कमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही!

१२ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कमला हॅरिसप्रमाणे भारतीय वंशाची अनेक लोक वेगवेगळ्या देशाच्या राजकारणात झळकताना दिसातत. त्या देशात स्थलांतरिताचा दर्जा असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे. अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या विजयाचा भारतीयांनी आनंद साजरा करणं हा ढोंगीपणाच!

दिवाळीमुळे भारतात उत्साहाचं वातावरण आहेच. त्यात सेलिब्रेशन करायला नवनवी कारणंही आपल्याला मिळतायत. त्यातलंच एक म्हणजे तिकडे दूर १३ हजार किमी लांब झालेल्या भारतीय वंशाचं कुणीतरी जिंकल्याचं. बिहार निवडणुकीचा, त्यातल्या भाजपच्या विजयाचा जितका बोलबाला झाला नसेल तितका बोलबाला भारतात कमला हॅरिस यांच्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी निवडून य़ेण्याचा झालाय.

कमला हॅरिस यांच्या दक्षिण भारतातल्या गावात त्यांच्या जल्लोष साजरा केला जातोय. देशभर दिवाळीसाठी राखून ठेवलेले फटाके हॅरिस यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वापरले गेले. पण खरंतर, हॅरिस यांच्या विजयासाठी आपण भारतीयांनी आनंद करण्याचं काहीही कारण नाही. कारण, हॅरिस यांच्यासोबत ज्या ज्या गोष्टींचा विजय झालाय त्या सगळ्या गोष्टी भारताने कधीही केलेल्या नाहीत. 

जगभरात आहे भारताचं योगदान

अमेरिकेप्रमाणे इतर अनेक देशात भारतीय वंशाचे लोक कार्यरत आहेत. कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळात ४ भारतीय वंशाचे लोक आहोत. त्यातले तीन शीख धर्माचे आणि एक महिला आहे. इंग्लडमधेही ऋषी सुनक, प्रीती पटेल आणि अलोक शर्मा महत्त्वाची पदं सांभाळतायत. या सगळ्यांबद्दल आपल्याला खूप अभिमान वाटतो. पाश्चात्य देशाच्या राजकारणातलं भारताचं योगदान असं याकडे पाहिलं जातंय.

भारतीय वंशाचे हे नेते म्हणजे भारत सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेल्यांची पहिली किंवा दुसरी पिढी. कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन भारतात ग्रॅज्युएशन पूर्ण करून वयाच्या १९ व्या वर्षी अमेरिकेत गेल्या. पीएचडीसाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी ऍडमिशन घेतली. पीएचडी पूर्ण करून कॅन्सर स्पेशालिस्ट झाल्या. तिथेच त्यांची भेट कमला यांच्या वडीलांशी जमैकाच्या डोनाल्ड हॅरिस यांच्याशी झाली. दोघांचं प्रेम जमलं आणि लग्नानंतर कमला आणि माया या दोन मुलींना त्यांनी जन्म दिला.

हेही वाचा : 'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

विजयाचा आनंद म्हणजे मोठा विरोधाभास

श्यामला गोपालन आणि डोनाल्ड हॅरिस हे दोघे आणि म्हणूनच त्यांच्या मुलीही अमेरिकेत स्थलांतरित, अल्पसंख्यांक म्हणून ओळखल्या जातात. फक्त अमेरिकेतच नाही तर कॅनडा, इंग्लंड किंवा इतर कुठल्याही देशात गेलेल्या भारतीय वंशाच्या नेत्याबद्दल हेच पहायला मिळतं. स्थलांतरित असतानाही ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर ही विराजमान आहेत. ही गोष्ट भारताने त्या देशात दिलेल्या योगदानाची नाही; तर त्या देशाचं राजकारण किती वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशकतेचं उदाहरण आहे.

अशी सर्वसमावेशकता भारताने कधीही दाखवलेली नाही. इटलीतून आलेल्या सोनिया गांधींना परदेशी म्हणून आपण स्वीकारलं नाहीच. पण ज्यांच्या गेल्या दहा बारा पिढ्या भारतात वाढलेल्या आहेत त्या सगळ्यांच्याच नागरिकत्वावर आपण आता शंका घेतोय. भूतकाळात कुणी आपल्याला त्रास दिला, कुणाच्या पूर्वजांनी काय केलं त्याचा सूड घेण्याची भाषा भारतात बोलली जातेय. त्यामुळेच अमेरिकेच्या राजकारणात स्थलांतरितांना, अल्पसंख्यांकांना भविष्य आहे, हे सांगणाऱ्या कमला हॅरिस यांचा विजयाचा भारतीयांनी आनंद करणं यापेक्षा जास्त ढोंगीपणा कोणता?

त्या अल्पसंख्यांकाचं प्रतिक आहेत

हा ढोगींपणा करणाऱ्या लोकांनी कमला आणि बायडन यांच्या भाषणं नीट ऐकलेली दिसत नाहीत. सगळ्यांना सोबत घेऊन, अल्पसंख्यांक वर्णभेदाच्या विरोधाताली आमची लढाई असेल असं हे दोघे सांगत होते. हॅरिसही स्वतःला भारतीय म्हणवून घेण्याऐवजी कृष्णवर्णीय म्हणवून घेण्याला जास्त प्राधान्य देत होत्या. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय महिला सिनेटऐवजी दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला सिनेट ही त्यांची ओळख तिथल्या मीडियानं उचललेली दिसत होती.

त्यामुळेच अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांनी निवडणुकीत ज्यो-कमला या जोडीला मतदान केलं. अल्पसंख्यांकांच्या मतामुळे ही जोडी निव़डून आली. म्हणूनही भारताने त्यांच्या विजयाचा आनंद मानायची गरज नाही.

भारतातल्या अल्पसंख्यांकांना अधिकाधीक असुरक्षित वाटू लागल्याचं अनेक आकडेवारीतून सिद्ध होतंय. देशातल्या सगळ्या वाईट गोष्टींसाठी या अल्पसंख्यांकांना धारेवर धरलं जातंय. नुकताच सुप्रीम कोर्टानेही याचा निर्वाळा दिलाय. कोरोना प्रकरणात तबलिघी मुस्लिमांना बळीचा बकरा केलं गेलं हे सुप्रीम कोर्टाचं विधान होतं. मग अल्पसंख्यांक कमलांसाठी भारतीय समाज कशासाठी उभा राहतोय?

हेही वाचा : बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?

हॅरिस यांच्या धर्मांचं काय?

कमला हॅरिस ७ वर्षांच्या असताना त्यांच्या आई वडलांचा घटस्फोट झाला. भारतीय वंशाच्या त्यांच्या आईनं दोन मुलींना एकटीनं वाढवलं. नव्या देशात, नव्या लोकांमधे हे करणं सोपं नव्हतं. त्यामुळेच की काय आपल्या वडलांकडच्या परंपरेपेक्षा हॅरिस भारतीय, हिंदू परंपरेशी जास्त जोडल्या गेल्या. देवळात जात असल्याचं त्या सांगतात. पण अनेकदा काळ्या लोकांच्या नॅशनल बाप्तिझ कन्वेशनलाही त्यांनी हजेरी लावल्याचं सांगितलं जातं.

हॅरिस यांचा स्वतःचाही बाप्तिझ्मा झालाय. सॅन फ्रान्सिस्कोच्या चर्चची मेंबरशीपही त्यांच्याकडे आहे. २०१४ मधे त्यांनी डॉगल्स एमहॉफ या ज्यू माणसाशी लग्न केलं. त्याच्या दोन मुलींच्या त्या सावत्र आई आहेत. तोपर्यंत म्हणजे जवळपास वयाची ५० वर्ष त्यांनी कुणाशीही लग्न केलं नव्हतं.

भारतात अशा स्त्रीया नेत्या म्हणून अपवादानेच आहेत. मायावती, ममता बॅनर्जी यांनी खंबीरपणे अनेक वर्ष त्यांच्या त्यांच्या राज्यांचं नेतृत्व केलंय. पण भारतात अजूनही बहुतांश ठिकाणी लग्न न झालेल्या स्त्रीला काहीही मान दिला जात नाही. सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. इतकंच काय, तिला निवडणुकीतून खाली पाडण्यासाठी तिच्या खासगी आयुष्यही चव्हाट्यावर आणलं जातं.

हॅरिस भारतात असत्या तर?

अशावेळी हॅरिस भारतात असल्या तर राजकारण राहू दे पण साध्या गल्ली बोळात तरी त्यांना सन्मानाने जगता आलं असतं? धर्म बदलला म्हणून देशद्रोही ठरवायलाही मागेपुढे पाहिलं गेलं नसतं. त्यांचं लग्नाला म्हणजे लव जिहाद, हिंदूं मुलींना, बायकांना फसवून त्यांचं धर्मांतर करण्याची खेळी वगैरे लेबलं लावली गेली असती. लग्न न करणारे किंवा देशासाठी बायकोला सोडून दिलेल्या पुरूषांचा उदोउदो केला जातोय. पण लग्न न करणाऱ्या कमला एक स्त्री असल्यानं त्यांना कुणी साधं उभंही राहू दिलं नसतं.

मग नेमकं कशासाठी भारत त्यांचं अभिनंदन करतोय? नेमकं कशासाठी भारतात त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करतोय? कमला हॅरिस यांच्या अभिनंदनासाठी फटाके फुटतायत. त्याचा आवाज खूप मोठा असला तरी स्वतःचा आवाज स्वतःला ऐकू जाईल इतकी शांतता भारतात अजूनही आहे. या शांततेचा फायदा आपण घ्यायला हवा. निदान स्वतःला ऐकू जातील इतक्या आवाजात प्रश्न विचारायला हवेत.

हेही वाचा : 

थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

बायडन आघाडीवर असतानाही ट्रम्प जिंकू शकतील का अमेरिकेची निवडणूक?