लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

०२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनामुळे राजकारणही बदलणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या इवेंटगिरीतून आपल्याला राजकारणी लोक जाणूनबुजून वैज्ञानिक माहितीपासून दूर ठेवत आलेत. तसं त्यांनी स्वतःच्या राजकीय हेतूसाठी केलं. पण सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांची ही कृती त्यांच्याच अंगाशी येतेय.

युवाल नोवा हरारी हे इस्राईलमधल्या जेरुसलेम  इथल्या हिब्रु युनिवर्सिटीतले प्राध्यापक, प्रसिद्ध इतिहासकार आणि तत्त्वचिंतक म्हणून ओळखले जातात. सेपियन्स आणि होमो डेअस ही मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगणारी त्यांची पुस्तकं जगप्रसिद्ध झालीयत. अनेक भाषांतून त्यांच्या पुस्तकाचे अनुवाद होत असतात.

त्यांचं २१ लेसन्स फॉर २१ सेन्च्युरी’ हे पुस्तक वाचल्यावर ते खऱ्या अर्थाने आत्ताच्या पिढीतले शिक्षक आहेत, याची खात्री पटते. २१ व्या शतकातल्या आव्हांनाची त्यांच्या इतकी सविस्तर आणि विचारपूर्वक मांडणी कुणीही केली नसेल. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा फायनॅन्शिअल टाइम्समधे आलेला लेख भरपूर वायरल झाला होता. कोरोनानंतर बदलणाऱ्या जगाचं चित्र त्यांनी या लेखातून आपल्यासमोर मांडलं.

काही दिवसांपूर्वीच चॅनेल ४ या ब्रिटीश मीडिया संस्थेनं त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतही कोरोना साथरोगानंतर आपला समाज कसा बदलत जाईल याचं चित्रण हरारी यांनी सांगितलंय.

 

कोरोनामुळे सगळीच क्षेत्रं बदलतील

या मुलाखतीत हरारी म्हणतात, कोरोनासारख्या जागतिक साथी आपल्यासमोर नवीन पर्याय ठेवतात. हे पर्याय नुसते ठेवले जात नाहीत तर तेच पर्याय निवडायला आपल्याला भाग पाडलं जातं. आपल्याकडे याशिवाय दुसरे पर्याय नाहीतच, असा भास निर्माण केला जातो. 

‘इतिहासाचा वेग वाढतोय. ज्या प्रक्रिया पूर्ण व्हायला वर्षानूवर्ष किंवा दशकं लागायची त्या आता काही दिवसांत पूर्ण होतायत. माझ्या युनिवर्सिटीबाबतच बोलायचं झालं तर गेल्या २० वर्षांपासून काही कोर्स ऑनलाईन चालू करायचे, असं प्लॅनिंग चालू होतं. पण त्याबाबत कुठलीही पावलं उचलली जात नव्हती. आणि आता एका आठवड्यात त्यांनी संपूर्ण युनिवर्सिटी, युनिवर्सिटीतले सगळे कोर्स ऑनलाईन करून टाकले.’

जग असंच झपाट्याने बदलत जाईल असं हरारी यांना वाटतं. कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी आपण निवडलेले हे तात्पुरते पर्यायच आता परमनंट होऊन जाणार आहेत. कारण संकट संपल्यावर आपण परत आधी होतो तशा समाजात राहायला जाणार नाही, असं ते सांगतात. कोरोनाचं निमित्त साधून आपण एकदम २०-२५ वर्ष पुढे गेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे, हे बदल फक्त युनिवर्सिटी, कॉलेज किंवा शिक्षणाच्या बाबतीतच नाही तर सगळ्या क्षेत्रात होणार आहेत. आपली अर्थव्यवस्था आणि राजकारणंही बदलणार आहे. या बदलांच्या प्रयोगाला किती यश येईल हे सांगता येत नाही. पण हे बदल न स्वीकारता आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे हे सत्य लोकांसमोर येणं महत्त्वाचं आहे, असं मत हरारी यांनी मांडलंय.

