बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?

०४ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


डब्लूएचओकडून १ ते ७ ऑगस्ट हा काळ जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाची लागण झालेल्या आईचं दुध पाजल्याने बाळाला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, अशी शंका घेतली जातेय. पण खरं म्हणजे, थोडी काळजी घेऊन आईचं दुध बाळाला पाजता येऊ शकतं असं डब्लूएओने आपल्या अहवालात सांगितलंय.

आईच्या पोटातून बाळ या जगात येतं तेव्हा त्याच्या जेवणाची निसर्ग लगेचच तयार करून ठेवतो. बाळाचं हे जेवणं म्हणजे आईचं दुध. जन्मल्यानंतर जवळपास दीड वर्ष बाळ आईच्या अंगावर दुध पितं. पहिले सहा महिने तर आईच्या दुधाशिवाय इतर कोणतंही अन्न त्याला दिलं जात नाही. या दुधात बाळाच्या वाढीसाठी गरजेचे असणारे अनेक पोषण घटक असतात. पण स्तनपानाविषयी अनेक गैरसमज सामान्य माणसांच्या आणि डॉक्टरांच्या मनातही दिसतात. म्हणूनच स्तनपानाविषयी जनजागृती करून हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी डब्लूएचओकडून १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या काळात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो.

सध्या कोरोना वायरसच्या संक्रमणात स्तनापानाविषयी एक वेगळी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या आईच्या दुधातून बाळालाही लागण होईल या भीतीने अनेक ठिकाणी नवजात बाळाला आईपासून दूर ठेवलं जातंय. पण खरंतर, कोरोना वायरसची लागण झालेल्या बाळाला आईच्या स्तनपानापासून कोणताही धोका नाही असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मान्य केले आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

आईपासून दूर बाळ सुरक्षित राहील?

बाळाला स्तनापन करण्याच्या दोन पद्धती जगभर वापरल्या जातात. आई आणि बाळ दोघेही एकमेकांच्या जवळ असतील तेव्हा थेट शरीराशी संपर्क येणारं स्तनपान केलं जातं. मात्र, बाळाच्या जन्मानंतर आई ऑफिसला जात असेल तर अंगावरचं दुध बॉटलमधे काढून फ्रिजमधे ठेवून आई नसताना बाळाला भूक लागेल तेव्हा हे दुध पाजलं जातं. हे दुध काढण्यासाठी पम्पिंग बॉटल नावाचं एक उपकरणंही बाजारात उपलब्ध असतं.

कोरोना वायरसच्या काळात या दोन्ही पद्धती धोकादायक असू शकतात, असं म्हटलं जातंय. थेट स्तनपान करताना बाळाला आईच्या जवळ नेल्याने त्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. त्यामुळे बाळाला आईपासून दूर ठेवणंच योग्य असं म्हटलं जातंय. अशा परिस्थितीत दुसऱ्या पद्धतीचा वापर करणं सुरक्षित असू शकेल. पण आईच्या दुधातच कोरोनाचे वायरस असतील आणि ते बाळाच्या पोटात गेले तर त्याला कोरोनाची लागण होऊ शकेल अशीही भीती व्यक्त केली जातेय.

आईच्या दुधात वायरस नाही

मात्र, आईला कोरोना झालेला असातनाही दोन्ही पद्धतींचा वापर करून बाळाला स्तनपान करता येऊ शकतं, असं डब्लूएचओनं सांगितलंय. उलट, हे दुध पाजलं नाही तर कोरोना वायरस वगळता इतर आजारांचे वायरस बाळावर सहज हल्ला करू शकतील, असं डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी सांगितलंय.

‘आईच्या दुधात कोरोनाचा सक्रीय वायरस आम्हाला आत्तापर्यंत आढळलेला नाही. अनेक केसेसमधे या दुधात वायरसच्या आरएनएचे तुकडे आढळलेत. मात्र, जिवंत किंवा हल्ला करणारा वायरस आढळलेला नाही. त्यामुळे आईच्या दुधातून बाळाला कोरोनाची लागण होईल, असं सिद्ध होऊ शकलेलं नाही,’ असं डब्लूएचओच्या प्रजनन आरोग्यविषयक सल्लागार डॉ. अंशू बॅनर्जी यांनी सांगितलंय. याचाच अर्थ कोरोनाग्रस्त आईचा बाळाशी संपर्क येऊ द्यायचा नसेल तर आईचं दुध उपकरणांच्या सहाय्याने काढून बाळाला पाजणं शक्य आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

दुध पाजणं शक्य आहे

खरं म्हणजे, उपकरणाशिवाय, आईच्या संपर्कात आणून थेट अंगावरून दुध पाजणंही शक्य असल्याचं आता समोर आलं आहे. अशाप्रकारे दूध पाजणं, आईचा स्पर्श बाळाला होणं हेही बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. विशेषतः नुकत्याच जन्मलेल्या बाळ पहिल्यांदा स्तनपान करत असेल तर थेट अंगावर दुध पाजलं जावं, असं अनेकदा तज्ञ सांगतात. कांगारू आपल्या बाळाला पोटात ठेवतं त्याप्रमाणे आईनंही आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला छातीशी घट्ट धरून ठेवणं गरजेचं असतं. थोडीशी काळजी घेऊन बाळाला अशाप्रकारे जवळ घेणं, त्याला दुध पाजणं सहज शक्य आहे.

बाळाला जवळ घेताना आईनं कॉटनचा मास्क लावणं किंवा कॉटनच्या कपड्याने तोंड आणि नाक झाकून घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या अमेरिकन आरोग्य संस्थेच्या अहवालात सांगण्यात आलंय. बाळाला हातात घेण्याआधी आणि पुन्हा खाली ठेवल्यानंतर आईनं आपले हात स्वच्छ धुवायला हवेत. शिवाय, आपल्या आणि बाळाच्या आसपासच्या जागेचं, गोष्टींचं सतत निर्जंतुकीकरण करत रहावं, असंही सीडीसीनं सांगितलंय. आई जास्त आजारी नसेल तर हे उपाय करून बाळाला अगदी अंगावरही दुध पाजता येणं शक्य आहे.

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती

मात्र, आई आजारी असेल तर उपकरणाच्या मदतीने अंगावरचं दुध बॉटलमधे काढून बाळाला पाजावं लागेल. त्याआधी ते उपकरण, त्याचे सगळे भाग, बॉटलच्या निपल्स या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून, त्या वाळवून मगच वापरण्यात याव्यात. आई खूपच आजारी असेल आणि अंगावर थेट पाजणं किंवा बॉटलमधे दुध काढणं दोन्ही शक्य नसेल तर दुसऱ्या निरोगी ओल्या मातेकडून बाळाला दुध पाजलं जावं. तेही शक्य नसेल तर अनेक ठिकाणी रक्ताप्रमाणे माणसांचं दुधही विकत मिळतं किंवा दान केलेलं असतं, ते बाळाला द्यायला हवं.

आईचं दुध हे बाळासाठी रोगप्रतिकारक शक्तीसारखं काम करतं. बाळ जन्मल्या आल्या आल्या येणारं चिकाचं दुध हे तर बाळाचं पहिलं लसीकरण आहे, असंच म्हटलं जातं. पोटातून बाहेर आल्यानंतर जगात असणाऱ्या वायरसशी लढण्याची ताकद या दुधामुळे बाळाला मिळते. त्यामुळे वारंवार आजारी न पडता बाळाची चांगली वाढ होऊ शकते. ही वाढ होणं हे फक्त लहानपणीच नाही तर पुढे आयुष्यभर उपयोगी पडतं. थोडक्यात, स्तनापानातून काही धोका होणार असेल तरीही त्यातून मिळणारे फायदे हे त्या धोक्यापेक्षा कित्तीतरी पट्टीनी जास्त असतात. त्यामुळे या नाहीतर त्या कोणत्या न कोणत्या मार्गाने आईचं दुध बाळापर्यंत पोचणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?