महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

०४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.

महात्मा गांधी म्हणत, की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या तीन दशकांत गांधीजींचं हे वक्तव्य काँग्रेस पक्षाबाबतीत अगदी यथार्थ होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या झंझावातातही या चिरेबंदी वाड्याला धक्का लागला नव्हता. ऐंशीच्या दशकापासून या वाड्याची पडझड सुरू झाली. आणि आज ‘भिंत खचली, कलथून खांब गेला, जुनी, पडकी, उद्ध्वस्त धर्मशाळा’ अशी या वैभवशाली वाड्याची दयनीय स्थिती झालीय.

आणीबाणीतही हाताला साथ

१९६० मधे महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९६२ मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४४ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभेच्या २६४ पैकी २१५ जागांवर विजय मिळवला होता. १९६७ मधे लोकसभेच्या ४५ पैकी ३७ जागा आणि विधानसभेच्या २७० पैकी २०३ जागांवर काँग्रेस पक्ष विजयी झाला होता. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत ४५ पैकी ४२ जागा पक्षाने सहज जिंकल्या. १९७२ च्या विधानसभेत पक्षाने २२२ जागांवर कब्जा केला.

हेही वाचाः महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?

१९७७ मधे आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुका झाल्या. उत्तर भारतात काँग्रेसचं पानिपत झालं. पण ही लाट महाराष्ट्रात थबकली. त्यावेळी ४८ पैकी २० जागा जिंकून काँग्रेसने आपलं आव्हान कायम ठेवलं. त्यानंतर काँग्रेसमधे फूट पडली. १९७८ मधे विधानसभेत रेड्डी काँग्रेसला ६९ आणि आय काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या.

पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं

वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेस आणि आय काँग्रेस यांचं संयुक्त सरकार स्थापन झालं. पण अवघ्या चार महिन्यांत शरद पवार यांनी एस. काँग्रेसची स्थापना करत ‘पुलोद’ प्रयोग केला आणि दादांचं सरकार पाडलं. पुढे हे सरकार बरखास्त झालं. आय काँग्रेसमधे रेड्डी काँग्रेस विलीन झाली. पण शरद पवार यांनी आपला सवतासुभा अपवाद वगळता कायमच ठेवला. तेथून काँग्रेस पक्षाला ग्रहणच लागलं आणि आजतागायत ते सुटलेलं नाही.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत आय काँग्रेसने पुन्हा आपलं बस्तान बसवत ३९ जागा जिंकल्या. विधानसभेला २८८ पैकी तब्बल १८६ जागांवर विजय मिळवला. पवारांच्या एस काँग्रेसला ४७ जागा मिळाल्या. तेव्हापासून गेल्या ४० वर्षांत पवारांच्या पक्षाची ताकद ही जास्तीत जास्त ५० ते ६० आमदार एवढीच राहिलीय. आणि त्यांच्या खासदारांची संख्या कधी दोन आकडी झालेली नाही.

हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

१९९९ मधे पुन्हा काँग्रेसपासून वेगळं होतं पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर पवारांना लोकसभेला १९९९ मधे ६, २००४ मधे ९, २००९ मधे ८ आणि २०१४ मधे ४ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या जागा १९९९ मधे होत्या १०, २००४ मधे १३, २००९ मधे १७ आणि २०१४ मधे अवघ्या दोन! आणीबाणीच्या काळातही काँग्रेसचा महाराष्ट्राचा गड शाबूत राहिला होता. पण पवारांनी काँग्रेसमधे फूट पाडल्यानंतर, ‘याला अडवा, त्याला पाडा’ असे डावपेच लढवले. काँग्रेस पक्षाची आज जी विकलांग अवस्था झालीय, त्याला पवारांची धूर्त खेळी हे एक महत्त्वाचं कारण आहे,  अशी राजकीय विश्‍लेषकांची मीमांसा आहे.

काँग्रेसमधल्या घराण्यांना हादरे

‘पुलोद’ प्रयोगापासूनच वसंतदादा पाटील आणि त्यांचा गट हा शरद पवार यांचं टार्गेट असल्याचं त्यांच्या पुढील काळातल्या डावपेचावरून दिसून येतं. १९९९ मधे सांगलीत लोकसभेला काँग्रेसतर्फे दादांचा मुलगा प्रकाशबापू पाटील उभं राहिले. पवारांनी राष्ट्रवादीतर्फे दादांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांचा मुलगा मदन पाटील यांना मैदानात उतरवलं. पवारांच्या या खेळीने दादा घराण्यात आणखी फूट पडली.

शंकरराव मोहिते पाटील हे दादांचे निकटवर्ती. त्यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील हे अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत आले. विजयसिंह २००४ मधे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत स्वबळावर उपमुख्यमंत्री झाले. पवारांना त्यांना डावलणं शक्य नव्हतं. १५ वर्षांनंतर माढ्याच्या जागेचा घोळ घालत पवारांनी मोहिते पाटील गटाला भाजपमधे जाणं भाग पाडलं. स्वपक्षीयांबाबत जे डावपेच, त्याहीपेक्षा अधिक धूर्तपणाने पवारांनी काँग्रेस नेत्यांविरोधात खेळी केल्या.

हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?

ताजं उदाहरण अहमदनगरमधल्या विखे पाटील घराण्याचं. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून चार पिढ्या आणि पाऊणशे वर्षांहून अधिक काळ विखे पाटील घराणं महाराष्ट्राच्या सार्वजनिक, सहकार आणि राजकीय घडामोडीत वावरत आलंय. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय यांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी चालवली होती.

नगरच्या वादात भविष्यातली खेळी?

लोकसभेच्या गेल्या दोन्ही निवडणुकीमधे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसला द्या, त्या बदल्यात पुण्याची जागा राष्ट्रवादीला घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसतर्फे विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीपुढे ठेवला होता. तसं झालं असतं तर नगरची जागा काँग्रेसने नक्कीच जिंकली असती.

राष्ट्रवादीने आणि खुद्द पवार यांनीही या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावताना राधाकृष्ण यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील या मतदारसंघातून पराभूत झाले होते, असा दाखला दिला. हा दाखला देऊन त्यांनी विखे पाटलांच्या जखमेवरची खपली विनाकारण काढली. पवारांनी दाखला दिला. पण अपुरा दिला. नंतर उच्च न्यायालयाने विखे पाटील यांच्याविरुद्ध विजयी झालेले यशवंतराव गडाख यांची निवडणूक रद्द केली होती हे त्यांनी सांगितलं नाही.

हेही वाचाः शरद पवारांचं बेरजेचं राजकारण निव्वळ पंतप्रधान होण्यासाठी नाही, तर

पुढे सर्वोच्च न्यायालयाने गडाखांना अनुकूल निकाल दिला. पण २८ वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून नगरची जागा काँग्रेसला द्यायची नाही, असा निर्णय पवारांनी घेतला, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यातून अखेर डॉ. सुजय यांना भाजपमधे जाणं भाग पडलं. काँग्रेसमधल्या एका मातब्बर घराण्याची ताकद कमी झाली. दादा घराणं, मोहिते पाटील घराणं, विखे पाटील घराणं अशा अनेक नेत्यांमुळे काँग्रेस सामर्थ्यशाली बनली होती. नेमक्या अशा बलाढ्य घराण्याच्या नेत्यांचं खच्चीकरण करत शरद पवार यांनी काँग्रेस जर्जर केली, असा निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरणार नाही.

काँग्रेस निर्नायकी करण्याचे डावपेच

एका बाजूला काँग्रेसचं खच्चीकरण आणि त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष निर्नायकी, नेतृत्वहीन कसा होईल या दृष्टीनेही पवार यांनी डावपेच लढवल्याची चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला भाजपमधे जायला भाग पाडून विखे पाटलांच्या नेतृत्वाला खीळ घालण्याची त्यांची चाल यशस्वी झालीच आहे.

मुख्यमंत्री पदाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून आपल्या बायकोला उभं करण्याचं आणि आपण महाराष्ट्रात राहण्याचं ठरवलं होतं. आपल्या बायकोला सहजपणे निवडून आणण्याची ताकद चव्हाण यांच्याकडे निश्‍चितच होती. पण कोठून, कशी कळ फिरली, कल्पना नाही. पण नांदेडची जागा त्यांनीच लढवावी, असा दिल्लीतून आदेश आला. या फतव्यामागे पवार हेच बोलविता धनी असल्याची बोलवा आहे.

हेही वाचाः काँग्रेसने उमेदवार दिलेल्या पाच ठिकाणी कोण मारणार बाजी?

विखे पाटील, चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधे मुख्यमंत्री पदासाठी पृथ्वीराज चव्हाण वगळता कोणताही प्रबळ नेता राहिलेला नाही. अशावेळी अजित पवार यांचं घोडं पुढं दामटावं आणि मुख्यमंत्रिपदाची शर्यत अनुकूल करून घ्यावी, असा पवारांचा हेतू असू शकतो. महाआघाडीच्या नथीतून मुख्यमंत्रिपदाचा तीर मारणं त्यांना फारसं अवघड नाही. त्यातूनच महाराष्ट्रातली काँग्रेस जास्तीत जास्त दुबळी व्हावी, नेत्यांचं खच्चीकरण व्हावं, अशी त्यांची धूर्त चाल असावी, असा राजकीय विश्‍लेषकांचा तर्क आहे.

डावपेचांचं ग्रहण कधी सुटणार?

काँग्रेस पक्षात गटबाजी आहे. दुफळी आहे. बेदिली आहे. हे सर्व पूर्वापार पाचवीला पुजलंय. तरीही २०१४ चा अपवाद वगळल्यास अनेक पडझडीतून काँग्रेस पक्ष सावरलाय. तरीही गेल्या २० वर्षांपासून पक्षाला पवारांच्या डावपेचाचं ग्रहण लागलंय. ते सुटल्याशिवाय काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेचा जीर्णोद्धार होणं कठीण आहे.

शरद पवार यांच्या खेळीमुळे वसंतरावदादा पाटील यांचं घराणं खिळखिळं झालं. विखे पाटील यांच्या मुलाला नगरची जागा देण्याला पवारांनी आडकाठी घातली आणि आता विखे पाटील पुढे काय करतील, हे प्रश्‍नचिन्हच आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना राज्यातच राहण्याची इच्छा होती. पण त्यांच्या गळ्यात मारुन मुटकून लोकसभेची उमेदवारी घालण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांची दिल्लीला पाठवणी करण्याचे मनसुबे पार पडले.

शरद पवार यांनी पद्धतशीरपणे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची वाट निर्वेध करण्याचे प्रयत्न चालवलेत. त्यात महाराष्ट्रातली काँग्रेस जवळजवळ नेतृत्वहीन झालीय.

हेही वाचाः निवडणूक जिंकण्याचं किलर इन्स्टिंक्ट कुणामधे?

 

(साभार दैनिक पुढारी.)