जागतिक स्पर्धांमधे भारतीय खेळाडू कमी का पडतायत?

०४ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा जागतिक मैदानी स्पर्धा असो, भारतीयांसाठी कोणतंही पदक म्हणजे मृगजळासारखंच असतं. ऑलिम्पिकमधे भालाफेकीतल्या सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या नीरज चोप्राने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेतही इतिहास घडवला. त्याचं सुवर्णपदक हुकलं तरीही, त्याची ही कामगिरी सर्वच भारतीयांसाठी प्रेरणादायक आहे.

अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडाप्रकार मानला जातो. त्यामधे धावण्याच्या वेगवेगळ्या शर्यती, गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक असे फेकीचे क्रीडाप्रकार, उड्यांच्या प्रकारातली लांब उडी, उंच उडी तिहेरी उडी, पोलवॉल्ट अशा स्पर्धा असतात. साहजिकच, खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखवण्याची आणि त्याद्वारे पदके जिंकण्याची हुकमी संधीच असते. ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमधे भारताला नेहमीच पदकांचा दुष्काळ पाहायला मिळालाय.

समाधानकारक कामगिरी

स्वातंत्र्यानंतर भारताला ऑलिम्पिकमधल्या पदकाचं स्वप्न नीरजने साकार केलं. जागतिक मैदानी स्पर्धाही ऑलिम्पिक इतकीच अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मात्र इथंही भारताच्या वाट्याला निराशाच आली आहे. २००३ला अंजू बॉबी जॉर्ज हिने लांब उडीत ब्राँझपदक पटकावलं होतं. त्यानंतर जागतिक मैदानी स्पर्धेचं पदक जिंकण्याची किमया नुकतीच नीरज याने साकार केली.

जागतिक स्पर्धेसाठी भारताने १८ पुरुष खेळाडू आणि चार महिला खेळाडू असं २२ खेळाडूंचं पथक पाठवलं होतं. अर्थात, पदकांसाठी फक्त नीरज हाच एकांडी शिलेदार मानला गेला होता. तरीही नीरज याच्याबरोबरच रोहित यादव, मुरली श्रीशंकर, एल्डॉस पॉल, अविनाश साबळे आणि महिलांमधे अन्नू राणी या खेळाडूंनी अंतिम फेरीत स्थान मिळवत समाधानकारक कामगिरी केली. यापूर्वी २०१५ला भारताचे तीन खेळाडू जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचले होते. त्या तुलनेत ही प्रशंसनीयच कामगिरी आहे.

नीरज चोप्राचा निर्धार

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपाठोपाठ जागतिक स्पर्धेतही भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकण्याची किमया यापूर्वी नॉर्वे देशाचा खेळाडू आंद्रेस थोर्किल्डेसन याने २००९ला साकार केली होती. या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी नीरज साकार करेल, अशी अपेक्षा होती. काही वेळेला इच्छाशक्ती भलेही खूप चांगली असेल; पण अपेक्षेइतकी शंभर टक्के शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती नसेल, तर त्याचा परिणाम कामगिरीवर होतो, हेच यंदा पाहायला मिळालं.

टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी अंतिम फेरीत एकच हुकमी ‘थ्रो’ करून नीरज हा अतिशय निश्चिंत झाला होता. त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर असलेला आत्मविश्वास जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसून आला नाही. जागतिक स्पर्धेनंतर त्याने लगेचच राष्ट्रकुल स्पर्धेतून दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे.

जागतिक स्पर्धेच्याच वेळी तो स्वतःच्या तंदुरुस्तीबाबत साशंक होता. मात्र जागतिक स्पर्धेसारखी महत्त्वाची स्पर्धा सोडून देणं त्याच्यासाठी आणि पर्यायाने देशासाठीही अशक्य होतं. अर्थात पदक मिळण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती, त्यामुळेच आपल्या हाताला आणि खांद्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण भालाफेक करणारच! हाच निर्धार त्याने ठेवला होता. इतरांप्रमाणे त्यालाही प्रतिकूल वार्‍याचा त्रास झाला. अपेक्षेइतकं नव्वद मीटर्स अंतराचं लक्ष्य त्याला साधता आलं नाही.

८८.१३ मीटर्स ही त्याची या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी होती. सुवर्णपदक जिंकणार्‍या ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसन याने तीन वेळा नव्वद मीटर्स पलीकडे भाला टाकला. अतिशय आरामात आणि आत्मविश्वास दाखवत त्याने ही कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याबरोबरच ते राखणं हे जास्त आव्हानात्मक असतं आणि हे आव्हान अँडरसनने लीलया पार केलं.

स्पर्धेत मर्यादित यश

ऑलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं यश केवळ एक-दोन खेळाडूंपुरतंच मर्यादित असतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर एरवी भारतीय खेळाडू इतर आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत भरपूर पदकांची कमाई करत असतात. मात्र ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेच्या वेळी त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो, असाच आजपर्यंत अनुभव पाहावयास मिळाला आहे.

तिहेरी उडीत एल्डॉस पॉल याने अंतिम फेरी गाठली आणि या क्रीडा प्रकारात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. अंतिम फेरीत मात्र अपेक्षेइतकी सर्वोत्तम कामगिरी तो करू शकला नाही आणि नवव्या स्थानावर त्याला समाधान मानावं लागलं. नीरज याच्याबरोबरच रोहित यादव यानेही पहिल्यांदाच भालाफेकीत अंतिम फेरीत स्थान मिळवलं. २१ वर्षीय रोहित याचीही पहिलीच जागतिक स्पर्धा होती, हे लक्षात घेतलं, तर त्याला मिळालेलं दहावं स्थान आगामी कारकिर्दीसाठी प्रेरणादायकच आहे.

या मोसमात सातत्याने नवीन राष्ट्रीय विक्रम करणारा अविनाश साबळे याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. स्टीपलचेसमधे सुरवातीच्या टप्प्यात तो सातत्यपूर्ण धावत होता. नंतर मात्र त्याचा वेग कमी पडला आणि तो अकराव्या स्थानावर फेकला गेला. मुरली श्रीशंकर याने लांब उडीत अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याला सातवं स्थान मिळालं. महिलांमधे अन्नुराणी हिने भालाफेकीत पहिल्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. तिलाही सातव्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं.

सुविधा तरीही इच्छाशक्तीचा अभाव

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अमेरिकन धावपटूंनी पदकांच्या तालिकेत प्रथम क्रमांक घेत निर्विवाद वर्चस्व राखलं. इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडत असतो.

मिल्खा सिंग, गीता झुत्शी, श्रीराम सिंग अशा ज्येष्ठ खेळाडूंच्या काळात सुविधा आणि सवलतींची वानवाच होती. त्यांच्या तुलनेत हल्लीच्या भारतीय धावपटूंच्या पायाशीच सुविधा आणि सवलती लोळण घालत असतात, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. घोड्याला तुम्ही पाण्यापाशी न्याल; पण पाणी प्यायचं की नाही, हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. भारतीय धावपटूंबाबत असाच काहीसा अनुभव येत आहे.

भारतीय खेळाडूंना फिजिओ, मानसिक तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ परदेशी प्रशिक्षकांची मदत, क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ, दरमहा भरपूर आर्थिक शिष्यवृत्ती किंवा नोकरी अशा सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं. अनेक वेळेला आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवर लक्ष केंद्रित करतानाच, या स्पर्धांपलीकडेही काही महत्त्वाच्या स्पर्धा असतात याचा त्यांना विसर पडतो की काय, अशी नेहमीच शंका येते. अशा महत्त्वाच्या स्पर्धांबाबत आपले खेळाडू गांभीर्याने विचार करत नाहीत.

जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचं काय?

भारतीय धावपटूंच्या गेल्या सात-आठ वर्षांमधे शासकीय स्तरावर खेळाडूंसाठी पोषक पावलं उचलली गेली आहेत. संभाव्य ऑलिम्पिकपटूंसाठी दरमहा मोठी रक्कम प्रशिक्षण आणि इतर सुविधांसाठी शासनातर्फे दिली जाते. ‘खेलो इंडिया,’ ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ अशा विविध योजनांद्वारे खेळाडूंच्या नैपुण्यशोध आणि त्याचा विकास यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.

भारतीय अ‍ॅथलेटिक महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे स्वतः माजी ऑलिम्पिकपटू असल्यामुळे त्यांना खेळाडूंची सुखदुःखं अगदी जवळून माहीत असतात. महासंघातर्फे खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्यांनीही अनेक योजना राबवल्या आहेत. नीरज चोप्राचं ऑलिम्पिक सुवर्णपदक ही या योजनांची पावती होती, असंही म्हटलं जातं.

इथिओपिया, जमेका आणि केनिया या देशांमधल्या खेळाडूंची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. साहजिकच, आपण जर जागतिक किंवा ऑलिम्पिकमधे पदक मिळवलं तरच आपल्याला चांगली पारितोषिकं आणि नोकरी मिळू शकते, असं ध्येय डोळ्यासमोर ठेवतच या देशांचे खेळाडू जागतिक स्तरावरच्या स्पर्धा गाजवतात. तशी इच्छाशक्ती किंवा ध्येय भारतीय खेळाडूंनी ठेवलं, तर निश्चितपणे ते जागतिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करू शकतील.

खेळाडूंना ज्या काही सुविधा आणि सवलती मिळत असतात, त्यासाठी होणारा खर्च हा देशातल्या नागरिकांनी दिलेल्या करांच्या उत्पन्नाद्वारेच केला जातो, हे या खेळाडूंनी लक्षात घेतलं पाहिजे. सुविधा आणि सवलती यांची रेलचेल असताना ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधे पदक मिळवणं ही आपली नैतिक जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे; तरच खर्‍या अर्थाने अ‍ॅथलेटिकला जागतिक नकाशावर भारताला चांगलं स्थान मिळू शकेल.