आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधले वाद काही थांबायला तयार नाहीत. आता वर्ल्डकपमधे प्रत्येक टीमने २ रंगांच्या जर्सीचे कीट किंवा सेट निवडले होते. त्यानुसार टीम इंडिया पुढच्या मॅचमधे केशरी रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. टीकाकारांच्या मते हा भाजप सरकारचा दबाव आहे. पण भारताने यापूर्वी २२ वेळा जर्सीचा रंग बदललाय.
सध्या क्रिकेटचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजेच वर्ल्डकप सुरु आहे. आपण प्रत्येक मॅचचा आनंद घेत आहोतच. पण या मॅचमधे काहीतरी वेगळं दिसतंय. हे वेगळेपण रंगातलं आहे. म्हणजे ही काही आपल्या टीवीच्या कलर सेटींगमधली बडबड नाही. हा वेगळा रंग म्हणजे खेळाडूंच्या जर्सीचा आहे. आणि बातम्यांमधून तर असंही समजतंय की पुढच्या मॅचमधे भारताच्याही जर्सीचा रंग बदलणार आहे.
वर्ल्डकप मॅचमधे साऊथ आफ्रिका एरवी तर हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळते. पण बांग्लादेशविरुद्ध खेळताना पिवळ्या रंगाची जर्सी घातली. तसंच २२ जूनच्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान या मॅचमधेही अफगाणिस्तानने निळ्याऐवजी गडद निळ्या आणि लाल रंगाची जर्सी वापरली. अचानक जर्सी बदलण्यावरून उलटसुलट चर्चा होतेय. एकीकडे तर आयसीसीच्या पूर्वपरवानगीशिवाय कपडे, त्याचा रंग, त्यावरील मजकूर, चिन्ह बदलू शकत नाहीत. मग जर्सी बदलण्यामागचं कारण काय?
खरंतर आयसीसीने आधीच घोषित केलं होतं. प्लेअर्सच्या कपड्यांचे दोन रंगाचे सेट किंवा कीट प्रत्येक टीमने बनवावेत. आणि तिसरा कीट किंवा सेट हा सरावासाठी असावा. प्रत्येक टीमच्या जर्सीचा रंग हा वेळोवेळी बदलला आहे. दर काही वर्षांनी त्याच्या रंगात, रचनेत बदल झालाय.
हेही वाचा: वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सुरवातीच्या बऱ्याच वर्षांमधे सर्व टीम पांढऱ्या रंगाच्या जर्सी वापरत होते. १९८५ मधे म्हणजेच पस्तीसेक वर्षांपूर्वी रंगीत जर्सी घालण्याचा ट्रेंड आला. आणि १९९० पासून जगातल्या सगळ्याच टीम रंगीत जर्सी वापरू लागल्या. भारताने १९८५ मधेच हा रंगबदल स्वीकारत, रंगीत जर्सी आणली. आजपर्यंत साधारण २२ वेळा आपल्या टीमने जर्सी बदललीय. एवढंच नाही तर जर्सीची रचनाही जवळपास २५ वेळा बदललीय, असं स्पोर्टकीडा या वेबसाईटने म्हटलंय.
भारताने बदललेल्या जर्सीमधे गडद निळा, फिकट निळा असे निळ्याचे वेगवेगळे शेड वापरलेत. तसंच पिवळ्या रंगाचाही वापर केला होता. जर्सीचे रंग बदलताना बऱ्याचदा काही टीमच्या जर्सीशी ते जुळतात होतात आणि सारख्याच रंगाच्या जर्सी घालून खेळताना. प्रेक्षकांना मॅच बघताना गोंधळल्यासारखं होतं असंही म्हटलं जातं. म्हणूनच आयसीसीने खेळण्यासाठी २ रंगांचे कीट ठरवण्यास सांगितलं.
हेही वाचा: पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?
अफगाणिस्तानने तर त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या जर्सीचे इमेजेस शेअर करून सांगितलं की आम्ही निळ्या, गडद निळ्या आणि लाल रंगाच्या जर्सी घालून खेळू. तर सरावासाठी समुद्री निळ्या रंगाच्या जर्सी वापरू. पण सोशल मीडियावर अचानक भारताच्या जर्सीवर चर्चा सुरु झालीय.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार भारताने आपल्या दोन रंगांच्या कीट किंवा सेटमधे निळ्या रंगाबरोबर केशरी रंग निवडलाय. तसंच भारत ३० जूनला इंग्लंडबरोबर खेळणार आहे. त्यावेळी इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग सारखाच असणार आहे. मग समोरची टीम जर्सी बदलेल, आपण का बदलायची? अफगाणिस्ताननेही बदललेली. पण इंग्लंड मात्र जर्सी बदलणार नाही.
हेही वाचा: वडिलांमुळे युवीला स्केटींगऐवजी क्रिकेटमधे यावं लागलं
इंग्लंड हा यजमान देश आहे. इंग्लंडने वर्ल्डकपचं आयोजन केलंय. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार होस्ट टीमला जर्सीचा रंग बदलता येत नाही. इंग्लंडविरुद्ध ३० जूनला मॅच आहे. या मॅचमधे टीम इंडियाच नव्या रंगाची केशरी जर्सी घालून मैदानात उतरलेली दिसेल.
भारतात केशरी रंग हा काही अंशी वादग्रस्त झालाय. रंगाचा राजकारण आपल्याकडे जोरात सुरू आहे. लोकांच्या मुद्यांपेक्षा आपले पुढारी रंगाच्या राजकारणावरचं भर देताहेत. केशरी रंग धर्म, श्रद्धा, राजकारण इत्यादी गोष्टींशी जोडला असल्यामुळे बऱ्याच जणांनी यावर आक्षेप घेतलाय. सोशल मीडियावर तर भाजप सरकारवर टीका करण्यात आली. हे सरकार हिंदुत्ववादी असल्यामुळे केशरी रंगाचा दबाव टाकला, सगळीकडे भगवीकरण करणार, राष्ट्रवाद फोफावतोय अशी टीका होतेय. एवढंच नाही तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी हिंदू देवदेवता आणि टीम इंडियाचे केशरी कपड्यांमधले फोटो वायरल केलेत.
हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम
यासंदर्भात टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण यांनी टाईम्स नाऊला प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणतात, आपल्या टीमने कोणत्याही रंगाची जर्सी घातली तरी काही फरक पडणार नाही. टीमचं लक्ष फक्त खेळाकडे असावं. कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करून समोरच्या टीमला हरवता येईल याचाच विचार टीमने करावा. तसंच क्रिकेट चाहते टीमच्या खेळाकडे, त्यांच्या मुवमेंटकडे, कोणती खेळी खेळतात याकडे लक्ष देणार आहेत.
शेवटी जर्सीच्या रंगापेक्षा खेळ महत्त्वाचा आहे. आणि एखादं दुसऱ्या मॅचमधे जर्सीचा रंग बदलला तरी टीम इंडिया आणि तिचा खेळ हाच आपला फोकस असला पाहिजे. केशरी हा जर्सीचा पर्यायी रंग आहे. आपल्या टीमचा मूळ निळा रंग तोच कायम राहणार आहे, हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.
हेही वाचा:
क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
बसभाडं ५ रुपये केल्याने, बेस्ट पुन्हा मुंबईची लाईफलाईन बनेल?
वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केलं काँग्रेसनं आणि थँक्स म्हणाले बाळासाहेबांना, कारण