इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
कचरा म्हटलं की, कित्ती काय आपल्या डोळ्यासमोर येतं. घरापासून अंगण, बाजारापर्यंत कित्येक ठिकाणं. कचऱ्याचे प्रकारही किती? त्यातही कितीक व्हरायटी असतात नाही? एक ना अनेक. त्यामुळेच कचरा आपल्या जगण्याचा भागच झालाय असं म्हटलं तर? चुकीचं नाहीच काही त्यात.
कचरा नेणाऱ्या गाड्या हल्ली अनेक ठिकाणी घरोघरी येतात. कचरेवाले आलेत असं आपण किती सहज म्हणून जातो? थेट आपल्या घरपोच येणाऱ्या सरकारलाही आपली कित्ती काळजीय. पण हा कचरा नेमका जातो कुठं? त्याच्या विल्हेवाटीचं काय? असे कित्येक प्रश्न मागे असतात ते असतातच!
कचऱ्यातून खत निर्मितीसारख्या प्रक्रिया आपण ऐकून आहोतच. अशातच आता इंडोनेशियातल्या एका व्यक्तीला कचऱ्यातून रोबोट तयार करायची भन्नाट कल्पना सुचलीय. कोरोना पेशंट म्हटलं की, संसर्गाचा धोका होईल म्हणून त्याच्याशी चार हात लांब राहणं माणसं पसंत करतायत. अशात इंडोनेशियाच्या एका गावात कचऱ्यापासून बनलेला रोबोट कोरोना पेशंटच्या मदतीलाही धावून जातोय.
इंडोनेशियात सुराबाया नावाचं एक शहर आहे. सध्या या शहराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या विळख्यात घेतलंय. याच सुराबायामधे टेम्बोक नावाचं गाव आहे. हे गाव तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या रचनात्मक प्रयोगांसाठी म्हणून ओळखलं जातं. सध्या एका रोबोटमुळे हे गाव चर्चेत आलंय.
याच गावातल्या असियांतो या ५३ वर्षांच्या व्यक्तीने आपल्या टीमच्या मदतीने रोबोट बनवलाय. त्यासाठी त्यांनी घरातलं टाकाऊ सामान, जुन्या टीवीतले मॉनिटर अशा वस्तूंचा वापर केलाय. या रोबोटचं बारसं करून त्यांनी त्याला 'डेल्टा रेबोट' असं नावंही दिलंय.
सध्या टेम्बोकमधल्या अनेक गल्ल्यांमधे कोरोनामुळे लोक घरीच विलगीकरणात आहेत. रोबोट आपण स्पीकरने त्यांच्यापर्यंत जेवण आल्याचा मॅसेज पोचवतो. या डेल्टा रोबोटचं डोकं घरच्या कुकरनं बनवलंय. त्यात एक बॅटरी बसवण्यात आलीय. ही बॅटरी १२ तास चालते. रोबोटच्या हालचालींसाठी म्हणून यात रिमोटचा वापर करण्यात आलाय.
हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
इंडोनेशिया सध्या कोरोना वायरसचं आशियातलं नवं केंद्र बनलंय. या देशातल्या कोरोना पेशंटचा आकडा ३६ लाखाच्या पार गेलाय. तर मृत्यूचा आकडाही १ लाखाच्या पलीकडे गेलाय. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणांवरचा ताण प्रचंड आहे.
जपानसारख्या देशांमधे रोबोटचा वापर केला जातोय. सध्याच्या साथरोगाच्या काळात हे रोबोट मदतीसाठी म्हणून वरदान ठरतायत. ते बनवायचे तर त्यासाठी तंत्रज्ञान आणि खर्चिक कामही आहे. अशावेळी इंडोनेशियातल्या एका गावात टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला हा रोबोट फार महत्वाचाय.
सध्या जग कोरोनाच्या कात्रीत असताना असे यंत्र मानव माणसाच्या दिमतीला येणं, त्यांचा वापरही एकप्रकारे आशेचा किरण म्हणायला हवाय. त्यामुळेच मनोरंजनासाठी म्हणून रोबोट तयार करताना त्याचा विधायक कामासाठीही वापर होऊ शकतो.
इंडोनेशियातल्या असियांतो व्यक्तीला या रोबोटची कल्पना सुचलीय. पण त्यामागची त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. कोरोनाच्या वाढत्या पेशंटचा विचार करून आपल्या सार्वजनिक सेवांमधे हा रोबोट मदत करू शकेल असं त्यांना वाटतंय. यासंबंधी माहिती देणारी रॉयटर या जगप्रसिद्ध न्यूज एजन्सीला त्यांची एक छोटेखानी प्रतिक्रिया आलीय.
हा रोबोट अगदीच सर्वसामान्य असल्याचं असियांतो यांचं म्हणणं आहे. तसंच तो घरगुती टाकाऊ वस्तूंपासून बनवल्यामुळे त्यांचाही योग्य ठिकाणी पुनर्वापर होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपल्याकडे कोरोना झाल्यावर घर, ठिकाण सॅनिटाईज केलं जातं. औषधं फवारणी केली जाते. तिथंही हा रोबोट काम करेल. असं त्यांनी रॉयटरला सांगितलंय.
हेही वाचा:
कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो