स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

२२ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


जॉनी आणि त्याचे वडील डेविड यांचं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणावं असंच नातं होतं. डेविड हेसुद्धा इंग्लंडचे क्रिकेटपटू पण त्यांची कारकीर्द आणि ते स्वत: फार काळ राहिले नाहीत. जॉनी इतर सर्व खेळांमधे पारंगत असूनही त्याच्या पप्पांच्या ओढीने तो क्रिकेटमधे आला.

इंग्लंडची टीम विश्वविजेता झाली आणि अटीतटीच्या लढतीनंतर मिळालेल्या यशाने त्यांचे सर्वच खेळाडू भावनावश झाले. आपला आनंद व्यक्त करायला त्यांच्यापाशी शब्द नव्हते. तशातही कॅप्टन इऑन मॉर्गन आणि सलामीवीर जॉनी बिअरस्टो यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंचं कौतुक केलं. त्यांच्या झुंजारवृत्तीला दाद दिली.

आणि बिअरस्टोंचे टेस्टमधे पदार्पण झालं

जॉनी बिअरस्टो हा मैदानावर खमकेपणाने खेळणारा खेळाडू. तो बॅटिंग, विकेटकिपिंग आणि फिल्डिंग जे काही करतो ते जीव तोडून. क्रिकेटवर त्याचं निरतिशय प्रेम आहे. या खेळावर तो लहान असल्यापासून फिदा आहे. इंग्लंडच्या टीममधली त्याची कहाणी वेगळी आहे. मन हेलावणारी आहे.

जोनायन हे त्याचं खरं नाव. त्याला लाडाने जॉनी नाव पडलं. ‘जॉनी जॉनी येस पप्पा’ असा त्याचा वडलांबरोबरचा संवाद खरोखरच होता. याचं कारण त्याचे वडील डेविड हेसुद्धा इंग्लंडकडून खेळले होते. ते मॉर्कशायरच्या टीमसाठी विकेटकिपिंग करायचे आणि तळाला येऊन फटकेबाजीही. कौटी क्रिकेटमधे यॉर्कशायरकडून खेळताना छाप पाडली आणि १९७९ मधे भारताविरुद्ध त्यांना टेस्टमधे पदार्पण करायची संधी मिळाली होती.

हेही वाचा: क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

बिअरस्टोंनी फास लावून आत्महत्या केली

बॉब टेलर आणि पॉल डाऊनटन या मातब्बर विकेटकीपरच्या स्पर्धेत बिअरस्टोंना मागे रहावं लागलं. परिणामी चारच कसोटी सामने त्यांच्या वाट्याला आले. आणि काही वनडे. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फारशी फळफळली नाही. पण निवृत्त झाल्यावर क्रिकेटवरील प्रेमाखातर ते समालोचक झाले आणि लोकप्रियसुद्धा.

त्याचवेळी मॉर्कशायर कौटी मॅचच्या व्यवस्थापनाशी त्यांचे खटके उडत होते. याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. ते डिप्रेशनमधे गेले. आणि एका दिवशी त्यांनी झोपेच्या गोळ्या अधिक घेतल्या. पण वेळीच उपचार झाल्याने ते बचावले. मात्र त्यांचं मन स्थिर राहिलंच नाही. काही दिवसांनी त्यांनी सरळ गळ्याला फास लावून आत्महत्या केली.

वडील गेले तेव्हा जॉनी अवघा आठ वर्षांचा होता. जॉनी आणि बेकी ही डेविडची दुसरी बायको जानेट हिची मुलं. आणि पहिल्या बायकोपासूनचा अँड्र्यू तेव्हा विशीपार होता. तो कौंटीत खेळतही होता. डेविडने वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी आपलं जीवन संपवलं. बिअरस्टो परिवारावर मोठी आपत्ती ओढवली. 

हेही वाचा: महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’  

जॉनी क्रिकेटकडे वळला आणि विक्रमही रचले

तरीही जानेटने मुलांना हिम्मत दिली. बापाची कमतरता भासू न देता तिने मुलांना वाढवलं. चांगलं शिक्षण दिलं. जॉनी बऱ्याच खेळत पारंगत होता. पण त्याचं मन क्रिकेटकडे अधिक ओढलं जात होतं. कदाचित वडलांच्या आवडीचा त्याच्यावर नकळत झालेला परिणाम असावा. जॉनी लहान वयातच इंग्लंडच्या १५ वर्षांखाली, १७ वर्षांखाली अशा संघात निवडला जाऊ लागला. आणि मग त्याने खंबीरपणे क्रिकेटलाच प्राधान्य द्यायला सुरवात केली.

इयान बेल जायबंदी झाल्याने भारतात येऊनच जॉनीला त्याची जागा घ्यायची संधी मिळाली होती. जॉनीने सुरवातीलाच यॉर्कशायर कौंटीकडून खेळताना विकेटकिपिंग आणि बॅटिंगमधे विक्रम रचले. इंग्लंडच्या वनडे टीममधे त्याने बॅट्समन म्हणून आपलं स्थान बळकट केलंय. जॉन बट्लर विकेटकिपिंग करतो आणि जॉनी दूरवर फिल्डिंग.

सलामीला जेसन रॅम्पबरोबर त्याची जोडी जमवली गेली. हा इंग्लंडसाठी मास्टरस्ट्रोक ठरलाय. या दोघांनी विश्वचषक स्पर्धेत नेहमीच जोरदार सलामी दिली. त्याच्या सुरवातीच्या आक्रमणामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा बोथट व्हायचा. 

हेही वाचा: मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

जॉनी आयपीएलचं समर्थन करतो

जॉनी हा बोलायला, वागायला रोखठोक आहे. काही खडूस समीक्षकांनी टीमवर टीका करायला सुरवात केली तेव्हा त्याने एक विधान केलं होतं. तो म्हणाला, ‘आम्ही हरतो कधी आणि आपल्याला यांच्या उरावर बसायला मिळतं कधी असं या मंडळींना झालंय.’

आयपीएलला दोष देणाऱ्या समीक्षकांवरही जॉनीने हल्ला चढवला. ‘मला स्वतःला आयपीएलचा खूप फायदा झालाय. तिथे सलामीला जाऊन टोलेबाजी करायची मला सवय लागली. उंच आणि सीमापार फटके कसे मारायचे हे मला भारताच्या वी. वी. एस. लक्ष्मण यांनी दाखवून दिलं. त्यांच्यामुळे मला सिक्स कसा सहजपणे ठोकायचा असतो, हे जमू लागलंय.’ असं जॉनीने निक्षून सांगितलं.

सचिन तेंडूलकरने निवडलेल्या संघातून खेळण्याचा मान जॉनीला लाभला. विश्वविजेत्या इंग्लडंच्या टीमसाठी खेळण्याची संधी त्याला मिळाली. आभाळातून बघणारे त्याचे पिताजी नक्कीच आनंदले असतील. त्यांची इच्छा, त्यांचं स्वप्न त्यांच्या जॉनीने पूर्ण केलं. ‘जॉनी जॉनी’ म्हटल्यावर ‘येस पप्पा’ म्हणणारा जॉनी खऱ्या अर्थाने येस करून दाखवलं असं म्हणू शकतो. 

हेही वाचा: 

रशियन फेसअॅपवर फोटो एडिट करताय. मग आपण सावध राहिलं पाहिजे 

भावांनो, आपल्या लाडक्या टिकटॉकवर पुन्हा बंदी येणार? 

शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं 

केला होता अट्टहासः शोषणमुक्त भारत प्रत्यक्षात येण्यासाठी तरुणांनी वाचायला हवी अशी कादंबरी