भाजपसाठी ब्राम्हणबहुल कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?

०४ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?

महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालीय. पण या निर्णयाची कुणकुण लागली तेव्हापासून त्यांची उमेदवारी वादात सापडलीय.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादांना उमेदवारी देण्यास अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध केला. इथल्या राजकारणाला जातीचा रंग देण्यात आला. चंद्रकांत पाटलांनी हा मतदार संघ निवडला कारण हा ब्राम्हणबहुल सुरक्षित मतदारसंघ आहे, असा आरोप ब्राम्हण महासंघाने केला.

चंद्रकांतदादा कोण आहेत?

चंद्रकांतदादा कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातचे रहिवासी आहेत. पण दादा लहानाचं मोठं झाले ते मुंबईत. तिथंच त्यांचं शिक्षण झालं. ८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १५ वर्षांआधी त्यांना एबीवीपीतून भारतीय जनता पार्टीचं काम करायला पाठवण्यात आलं.

चंद्रकांतदादांनी २००९ मधे पहिल्यांदा महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक लढवली. आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून ते विजयी झाले. २०१४ मधेही ते निवडून आले. चंद्रकांतदादा थेट लोकांमधून निवडून आले नाहीत. मागच्या दाराने राजकारणात आलेला माणूस म्हणून त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात.

पाच दशकांचा संसदीय राजकारणाचा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही मागच्या दारानं सत्तेत बसलेत, असं म्हणत चंद्रकांतदादांना टोला लगावला होता. त्यामुळेच आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय चंद्रकांतदादांनी घेतलाय.

हेही वाचाः भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?

कोल्हापूरच्या मैदानातून थेट पुण्यात

दादांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय आता जाहीर केला असला तरी ते गेली पाच वर्षांत स्वतःसाठी मतदारसंघ शोधत होते. आपलं गाव असलेल्या भुदरगडमधे चाचपणी केली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही मोर्चेबांधणी केली.

दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असून त्या जागा आपल्याला सुटण्याची शक्यता नसल्याचा अंदाज घेत चंद्रकांतदादा नव्याने सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यामुळेच दादांनी विजयाची हमी देऊ शकणाऱ्या कोथरूडची निवड केल्याचं बोललं जातंय.

कोथरूड मतदारसंघच का निवडला?

पुण्यातल्या पत्रकार अश्विनी डोके सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोथरूड हा भाग गेल्या काही वर्षांमधे नवी सदाशिव पेठ म्हणून उदयाला आलाय. इथे ब्राम्हण समाजाची खूप मोठी संख्या आहे. ब्राम्हण मतदार लाखाच्या घरात आहे. ब्राम्हणांखालोखाल इथे मराठा जातीची लोकसंख्या आहे. बाजूच्या मुळशी पट्ट्यातून मराठा समाजाचे लोक इथे आलेत. इतर छोट्या-छोट्या जातीही राहतात.’

‘साक्षरतेचा प्रमाण चांगलं असलेल्या या भागातून गेल्या काही विधानसभा निवडणुकीचे कल बघितल्यास ते युतीच्या उमेदवाराच्या बाजूने असल्याचे दिसतात. इथला मतदानाचा, उमेदवारांचा पॅटर्न बघितल्यास त्यामधे जातीचा पॅटर्न खूप प्रभावीपणे काम करताना दिसतो. त्यात ब्राम्हण जातीचं वर्चस्व आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार मेधा कुलकर्णीचं तिकीट कापल्यावर ब्राम्हण समाजातून तीव्र प्रतिक्रिया आली.’

‘मेधा कुलकर्णी या ब्राम्हण समाजाच्या अस्मितेचं राजकारण करतात. त्यांच्या वेळोवेळच्या भूमिकांवरूनही ही गोष्ट स्पष्ट झालीय. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने तर चंद्रकांत पाटील यांना ब्राम्हणविरोधी म्हणत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. राज्यात ब्राम्हण मतदारांची मोठी संख्या असलेल्या काही मोजक्या मतदारसंघांत कोथरूडचा समावेश होतो. त्यामुळेच आता ब्राम्हण महासंघानेही इथे आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय.’

हेही वाचाः चला, बाईविषयीचे हे नवरंगी समज तोडत आपण सीमोल्लंघन करूया!

खरंच भाजपचा बालेकिल्ला आहे?

चंद्रकांतदादा पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, की कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. इथे भाजपची कशी ताकदवान आहे, हेही ते सांगतात. पण खरंच असं आहे? २००९ मधे मतदारसंघ फेररचनेत कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आलाय. २०१४ मधे भाजपच्या मेधा कुलकर्णी ६४ हजाराच्या मताधिक्याने इथून निवडून आल्या. त्याआधी २००९ मधे युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले होते.

याविषयी डोके म्हणाल्या, ‘२०१४ आधी युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. चंद्रकांत मोकाटे हे इथून निवडून यायचे. पण गेल्यावेळी युतीत फाटाफूट झाली. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच कोथरूडमधल्या मतपत्रिकेत कमळाचं चिन्ह आलं. भाजपने हा मतदारसंघ तब्बल ६४ हजाराच्या मताधिक्याने जिंकला. २०१९ मधे लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या गिरीश बापटांना इथून लाखाचं मताधिक्य मिळालं.’

‘ब्राम्हण महासंघाने विरोध केला असला तरी इथला ब्राम्हण समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला मानणारा आहे. म्हणजे आपण इथला ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणत भाजपला फॉलो करतो, असं आपण म्हणू शकतो. आणि यामधेच चंद्रकांतदादा कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे, असं म्हणण्यातली खरी मेख आहे,’ असं डोके यांना वाटतं.

ब्राम्हणबहुल सुरक्षित मतदारसंघ

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने चंद्रकांतदादांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, ‘कोथरुडमधील आमदार हा ब्राम्हणच असावा अशा आमची मागणी नाही. यापूर्वीदेखील चंद्रकांत मोकाटे होते, शशिकांत सुतार होते. तेव्हा आम्ही कधीही आक्षेप नोंदवला नाही. पण यावेळेस चंद्रकांत पाटलांनी हा मतदार संघ निवडला कारण हा ब्राम्हणबहुल सुरक्षित मतदारसंघ आहे.’

भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांतदादांनी स्वतःसाठी ब्राम्हणबहुल सुरक्षित मतदारसंघ निवडला. राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीसोबतच केरळमधल्या वायनाडमधूनही लढण्याची घोषणा केली. वायनाड हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. मुस्लिमबहुल असल्यामुळेच राहुल गांधींनी हा सुरक्षित मतदारसंघ निवडल्याची टीका त्यांच्यावर झाली. यामधे आपल्या पंतप्रधानांनीही अप्रत्यक्षरित्या भाग घेतला. वर्ध्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या या निर्णयाला बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्याक या राजकारणाशी जोडलं.

अल्पसंख्याक, बहुसंख्यांक वादाची फोडणी

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाने काँग्रेसला शिक्षा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळेच काही नेतेमंडळी बहुसंख्याकांचा प्रभाव असलेले मतदारसंघ सोडावं लागताहेत. या मंडळींना निवडणूक लढवण्यासाठी अल्पसंख्यांक जिथे बहुसंख्याक आहेत तिथे जावं लागतंय.’ मोदींच्या या टोलेबाजीविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रारही केली होती. पण आयोगाने या प्रकरणात मोदींना क्लिनचिट दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या उमेदवारीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, 'पराभवाच्या भीतीने राहुल यांनी मुस्लिमबहुल जागा निवडलीय. वायनाड सीटवर २०११ च्या लोकसंख्येनुसार ४९ टक्के हिंदू मतदार आहेत. काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीपुरते हिंदू असून निवडणुकीच्या काळातच ते जानवं घालतात. अमेठीतला धोका ओळखून राहुल आता दक्षिणेत लढायला गेलेत.'

हेही वाचाः 

बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?

ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?