करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर

१३ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


डॉ. आनंद नाडकर्णी यांचं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस हे नुकतंच प्रसिद्ध झालेलं पुस्तक. आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला हे पुस्तक शिकवतं. त्याचबरोबर मानसिक आरोग्याची सनदही आपल्या हाती सोपवतं. त्यामुळेच या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्या संवादाचं हे शब्दांकन.

कोरोना या अदृश्य वायरसनं संपूर्ण जगावर हल्ला केला. याआधी कधीही न अनुभवलेला, कधीही न पाहिलेला काळ आपण जगलो. अनेकांची आयुष्य या काळानं बदलवली. काहींची घडवली तर काहींची पुरती बिघडवली. अशा संक्रमणाच्या काळात आपल्या जगण्यात झालेले बदल लेखक आणि मनोविकार तज्ञ असणाऱ्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी कशा पद्धतीने स्वीकारले याचा आढावा घेणारं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलं.

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस असं या पुस्तकाचं नाव. जगण्यासोबतच प्रत्येकाच्या आचार विचारात झालेल्या बदलांचा वेध नाडकर्णी यांनी अतिशय सजगतेनं आपल्या या पुस्तकात घेतलाय. हे आपल्याला विचारभावनांचं आरोग्य जपायला तर शिकवतंच पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याची एक सनदही आपल्या हाती सोपवतं.

त्यांच्या या खास पुस्तकाची पहिली आवृत्ती बाजारात आली आणि पुढच्या दहा दिवसात संपली देखील! यानिमित्ताने प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी नाडकर्णी यांच्याशी झूमवरून मुक्त संवाद साधला. विचार भावनांच्या एकूण आरोग्याबद्दलचा हा संवाद होता. यातल्या नाडकर्णी यांच्या बोलण्याचं राहूल सोनके यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.

प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद?

एखादं शीर्षक आपल्या डोळ्यासमोर अचानक येतं. आपलं जगणं ऐन भरात असताना फेब्रुवारी, मार्चमधे कोरोना वायरस आला. त्यानं आपल्या जीवनाची गतीच बंद पडली. आता या काळाला नेमकी कशी प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न मनात पडत होता. मग लक्षात आलं, आपल्याला या काळाला प्रतिक्रिया द्यायची आहे की प्रतिसाद द्यायचा आहे? हे निवडणं आपल्या हातात आहे.

सुरवातीला मी सुद्धा प्रतिक्रिया देण्याच्या मोडमधेच होतो. त्यामागे एक कारण होतं. आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजीकल हेल्थ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्तानं २२ मार्चला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमधे आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आमचं काम मोठ्या उत्साहात चालू होतं. पण मार्च पुढे सरकत होता आता काही खरं नाही हे लक्षात आलं. आमच्या मानसशास्त्राच्या भाषेत 'डिफेन्स मेकॅनिझम' असं म्हटलं जातं ते सुरू झालं.

थोडक्यात, आम्ही वास्तवच नाकारणं चालू केलं. असं काही होणारच नाही असं आम्ही मानून चालू लागलो. आमच्या कार्यक्रमापर्यंत काहीतरी होईल, आपला कार्यक्रम झाल्यानंतर लॉकडाऊन होईल असंच मनात घोळत राहिलो. पण हे सगळे विचार सत्यात येणारे नव्हते. अर्थातच, खूप मोठा मनोभंग झाला. आणि मी त्या प्रतिक्रिया मोडवर गेलो.

हेही वाचा : सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

शीर्षकाबद्दल बोलताना

त्यानंतर लगेचच गुढीपाडवा होता. गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या मुलाने एकदा इन्स्टाग्रामवर लाइव जाण्याचं सुचवलं. मी तुझी मुलाखत घेतो असं तो म्हणाला. मला वाटतं, हे सुचवणं हाच माझ्यासाठी बदल घडवणारा क्षण ठरला. सविता आणि कबीर म्हणजे माझ्या बायकोच्या आणि मुलाच्या मदतीनेच घरात प्रकाशयोजना वगैरे करून आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार केला. 

या लाइवनंतर मला कळालं की या परिस्थितीकडे पहायचे आपल्याकडे दोन मार्ग आहेत आणि ते म्हणजे प्रतिक्रिया देणं किंवा प्रतिसाद देणं. यातला दुसरा मार्ग मी निवडला. आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो म्हणजे काय तर आपल्याला सक्रिय व्हावं लागतं. म्हणून मी लिहायला सुरवात केली.  खूप लेख लिहिले. पण हे लेख प्रसिद्ध करण्यासाठी काही माध्यमच नाहीत हे लक्षात आलं. पेपर, प्रकाशन काहीच सुरू होत नव्हतं. रोजचं वर्तमानपत्रही हातात पडत नव्हतं. मग या लेखांचं करायचं काय?

मग एक कल्पना सुचली. हे लेखांचं अभिवाचन करून आपण ते रेकॉर्ड करूया, असं सुचलं. त्याला मागे तुझ्या गिटारचा सूर दे, असं मी कबीरला सांगितलं. आमच्या म्युझिक टीममधले बाकी सदस्यही त्यावर काम करायला तयार झाले. अशी रेकॉर्डिंग आयपीएचच्या वगैरे चॅनेलवर आम्ही पब्लिश करू लागलो.

या काळात माझ्या मनाची गरज म्हणून मी नवनवीन कविता केल्या. मानसशास्त्राच्या क्षेत्रात काहीतरी करायचं म्हणून वेगवेगळ्या पेपरमधे लेखही लिहिले. या पेपरमधल्या आणि आमच्या रेकॉर्ड केलेल्या काही निवडक लेखांचं संकलन केलं आणि हे नवं पुस्तक तयार झालं. हे सगळं ‘करत’ असताना मला ‘कळत’ही गेलं. म्हणून या पुस्तकाचं शीर्षक ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस.’

गांधींजींची सोबत

याकाळात मी भरपूर घरकाम गेलं. पुस्तकात याचा उल्लेख आलेला आहे. त्यातूनच पुस्तकात मांडलेली ती झिरो सिंक पॉलिसी ही कल्पना पुढे आली. हाताला लागेल ते भांडं घासून सिंक सतत मोकळं ठेवायचं असं आमच्या घरात चालू होतं. या श्रमप्रतिष्ठानाच्या निमित्ताने माझ्यासोबत सतत एक व्यक्ती आहे असं मला वाटायचं आणि ती व्यक्ती म्हणजे गांधीजी. अगदी मुन्नाभाईला दिसायचे तसे गांधींजी मला दिसायचे.

कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनीच आपल्या जीवनशैलीत खूप बदल केलेत. गांधीजीही जीवनशैलीच्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी प्रसिद्ध झाले. त्यानिमित्ताने आपण आपल्या आधीच्या जीवनशैलीबाबत प्रश्न विचारले पाहिजेत असं वाटलं.

आम्ही दिवाळीही फार साध्या पद्धतीने साजरी केली. गांधीजी साधेपणातल्या सौंदर्याबद्दल नेहमी बोलायचे. माझ्याकडे आहे ते सुंदर नाही तर जे सगळ्यांकडे आहे ते सुंदर असं ते म्हणायचे. जीवनशैलीच्या या दृष्टिकोनातून मी गांधींचा फार विचार केला होता.

कबीरच्या सांगण्यावरून मी ऑस्कर जिंकलेला पॅरासाईट हा सिनेमा पाहिला होता. गांधींच्या या बोलण्याचा संबंध मला हॉलिवूडच्या या चित्रपटाशी लावता आला आणि त्याच्यावर ही लिहिणं झालं. या बंद आयुष्याच्या निमित्ताने जीवनशैलीचा पुनर्विचार कसा करायचा?  याचा विचार या पुस्तकात मी केलाय. 

हेही वाचा : फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

प्रतीकांचाही विचार

पंतप्रधान मोदींनी दिवे लावणीचं आवाहन केलं होतं तेव्हा माझ्या एका रेकॉर्डिंगबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. पण याकाळातून जाताना आपण एखाद्या प्रतिकाचा विचार जरूर करावा, असं मला वाटलं. त्यातच कोरोनाच्या निमित्ताने आपल्या पंतप्रधानांनी दिव्याचं प्रतीक सुचवलं होतं. तर आपण त्याचा स्वीकार करावा असं मला वाटलं आणि म्हणून मी ते टिप्पण लिहिलं.

दिवा हे प्रतीक आपल्या संस्कृतीत खूप वेगळं आहे, महत्त्वाचं आहे.  प्रतिकांचं सामर्थ्य आहे कशात असा एक लेखही या पुस्तकात आहे. लोकांना प्रतीकं का लागतात? अमूर्त संकल्पना सर्वसामान्यांना कळत नाहीत, तर प्रतीकं कळतात. गांधीजींचा चरखा हे देखील च! दांडी मार्च मधे 'मीठ' हे देखील प्रतिकात्मकच. 

या प्रतीकांकडे आपण व्यापारी उद्देशाने पाहिलं तर त्याचे 'ब्रँड्स' होतात. पण विकासाच्या आणि समाजाला जोडण्याच्या दृष्टीनं पाहिलं तर ती प्रतीकं असतात. प्रतीकं आणि त्यांच्या बाजूने येणारे विधी याचाच अर्थ असा की त्यावेळेला ती अनुरूप भावना असते. या गोष्टींचं व्यापारीकरण, विधीची कर्मकांड न करता ती जर संवादासाठी आणि शिकण्यासाठी वापरली तर ते खूप चांगलं होईल. 

अफ्लूएन्झा साथीचा प्रसार

जीवनशैलीच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे असं गांधीजी आपल्याला सांगतात. अफ्लूएन्झ म्हणजे समृद्धी किंवा सुबत्ता. तर 'अफ्लूएन्झा' म्हणजे समृद्धीमुळे येणारी सूज. हा एकप्रकारचा आजारच झालाय असं काही समाजशास्त्रज्ञांच म्हणणं आहे. हा अभ्यास मी आपल्या जीवनशैलीला लावला आणि त्यावरून पुस्तकातली काही प्रकरणं तयार झाली. 

या अफ्लूएन्झामधे काय होतं तर माणूस भोगवादी बनतो. या कोरोनामुळे अभावांचा अनुभव आलाय. या अनुभवातून आपण झगमटीच्या रोषणाईपासून स्वतःला परावृत्त  केलं तर अनावश्यक खर्च आपण कमी करू शकतो.

त्यामुळे यानिमित्ताने आपण विचारपूर्वक हा खर्च, उधळपट्टी कमी करू शकलो  तर ही सूज कमी होईल. या अफ्लूएन्झाला कमी करायचंय असा एक विचार मांडणारा लेख पुस्तकात आहे.

हेही वाचा : पाणी कसं प्यावं?

भावनांवर नियंत्रण कसं मिळवावं?

रूढार्थाने माझं हे नवं पुस्तक भावनिक नियमांवरचं नाहीय. पण तुम्ही हे पुस्तक बारकाईने वाचलं तर ते भावना नियंत्रणासाठी मदत करू शकतं. त्यातही पुस्तकात भावनांच्या नियमनाचा एक लेख आहे. ताटीच्या अभंगांवर हा लेख लिहिलाय.

कोरोना काळात वाचताना, काही गोष्टी अभ्यासताना ताटीचे अभंग समोर आले. ते भावनिक नियोजनच्या संदर्भात ते महत्त्वाचं असल्याचं माझ्या लक्षात आलं. ज्ञानेश्वर कित्तीतरी मोठे, जिनियस. पण शेवटी माणूसच. कधीतरी त्यांनाही नकारात्मक भावनांनी घेरलं असणार. त्यावेळी त्यांची बहीण मार्गदर्शक, समुपदेशक झाली. यावर मी एक दीड तासाचं भाषणच दिलं होतं.

या एकाच लेखात भावनिक नियोजन थेटपणे येतं. नकारात्मक भावनांचा स्वीकार आधी कसा करावा? या भावनांचा स्वीकार करून त्यांना आपल्याला मोठ्या ध्येयाकडे वळवता आलं तर त्या भावनांमधली ऊर्जा आपल्याला अधिक चांगल्या कामासाठी वापरता येते. मुक्ताई ज्ञानेश्वरांना भावनिक नियोजनाबरोबरच भावनिक संवर्धनाचा मंत्र देतात. भावनिक नियोजन ते भावनिक संवर्धन या दिर्घ लेखात येतो.

तितीक्षेची ओळख

या पुस्तकात तितीक्षा हा संस्कृत शब्द येतो. याचा अर्थ होतो चिकाटी किंवा धीर. कोरोनाच्या काळात आपला धीर कसा काय वाढवायचा, तेव्हा हा शब्द आला 'तितीक्षा'. याला ज्ञानेश्वरांनी 'सहनसिद्धी' हा शब्द वापरलाय. पाश्चिमात्य देशात या तितीक्षेची मांडणी अल्बर्ट एलिस करतात. असह्य, अशक्य झालं की आपलं मन आता सहन होत नाही असं आपल्याला सांगतं. तिथून त्याला तू करू शकतोस या विचारापर्यंत आणावं लागतं. मी माझा गड सोडणार नाही ही भावना म्हणजे तितीक्षा. यात फक्त सहन करत राहणं असं नाहीय. तर उमेदीने सामोरं जाणं म्हणजे तितीक्षा.

पुस्तकातल्या लेखात हा शब्द मी लोकमान्यांसाठी वापरलाय. 'लोकमान्यांची तितीक्षा' लोकमान्य त्यांच्या आयुष्यात तितीक्षा जगले.

'उन्हाळ्यात मंडालेचा तुरुंग म्हणजे लोहार कामाची जणू तापलेली भट्टीच असे. त्यातच उन्हाळ्यातले वादळी वारे मातीचे थर अंगावर उभे करत. हिवाळ्यात कमालीची आणि बोचणारी थंडी असे. लाकडी दरवाजे ही या थंडी पासून कुणाचही संरक्षण करू शकत नसत. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि सूर्य तापलेला, पाण्यात भिजलेला टॉवेल जर अंगाभोवती गुंडाळला तर काही मिनिटातच कोरडा होत असे. आमच्यापैकी एकही जण मोठ्या आजारातून गेल्याशिवाय राहिलेला नाही. अशा परिस्थितीतही लोकमान्यांनी बौद्धिक लिखाणाकडे लक्ष दिलं हे अपूर्वच!' हे १ ऑगस्ट १९४४ साली आझाद हिंद रेडियोवरून नेताजींनी लोकमान्यांना वाहिलेली आदरांजली आहे.

एकप्रकारचा आशावाद लोकमान्य टिळकांकडे होता. असा आशावाद तितीक्षेवरती आधारित असतो. त्यामुळेच तो भक्कम असतो. म्हणून पुस्तकात टिळकांचा उल्लेख केलाय. 

हेही वाचा : लाच न देण्याची चैन कुणाला परवडणार?

रोगप्रतिकारक शक्ती कशी मिळवणार?

मुळात रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्व म्हणजे शरीर, मन आणि समाजाचं नातं. ज्याने हे नातं ओळखलं त्याने ही रोगप्रतिकारक शक्ती ओळखली. आरोग्याकडे आपण सर्वसमावेशक दृष्टीकोनातून पहायला हवं. तरच आपण आरोग्याचं रक्षण करू शकतो.

कोरोनाच्या काळात सगळेच जण रोगप्रतिकारक शक्तीकडे पाहत होते. मग या प्रतिकारक शक्तीचे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं कुठले भाग आहेत? त्याचा विचार मला करावासा वाटला. नुसतं झिंक विटॅमिन खाल्लं म्हणजे प्रतिकार शक्ती मिळाली असं नाही. मनात कल्लोळ चालला असेल तर हे खाल्लेलं अंगी कसं लागणार?

मनाचा वाटा हा सगळ्या आजारांमधे आहे. आजाराकडे तुम्ही कसे पाहता त्यावर तुम्ही त्यातून कधी, कसे बरे होता हे ठरतं. यासाठी मनाचा वापर कसा करावा याबाबतही या पुस्तकात एक लेख आहे.

मनारोग्याची सनद

शारीरिक आरोग्य हे मूर्त स्वरूपात असल्यामुळे आपल्याला त्याची व्याख्या करता येते. तसं मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येत नाही. म्हणून मानसिक आरोग्याच्या बाबतीत काय करता येईल ते पुस्तकाच्या शेवटी नेमक्या मुद्द्यांमधे मांडलंय.  माझं मानसिक आरोग्य कसं आहे? हे समजण्यासाठी पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या या मुद्द्यांच्या आधार घेता येईल.

आजच्या काळात मानसिक आरोग्य तपासून पाहणं ही खूप गरजेची गोष्ट झालीय. आपण ताप, शरीरातली ऑक्सिजनची पातळी तपासतो मग मानसिक आरोग्य का नको?  म्हणून या पुस्तकात मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर दिलाय. यातून त्या व्यक्तीला स्वतःचं मानसिक आरोग्य समजायला मदत होईल.

हेही वाचा : 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला?

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?