सावधान, देशातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत!

२५ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही.

मानवी संस्कृती ही नदीच्या काठानं मोठी झाली. नदी आटली की संस्कृती संपते. अशा अनेक संपलेल्या नद्यांनी संपलेल्या मानवी वस्त्या आज ऐतिहासिक संशोधनाच्या जागा ठरल्यात. मानवी इतिहासाची ही गोष्ट नाइलपासून सिंधू नदीपर्यंत आणि गंगा-ब्रह्रमपुत्रेपासून चीनमधल्या पिवळ्या नदीपर्यंतची संस्कृती पाहिली की स्पष्टपणे कळते. तरीही आपण अजून शहाणे होत नाही, हेही तेवढंच खरं आहे.

माणसानं विकासाच्या नावाखाली निसर्गाचा जो काही आसुरी ऱ्हास सुरू केलाय, त्यामुळे होणाऱ्या पर्यावरण बदलाचे परिणाम आता दिसू लागलेत. संयुक्त राष्ट्रांनी नद्यांसदर्भातला एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केलाय. त्यात त्यांनी भारतातल्या नद्यांबदद्ल चिंता वाटावी अशी विधानं केली आहेत. कोकणातल्या नद्यांबद्दलचीही निरिक्षणं तशीच आहेत. हे सगळं फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

काय सांगतोय संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०५० पर्यंत पाणी संकटामुळे सर्वात जास्त परिणाम होणार्‍या देशांत भारत असेल. तसंच आगामी दशकांत हिमनदी आणि बर्फ बितळल्यामुळे भारतासाठी जीवनदायिनी मानली जाणार्‍या गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधूसारख्या नद्यांमधलं पाणी कमी होईल, असंही या अहवालात म्हटलंय.

या तीन नद्यांसह आशियातल्या दहा प्रमुख नद्या हिमालय क्षेत्रातून उगम पावतात आणि देशातल्या तब्बल १.३ अब्ज लोकांची पाण्याची गरज भागवतात. या नद्या कोरड्या पडत गेल्या तर त्याचा मोठा फटका भारत, पाकिस्तान आणि चीनला बसू शकतो.

जागतिक पर्यावरण संस्थेनं जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, देशात २०३१ पर्यंत पाण्याची दरडोई वार्षिक सरासरी उपलब्धता १३६७ क्युबिक मीटर राहील. ही १९५० मधे ३०००-४००० क्युबिक मीटर होती. त्यात सातत्याने घट होत आहे. गंगा -ब्रह्मपुत्रा-मेघना नदी प्रणालीचं पाणलोट क्षेत्र एकूण नदी पाणलोट क्षेत्राच्या ४३ टक्के आहे.

हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?

एकट्या गंगेवर ४० कोटी लोक अवलंबून

भारतात जगाची १७.७४ टक्के लोकसंख्या राहते आणि आपल्याकडे ताज्या पाण्याचे स्त्रोत केवळ ४.५ टक्केच आहेत, त्यामुळे ही फार चिंताजनक परिस्थिती आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. फक्त गंगा या नदीचं उदाहरण घेतलं तर या एकट्या नदीवर देशभरातल्या विविध राज्यांतले सुमारे ४० कोटी लोक अवलंबून आहेत.

२५०० कि.मी. लांब असलेली गंगा देशातल्या सर्वात प्रमुख नद्यांपैकी एक आहे. गंगोत्री हिमनदीतून गंगेला पाणी मिळतं. पण, गेल्या ८७ वर्षांत ३० कि.मी. लांब असलेल्या हिमनदीचा दोन किलोमीटर भाग वितळला आहे. भारतीय हिमालय क्षेत्रात ९५७५ हिमनद्यांपैकी ९६८ हिमनद्या उत्तराखंडमधे आहेत. हिमनद्या वेगाने वितळल्या तर भारत, पाक, चीनमधे पूरस्थिती येऊ शकते.

एकीकडे पूर आणि दुसरीकडे दुष्काळ ही परिस्थिती भविष्यात वाढू शकते. वातावरणातले बदल आणि अनियंत्रित बांधकाम जलस्त्रोतांना आणि जलमार्गांना अत्यंत भयानक पद्धतीने दुषित करत आहेत. गंगा-यमुनेच्या खोऱ्यात तर गेल्या काही वर्षात आलेल्या पुरांच्या मागे या महानद्यांशी मांडलेला खेळ आहे, हे विसरून चालणार नाही.

कोकणातल्या बारमाही नद्यांच्या पातळीतही घट

उत्तरेतल्या नद्यांप्रमाणे राज्यातल्या, विशेषतः कोकणातल्या नद्याही आटत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. वाढत्या तापमानवाढीचा परिणाम बारमाही नद्यांच्या पाण्यावर होत असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी कमी होतेय. कोकणातल्या पाच नद्यांवर याचा परिणाम झाल्याचं चित्र पुढे आलंय. कोकणात चौदा बारमाही नद्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या नद्यांचं पाणी दहा टक्क्यांनी घटलंय.

कोकणात दमणगंगा, तानसा, वाशिष्ठी, भातसा, कुंडलिका, आंबा, उल्हास, पाताळगंगा, गडनदी, काळू, सावित्री, वैतरणा, सूर्य, देवगड अशा महत्त्वाच्या नद्या आहेत. या नद्या बारमाही वाहत आहेत. मात्र, नैसर्गिक नद्यांमधे तयार असलेली नैसर्गिक कुंडलं कमी झाल्यानं त्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

कोकणातल्या भूगर्भातल्या पाणी पातळीतही मोठी घट झाल्याचं दिसून येतंय. वीस वर्षांपूर्वी २०० फुटांवर कूपनलिकांना पाणी मिळत होतं. मात्र आता साडेतीनशे ते चारशे फूट खोल कूपनलिका खोदाव्या लागतात. एवढ्या प्रमाणात पाणी पातळी खोल गेलीय.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत नद्यांना धोका

नद्यांमधली पाणी पातळी कमी होण्याचं कारण पूर्वीची नैसर्गिक पाणी साठ्याची कुंडं भरावाने भरून गेली. यामुळे प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातलं बदलापूर, रायगडमधल्या महाड आणि रत्नागिरी इथल्या चिपळूण या भागात मोठ्या महापुराचा सामना करावा लागत आहे. सरकारने गाळ काढण्यासाठी आता निधी मंजूर केला आहे. पण, हे गाळ काढण्याचं काम संथगतीने होतंय.

जेवढा गाळ काढला जातो तेवढा पावसाळ्यात पुन्हा येऊन भरतो. त्यामुळे पाणी कमी होण्याचं आणि पूर येण्याचं प्रमाण वाढलंय. जागतिक तज्ञांच्या मते, तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वेगाने वाढतेय. याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम मोठे होतील. एका बाजूला खारं पाणी वाढतंय, तर तापमानवाढीमुळे गोड्या पाण्याचे स्त्रोत कमी होऊ लागलेत. ही धोक्याची घंटा आहे.

तापमानवाढ हा विषय राज्यातल्या सर्वच भागांमधे आढळून येतो. वितळणाऱ्या बर्फामुळे भारताच्या गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांचं पाणी कमी झाल्याचं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात आहेच. पण देशातल्या इतर नद्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे. कोकणासारख्या भागात मान्सून हा पाण्याचा मुख्य स्त्रोत असून, त्याचंही गणित बदलत आहे. उत्तरेतल्या नद्या आटल्यास स्थलांतराचा मोठा फटका कोकणासह इतर राज्यांनाही बसू शकतो.

निसर्गाला गृहित धरणं महाग पडेल

कोकणात प्रचंड पाऊस पडूनही पाणी अडवलं जात नसल्यामुळे फेब्रुवारीनंतर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून दमणगंगासह पाच नदी खोर्‍यांतलं पाणी अडवण्याचा कार्यक्रम सरकारने जाहीर केला आहे; पण हा कार्यक्रम किती वर्षांत पूर्ण होणार, याचं कोणतंही वेळापत्रक नाही. तसंच त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचाही फारसा विचार झालेला नाही.

मुळात आपल्याकडे कोणताही प्रकल्प राबवताना पर्यावरणासंदर्भातला अहवाल तयार केला जातो, पण त्याच्या विश्वासार्हतेबद्दल कोणालाच खात्री नसते. कारण अनेक पर्यावरणविषयातल्या तज्ञांनी आजपर्यंतच्या या अहवालांबद्दल कायमच जाहीरपणे साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळेच आज अनेक पर्यावरणाला घातक प्रकल्पांना कोकणासारख्या संवेदनशील भागात मंजुरी मिळाली आहे.

पर्यावरणाला गृहित धरून होणारा हा विकास भविष्यात नद्यांच्या हानीला कारणीभूत ठरला तर तिथल्या मानवी वस्तीपुढे स्थलांतराशिवाय पर्याय नाही. मागे एकदा पुण्यात एक नाला सापडल्याची बातमी आली. महापालिकेने जेव्हा अभ्यास केला तेव्हा कळलं की तिथं एक छोटी नदी होती. तिच्यावर इमारती बांधल्या गेल्या आहेत. मुंबईत मिठी नदीची अवस्थाही काही वेगळी नाही. या नद्यांचा विनाश पुढे माणसाच्या विनाशाकडे जाऊ नये, याची काळजी माणसांनाच घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: 

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!