अॅलन मस्कच्या स्टारलिंकमुळे भारतीय गावांमधे इंटरनेट क्रांती?

०२ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


'स्टारलिंक' ही जगातले श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी 'स्टारलिंक' एक आहे. सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा या कंपनीचा महत्वाचा उद्देश आहे. सध्या जगभरातल्या १४ देशांमधे तिचं काम सुरू आहे. मस्क यांनी भारतातल्या गावागावात इंटरनेट पोचवायचं स्वप्न पाहिलंय. स्टारलिंकची भारतातली एण्ट्री त्यामुळेच फार महत्वाची आहे.

जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अॅलन मस्क यांचं नाव घेतलं जातं. ८ जानेवारीला त्यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपनीनं भारतात रजिस्ट्रेशन केलं होतं. अॅलन यांनी मंगळावर मानवी वस्ती उभी करायचं स्वप्न पाहिलंय. त्यांच्या भन्नाट आणि कल्पक गोष्टींसाठी ते जगप्रसिद्ध आहेत.

टेस्ला नंतर मस्क आपल्या अभिनव कल्पना घेऊन पुन्हा एकदा भारतात प्रवेश करतायत. त्यांची 'स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायवेट लिमिटेड' ही कंपनी भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज झालीय. तसा मेगा प्लॅनही मस्क यांनी बनवल्याचं स्टारलिंकचे भारतातले डायरेक्टर संजय भार्गव यांनी लिंक्डइनच्या पोस्टमधे म्हटलंय.

मस्क यांच्या स्टारलिंकची झेप

स्टारलिंक ही अॅलन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' या खाजगी अवकाश वाहतूक कंपनीचा एक भाग आहे. ती लहान उपग्रह तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपन्यांचा हेतू हा सॅटेलाइटचा वापर करून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पोचवणं हा असतो. अमेझॉनची कुयपर तसंच इंग्लंड, भारती एंटरप्राइजची वनवेब या कंपन्या सध्या यात आघाडीवर आहेत.

सप्टेंबर महिन्यात आपण भारतात इंटरनेट सेवा सुरू करत असल्याचं अॅलन मस्क यांनी म्हटलं होतं. या घोषणेमुळे कुयपर आणि वनवेब यांच्यासोबतीला आता स्टारलिंकची एण्ट्री झालीय. मस्क यांनी घोषणा त्यांनी केल्यावर पुढच्या प्रक्रियेला सुरवात झाली कंपनीचे भारतातले डायरेक्टर म्हणून संजय भार्गव हे ऑक्टोबरपासून या कंपनीसोबत जोडले गेले.

भारतातल्या इंटरनेट सेवांचं स्वरूप नेमकं कसं असेल याबद्दल भार्गव यांनी स्पष्टता केलीय. लिंक्डइनच्या पोस्टमधे त्यांनी भारतातल्या इंटरनेट सेवेसाठी स्थानिक युनिट महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. स्टारलिंकला भारतातल्या ग्रामीण भागात ऑनलाईन इंटरनेट सेवा पोचवायची आहे. त्यासाठी भारतात २ लाख केंद्र उभी करण्याची योजना असल्याचं भार्गव यांनी म्हटलंय.

हेही वाचा: २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी

असं असेल स्टारलिंकचं काम

भारतातल्या ग्रामीण भागात इंटरनेट सेवा देणं अॅलन मस्क यांचं उद्दिष्ट आहे. संजय भार्गव ऑक्टोबरला जॉईन झाल्यावर मस्क यांनी भारतातल्या स्टारलिंकसाठी अनेक अधिकाऱ्यांची निवड केलीय. यात महत्वाचं नाव आहे ते पर्नील उर्ध्वरेशे यांचं. त्यांनी याआधी भारत आणि अमेरिकेत सार्वजनिक धोरण विषयावर काम केलंय. त्यांच्याकडे 'मार्केट एक्सेस डायरेक्टर' म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.

अनेक कंपन्या दूरसंचार सेवा क्षेत्रात उभ्या राहतायत. दूरसंचार सेवा हे बिजनेस मॉडेल आहे. त्यामुळेच त्यात पाय रोवण्याचा प्रयत्न स्टारलिंक करतंय. स्टारलिंक ज्या सेवा देईल त्यात नेमकं काय असेल तर सॅटेलाइट ब्रँडबँड इंटरनेट सेवा, सोबत मल्टिमीडिया कम्युनिकेशन ज्यात मजकूर, ग्राफिक, ऑडियो, वीडियो, कॉन्टॅक्ट स्टोरेज अशा काही सेवा असतील. सॅटेलाइट फोनसारख्या इतर अनेक क्षेत्रांमधेही कंपनी भारतात काम उभं करेल.

भार्गव यांनी लिंक्डइनच्या पोस्टमधे कंपनी काय करणार आहे त्यासंबंधीचं प्रेझेंटेशन एका वीडियोतून दिलंय. तसंच आपली धोरणं आणि स्ट्रॅटेजी नेमकी कशी असेल हेसुद्धा सांगितलंय. स्टारलिंक कंपनीच्या इंटरनेट सेवा भारताच्या ग्रामीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या असतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी एक प्लॅनही तयार करण्यात आलाय.

भारतातल्या ग्रामीण भागात इंटरनेट

स्टारलिंकला जेव्हा स्वतःच्या सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळेल तेव्हा अनेक पातळ्यांवर काम केलं जाईल. त्याचा भाग म्हणून कंपनी इतर देशांमधे स्वतःचं एक किट तयार करून देते. या किटमधे वायफाय राऊटर, केबल, ट्रायपॉड, पावर सप्लाय अशा गोष्टी असतात. असंच किट सुरवातीला दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या १०० ग्रामीण शाळांमधे उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं.

त्यानंतर जिथं इंटरनेट सेवा पोचलेल्या नाहीत अशा १२ ग्रामीण जिल्ह्यांकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. पुढच्या डिसेंबरपर्यंत देशभरात स्टारलिंकची अशी २ लाख इंटरनेट उपकरणं असतील. त्यातली ८० टक्के उपकरणं भारतातल्या ग्रामीण भागात कंपनीकडून उपलब्ध करून दिली जातील. कंपनीला त्याच्या ५ हजार ऑर्डर मिळाल्या असल्याचं कंपनीचे डायरेक्टर भार्गव यांनी लिंक्डइनवर म्हटलंय.

सध्याच्या घडीला स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा ही ऑस्ट्रेलिया, चिली, इंग्लंड, अमेरिकेसारख्या एकूण १४ देशांमधे असल्याचं डिडब्ल्यू वेबसाईटच्या एका लेखात वाचायला मिळतं. अर्थात सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पोचवत असताना कंपनीला इतर अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. आजही भारतातल्या ग्रामीण भागात इंटरनेटच्या पुरेशा सुविधा पोचलेल्या नाहीत अशावेळी मस्क यांच्या स्टारलिंकची उडी नवा आशेचा किरण ठरतेय का पहावं लागेल.

हेही वाचा: 

'बर्ड फ्लू'से डरने का नय!

ब्रेन ड्रेनपेक्षा विघातक आहे वेल्थ ड्रेन!

पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?

शपथ घेतल्यानंतरही सोपा नसेल जो बायडन यांचा प्रवास

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