधेही बदल झाले. 'फाईव जी' आल्यामुळे या स्पीडचं टेंशन राहणार नाही. इंटरनेट जितकं जलद तितका क्लाऊड पीसी वापरताना अडचणी कमी. इतरवेळीही इंटरनेटचा कमी स्पीड किंवा नेटवर्कमधे आलेला व्यत्यय आपली चिडचिड वाढवणारा असतो. त्यामुळे जिओची 'फाईव जी' नेटवर्कची घोषणा क्लाऊड पीसीसाठी फायद्याची असेल.
हे सगळं असलं तरी क्लाऊड पीसीसमोर काही आव्हानंही असतील. आजही ग्रामीण भागात पुरेशा दूरसंचार सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी इंटरनेटचा इश्यू असतो. त्यामुळे क्लाऊड पीसीसमोर काही मर्यादाही आहेत. सायबर सुरक्षा हा आजकाल सर्वाधिक चर्चेतला मुद्दा आहे. त्यामुळे ऑनलाइन सर्वर असला तरी आपला डाटा लीक होणारच नाही याची शाश्वती देता येत नाही.
हेही वाचा:
‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?
अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक