लुका छुपीचा डायरेक्टर लक्ष्मण उतेकरः पोलादपूरच्या शेतातून बॉलीवूडपर्यंत

०५ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन यांचा लुका छुपी हा हिंदी सिनेमा सध्या देशभर गाजतोय. त्याचा डायरेक्टर आहे लक्ष्मण उतेकर. रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या लक्ष्मणचा स्ट्रगल स्पॉटबॉयपासून बॉलीवूडमधला आघाडीचा सिनेमॅटोग्राफर बनण्यापर्यंतचा आहे. त्याच्याविषयी आणि त्याच्या सिनेमाविषयी त्याचा मनमोकळा इंटरव्यू.

१ मार्चला लुका छुपी सिनेमा रिलीज झाला. युद्धाचा माहौल असतानाही पहिल्याच दिवशी त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं, ८ कोटी. पुढच्या दोन दिवसांचं एकूण कलेक्शन ३२ कोटींच्याही पुढे गेलं. २०१९ मधला हा विक्रमी गल्ला होता. लुका छुपी हिट झालाय, हे वेगळं सांगायची आता गरज उरलेली नाही.

लिव इन रिलेशनशिपवर मथुरेत घडणारा सिनेमा. क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन हे सध्याचे फ्रेश चेहरे त्यात आहेत. गाणीही गाजलीत. बहुतांश परीक्षणांमधेही सिनेमाचं कौतुक झालंय. याचा सर्वाधिक आनंद झाला असेल, तो लक्ष्मण  उतेकरला. कारण हा डायरेक्टर म्हणून त्याचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे.

बॉलीवूडमधला जमिनीवरचा माणूस

आज बॉलीवूडचा आघाडीचा सिनेमॅटोग्राफर म्हणजे कॅमेरामन लक्ष्मण उतेकर या सिनेमातनं बॉलीवूडमधे आपली दिग्दर्शनाची इनिंग सुरू करतोय. पण याआधी त्याने टपाल आणि लालबागची राणी या दोन मराठी सिनेमांचं डायरेक्शन केलंय. हा त्याचा डायरेक्टर म्हणून हिंदीतला पहिलाच सिनेमा असला तरी बॉलीवूडला लक्ष्मण उतेकर हे नाव नवीन नाही. ब्लू, डिअर जिंदगी, इंग्लिश विंग्लिश, 102 नॉट आऊट सारख्या चर्चित सिनेमांचा सिनेमॅटोग्राफर म्हणून लक्ष्मण सगळ्यांना माहीत आहे.

गेली अनेक वर्षं तो बॉलीवूडमधे पाय रोवून उभा आहे. पण त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतानाचा अनुभव मात्र सेलिब्रेटीटाईप नाही. हिंदीतल्या तथाकथित ग्लॅमरचा किंचितसाही लवलेश त्याच्यामधे जाणवत नाही. उत्तम मराठी आणि बोलण्यातला  साधेपणा यामुळे तो बॉलीवूडच्या दिखाऊ गर्दीपासून वेगळा ठरतो.

हेही वाचाः कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

मराठी माणसांचा सिनेमा मथुरेतला

लुका छुपी रिलीज झालाय. त्यामुळे लक्ष्मण सध्या सिनेमाच्या टीमसोबत पोस्ट रिलीज प्रमोशनमधे व्यस्त आहे. तरीही तो इंटरव्यूसाठी अगदी सहज उपलब्ध होतो. वेळ पाळतो. मुलाखतीची सुरवात अर्थातच लुका छुपीपासून होते. लक्ष्मण सांगू लागतो. त्याच्या लालबागची राणी या सिनेमाचा पटकथा लेखक रोहन घुगेने लक्ष्मणला कथा ऐकवली.

त्याबद्दलचा किस्सा लक्ष्मणकडून ऐकताना जास्त मजा येते. तो लक्ष्मणच्याच शब्दांत, रोहनने मुळातच या सिनेमाची कथा हिंदी सिनेमा डोक्यात घेऊनच लिहिली होती. त्यामुळे त्यावर हिंदी सिनेमा बनवायचा आणि तोही मीच डायरेक्ट करायचा, हे ठरलं. मग आम्ही त्यावर काम करायला लागलो. आम्हाला वाटलं, या सिनेमाची कथा मथुरेच्या पार्श्वभूमीवर रंगू शकते. तिकडची  संस्कृती, लोकांचा वावर, राहणीमान, भाषा यामुळे ही कथा अधिकच बहरेल.

त्यानुसार मग मी आणि रोहन मथुरेमधे जाऊन राहिलो. तिकडची संस्कृती, भाषा, त्यांचा बोलण्याचा लहेजा सर्व जवळून अनुभवलं. जवळपास दीड वर्ष आमचा कथेवरचा रिसर्च सुरू होता. या दरम्यान आम्ही महिनोन्महिने मथुरेला जाऊन राहिलो. तिथे मित्र बनवले. लोकांच्या ओळखी जमवल्या. कथेची बांधणी पूर्ण झाल्यानंतरच आम्ही निर्मात्याचा शोध सुरू केला. 

सिनेमासाठी लेखकाचं नाव बदलवलं

लक्ष्मण पुढे सांगतो, इथपर्यंतचा कथेचा प्रवास विनासायास पार पडला. पण सगळ्यात जिकिरीचं होतं ते निर्माता शोधणं. एकतर दोन मराठी माणसं हिंदी सिनेमा बनवणार ही गोष्टच अनेकांच्या पचनी पडत नव्हती. मी सिनेमॅटोग्राफर म्हणून कितीही परिचित असलो तरीही. कारण आता मी नवा डायरेक्टर होतो. सोबत रोहन घुगेही त्यांच्यासाठी नवीनच होता. लेखक दिग्दर्शकाच्या आमच्या या जोडीला अनेक निर्मात्यांनी थातुर मातुर कारणं देऊन अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवला.

आप मराठी हो और ये कहानी तो मथुरा की हैं. तो आप कैसे कर पाओगे? आप इसकी कल्चर को, रहेन सहेन बारीकियों को कैसे फिल्म में ला पाओगे? असं  अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले.

या प्रश्नांनी कंटाळून शेवटी एके दिवशी मी रोहनला सांगितलं, आत्तापासून तू रोहन घुगे नाही, तर रोहन शंकर आहेस. शंकर हे रोहनच्या वडलांचं नाव. आजपासून तुझी ही नवी ओळख आणि आता या नावानेच आपण आपली कथा निर्मात्यांसमोर मांडायची.

हेही वाचाः सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला

आणि निर्माता मिळाला

लक्ष्मण पुढे सांगतो, एकापाठोपाठ एक निर्मात्यांना भेटत असतानाच एकदा दिनेश विजन यांना त्यांच्या ऑफिसमधे त्यांना कथा ऐकवली. त्यांना ऐकताक्षणीच ती आवडलीही. त्यांनी लगेच होकारही कळवला. मी सिनेमा दिग्दर्शित करण्याचंही त्यांनी स्वागत केलं. अशाप्रकारे लुका छुपी सिनेमाचा पहिला महत्वाचा टप्पा आम्ही  पार केला.

दिनेश विजन हे बॉलीवूडमधल्या नव्या निर्मात्यांमधलं महत्त्वाचं नाव. नवे डायरेक्टर आणि कलाकार यांच्या क्रिएटिव कथांना त्यांनी कायमच प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय. स्त्री, हिंदी मीडियम, बदलापूर, लव आज कल, कॉकटेल, गो गोवा गॉन, फाईंडिंग फॅनी ही त्यांच्या सिनेमाची यादीच त्यांचं वेगळेपण सांगण्यासाठी पुरेशी आहे. राबता या सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सेनॉनच्या सिनेमाचे ते डायरेक्टरही होते.

लक्ष्मण सांगतो, दिनेश सरांची निर्मिती म्हटल्यानंतर पुढच्या सगळ्याच गोष्टी आपोआप सोप्या होत गेल्या. क्रिती आणि कार्तिक यांची मुख्य कलाकार म्हणून निवड पक्की झाली तर पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, विनय पाठक हे सहकलाकारही जोडले गेले.

डायरेक्शनच्या पहिल्या अनुभवाविषयी

हिंदीतल्या कलाकारांना दिग्दर्शित करण्याच्या पहिल्या अनुभवाविषयी लक्ष्मण सांगतो, निर्मात्याचा ठाम पाठिंबा असला की डायरेक्टरचं काम अर्ध्याहून जास्त सोपं होऊन जातं. माझंही असंच झालं. पहिल्यांदा हिंदी सिनेमासाठी अॅक्शन म्हणण्याच्या माझ्या प्रक्रियेत कधीच कुठल्याच कलाकाराची किंवा तंत्रज्ञाची अडचण नाही आली. मातब्बर कलाकार आणि कुशल तंत्रज्ञ यामुळे ठरलेल्या कालावधीत सिनेमा तयारही झाला.

हिंदीच्या सेटवर माझ्यासाठी दिग्दर्शकाची भूमिका नवी असली, तरी सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे वातावरण मला नवं नव्हतं. पण नव्या भूमिकेत रूळताना जुन्याचा हव्यास संपत नाही, असंही सेटवर घडायचं. माझा सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग एखादा सीन उत्तमच शूट करेल, हा विश्वास असतानाही माझ्यातला सिनेमॅटोग्राफर मधेच उसळी मारून बाहेर यायचा. अर्थात यापूर्वी मराठीतल्या अनुभवामुळे मी ते कंट्रोल करू शकलो.

लुका छुपीचं संगीतही चांगलंच लोकप्रिय झालंय. लक्ष्मण त्याचं सगळं श्रेय निर्माता दिनेश विजनना देतो. त्याविषयी तो सांगतो, दिनेशजींच्या आतापर्यंत सर्वच सिनेमांमधे संगीत जमेची बाजू राहिलीय. यावेळी त्यांनी जुन्याच गाण्यांना नव्याने सादर करण्याची कल्पना मांडली आणि ती आम्हालाही पटली. म्हणूनच या सिनेमातली गाणी अधिक जवळची वाटली. लगेच ओठांवरही रुळली.

लुका छुपी रिलीज झालाय. त्याला चांगला रिस्पॉन्सही मिळतोय. मग हा सिनेमा  १०० कोटींचा ट्रेंड फॉलो करणार का, यावर लक्ष्मण मिष्कीलपणे हसतो आणि म्हणतो, १०० कोटीचं माहीत नाही पण प्रेक्षकांना सिनेमा नक्कीच आवडेल. मनोरंजक वाटेल.

लुका छुपीनंतर पुढे काय हा प्रश्न विचारल्यावर लक्ष्मण लगेचच त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगू लागतो, लुका छुपीमुळे मी एक मोठा काळ कॅमेरापासून स्वतःला लांब ठेवलंय. पण मला आता पुन्हा कॅमेराची लेन्स साद घालतेय. तेव्हा आता लवकरच पुढचा हिंदी सिनेमा सिनेमॅटोग्राफर म्हणून सुरू करतोय. बधाई हो फेम दिग्दर्शक अमित शर्मा यांचा हा सिनेमा एक स्पोर्टस् बायोपिक आहे ज्यात अजय देवगण मुख्य भूमिकेत असेल.

हेही वाचाः राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?

स्पॉटबॉयपासून डायरेक्टर बनायचा संघर्ष

याच दरम्यान आपण गावाला जाऊन कुटुंबाला भेटून येणार, हे  सांगायला लक्ष्मण विसरत  नाही. लक्ष्मण एका शेतकरी कुटुंबातून आलाय. त्याचे वडील आजही शेती करतात. पोलादपूरमधे त्यांचं स्वतःचं घरदार, शेती सर्व काही आहे. लक्ष्मणच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल त्याच्या वडलांना काय वाटतं, हे विचारल्यावर तो सांगतो, बाबांना एवढंच माहितीय की मुलगा मुंबईमधे काहीतरी चांगलं काम करतोय आणि मला त्यातच समाधान आहे.

मोकळ्या आकाशाखाली वावरणाऱ्या माझ्या कुटुंबाला मुंबईमधली घरं म्हणजे तुरुंग वाटतात. त्यामुळे मालाडच्या माझ्या घरात त्यांचं येणं तसं कमीच. मग मीच सुट्टी मिळाली की पोलादपूरला धाव घेतो. मला तिकडचा मळा, शेत सतत बोलावत असतं. टपाल हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमाही माझ्या याच गावातल्या कथेवर आधारित आहे.

विशेष म्हणजे लक्ष्मणने सिनेमाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. इंडस्ट्रीत त्याची सुरवात स्पॉटबॉयपासून झाली. त्यानंतर कॅमेरा असिस्टंट, असोसिएट कॅमेरामन अशा टप्प्याटप्प्याने त्याने या क्षेत्रात जम बसवला. यहाँ या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना त्याला कॅमेरा ऑपरेट करायची संधी मिळाली. त्यानंतर त्याने सिनेमॅटोग्राफी हेच आपलं अंतिम ध्येय बनवलं.

मातीतला माणूस मातीतच जगणार

उद्या आयुष्यात काय घडेल, ते माहीत नाही. पण आज मी करतोय, ते कदाचित शेवटचं असू शकेल, हा विचार घेऊन लक्ष्मण जगत आलाय. त्यामुळेच खरंतर बॉलीवूडमधला झगमगाट, इनसिक्युरिटी, स्पर्धा याचा त्याला काहीच फरक पडत नाही.

मातीतला मी मातीतच वाढणार, इथेच जगणार आणि अखेर मातीतच मिसळणार. मग आकाशाच्या ओढीने उगाच नको त्या गोष्टींचा हव्यास का करू, असं जगण्याचं साधंसुधं तत्त्वज्ञान सांगत लक्ष्मण मनमोकळा हसतो. आणि त्याचं हे हसणे ऐकताना आपणही नकळतपणे बॉलीवूडच्या झगमगापासून दूर पोलादपूरच्या त्याच्या शेताकडे झेपावू लागतो.

हेही वाचाः 

नसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील?

सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?

ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा

डॉन रवी पुजारी अंडरवर्ल्डचं विजिटिंग कार्ड?

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)