‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ असं आपण नेहमी म्हणत असतो. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारतीय खेळाडूंनी सात मेडलची कमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत मेडलचा दुहेरी आकडा गाठताना ‘हम भी कुछ कम नही’असं दाखवून दिलं.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतल्या नेत्रदीपक यशामुळे भारतात ऑलिम्पिकविषयक सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. आपल्या दिव्यांग खेळाडूंनी यशाचा हाच वारसा पुढे चालवत भारतीय क्रीडा क्षेत्रात आणखीनच चैतन्य निर्माण केलंय. सुदैवाने भारताच्या क्रीडा चाहत्यांना पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेता आला.
दिव्यांग असलेल्या खेळाडूंना काय काय अग्निदिव्यातून जावं लागतं याची कल्पना सर्वांना आलीच असेल. काही खेळाडूंना एक हात नाही, तर काहींना दोन्ही पाय नाहीत, काही खेळाडूंचे कृत्रिम पाय, पूर्ण अंधत्व किंवा अल्पदृष्टी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे दिव्यांग झालेल्या खेळाडूंची कामगिरी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती.
भारतीय खेळाडूंनीही दिव्यांगत्वाच्या यातना सोसताना चेहर्यावर मात्र त्या वेदनांचा कुठेही लवलेश जाणवू दिला नाही. सतत चेहर्यावर आत्मविश्वास, आनंद, देशासाठी खेळण्याची निष्ठा आणि सकारात्मक ऊर्जा याचाच प्रत्यय घडवला आहे.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची पदकांची कमाई यंदा विक्रमी ठरली आहे. सर्वसाधारण खेळाडूंप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहकार्य देताना केंद्र शासनाने आणि काही खासगी प्रायोजकांनी हात राखून ठेवला नाही. केंद्रीय क्रीडा खात्याने तयार केलेल्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम या योजनेतही काही दिव्यांग खेळाडूंना संधी मिळाली होती. गो स्पोर्टस् फाऊंडेशन, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, लक्ष्य फाऊंडेशन आणि इतर काही दानशूर संस्थांनीही दिव्यांग खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केलं होतं.
सर्वसाधारण खेळाडूंप्रमाणेच या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षक, राष्ट्रीय प्रशिक्षक, खासगी प्रशिक्षक, फिजिओ, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ, पूरक व्यायामासाठी आवश्यक साधनं अशा अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. काही खेळाडूंना यापूर्वीच चांगल्या नोकर्या मिळाल्यामुळे त्यांची भविष्याची चिंता मिटली होती. कोरोना काळातही या खेळाडूंसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा देण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसाधारण खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेला जाण्यापूर्वी वैयक्तिकरीत्या भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या, तशाच शुभेच्छा त्यांनी दिव्यांग खेळाडूंनाही दिल्या होत्या. देशाचे पंतप्रधान वैयक्तिकरीत्या आपल्याला भेटून शुभेच्छा देतात तेव्हा आपल्यावर देशाचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी आहे हे ओळखूनच दिव्यांग खेळाडूंनीही सर्वोच्च क्षमतेइतकी कामगिरी केली.
नेमबाजीत अभिनव बिंद्रा याने ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवत आपल्या देशात खर्या अर्थाने नेमबाजीचं युग निर्माण केलं. त्याच्याकडून प्रेरणा घेत राजस्थानची खेळाडू अवनी हिने पॅरालिम्पिकच्या पदार्पणातच दहा मीटर्स एअर रायफलमधे सोनेरी वेध घेत स्वप्नवत कामगिरी केली.
वयाच्या अकराव्या वर्षी अपघातामुळे ती पायात विकलांग झाली. शालेय जीवनात मोठी स्वप्नं पाहात असतानाच असं दुर्दैव तिच्या वाट्याला आलं. त्यामुळे ती दोन वर्ष नैराश्येतून बाहेर पडली नव्हती. अखेर पालकांनी तिला अभिनव बिंद्राचं चरित्र वाचायला दिलं. तिला सुरवातीला तिरंदाजीत करियर करावंस वाटलं. पण आपणही बिंद्राप्रमाणेच गोल्ड मेडलचा वेध घ्यावा, असं स्वप्न पाहात तिने नेमबाजीचं प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली.
महत्त्वाकांक्षेला अफाट कष्टाची जोड देत तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधे चमक दाखवायला सुरवात केली. तिला पालकांनीही सतत मदत केली. स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर तिने महाराष्ट्राच्या नेमबाज सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली. काही महिने ती जयपूरहून पनवेलला आली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकतानाच स्पर्धा विक्रमाची नोंद केली.
ऑलिम्पिक स्पर्धेत सपशेल निराशाजनक कामगिरी करणार्या खेळाडूंनी अवनीपासून स्फूर्ती घेतली पाहिजे. सर्वसाधारण खेळाडूंच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अवनीने पदक नक्कीच घेतलं असतं, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली होती. नेमबाजीत अवनीच्या यशापासून प्रेरणा घेत सिंगराज अधाना याने दहा मीटर्स एयर पिस्तूल प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केली.
हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन
नीरज चोप्राकडून प्रेरणा घेत सुमित अंतीलियाने दिव्यांगांच्या भालाफेकीत सुवर्ण वेध घेताना अतुलनीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी करताना त्याने विश्वविक्रमही नोंदवला. मोटारसायकलच्या अपघातात डावा पाय गमावल्यानंतर त्याची अनेक स्वप्नं धुळीला मिळाली. पण त्याचा मित्र आणि दिव्यांग खेळाडू राजकुमार याने त्याला अॅथलेटिक्समधे भाग घेण्याचा सल्ला दिला.
त्याप्रमाणे त्याने २०१७ ला नितीन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. गेल्या तीन वर्षांत जागतिक स्तरावर सुमितने अनेक वेळा विश्वविक्रमासह भरपूर मेडल मिळवली आहेत. या पदकांच्या शिरपेचात त्याने पॅरालिम्पिक गोल्ड मेडलचा तुरा खोवला आहे.
अॅथलेटिक्समधेच निशांत कुमार याने उंच उडीत रूपेरी कामगिरी केली. आठव्या वर्षी अपघातामुळे त्याला उजवा हात गमवावा लागला. मात्र या परिस्थितीस आत्मविश्वासानं सामोरं जात त्याने शैक्षणिक आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमधे अनेक मेडल मिळाल्यानंतर दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमधे त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती.
जानेवारी महिन्यात कोरोनाच्या आजारामुळे त्याच्या सरावात काही दिवस खंड पडला. शारीरिक तंदुरुस्तीच्याही समस्येला त्याला तोंड द्यावं लागलं. पण कमालीची जिद्द ठेवत त्याने पॅरालिम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवलं आणि देशाची मान उंचावली.
दिव्यांगांच्या इतर गटात मरियप्पन थांगवेलू या खेळाडूचं उंच उडीतलं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. रियो इथल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल पटकावलं होतं. टोकियो इथं मात्र पावसामुळे त्याचे मोजे भिजले आणि अपेक्षेइतकी पकड त्याला घेता आली नाही. अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारात शरद कुमार ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.
दिव्यांगांच्या आणखी एका गटात देवेंद्र झाजरिया या अनुभवी खेळाडूने भालाफेकीत सिल्वर मेडल जिंकलं. यापूर्वी त्याने २००४ आणि २०१६ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं होतं. तो आणि त्याचा सहकारी सुंदरसिंह गुर्जर यांनी ब्राँझ मेडल घेत देशाला आणखी एक मेडल मिळवून दिलं. गतिमंद मुलांच्या विभागात योगेश कथुरिया याने थाळीफेकीत ब्राँझ मेडल पटकावत पॅरालिम्पिक मेडलचं स्वप्न साकारलं.
हेही वाचा: जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
महिलांच्या वीलचेयर गटात भाविनाबेन पटेल हिने टेबल टेनिसमधे सिल्वर मेडल जिंकताना सनसनाटी कामगिरी केली. रियो इथल्या २०१६ ची पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि २०१८ ची जागतिक स्पर्धा या दोन्ही स्पर्धांसाठी तिची निवड झाली होती. मात्र दिव्यांगांच्या संघटनांमधल्या अंतर्गत मतभेदांमुळे तिच्या या संधी हुकल्या होत्या.
यंदा मात्र तिला टोकियो स्पर्धेसाठी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. या प्रवासात तिने रियो गोल्ड मेडल विजेती बोरीस्लाव रँकोविक आणि चीनची मातब्बर खेळाडू झांग मिओ या दोन्ही खेळाडूंवर सनसनाटी विजय नोंदवला.
अंतिम फेरीत तिचा अनुभव कमी पडला. कारण तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. वीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळणं किती अवघड असतं हे तिच्या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहणार्यांच्या लक्षात आलं असेल.
भारताच्या या दिव्यांग खेळाडूंच्या कामगिरीत पॅरालिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचा सिंहाचा वाटा आहे. या संघटनेच्या अध्यक्ष दीपा मलिक या स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्या स्वतः दिव्यांग खेळाडू असून आजपर्यंत पॅरालिम्पिक, जागतिक अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे त्यांनी पदकांची लयलूट केली आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान मिळाले आहेत.
केवळ क्रीडाक्षेत्र नाही तर इतर क्षेत्रातल्या युवा लोकांना प्रेरणा देण्यासाठीही त्यांची व्याख्यानं आयोजित केली जातात. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघटनेच्या सर्वच पदाधिकार्यांनी खेळाडूंचं हित डोळ्यासमोर ठेवत खेळाडूंच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले.
दिव्यांग खेळाडू मिळेल त्या सुविधा आणि सोयींबाबत समाधान व्यक्त करत आपल्या देशाची प्रतिमा कशी उंचावली जाईल हाच ध्यास ठेवत असतात. एरवी आपले सर्वसाधारण खेळाडू किरकोळ सुविधा नाही मिळाल्या तरी तक्रार करत असतात.
प्रशिक्षक आणि संघटनांबरोबरही त्यांचा योग्य रीतीने सुसंवाद नसतो. अशा खेळाडूंनी दिव्यांग खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. अवनी, सुमित, भाविनाबेन या दिव्यांग खेळाडूंना आदर्श मानून सर्वसाधारण खेळाडूंनी एकाग्रतेने स्पर्धेत भाग घेतला तर आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमधे भरघोस मेडल मिळू शकतील.
हेही वाचा:
हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे
नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)