कोरोना साथरोग हे महत्त्वाचं वळण

फायनॅन्शिअल टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या लेखात हरारी यांनी समाजात होणाऱ्या या बदलांविषयी फारच सविस्तर चर्चा केलीय. लोकांवर पाळत ठेवून राज्य म्हणजेच राज्यातली सरकारं आपली सत्ता नागरिकांवर गाजवतील, अशी भीती हरारी यांनी व्यक्त केलीय. पुन्हा अशा साथरोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लोक कुठे जातात, काय करतात, कुणाला भेटतात यावर सरकार पाळत ठेवेल. अशी पाळत ठेवणं योग्य की अयोग्य या विषयावर खरंतर वर्षानूवर्ष वादविवाद चाललाय, तो पुढेही खूप वर्ष चालू राहिला असता. पण कोरोनामुळे अशा निर्णयांना झटक्यात ग्रीन सिग्नल मिळेल, असं हरारी यांनी या मुलाखतीत सांगितलं.

हरारी म्हणतात, ही पाळत कधी थांबेल हे सांगता येणार नाही. आणि हीच तर त्याबाबतची सगळ्यात भयंकर गोष्ट आहे. कारण एका आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी या पाळत ठेवण्याला संमती दिली जातेय. आणि आणीबाणीची परिस्थिती कधीही संपतंच नाही. उद्या दुसरी आणीबाणी आपली वाट पाहत बसलेलीच असेल. आत्तापर्यंत देशांनी पाळत ठेवणाऱ्या ज्या भयानक तंत्रज्ञानाला नकार दिला ती सरकारं आता लगेच ही तंत्रज्ञानं आत्मसात करतील.

लगेच दुसऱ्या एखाद्या वायरसशी साथ पसरण्याचा धोका आपल्यासमोर आहेच. कोरोना नाही तर इबोला येईल किंवा साधा फ्लू आहेच. या सगळ्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, असं सांगून नागरिकांवर पाळत ठेवण्याचे सगळे दरवाजे उघडे केले जातील. पाळत ठेवणं म्हणजेच सर्वेलियन्सच्या इतिहासात कोरोना वायरस साथरोग हे एक महत्त्वाचं वळण असेल, असं हरारी यांनी सांगितलंय.

हेही वाचा : कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

लोकांना शिक्षण देणं महत्त्वाचं

इथून पुढं ठेवली जाणारी पाळत ही आत्तासारखी साधीसुधी पाळत नाही. माझ्या मोबाईलवरून मी आत्ता कुठे जातो, काय करतो यावर सरकार पाळत ठेवू शकतं. पण कोरोमुळे माझ्या शरीराच्या आत काय चाललंय यावरही सरकार पाळत ठेवू लागेल. माझं ब्लड प्रेशर माझ्या शरीराचं तापमान सगळं मोजलं जाईल. आणि अशा टोटॅलिटेरियन म्हणजेच एकाधिकारशाहीतूनच आपण साथरोगाशी सामना करू शकू, असं चित्र आपल्यासमोर उभं केलं जाईल.

पण ही गोष्ट खरी नाही. आपल्याकडे दुसरा पर्याय नेहमीच उपलब्ध असणार आहे. आणि तो म्हणजे नागरिकांवर विश्वास ठेवणं. लोकांनी हात धुवावेत म्हणून बाथरूममधे कॅमेरा लावण्याऐवजी सगळ्या लोकांना हात धुण्याचं महत्त्व पटवून त्यांच्यावर विश्वास टाकणं गरजेचं आहे. हा दुसरा पर्याय आपल्याकडे आहे, असं हरारी यांनी या मुलाखतीत सांगितलंय. 

‘मी लोकांवर पाळत ठेवण्याच्या पूर्ण विरोधात नाही. लोकांना मार्गदर्शन जरूर करावं. पण माहितीचा अभाव असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून त्या गोष्टी जबरदस्तीनं करून घेणं हा एकमेव मार्ग आहे या विचाराला माझा विरोध आहे. साबणाने हात न धुणारा एक अल्पसंख्यांक गट समाजात अस्तित्त्वात असला आणि त्यांच्या माध्यमातून असे वायरस पसरण्याचा धोका असला तरी त्यांना जबरदस्ती करून आपण हात धुवायला लावू शकत नाही.’ असंही ते पुढे म्हणतात.

हात धुण्याचं महत्त्व त्यांना पटायला हवं. माणसं चांगली सुशिक्षित असतील आणि त्यांना योग्य माहिती असेल तर त्यांच्यावर विश्वास टाकणं सहज शक्य आहे. आणि त्यांना सुशिक्षित करणं हेही सरकारचंच काम आहे, हे हरारी आपल्या लक्षात आणून देतात.

संपूर्ण देश सोबत हवा

हरारी म्हणतात, ‘दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून बेजबाबदार राजकीय नेते सातत्याने लोकांचा विज्ञान, तज्ञ आणि तार्किक माहितीवरचा विश्वास कमी करण्याच्या मागे लागलेत. तसं करण्यामागे त्यांचे राजकीय हेतू आहेत. पण आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांचं हेच कृत्य त्यांच्या आणि आपल्याही अंगाशी आलंय.’

‘गेल्या अनेक वर्षांपासून असे राजकारणी आपापल्या देशांतला बंधुभावाचा धागा तोडण्याच्या प्रयत्नात आहेत. देशातल्या एकाच गटाचे किंवा समुदायाचे आपण नेते आहोत अशी छबी लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न ते करतात. दुसऱ्या गटाला ते शत्रू म्हणून नाही तर धोकादायक जमात म्हणून पुढे आणतात. यातूनच त्यांना सत्तेचं तिकीट मिळतं. साधारण परिस्थितीत असं करून आपण देशाचा कारभार चालवू शकतो. पण संकटाच्या काळात असं राज्य चालवता येत नाही.’

अमेरिका हे त्यांचं चांगलं उदाहरण असल्याचं हरारी यांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या अधिकाऱ्यानं सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पुर्वेला मावळतो, असं सांगितलं तरी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे अमेरिकेत ५० टक्के लोक आहेत. तर एक अधिक एक दोन, असं म्हटलं तर ते अधिकारी म्हटला म्हणून त्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांची संख्याही लोकसंख्येच्या निम्मी आहे. पण अशा आरोग्य संकटाच्या परिस्थितीवर मात करताना फक्त अर्धी लोकसंख्या देशाच्या नेत्यासोबत असून भागत नाही. संपूर्ण देश सोबत असावा लागतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

आपण फक्त आपलाच देश वाचवू शकत नाही

हरारी यांनी सांगितलेलं उदाहरण सध्या भारतातंही लागू होतं. त्यांचं विश्लेषण चोख असतं. म्हणूनच त्यांनी पुढे दिलेला धोक्याचा इशाराही समजून घेणं गरजेचं आहे. आरोग्य संकटामुळे लोकशाहीला उतरतीला कळा लागेल, असं हरारी म्हणतात. जगभरात सगळीकडे अधिकारशाही येईल, अशी भीती त्यांना वाटते. किंवा याच्या एकदम उलट परिस्थिती येईल असा आशावादही ते व्यक्त करतात.

कोरोनामुळे लोकांना राष्ट्रीय एकतेचं महत्त्व कळेल, असं त्यांना वाटतं. पण फक्त राष्ट्रीय नाही तर सध्या जागतिक एकात्मतेची गरज आहे, असं हरारी वारंवार सांगतात. जंगल जळू लागलं तर आपण फक्त आपलंच झाड वाचवू शकत नाही, अशी एक म्हण सध्या फार गाजतेय. त्याचप्रमाणे जगात उलथापालथ होऊ लागली तर त्यांचा नेता स्वतःच देश वाचवू शकणार नाही.

त्यासाठीच आज जागतिक समन्वयाची गरज निर्माण झालीय. देशांनी आपल्याकडची वैज्ञानिक माहिती, आपलं आधुनिक तंत्रज्ञान दुसऱ्या देशांना सढळ हाताने देऊ केलं पाहिजे. जागतिक आर्थिक योजना आखायला हव्यात. श्रीमंत देशांनी गरीब देशांना सावरण्यासाठी मदत करायला हवी. या क्षणाला देशाला एका जागतिक नेत्याची म्हणजेच ग्लोबल लिडरची गरज आहे, असं हरारी म्हणतात.

हेही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?