दरवेळी जगण्यामरण्याचा प्रश्न आला की नथुरामायणाचा मुद्दा उकरून काढला जातो. गांधीजींचा खून करणाऱ्या नथूरामला देशभक्तीचं सर्टिफिकेटही दिलं जातं. आताही ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनेही असंच केलं. नंतर तिने माफीही मागितली. दर काही दिवसांनी घडणाऱ्या या घटनांवर आधारित दोन तरुणांमधला हा एक संवाद.
निवडणुका जवळ आल्या की नथुराम गोडसेचे गोडवे पुन्हा पुन्हा गायले जातात. बॉम्बस्फोटाच्या आरोपात तुरुंगवास भोगलेल्या साध्वी प्रज्ञासिंग यांनीही तेच केलं. मग त्याला विरोधही झाला. नेते, अभिनेते कमल हासन यांनीही तेच केलं. नथुरामचं हे तथाकथित देशप्रेम नेमकं आहे तरी काय, हे साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगणारा हा एक संवाद.
तरुण १: नथुराम गोडसे देशभक्त असू शकतो?
तरुण २: का नाही?
तरुण १: अरे, त्याने आपल्या राष्ट्रपित्याचा खून केला, खून! जग ज्या माणसाला महात्मा, अहिंसेचा पुजारी, सत्याची कास धरणारा, तीही जीवनाच्या सर्व क्षेत्रात. अगदी युद्धात आणि राजकारणातही. अशा सत्यवादी माणसाचा त्याने खून केला.
तरुण २: वैचारिक मतभेदातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. पण म्हणून त्याचं देशावर प्रेमच नव्हतं, असा निष्कर्ष काढता येईल का? नथुरामाचा देशावर प्रेम करण्याचा अधिकार हिरावून घेता येईल?
तरुण १: मग उद्या चोर, दरोडेखोर अन् मल्ल्या, मोदी हेही मी देशभक्त असल्याचा दावा करतील. मोदी म्हणजे नीरव मोदी, उगीच गैरसमज नको.
तरुण २: एखाद्याने केलेल्या चोरीने किंवा फसवणुकीने कायदा मोडला म्हणता येईल. पण त्यामुळे त्याचं देशावर प्रेम नाही, असं कसं म्हणता येईल? मला हेच तर कळत नाही.
तरुण १: मित्रा, याच तर्काच्या आधारे उद्या वीरप्पन, भिंद्रनवाला, दाऊद हेही देशप्रेमी असल्याचा दावा करतील. त्याचं काय?
तरुण २: मुद्दा फार ताणू नकोस. तुझ्या विचारांशी मी सहमत नसल्याने माझं देशावरच प्रेम नाही, असा अर्थ काढणं ठीक नाही, असं म्हणायचंय मला.
तरुण १: म्हणजे?
हेही वाचा: गांधीजी पुन्हा वायरल झालेत
तरुण २: म्हणजे काय? गांधींच्या विचारांशी नथुराम सहमत नव्हता.
तरुण १: अरे, संघवाल्यांसारखा ‘गांधी’ काय म्हणतोस? गांधीजी म्हण की जरा.
तरुण २: तेच ते. तर नथुराम हा गांधीजींच्या विचारांशी, कृतीशी सहमत नव्हता. म्हणून काय त्याचं या देशावर प्रेमच नव्हतं असं म्हणायचं काय? संघवाले, भाजपवाले त्यांच्या मतांशी सहमत नसलेल्या व्यक्तींना, डाव्यांना देशद्रोही वगैरे जाहीर करून त्यांच्यावर तसे शिक्के मारण्याचे धंदे करत स्वत:वर देशप्रेमाची मोहोर डागवून घेतातच की. त्याला आपण विरोध करतोच ना. त्याच न्यायाने केवळ देशातल्या नागरिकांनी एकमेकांच्या विरोधात मत बाळगल्याने त्यांचं देशावर प्रेम नाही किंवा नव्हतं, असं म्हणता येणार नाही.
गड्या, तुझ्या तर्कात दम आहे खरा. या देशात जन्मलेल्या प्रत्येकाचं आपला देश म्हणून, जन्मभूमी म्हणून, आणि काहींची आश्रय भूमी म्हणून या देशावर प्रेम असू शकतं. ते प्रेम व्यक्त करण्याची सर्वांची पद्धत वेगवेगळीही असू शकते. मतभिन्नता किंवा मतभेद असल्याने एकमेकांचा देशावर प्रेम करण्याचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
तरुण २: या न्यायाने नथुरामचं या देशावर प्रेम होतं, असं म्हटल्याने इतकं अस्वस्थ व्हायचं कारण नाही.
तरुण १: नाही रे. तुझा तर्क बरोबर वाटत असला तरी काही तरी गफलत होतेय. राष्ट्रपित्याचा खुनी आणि देशप्रेमी? थांब जरा काही तरी सुटतंय मला एक सांग.
तरुण २: बोल, ऐकतोय मी.
तरुण १: हं. हं. हं.
हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते
तरुण २: झालं का विचार करून?
तरुण १: हे बघ, देश म्हणजे केवळ माती नाही. देश बनतो तो त्या मातीवर राहणाऱ्या माणसांनी. पृथ्वीतलावार अनेक भूभाग, बेटं निर्जन आहेत. त्यांना कुणीही देश म्हणत नाही.
तरुण २: होय. तुला नेमकं काय म्हणायचंय?
तरुण १: मला म्हणायचंय, प्रत्येक माणसाची त्याच्या देशाविषयीची धारण वेगळी असू शकते.
तरुण २: बरं. मग?
तरुण १: अरे, समजून घे. काहींच्या स्वप्नांतला, वास्तवातला देश, हा इतरांच्या स्वप्नांतल्या, वास्तवातल्या देशापेक्षा वेगळा असू शकतो.
तरुण २: किती तात्विक बोलतोस. जरा सोपं आपल्यासारखं, चारचौघांसारखं बोल. थेट मुद्द्यावर ये.
तरुण १: थेट मुद्द्यावरच येतो. नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांचा देशच मुळीच एक नव्हता!
तरुण २: म्हणजे! ते दोघे या मातील जन्मला आले नव्हते काय?
तरुण १: जरा धीर धर. इतका एक्साइट होऊ नकोस. मला मुद्दा पूर्ण करू दे. तर मी सांगत होतो, गांधीजी आणि नथुराम यांना अपेक्षित असलेले देश दोन निरनिराळे आणि एकमेकांच्या विरोधी कल्पनांवर आधारीत देश होते. म्हणून त्या दोघांच्या धारणांनुसार त्यांचे-त्यांचे देश वेगवेगळे होते. गांधीजींना सर्व माणसांना समान लेखणारा, धर्मांचा, जातीचा संकुचितपणा उक्ती आणि कृतीत नसणारा देश अपेक्षित होता. स्वातंत्र्योत्तर काळात तशा पद्धतीचा देश अस्तित्वात आणण्यात आला. तशी राज्यघटना अस्तित्वात आणण्यात आली आणि पुढील सत्तर वर्ष त्याच सिद्धांतानुसार देश घडवत आणण्यात आला.
तरुण २: हे सगळ्यांना माहिती आहेच. मुद्द्याचं बोल?
हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
तरुण १: तेच तर सांगतोय. नथुरामच्या स्वप्नातला देश अस्तित्वात आला नाही. म्हणजेच हिंदू राष्ट्रवादाची झूल पांघरलेला ब्राह्मण्यावादी व्यवस्था पावन माणणारा ब्राह्मण्यवादी देश अस्तित्वात आला नाही. गांधीजींना भारत हवा होता. नथुरामला हिंदुस्थान.
तरुण २: तर मग?
तरुण १: मग काय गांधी आणि गोडसे हे एका गावचे नव्हते!
तरुण २: म्हणजे?
तरुण १: म्हणजे काय? अरे, गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता. आणि नथुरामाची भक्ती ज्या देशावर होती, तो देश कधीच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे अस्तित्वातल्या भारत देशावर नथुरामचं प्रेम असण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे नथुराम देशप्रेमी होता, असं म्हणता येणार नाही.
तरुण २: अरे पण, आपला धर्मनिरपेक्ष देश राज्यघटनेनुसार १९५० नंतर जन्माला आला.
तरुण १: हो, हो, हो. ऐक तरी. तर मी म्हणत होतो. राज्यघटनेनुसार अस्तित्वात आलेला गांधीजींचा भारत समृद्ध विशाल परंपरेचा, सहिष्णू परंपरेचा पाईकच झाला. या देशाची समृद्ध परंपरा काही घटनांचा अपवाद वगळता उदारवादीच आहे. ती नथुरामच्या हलक्या कल्पनेतली कट्टर परंपरेची पाईक कधीच नव्हती. तुला काय म्हणायचंय? १९५०च्या आधी हा देश संकुचित कट्टरवादी होता?
तरुण २: अजिबात नाही.
हेही वाचा: अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
तरुण १: तर मग निष्कर्ष काय?
तरुण २: ज्या देशावर गांधीजींची भक्ती होती, त्या देशावर नुथरामची भक्ती नव्हती. तो गांधीजींचा दुश्मन आणि पर्यायाने त्यांच्या देशाचा म्हणजेच आपल्या देशाचा दुश्मन होता.
तरुण ३ : अरे, तासभर झालं तुम्हा दोघांचं ऐकतोय. थांबा जरा. मला सांगा, नथुरामच्या देशभक्तीविषयी कोणी शंका व्यक्त केली का? कमल हसन तर म्हणाला, स्वातंत्र्योत्तर काळातला आद्य दहशतवादी नथुराम गोडसे होता. तो हिंदू होता. तो हिंदू दहशवादी होता की नव्हता यावर चर्चा होऊ नये म्हणून त्याच्या देशभक्तीचा मुद्दा पुढे आणला गेला. तुम्हीही संघवाल्यांच्या नेहमीच्याच विषयांतर करण्याच्या डावात सापडलात आणि चर्चा करत बसलात.
तरुण १ आणि तरुण २ एकमेकांकडे बघत राहिले. तिसरा तरुण गाडीवर कीक मारून निघूनही गेला.
हेही वाचा:
विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग १)
साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?
एक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे
देशभरातल्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात, ते इथे वाच
असाही एक पोल आहे, ज्यानुसार मोदींना सरकार बनवणं सोपं नाही