निकी हेली : महासत्तेचं भावी नेतृत्व

०२ मार्च २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


अमेरिकेतल्या आतापर्यंतच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं एकाही महिला नेत्याला पक्षातर्फे नामांकन दिलेलं नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार असतील. हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून २४६ वर्ष झालीत तरीही देशाला आतापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष लाभलेली नाही. आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिस्वातंत्र्याला प्राधान्य देणार्‍या या देशात एकही महिला सर्वोच्च पदाला पोचलेली नाही आहे. पण गेल्या २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊन इतिहास रचला.

आता त्याच्याही पुढे जाऊन अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष देण्याचा विडा उचललाय तो मूळच्या भारतीय अमेरिकन असलेल्या निकी रांधवा-हेली यांनी. अमेरिकेत जन्मलेल्या निकी या शीख असून त्यांचे पालक पंजाबमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेत. भारतीय वंशाच्या महिला जागतिक महासत्तेचं नेतृत्व करण्यासाठी, तिथल्या महिलांना राजकारणात सर्वोच्च पद देण्यासाठी पुढे सरसावल्यात ही गोष्ट भारतासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे.

२०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरत असल्याचं १५ फेब्रुवारीला निकी हेली यांनी जाहीर करून अमेरिकेच्या राजकारणाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. 'मी ना कृष्णवर्णीय होते ना मी श्वेतवर्णीय होते. म्हणूनच मी वेगळी होते. आणि त्यामुळेच मला वेगळ्याच वंशभेदाला शालेय जीवनापासून ते राजकारणात येईपर्यंत तोंड द्यावं लागलं.' त्यामुळेच मी घडल्याचं निकी हेली यांनी आपल्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करताना सांगितलं.

हेही वाचा: ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

माजी बॉसला दिला धक्का

निकी हेली या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार असून साऊथ कॅरोलिना राज्याच्या माजी गवर्नर आणि अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या तत्कालीन राजदूत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीचे खमके उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून आवाहन देणार्‍या त्या पहिल्याच ठरल्या आहेत.

ट्रम्प यांनी नोव्हेंबरमधे आपली उमेदवारी जाहीर केली होती. माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेनसे आणि फ्लोरिडा राज्याचे गवर्नर रॉन दिसांटिझ हे ट्रम्प यांचे अध्यक्षीय पदासाठी पक्षातल्या प्रमुख प्रतिस्पर्धी मानलं जात असताना हेली यांनी मैदानात उतरून आपल्या माजी बॉससह सगळ्यांनाच धक्का दिला. अजून पेनसे आणि दिसांटिझ तसंच पक्षातल्या इतर नेत्यांनी आपली उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही.

५१ वर्षाच्या हेली यांनी 'आता नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. एकविसाव्या  शतकावर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर २० व्या शतकातल्या नेत्यांना निवडून देणं थांबवलं पाहिजे.' असं म्हणत त्यांनी बायडेन आणि ओघाने ट्रम्प यांच्या  वयानुसार वाढणार्‍या सत्तेच्या महत्वाकांक्षेवरच निशाणा साधला.

कुटुंब भारतातून अमेरिकेत

निकी हेली यांचं मूळ नाव निम्रता निकी रांधवा. त्या मूळच्या शीख कुटुंबातल्या असून त्यांचे वडील अजित सिंग रांधवा आणि आई राज रांधवा हे पंजाबच्या अमृतसरमधून अमेरिकेत स्थलांतरित झालं. त्यांचे वडील पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते तर आईने दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती.

वडिलांना कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा तिकडे गेले. नंतर १९६९ मधे अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलिना राज्यातल्या बांबेर्ग या छोटयाशा गावात स्थायिक झाले. तिथंच २० जानेवारी १९७२ला निकी यांचा जन्म झाला. तिथंच त्यांचं शालेय शिक्षण झालं. पुढे क्लेमसन विद्यापीठातून त्यांनी अकाउंटिंगची पदवी घेतली आणि नंतर एका घनकचरा व्यवस्थापन कंपनीमधे काम केलं.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या डिझायनर कपड्यांच्या व्यवसायात मदत केली. १९९६ला त्यांनी मायकेल हेली यांच्यासोबत लग्न केलं आणि त्या निकी रांधवाच्या निकी हेली झाल्या. त्यांनी लग्नानंतर ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. पण त्या आपल्या शीख धर्माचंही पालन करतात.

हेही वाचा: हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

असं मिळालं पहिलं राजकीय यश

लग्न होईपर्यंत त्यांचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नव्हता. विशेष म्हणजे त्यांचे आईवडील आणि सासरपैकी कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास खडतर होता पण त्यांनी तो जिद्दीने पार केला. त्यांनी पहिला सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९९८ला त्या ऑरेन्जबर्ग प्रांताच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालिका आणि पुढे २००४  मधे राष्ट्रीय महिला व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षा झाल्या. त्यासोबतच त्यांनी इतर बर्‍याच संघटनांच्या धुरा सांभाळल्या.

त्याचवर्षी त्यांनी  लोकसभेसाठी साऊथ कॅरोलिनाच्या लेक्सिन्गटन प्रांतातून निवडणूक लढवायची ठरवली. रिपब्लिकन पक्षातले प्रतिस्पर्धी कून, जे गेली अनेक वर्ष त्या प्रांतातून निवडून येत होते त्यांचा अंतिम फेरीमधे पराभव करून त्या पक्षातर्फे उभ्या राहिल्या आणि बिनविरोध निवडून आल्या.

निकी हेली या साऊथ कॅरोलिनाच्या लोकसभेवर निवडून जाणार्‍या पहिल्या भारतीय अमेरिकन व्यक्ती ठरल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. २००६मधे त्या पुन्हा बिनविरोध निवडून आल्या तर २००८ मधे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली.

विरोधाला जुमानलं नाही

डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिटंन यांच्यामुळे आपण प्रभावित झाल्याचं आणि एकामागून एक निवडणूक लढवत गेल्याचं हेली सांगतात. २००९ मधे त्यांनी पक्षातर्फे गवर्नर पदासाठी उभं रहात असल्याचं स्पष्ट केलं. त्यावेळी शिकागो इथल्या व्यावसायिक आणि रिपब्लिकन हिंदू युतीचे संस्थापक शालभ शाली कुमार यांनी हेली यांना  निधी पुरवला.

पक्षातर्फे नामांकन मिळवत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कसलेल्या उमेदवाराचा पराभव करत राज्याच्या ११६व्या गवर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्या साऊथ कॅरोलिना राज्याच्या पहिल्या महिला गवर्नर तसंच भारतीय अमेरिकन वंशाच्या दुसर्‍या गवर्नर ठरल्या. इतकंच नाही तर वयाच्या केवळ ३८व्या वर्षी पदभार सांभाळून त्यावर्षीच्या देशातल्या सर्वात कमी वयाच्या गवर्नर ठरल्या.

२०१४ला त्या पुन्हा गवर्नर म्हणून निवडून आल्या. त्यावेळी साऊथ कॅरोलिना राज्याच्या चार्ल्सटन इथं आफ्रिकन चर्चवर एका श्वेतवर्णीय माथेफिरूनं वर्णभेदाच्या तिरस्कारातून बेछूट गोळीबार केला. त्यात नऊ लोक मारले गेले. श्वेतवर्णीय वर्चस्वाचा प्रतिक असलेला झेंडा त्यावेळी त्याने धरला होता. या घटनेनंतर निकी हेली यांनी राज्याच्या राजधानीतून तो झेंडा काढायला लावला. त्यावेळी त्यांना खूप विरोध झाला पण त्यांनी कुणाला जुमानलं नाही.

हेही वाचा: ट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील?

ट्रम्प काळात अमेरिकेच्या राजदूत

नोव्हेंबर २०१६ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमेरिकन राजदूत म्हणून निकी हेली यांचा विचार करत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार त्यांनी जानेवारी २०१७ला अमेरिकेच्या राज्यसभेकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला. ९४-४ एवढ्या बहुमताने निकी यांची निवड करण्यात आली आणि अमेरिकेच्या २९व्या राजदूत म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

अमेरिकेच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोचणार्‍या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन व्यक्ती होण्याचा मानही हेली यांनीच पटकावला. या नियुक्तीमुळे परराष्ट्र धोरणाचा अनुभव त्यांच्या राजकीय खात्यात जमा झाला. त्यावेळी इराणवर टीका करत त्यांनी ट्रम्प सरकारचा इस्राईलधार्जिणी दृष्टीकोन आणखी ठळक केला.

ट्रम्प यांच्यासोबतचे राजकीय संबंध

पहिल्यापासून ट्रम्प यांच्यासोबतचे हेली यांचे राजकीय संबंध हे नरम गरम राहिले आहेत. ट्रम्प यांनी जेव्हा जेव्हा महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे तेव्हा त्यांचा निषेध पहिला हेली यांनी केला. त्यांनी जेव्हा २०१६ मधे पहिल्यांदा अध्यक्षीय उमेदवारी जाहीर केली तेव्हा हेली यांनी त्यांना पक्षांतर्गत फेरीत विरोध दर्शवला होता.

'ट्रम्प हे कु क्लूक्स क्लॅन या श्वेतवर्णीय वर्चस्ववादी संघटनेचा पाठिंबा घेत आहेत. असा राष्ट्राध्यक्ष आमच्या देशाला नको आहे, आमच्या देशात असले खपवून घेतलं जाणार नाही' अशा कडक शब्दात हेली यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी फ्लोरिडा राज्याचे सिनेटर मार्क रुबिओ यांना आपलं समर्थन दिलं होतं. पण शेवटी जेव्हा अंतिम फेरीत पक्षाचं बहुमत ट्रम्प यांच्याकडे झुकलं तेव्हा हेली यांनी त्यांना पाठिंबा दिला.

पुढे ट्रम्प यांनी हेली यांना अमेरिकेचं राजदूत म्हणून नियुक्त केल्यानंतर दोघांमधले राजकीय संबंध मैत्रीपूर्ण झाले. पण  २०२०ची अध्यक्षीय निवडणूक हरल्यावर ट्रम्प यांनी जो काही कांगावा केला त्यासाठी हेली यांनी पुन्हा त्यांच्यावर  हल्लाबोल केला. मात्र ट्रम्प यांच्यावर जेव्हा महाभियोगाचा खटला चालवण्यात आला तेव्हा हेली यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केलं नाही.

२०२४ मधे ट्रम्प पुन्हा जर अध्यक्षीय निवडणुकीसाठी उभारले तर आपण मधे येणार नाही असं हेली यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आता जेव्हा पक्षातला आपला पहिलाच प्रतिस्पर्धी म्हणून हेली यांनी उमेदवारी जाहीर केली आहे हे कळल्यावर ट्रम्प यांनी, 'लोक आपले शब्द आपल्या सोयीनुसार फिरवतात' असा टोमणा मारला.

हेही वाचा: आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

रिपब्लिकन पक्षातल्या महिला नेत्या

निकी हेली यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष आपल्या पक्षातल्या महिला नेत्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांना कशाप्रकारे आणि किती संधी देतो हे स्पष्ट होईल. आतापर्यंत पक्षातल्या एकाही महिला नेत्याला अध्यक्षीय निवडणुकीत पक्षातर्फे नामांकन मिळालेलं नाही. इतकंच काय तर राज्यस्तरावरची प्राथमिक फेरीही जिंकता आलेली नाही.

निकी हेली या २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या पहिल्या महिला प्रमुख उमेदवार आणि या शतकातल्या रिपब्लिकन पक्षातल्या पाचव्या महिला उमेदवार आहेत. यावरून हा पक्ष महिलांना नेतृत्व देण्यात किती उदासीन आहे हे दिसून येतं. त्या पार्श्वभूमीवर हेली यांचं थेट अध्यक्षीय शर्यतीत उतरून राजकारणातल्या पुरुषसत्ताक वर्चस्वाला आव्हान देणं आशादायी मानलं जातंय. 'देशाला नवीन दिशा द्यायची असेल तर कणखर महिला नेतृत्वाची गरज असल्याचं', हेली म्हणतात.

हेली यांच्यासमोरची आव्हानं

जागतिक महासत्तेच्या अध्यक्षीय पदाची निवडणूक लढवणं हे खूप कठीण काम आहे. हेली यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते ट्रम्प यांचं. सध्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या पोलनुसार संभाव्य उमेदवार म्हणून ट्रम्पच आघाडीवर आहेत.

नुकतंच रॉयटर्स यांच्या पोलनुसार, फक्त चार टक्के नोंदणीकृत रिपब्लिकन्स हेली यांना तर ४३ टक्के ट्रम्प यांना पसंती देतात. याशिवाय २०१८ मधे राजदूत पदाचा राजीनामा दिल्यानंतर निकी हेली यांनी इतर कुठला पदभार स्वीकारला नाही त्यामुळे त्या अलीकडे राजकारणात पूर्ण सक्रिय नव्हत्या असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. याशिवाय या निवडणुकीसाठी त्या निधी कसा उभारणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुसरं महत्वाचं म्हणजे २०२२ मधे भारतीय अमेरिकन मतदारांचा सर्वे घेतला होता त्यामधे ५६ टक्के लोक डेमोक्रॅटिक पक्षाला तर केवळ १५ टक्के रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देतात. यामुळे भारतीय समुदाय कितपत हेली यांना पाठिंबा देऊ शकतील हा एक प्रश्न आहे. पण हेली या एक ही निवडणूक आतापर्यंत हरलेल्या नाहीत.

त्यांचं भक्कम राजकीय कार्य आणि अनुभव, कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगल्भ आत्मविश्वास आणि अश्वेतवर्णीय म्हणून असेलली वेगळी ओळख त्यांना या निवडणुकीत जिंकण्यासाठी पुरेसे आहे. जर हेली या अध्यक्षीयपदाची निवडणूक जिंकल्या तर इतिहास घडेल. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आणि पहिली भारतीय अमेरिकन व्यक्ती म्हणून त्या जागतिक महासत्तेची धुरा सांभाळतील.

हेही वाचा: 

नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी