अंधाधूनसारखा सिनेमा चीनमधे अंधाधुंद कमाई का करतो?

२५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय?

अंधाधून या हिंदी सिनेमानं चीनमधे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केलाय. थोडं थोडकं नाही तर तब्बल ३०० कोटी एवढं कलेक्शन आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या या सिनेमानं भारतातही चांगला गल्ला कमावला. चांगली गोष्ट आणि जबरदस्त दिग्दर्शन या जोरावर कोणताही मोठा स्टार नसताना अंधाधूनचा हा रेकॉर्ड तर ट्रेड अनॅलिस्टला डोकं खाजवायला लावणारा आहे. खास करुन चीन मधलं रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन विचार करायला लावणारं आहे. 

अंधाधून ही अगदी साधी सोपी मर्डर मिस्ट्री आहे? पण त्याचं सादरीकरण अचाट आहे. तर्क्य अतर्क्य गोष्टी इतक्या पटापट घडतात की प्रेक्षक त्यात गुंतत जातो. फ्रँक काफ्काच्या कादंबरीत पानोपानी उत्कंठा असते तसंच थ्रील अंधाधूनच्या घट्ट मांडणीत आहे. यामुळेच फक्त भारतीयच नाही तर चीनच्या प्रेक्षकांनी त्याला पसंतीची दाद दिली. 

हेही वाचा: माणसात असलेला काला बंदर कसा काढता येईल?

चीनला बॉलीवूड का आवडू लागलंय?

इथवर सर्व ठिक आहे पण चीनमधे सध्या भारतीय सिनेमे जो काय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतायत त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. थ्री इडियट, पीके नंतर बजरंगी भाईजान, बाहुबली, दंगल, सिक्रेट सुपरस्टार आणि आता अंधाधून यांनी चीनच्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. गेल्या ७-८ वर्षात असं काय झालं की चीनी प्रेक्षकांना भारतीय सिमेमाचं याड लागलं. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सध्या अनेक हिंदी सिनेमाची भारतापेक्षा जास्त कमाई चीनमधे होतेय. 

अहमदनगरचे दिलीप गिरीधर चौधरी गेली अनेक वर्षे चीनमधे राहतायत. ते तिथले टीवी सेलिब्रेटी आहेत. तिथल्या सिनेमा क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांच्याकडूनच भारतीय सिनेमांच्या रेकॉर्ड कमाईचं रहस्य जाणून घेता आलं.

हेही वाचा: लॅक्मेचा फॅशन वीक किती दिवस बघायचा, आता आपणही उतरलं पाहिजे

दिलीप चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारतातल्या सिनेमांच्या कथा थेट काळजाला हात घालतात. त्यांची पटकथा फारच उत्तम असते. चीनमधे गेली काही वर्षे त्याच त्याच पध्दतीचे सिनेमे बनतायत. त्यामुळं भारतीय सिनेमीची मांडणी इथल्या लोकांना आवडतेय. आधी फक्त आमिर खानचे सिनेमे चालले, त्यानंतर सलमानचा बजरंगी भाईजान यामुळे इथं खान ट्रेन्ड चालतोय की काय अशी भीती होती. पण आधी बाहुबली आणि अंधाधूनच्या यशानं हा समज खोटा ठरवला. इथे भारतीय सिनेमांच्या कथांची मागणी वाढलीय.?’

चीनमधला प्रेक्षकांचा पॅटर्न भारतापेक्षा वेगळा

भारतात आवर्जून थिएटरमधे जावून सिनेमा बघणारा प्रेक्षक १६ ते २५ वयोगटातले आहेत. २५ वयोगटापुढचा प्रेक्षक फॅमिली ऑडियन्स विभागात येतो. या वयोगटातल्या प्रेक्षकांची संख्या बऱ्यापैकी आहे. यातून मल्टीप्लेक्सचं एक नवीन कल्चर सुरू झालंय. ते वाढतंय आणि सध्या भारतात मल्टीप्लेक्सची संख्या ९ हजार ६०० पेक्षाही जास्त आहे. 

चीनमधे प्रेक्षकांच्या बाबतीत थोडी वेगळी गणितं आहेत. इथं थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहणारे २० ते ६० वयोगटात मोडतात. कुटुंबातल्या सदस्यांची संख्या तीनपर्यंत मर्यादित असल्यानं तिथं चित्रपट पाहणं हा कौटुंबिक विषय नसून तो वैयक्तिक आहे. त्यामुळं तिथल्या ६ हजारहून जास्त मल्टीप्लेक्समधे प्रेक्षकांची गर्दी असते. त्यात सहाजिकच तरुणांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा: सेन्सॉर नावाचं मांजर आपल्या आडवं का येतं?

कथा आवडली की सिनेमा हिट होणारच

भारतातले सिनेमे कथेसाठी पाहिले जातात. चीनमधे एकाच पठडीतले सिनेमे बनतायत किंवा मग तंत्रज्ञानाचा भडीमार असेलेले सिनेमे येतात. याचा इथल्या प्रेक्षकांना वीट आलाय. यामुळं भारतीय सिनेमांतली गोष्ट आणि सादरीकरण त्यांना आवडतंय. बरं हे कुठल्या एका अभिनेत्याच्या क्रेझशी संबंधित नाही. कथा चांगली असेल तर चीनमधले प्रेक्षक या सिनेमाला डोक्यावर घेतातच. यात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. बरं यातही मिथकं आणि थोडीफार चौकट तोडणारा सिनेमा चीन मधल्या प्रेक्षकांना आवडतोय.

चीनमधले लोक कामसू आहेत. त्यांच्या कामाचं चक्र सुरुच असतं. त्यातूनही सिनेमा पाहण्यासाठी वेळ काढतात हे विशेष. अशावेळी हलका फुलका इमोशनल ड्रामा त्यांना आवडतो. आत्तापर्यंत चीनमधे जे सिनेमे चाललेत यात मनोरंजन हाच एक मोठा भाग होता. यातही थ्री इडियट, दंगल, सिक्रेट सुपरस्टार सारखे हलके फुलके पण मोटीवेट करणारे सिनेमे त्यांना आवडतात. 

हेही वाचा: रजनीकांतचं पॉलिटिक्स सिनेमातून बोलतंय

भारत आणि चीन एकत्र सिनेमा बनवणार?

नुकताच ९वा बिजींग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल १३ ते २० एप्रिल दरम्यान पार पडला. याची सांगता शाहरूख खानच्या झीरो या सिनेमाने झाली. शिवाय २०१८च्या भयानकम या मल्याळी सिमेमाला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला. यावेळी किंग खान शाहरुख खान आणि बजरंगी भाईजानचा दिग्दर्शक कबीर खान भारत चीनमधल्या सिनेमा क्षेत्राच्या एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चेत सहभागी झाले.

शाहरुखच्या मते भारतीय कथा आणि चीनचं तंत्रज्ञान यानं सिनेमात नवा अविष्कार घडू शकतो. शाहरुखचा झीरो थोडा एडिट करुन खास चीनच्या प्रेक्षकांना दाखवण्यात आला. तो ही आता मल्टीप्लेक्समधे गर्दी करतोय. एक गोष्ट मात्र नंक्की सिनेमा नावाची गोष्ट दोन्ही देशांमधे सॉफ्ट पावरचं काम करतंय. त्याचा प्रभाव दोन्ही देशांतल्या संबंधांवर चांगला व्हावा, अशी आशा बाळगायला हरकत नाही. 

हेही वाचा: ट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा