कांगारुंच्या धूर्त खेळीनं भारताला वन डे सिरीजमधे चितपट केलं

०५ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना नंतर पहिल्यांदाच सिडनीत झालेल्या वनडे सिरीजमधल्या पहिल्या दोन्ही मॅचमधे ऑस्ट्रेलियाकडून भारताला सपशेल पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्ध्यांना हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी या वेळीही तेच केलं. भारताची क्रिकेट टीम आयपीयलमधल्या प्रॅक्टीसवर अवलंबून होती. त्यामुळे टीम तिथं पोचल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे मॅच खिशात घातली.

सध्या क्रिकेट विश्वात कांगारू हे कोल्हा बनून राहिलेत. त्यांनी याची चुणूक नुकतीच भारतीय क्रिकेट टीमला दाखवली. वनडे क्रिकेट प्रकारात बलवान समजली जाणारी भारतीय टीम कांगारूंच्या देशात निस्तेज ठरली. याचं कारण कांगारूंनी वापरलेली धूर्त खेळी. सर्वसाधारण कुठलाही पाहुणा टीम येण्याआधी कांगारूंच्या देशात जे पंडित असतात ते आणि आजी, माजी खेळाडू मत प्रदर्शन करायला खूप आधीपासून सुरवात करतात. तशी यावेळीही त्यांनी केली.

इंग्लंडबरोबर त्यांची सिरीज कोणतीही असो, प्रतिष्ठेची असते. ती परंपराच आहे. अलीकडे भारताविरुद्धही ते आक्रमक बनलेत. त्यामुळे त्यांनी आपले डावपेच आधीच सुरू केले होते. त्याचा भाग म्हणून विराट कोहलीची स्तुती करायला सुरवात केली. हेतू हा या स्तुतीत भारतानं बुडावं आणि बेसावध रहावं. दुसरीकडे ते आपली टीम भारताला सहज हरवेल हेही सांगत राहिले. डिवचून शत्रूला चुका करायला लावायच्या ही त्यांची जुनी नीती.

प्रतिस्पर्धी आधीच हतबल करायची संधी कांगारू नेहमी साधतात. त्यांनी यावेळी तेच केलं. आयपीयलमधल्या सरावावर अवलंबून असलेली भारतीय टीम तिथं गेल्यावर वास्तवात येईपर्यंत कांगारूंनी वनडे खिशात घातली. टीमची निवड भारतासाठी अडचणीचा प्रश्न ठरला.

हेही वाचा : अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

रोहित शर्माची उणीव जाणवली

रोहित शर्मा हा तंदुरुस्त आहे की तसं भासवत आहे हे कोडं टीम पोचली तरी कायम होतं. एकीकडे रोहित दुखापतग्रस्त असूनही आयपीयलशी इमान राखून खेळला. पण तो ऑस्ट्रेलियाला जायला मात्र तंदुरुस्त आहे की नाही याचं खरं उत्तर ना मंडळाकडे होतं ना निवड समितीकडे, ना विराट आणि शास्त्रीकडे. तो नाही स्पष्ट झालं तेव्हा हा खरा टीमसाठी मोठा आघात होता. याचं कारण गेल्या काही वर्षांत वनडे प्रकारात त्याच्याकडे बॅटिंगची धुरा होती. त्याच्यासारखा भक्कम बॅट्समन नसल्यामुळे ऐनवेळी शिखर धवनला साथीदार कोण हे ठरवायची वेळ व्यवस्थापनावर आली.

इथंही कांगारूंची कूटनीती बघा, त्यांचा कॅप्टन फिंच सांगत राहिला, मयांक अगरवालची भारताने निवड करावी. याला काय गरज भारताने कुणाला निवडावं हे सांगायची. पण आपण किती खिलाडू आणि सौम्य आहोत हे दाखवायचा हा प्रयत्न होता. शेवटी मयांकचीच निवड झाली आणि तो फारसं काही करू शकला नाही. भक्कम सलामी शिवाय दोन्ही मॅचमधे पावणेचारशे धावांचा पाठलाग अशक्य होता. तेव्हा रोहितची उणीव हा मुद्दा भारतासाठी महत्त्वाचा ठरला यात शंका नाही. आता या प्रकरणात चूक नेमकी कुणाची हे स्पष्ट व्हायला हवं.

विराटने भानावर यायला हवं

विराट कोहली हा एकंदरीत पिता होण्याच्या मानसिकतेत अधिक गुंतलाय असं आयपीयलपासून वाटतंय. त्याचं क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही. पण एका खाजगी गोष्टीची प्रसिद्धी माध्यमांनी भलतीच उचलून धरली. त्याचे परिणाम त्याच्या खेळात आणि नेतृत्वात दिसलेच. त्याने फिल्डिंगमधे ढिसाळपणा केला आणि बॅटिंगमधे तो नेहमीचा विराट वाटला नाही. नेतृत्वात तर तो बॉलिंगमधे बदल करताना, खेळाडूंमधे जिद्द उत्पन्न करताना दिसला नाही.

जो आक्रमक विराट सर्वांना माहितीय तो दिसला नाही. ‘चालतं सगळं’ अशा तर्‍हेची बेफिकिरी त्याच्यात आल्याचं जाणवतं. त्याने नेहमीच ‘हम बोलेसो कायदा’ असा रवैया ठेवलाय. प्रशिक्षकसुद्धा कोण हवा हे तो ठरवतो. त्यामुळे त्याचा धाक शास्त्रीपासून सर्वांना आहे. पण जोवर तो विजय मिळवून देत होता, तोवर हे खपत होतं आणि मुख्य म्हणजे दुसरे पर्याय नव्हते तेव्हा चालून जात होतं. आता तशी परिस्थिती नाही. रोहित आणि राहुलसारखे पर्याय उपलब्ध झाल्याने त्याने आता भानावर यायला हरकत नाही.

वास्तविक याआधी काही खेळाडूंना बाहेर बराच काळ जावं लागल्यानं झालेल्या मुलाचं तोंड लगेच बघायला मिळालं नव्हतं. पण त्यांनी त्याबाबतच्या भावना खेळात कधीच आणल्या नाहीत. आता तर विराटला खास सुट्टी दिली गेलीय. तो कमी काळ टीम सोबत असेल.

हेही वाचा : आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

फिरकी बॉलर्सनी निराशा केली

अद्याप भारताला क्रमांक चारसाठीचा बॅट्समन मिळालेला नाही. अय्यर हा त्या दृष्टीने तयार केला जातोय. पण तो मुरलेला नाही. राहुल आणि पंड्या यांच्याकडे सातत्य नाही आणि क्रमांक सातपासूनच भारताचं शेपूट सुरू होत असल्यानं धावांचा पाठलाग लगेच खुंटतो असं दिसू लागलंय. बॅटिंग भारताचं खरं सामर्थ्य होतं, ते तेवढं उरलेलं नाही. धोनीची निवृत्ती लक्षात घेऊन बॅटिंगची खोली वाढवण्याची गरज आहे. तसा विचार झालेला दिसत नाही. जडेजा आणि पंड्या हे अस्सल अष्टपैलू मानता येत नाहीत.

पंड्या तर आता  बॅट्समन म्हणूनच प्रसिद्ध आहे. जडेजा, कपिलदेव, घावरी, मनोज प्रभाकर यांच्या तोडीचा नाही. चांगले दोन अष्टपैलू टीमला गरजेचे आहेत. अश्विनला खूप आधी बाहेर काढण्याची घाई विराट आणि त्याच्या होयबांनी केली हे आता जाणवतेय. फिरकी बॉलरनी तर सपशेल निराशा केलीय. सुमारे अडीचशेहून अधिक धावा देत दोन मॅचमधे एक बळी घेणारे फिरकी बॉलर हा टीमसाठी भारी ठरला. चहल हा नेमका कुठल्या कारणाने निवडला जातो ते विराटला माहीत. भारताची वेगवान बॉलिंग धारदार झाल्याचं मध्यंतरी ठासून सांगितलं जायचं. यांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्यात.

तिथल्या बॅटिंगसाठी पूरक टणक खेळपट्ट्यांवर बूमराह सपशेल निष्प्रभ ठरला. खरं तर याआधी न्यूझीलंडमधे सुद्धा तो फारसं काही करू शकला नव्हता. गेल्या काही मॅचमधे सातत्याने प्रतिस्पर्धी सलामीची जोडी शतकी भागीदारी करत आलीय. म्हणजे धावा रोखणंसुद्धा त्याला आणि शम्मीला जमत नाहीये. याकडे म्हणावं तसं कुणी लक्षच दिलं नाही. भुवनेश्वरची उणीव नक्कीच जाणवत आहे. तो तिसरा बॉलर म्हणून महत्वाचा होता. आता सैनीमधे दम वाटत नाही.

कांगारुंची धूर्त खेळी

यजमान असलेल्या कांगारूंचा एकमेव फिरकीबहाद्दर झंपा ६ बळी दोन मॅचमधे घेताना दिसला आणि जोश हजेल वुडने डोकं वापरून उसळते चेंडू मारत यश मिळवलेलं दिसलं. त्यांचा प्रमुख बॉलर स्टार्क मात्र निस्तेज ठरला हे विशेष. त्यांच्याकडून खरी उठावदार कामगिरी बॅट्समनची झाली. त्यासाठी स्टीव स्मिथचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याने भारतीय बॉलर्सवर हुकमत चालवली. लागोपाठ दोन वेगवान शतकं मारून त्याने आपला दर्जा दाखवला आणि टीमला अभेद्य बनवलं.

तो आणि वॉर्नर हे दोघेही फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्यावर हेटाळणीचे विषय झाले. सध्यातरी दोघंही अतिशय मन लावून खेळताना दिसतायत. ही त्यांच्या टीमसाठी फायद्याची गोष्ट ठरतेय. भरीला मॅक्सवेल फॉर्मात आलाय. त्याने दोन्ही टीममधे केलेल्या भन्नाट खेळीनं खरं तर भारतीयांचं मनोबल खच्ची केलं.  त्याला आयपीयलमधल्या कामगिरीवर सामान्य समजण्याची चूक भारतीयांनी केली.

सेहवागसारख्यानं तर त्याला बारा कोटींचा पंजाब इलेवनचा चियर लीडर म्हणून हिणवलं. पण त्याने जिथं मर्दुमकी दाखवायची तिथं नेमकी दाखवली. आयपीयलमधे पैशासाठी खेळत रहायचं आणि नाव कमवण्यासाठी देशासाठी खेळायचं असतं. ही भावना, हा विचार त्याच्याकडे आणि एकूणच सर्व कांगारूंकडे आहे. म्हणून ते धूर्त म्हणायचे. सिरीजमधली तिसरी मॅच भारतानं जिंकली आणि तिन्ही मॅचमधे पूर्ण शंभर ओवर टाकली गेली. कांगारूंनी भारतीय चाहते, पुरस्कर्ते, जाहिरातदार यांनाही खूश करून दोस्तीसुद्धा निभावली.

हेही वाचा : 

समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?

ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

मनोहर कदमः चळवळीशी एकरूप झालेला कार्यकर्ता संशोधक

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं