निवडणूक कॅनडाची चर्चा भारतीय कनेक्शनची

२१ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


२० सप्टेंबरला कॅनडामधे मध्यावधी निवडणुका झाल्या. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निवडणुकीचा निर्णय आत्मघातकी ठरेल असं म्हटलं जातंय. या निवडणुकीच्या प्रचार काळात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांची. सगळीकडे त्यांचाच बोलबाला होता. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा जगमीत सिंह किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय.

जगभरातल्या श्रीमंत देशांच्या यादीत कॅनडाचं नाव घेतलं जातं. संसदीय लोकशाही असलेल्या या देशात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी १५ ऑगस्टला मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या. २० सप्टेंबरला तिथं प्रत्यक्ष निवडणूक झाली. लवकरच नवं सरकारही येईल.

याआधी २०१९ ला जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वातल्या लिबरल पार्टीला 'हाऊस ऑफ कॉमन्स'च्या निवडणुकीत म्हणजेच तिथल्या कनिष्ठ सभागृहात १५७ जागा मिळाल्या. तडजोडी झाल्या. आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. कोणताही कायदा पास करायचं म्हटलं की ट्रुडो यांचं टेन्शन वाढत होतं.

प्रत्येकवेळी इतर पक्षांवर अवलंबून राहणं ट्रुडो यांच्यासाठी डोकेदुखीचं ठरायला लागलं. दुसरीकडे कोरोना काळातली परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश ट्रुडो यांना अडचणीत आणत होतं. विरोधी पक्ष त्यांच्यावर टीकेची झोड उठवत होते. त्यामुळे त्यांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली.

एक निवडणूक, १२ मुद्दे

व्हँकूवर सन हा कॅनडातला एक प्रतिष्ठित पेपर आहे. कॅनडातल्या निवडणूक काळातल्या मुद्यांची चर्चा या पेपरमधल्या एका लेखात वाचायला मिळते. त्यांच्या मते १२ महत्वाचे मुद्दे होते जे निवडणूक काळात केंद्रस्थानी ठेवून त्यावर वाद, चर्चा झाली. कॅनडातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. त्यावर मतं मागितली गेली.

ट्रुडो सरकारला देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवरून धारेवर धरलं गेलं. निवडणूक प्रचार काळात पक्षांनी घरांच्या परवडणाऱ्या किंमतीचं आश्वासन दिलं. तसंच रोजगाराचा मुद्दाही चर्चेत राहिल्याचं व्हँकूवर सननं म्हटलंय. त्यासोबतीला आरोग्य, ऊर्जा, हवामान बदल, अर्थव्यवस्था, लहान मुलांचं आरोग्य, स्थलांतर अशा मूलभूत विषयांवर तिथल्या राजकीय पक्षांमधे घमासान चर्चा झाली.

कॅनडात बहुपक्षीय पद्धती असून देशात लिबरल पार्टी ऑफ कॅनडा आणि कंझर्वेटिव पार्टी ऑफ कॅनडा हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यासोबतच ब्लॉक क्यूबोकॉइस, न्यू डेमोक्रॅटिक आणि ग्रीन पार्टी या पक्षांसोबत इतर काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात. निवडणूक प्रचार काळात या पक्षांमधे या १२ मुद्यांवर चर्चा झाल्याचं व्हँकूवर सननं म्हटलंय.

हेही वाचा: क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस

जस्टीन ट्रुडोंच्या विरोधात नाराजी

जस्टीन ट्रुडो २०१५ ला पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ ला पुन्हा सत्तेत आले. या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वातल्या लिबरल पार्टीला ३३८ पैकी १५७ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी ट्रुडो यांनी अल्पमतातलं सरकार बनवलं होतं.

एक दशकभर कॅनडाच्या सत्तेवर राहिलेल्या स्टीफन हार्पर यांना हरवून ट्रुडो २०१५ ला पहिल्यांदा सत्तेत आले. तेव्हा त्यांनी हवामान बदल, महिलांचे अधिकार असे काही मूलभूत मुद्दे मांडले होते. याच मुद्यांमुळे ते लोकप्रिय ठरले. त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. शेवटी त्यांनी सत्तेचा सोपान गाठला.

यावेळी कॅनडात कोरोनाची चौथी लाट आली असताना ट्रुडो यांनी मध्यावधी निवडणुकांची घोषणा करणं हे आत्मघातकी असल्याचं तिथल्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश हेही त्यामागचं एक कारण होतं.  या मुद्यावरून ट्रुडो यांच्याविरोधात लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचं वेगवेगळ्या मत चाचण्यांमधून दिसतंय.

विरोधी पक्षांचा बोलबाला

कंझर्वेटिव हा कॅनडातला उजव्या विचारांचा पक्ष आहे तसंच तिथला प्रमुख विरोधी पक्षही. एरिन ओ टूल हे या पक्षाचे नेते आहेत. निवडणूक निकालानंतर लोकांच्या नाराजीचा फायदा त्यांच्या नेतृत्वातल्या कंझर्वेटिव पक्षाला होतो का ते पहावं लागेल. टूल यांनी निवडणूक प्रचार काळात कोरोनाचं देशव्यापी लसीकरण आणि त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनिवार्य लसीकरणाला विरोध हे मुद्दे प्रकर्षाने मांडलेत.

'ब्लॅंचेट ब्लॉक क्यूबोकॉइस' हा पक्ष कॅनडातला सगळ्यात मोठा भाग असलेल्या क्यूबेक इथंच आपले उमेदवार देत असतो. क्यूबेक हा फ्रेंच भाषिक भाग आहे. त्यामुळे या भाषेच्या आणि भागाच्या अस्मितेचा मुद्दा हा पक्ष मांडत असतो. या पक्षांचं नेतृत्व वेइस फ्रँकोइस करतात. नवीन स्थलांतरित लोकांना कॅनेडियन नागरिकत्व द्यायच्या आधी त्यांना फ्रेंच भाषा येणं अनिवार्य असायला हवं अशी त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे.

एनामी पॉल या महिलेकडे मागच्या वर्षी कॅनडातल्या ग्रीन पक्षाचं नेतृत्व आलं. पॉल या ग्रीन पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय कॅनेडियन आणि ज्यू महिला आहेत. २०१९ ला झालेल्या निवडणुकीत ग्रीन पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. पर्यावरण हा मुद्दा घेऊन ग्रीन पक्ष कॅनडात निवडणूक लढवत असतो.

हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

निवडणुकीचं भारतीय कनेक्शन

कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यातले जवळपास ५ लाख हे शीख समाजाचे नागरिक आहेत. खलिस्तानी समर्थकांबद्दलचं जस्टीन ट्रुडो यांचं मवाळ धोरण अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. २०१८ मधे ट्रुडो भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी इथल्या स्वर्ण मंदिराला भेटही दिली होती. तेव्हा तो त्यांच्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा हा भाग समजला गेला.

कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समधे सध्या ३३८ सदस्य आहेत. त्यापैकी २२ सदस्य हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. तर त्यातले १८ खासदार हे शीख समाजातून येतात. मूळ भारतीय वंशाच्या खासदारांपैकी ३ जणांना कॅनडाच्या कॅबिनेटमधे स्थान मिळालंय.

सध्याच्या निवडणुकीतही या भारतीय-कॅनेडियन उमेदवारांचा बोलबाला दिसून येतोय. सगळ्याच पक्षांनी त्यांना कमी अधिक प्रमाणात उमेदवारी दिलीय. ज्यात लिबरल पक्षाकडून १७, कंझर्वेटिवने १३, न्यू डेमोक्रॅटिक पक्षाकडून १० तर ग्रीन पक्ष आणि पीपल पार्टी ऑफ कॅनडा या पक्षांनी प्रत्येक ५ भारतीय-कॅनेडियन उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय.

भारतीय वंशाचे जगमीत किंगमेकर?

मूळ भारतीय वंशाचे असलेले जगमीत सिंग सध्या कॅनडाच्या संसदेत खासदार आहेत. एका प्रमुख विरोधी पक्षाचा पहिला कृष्णवर्णीय चेहरा म्हणून संसदेत प्रवेश करणारे ते पहिले राजकीय नेता ठरलेत. तिथल्या डाव्या विचारांचा पक्ष असलेल्या 'प्रोग्रेसिव न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे' ते प्रमुख नेते आहेत.

२०१७ मधे पहिल्यांदा या पक्षाची धुरा जगमीत सिंग यांच्या हाती आली. त्याआधी त्यांनी वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून काम केलंय. त्यांचा जन्म कॅनडाच्या ओंटोरियो इथल्या स्कारबोरो भागात झाला. त्यांचे वडील मानसोपचारतज्ञ होते. अनेक मुद्यांवर त्यांनी ट्रुडो सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. त्यामुळेच ते लोकप्रिय नेत्यांच्या यादीत जस्टीन ट्रुडो आणि कंझर्वेटिव पक्षाच्या एरिन ओ टूल यांनाही मागे टाकू शकल्याचं रॉयटर न्यूज एजन्सीच्या एका लेखात म्हटलंय.

सध्या तिथल्या निवडणुकीच्या धामधुमीत जगमीत यांच्या नावाची फार चर्चा होतेय. त्याचं महत्वाचं कारण ठरलंय ते त्यांनी निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर केलेला वापर. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या प्रचाराचे वेगवेगळे वीडियो दिसतात. नव्या माध्यमाशी जोडून घेतल्यामुळे तरुणांमधे ते फार लोकप्रिय ठरलेत. निवडणूक निकालानंतर दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांना त्यांच्यावर अवलंबून रहावं लागेल. ते किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय.

हेही वाचा: 

लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय?

ट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय?

'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?