जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?
बयो, कोण आहेस तू? आजवर तुझं नावही ऐकलं नव्हतं मी आणि आज तुझ्याबद्द्ल वाचतोय. तुला ऐकतोय आणि माझ्या डोळ्यांतलं पाणी खळत नाही. मी तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी तुझ्या शब्दाशब्दांमागची आई अनुभवतोय.
अशी आहेस तरी कोण तू, की मी तुझ्याबद्दल बोलावं. तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अग बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?
मागच्या शुक्रवारी ख्राईस्टचर्चच्या दोन मशिदीत एक बंदुकधारी माथेफिरु घुसला आणि त्याच्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण मारले गेले तर ४० जण जखमी झाले. १५ मार्चला कधीतरी ही बातमी ऐकली, वाचली आणि हे आता इतकं सवयीचं होऊन गेलंय की बातमी ऐकता ऐकताच विसरुनही गेलो. काय काय लक्षात ठेवायचं?
माणूस. म्हणे सर्वात बुध्दिमान प्राणी! पण धर्म, जात, वंश, देश, प्रांत यांची नशा त्याला अशी चढते की तो पिसाळलेलं जनावर होऊन जातो. बुध्दापासून गांधीपर्यंत, किंगपासून मंडेलापर्यंत अनेकांनी औषधोपचार केले पण त्याच्यातलं जनावर शमत नाही. मानवी मूर्खपणाला कमी लेखून चालत नाही. तो अव्याहत सुरुच आहे. असले काहीतरी स्वतःला आगतिक करणारे विचार मनात आले आणि रोजच्या व्यवहारात गुरफटून गेलो.
कुणी माथेफिरु मला उडवत नाही तोपर्यंत मी आणखी काय करणार होतो? पण संध्याकाळी बातम्यात तुला पाहिलं जेसिंडा आणि मी पाहतच राहिलो. तू स्वतः देशाच्या राजधानीहून गोळीबारात मारल्या गेलेल्या, जखमी झालेल्या लोकांना, त्यांच्या परिवाराला भेटायला आली होतीस.
डोक्यावर मुस्लीम महिला घेतात तसा काळा स्कार्फ पांघरला होतास तू. सुरवातीला वाटलं, ही सारी राजकीय नाटकं, सगळीकडे हेच सुरु असतं तर! पण मग तुझ्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. ते अपार करुणेने भरलेले होते. एका असह्य जखमेनं तुझा चेहरा ठणकत होता. आपली पोटची लेकरं मृत्यूमुखी पडावीत अशी वेदना तुझ्या देहबोलीतून माझ्यापर्यंत पोचली होती. तू त्या अभागी लोकांना उराउरी भेटत होतीस आणि पुन्हा पुन्हा फुटत होतीस.
आपल्या देशाची प्रथम नागरिक आपल्या सोबत आहे याचा दिलासा त्या दुःखितांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तुझ्या पदाचे सारे प्रोटोकॉल तू बाजूला ठेवले होते, ' माझा सारा वेळ तुमच्यासाठी आहे, तुम्ही जिथं गरज आहे तिथं मला न्या, माझी सारी कामं मी बाजूला ठेवली आहेत.’ तू सांगत होतीस.
खरं तर न्युझीलंड हे एक शांतताप्रिय बेट. तिथं असं काही व्हावं, याचा तीव्र धक्का तुला बसला होता. हे सारं मुस्लीम म्हणजे न्युझीलंडमधला स्थलांतरित समाज. कुणी सिरियातून तर कुणी अरबस्थानातून आपल्या जळत्या मायभू मागे ठेवून शांतता आणि मूठभर सुखाच्या शोधात इथंवर आलेले. हे स्थलांतरित हेच तर त्या अतिरेकी माथेफिरुचं दुखणं होतं.
त्याच्याजवळ सापडलेल्या मॅनिफेस्टोमधे लिहलं होत स्पष्ट, ‘या स्थलांतरितांनी आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांनी आमचं श्वेतवर्णियांचं कल्चर नष्ट केलं. हे युरोपिअन, पाश्चात्य जग गढूळ केलं. डोनाल्ड ट्रम्प हीच आता एकमेव आशा आहे, श्वेतवर्णियांच्या अस्मितेचं ट्रम्प हे एक प्रतिक आहे.’
म्हणून तर आजूबाजूचे सारे नेते या हल्ल्याला अतिरेकी हल्ला म्हणून संबोधत असताना ट्रम्प साहेब केवळ मृतांना श्रध्दांजली वाहतात. पण कुठेही या हल्ल्याला अतिरेकी हल्ला म्हणून संबोधत नाहीत की व्हाईट नॅशनलिझम हा शब्दही वापरत नाहीत. पण तुला हे स्थलांतरित परके वाटत नाहीत, जेसिंडा! तुला माहीत होतं सिरियातल्या यादवीला कंटाळून आलेले अनेकजण होते यात. बिचारे इथं आले तरी त्यांचं भागधेय बदललं नाही. त्यांच्या दुःखांनी तू व्यथित झाली होतीस.
‘आज न्युझीलंडच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे.’ तू बोलत होतीस, ‘न्युझीलंड हे खपवून घेणार नाही. या अतिरेकाला या देशात थारा नाही. अतिरेक्यांनी त्यांच्या मानवताविरोधी कृत्याकरता आम्हाला निवडलं असेल पण आम्ही अशा प्रवृत्तींना अत्यंत स्पष्ट शब्दांत नाकारतो. भले जे मारले गेले ते स्थलांतरित असतील पण ते परके नव्हते आणि नाहीत. ते आम्ही आहोत आणि आम्ही ते आहोत. दे आर अस. न्यूझीलंड आम्हा सगळ्यांचं घर आहे. धार्मिक स्थळी, जिथं ते सर्वाधिक सुरक्षित असायला हवं होते, तिथं हे घडावं, हे वेदनादायी आहे.’
तुझा प्रत्येक शब्द अंतःकरणापासून आलेला होता. त्यात आईच्या प्रेमाचा ओलावा होता. अग बयो, इथं निरपराध माणसं मारली गेल्यावर आठवडा आठवडा काय अगदी महिनोमहिने आमच्या नेत्यांना त्यावर काही बोलावं असं वाटत नाही. जामिनावर सुटलेल्या खुन्यांचा सत्कार करण्यासाठी आमचे नेते तत्पर असतात. तिथं तू कोणत्या अतूट मानवी धाग्यांनी धावून गेली होतीस.
अवघं ३८ वर्षाचं वय तुझं. जगातली सर्वात तरुण महिला पंतप्रधान तू. या पदावर असतानाच गेल्यावर्षी तू एका कन्येला जन्म दिलास. आपल्या डेप्युटीकडे दीड महिने कार्यभार सोपवून आईपणाची गोड रजा उपभोगलीस तू! कणखर राजनेत्यातली ती आईच तर मी अनुभवत होतो तुला ऐकताना, पाहताना.
तुझ्या देशात पोटापाण्याच्या शोधात आलेल्या या स्थलांतरितांसाठी देशाचा झेंडा अर्ध्यावर उतरतो. तुझं सरकार मृतांच्या अंत्यविधीचा केवळ खर्च उचलून थांबत नाही तर तू घोषणा करतेस, ‘या अतिरेकी हल्ल्यात अनेक कुटुंबातले कर्ते स्त्री-पुरुष मृत्यूमुखी पडलेत. जखमी झालेत. ही सारी कुटुंबं आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होईपर्यंत सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.’
या हल्यानं तू मुळापासून हलली आहेस. माझ्या देशात पुन्हा असं होता कामा नये, हा निर्धार तुझ्या प्रत्येक हालचालीतून दिसतो. तुझं बोलणं केवळ तोंडपाटीलकी नाही. नाही तर आमच्याकडे नेते, 'असं होता कामा नये' म्हणून ओरडत राहतात आणि झुंडी हवं ते करत राहतात. पण तू या हल्ल्याच्या मुळापर्यंत जातेस बयो. देशात बंदुकीचा परवाना देणाऱ्या गन लॉमधे काय त्रुटी आहेत, याची पाहणी करुन दहा दिवसात सुधारित कायदा आणला जाईल, हे तू स्पष्ट करतेस.
लोकांनी आपल्याकडच्या बंदुका स्थानिक पोलिसांकडे जमा कराव्यात, असं आवाहन करतेस. तुझ्या बोलण्याचं, वागण्याचं प्रतिबिंब न्यूझीलंडच्या रस्त्यारस्त्यावर दिसतंय. तरुण मुलं, मुली, म्हातारे कोतारे जागोजागी जमून प्रार्थना करताहेत. अतिरेकी राष्ट्रवादाविरोधी घोषणा देताहेत. गोरी माणसं आपल्या मुस्लीम बांधवांसाठी गळाभेट घेत रडताहेत. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, जेसिंडा! यू आर दी रिअल लीडर, यू आर माय लीडर!
तुझ्यातलं प्रेम, सहभावना, संवेदनशीलता रस्त्यावरच्या माणसांपर्यंत पोचते आहे. हे सोप्पं नसतं. त्याला नुसती बलदंड छाती असून भागत नाही. मानवी सुख दुःखासोबत धडकणारं हृदय असावं लागतं सोबत!
आणि संसदेत तू ठामपणे सांगतेस, ‘त्या माथेफिरु अतिरेक्याने त्याच्या हीन कृत्याकरता आपला देश निवडला असेल पण लक्षात ठेव म्हणावं त्याला, तुला या देशाकडून काहीसुध्दा मिळणार नाही. अगदी तुझं नावही देणार नाही मी तुला. माझ्याकरता जे मारले गेले त्यांची नावं महत्वाची आहेत. तुझ्यासाठी मात्र अतिरेकी, दहशतवादी व्यक्तीचं नाव महत्वाचं नाही.’
तुझ्यासारखं बुध्दिमान, स्वच्छ दृष्टी असलेलं, धैर्यशील, खंबीर आणि संवेदनशील नेतृत्व जगातल्या प्रत्येक देशाला लाभलं तर जग किती सुंदर होऊन जाईल, जेसिंडा! तू म्हणतेस ते किती खरं आहे. ‘यू आर कॅन बी प्रॅगमॅटिक अँड ग्रो अन इकॉनॉमी अँड इम्प्रूव वेलबिइंग अँड डू ऑल ऑफ द थिंग्ज यू हॅव एन एक्पेक्टेशन गवर्नमेंट्स डू, बट डू इट विथ अ बिट ऑफ हर्ट.’
जेसिंडा, तुझ्यासारख्या आईच्या हातात जेव्हा देशाची नाडी असते तेव्हा वाढणाऱ्या जीडीपीमधे सुध्दा हृदयाचे ठोके ऐकू येतात. जेसिंडा, माय डिअर मदर न्युझीलंड, तू अशी वेलिंग्टनमधे थांबू नकोस बयो, पसरत जा, वाहत जा, खळाळणाऱ्या नदीसारखी आणि कधीतरी माझ्याही घरापर्यंत पोच. मी अंगणात उभा राहून, टाचावर करुन तुझी वाट पाहतोय, जेसिंडा! नक्की ये जेसिंडा, नक्की!
(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)