कॉमनवेल्थमधे भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं कारण ठरलेला लॉन्स बॉल

११ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


बर्मिंगहॅम इथल्या कॉमनवेल्थ गेमची नुकतीच सांगता झाली. भारतीय खेळाडूंनी २२ गोल्ड, १६ सिल्वर, २३ ब्रॉंझवर आपलं नाव कोरत ६१ पदकांची घसघशीत कमाई केलीय. यात सगळ्यात चर्चा झाली ती 'लॉन्स बॉल' या खेळाची. भारताच्या महिला आणि पुरुष गटाने पहिल्यांदाच या खेळात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. लॉन्स बॉलमधल्या तगड्या आणि अनुभवी टीमना त्यांनी अस्मान दाखवलं.

इतर खेळांच्या तुलनेत भारतात क्रिकेटला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. त्यातही पुरुषांचं क्रिकेट सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असतं. अशावेळी इतर खेळांकडे आपण तितकंसं गांभीर्याने पाहत नाही. पण कॉमनवेल्थ स्पर्धेत 'लॉन्स बॉल' या अपरिचित खेळात चार महिला खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे 'लॉन्स बॉल' हा आगळावेगळा आणि सर्वांसाठी अपरिचित असलेला खेळ चर्चेत आला. 'लॉन्स बॉल' हा कॉमनवेल्थमधल्या भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं कारण ठरलाय.

लॉन्स बॉल मैदानी खेळ

लॉन्स बॉलमागे  हा खेळ सध्या युरोपियन देशांमधे फार प्रसिद्ध आहे. पण त्याची सुरवात १३ व्या शतकात इंग्लंडमधे. तसंच एक प्रमुख खेळ म्हणून प्राचीन इजिप्तमधे त्याला मान्यता होती. सध्या मैदानी खेळामधे लॉन्स बॉलची गणना केली जाते. हा गवतावरून चेंडू ढकलण्याचा एक खेळ आहे. १९३०मधे या खेळाचा समावेश कॉमनवेल्थमधे करण्यात आला होता.

लॉन्स बॉल हा एकट्याने, दोघं किंवा तीन ते चार जणांची ग्रुप करूनही खेळता येतो. चार खेळाडू खेळत असतील तर त्यांना फोर्स असं म्हटलं जातं. याची सुरवात टॉस उडवून केली जाते. जी टीम टॉस जिंकलीय त्यांना जॅक बॉल करायची संधी मिळते. जॅक म्हणजे बॉल एका स्थिर असलेल्या बॉलच्या दिशेनं टाकणं. जॅकला टार्गेट असंही म्हटलं जातं. थ्रोईंग बॉल करून जॅकपर्यंत पोचावं लागतं. एका विशिष्ट मैदानात हा खेळ खेळवला जातो. त्याच भागात राहून हा खेळणं अनिवार्य असतं.

तुम्ही एकट्याने खेळत असाल तर चार वेळा संधी दिली जाते. पुरुष आणि महिलांचा खेळ वेगवेगळा असतो. टीमला जॅकच्या जितकं जवळ जाऊ त्या प्रमाणात गुण दिले जातात. जो टार्गेटच्या जवळ पोचेल त्याला विजेता म्हणून घोषित केलं जातं. या खेळात वापरला जाणारा बॉल हा रबरी किंवा लाकडीही असतो. त्याचं वजन हे १.५९ किलोच्या जवळपास असतं. हा बॉल पूर्णपणे गोलाकार नसतो. त्याच्या दोन्ही बाजू बायस आणि नॉन बायस म्हणून ओळखल्या जातात.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

संघर्षातून सोनेरी यश

२ ऑगस्ट हा दिवस 'लॉन्स बॉल' प्रेमींसाठी सुखद धक्का होता. या खेळात आजपर्यंत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा बड्या देशांचं वर्चस्व राहिलंय. त्या वर्चस्वाला टक्कर देत भारताच्या महिला गटाने लॉन्स बॉलमधे गोल्ड मेडल मिळवलं. भारताच्या महिला टीमने यशस्वी लढत देत दक्षिण आफ्रिकेला चितपट केलं. यात भारताच्या महिला खेळाडू लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी टिर्की यांचा समावेश होता.

मोठ्या संघर्षातून या महिला खेळाडू पुढे आल्यात. यातल्या लवली चौबे या सध्या झारखंडच्या पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून काम करतायत. एकेकाळी उंचउडीमधे त्यांनी बाहेरच्या देशांमधे भारताचं प्रतिनिधित्व केलंय. तर रूपा राणी टिर्की यांनीही कब्बडीत यशस्वी कामगिरी केलीय. त्या क्रिकेटही उत्तम खेळतात. सध्या रूपा झारखंडमधे क्रीडा अधिकारी म्हणून काम करतायत. तर नयनमोनी सैकिया पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आसाममधे सेवा बजावतायत.

पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या मैदानी खेळामधे भारताच्या  महिला लॉन्स बॉल टीमने ऐतिहासिक कामगिरी केलीय. त्यांनी संघर्षातून हे सोनेरी यश मिळवलंय. त्यामुळे त्याचं कौतुकही व्हायला हवं. कोणताही खेळ हा विशिष्ट जेंडरचा हा विचार आता आपण सोडून द्यायला हवा. सरकारनंही त्याकडे खेळ म्हणूनच लक्ष देऊन सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायला हवेत.

पुरुष गटाची दमदार एण्ट्री

१९३०ला लॉन्स बॉलचा समावेश कॉमनवेल्थमधे झाला. २०१२ला या खेळात भारताने पहिल्यांदा एण्ट्री केली. ९२ वर्षांचा इतिहास असलेल्या या खेळात भारताने पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळवणं ऐतिहासिक होतं. या खेळात सगळ्यात जास्त मेडल मिळवणारा देश इंग्लंड आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड आणि दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. त्यामुळे एण्ट्री केल्यापासून १२ वर्षानंतर भारताला लॉन्स बॉलमधे मिळणारं मेडल विशेष म्हणायला हवं.

महिला टीमच्या यशानंतर भारताच्या सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार या चार जणांच्या टीमनेही लॉन्स बॉलमधे सिल्वर मेडल मिळवलं. सेमीफायनलला आपण तगड्या आणि अनुभवी अशा इंग्लंडला मात देत फायनलमधे पोचलो होतो. ही लढतही चुरशीची झाली होती. फायनलमधे आपली स्पर्धा आयर्लंडशी होती. आयर्लंडला १९९८ला लॉन्स बॉलमधे गोल्ड मेडल मिळालं होतं. त्यामुळे भारत आणि आयर्लंडमधली लढत उत्सुकता वाढवणारी होती. पण या अंतिम स्पर्धेत भारताला सिल्वरवर समाधान मानावं लागलं.

क्रिकेटमधल्या स्टीव वॉ, मार्क वॉ, भारताच्या महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूंनाही या लॉन्स बॉलनं भुरळ घातलीय. तब्बल १२ वर्षानंतर या खेळात भारताने घवघवीत यश मिळवलंय. हा खेळ आजपर्यंत कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. कॉमनवेल्थमधल्या गोल्ड मेडलनं त्याला सर्वदूर पोचवलंय. त्यामुळे या निमित्ताने अधिक सक्षम खेळाडू उभे करायची जबाबदारी आता सरकारची आहे.

हेही वाचा: 

विराट असा कसा तू वेगळा वेगळा

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील