टीका केली तरीही साईंचा महिमा वाढतो कसा?

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


चार वर्षांपूर्वी द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाईट शब्दांत टीका केली होती. धर्मसंसद भरवून साईबाबांची पूजा न करण्याचा फतवा काढला होता. पण आता त्याचा सगळा प्रभाव संपला आहे. साई संस्थानाने समाधी शताब्दीच्या निमित्ताने केलेला प्रचार त्याला कारण आहे तसंच भक्तांची साईंविषयीची श्रद्धाही.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या शिर्डीत आहेत. साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मंदिर संस्थानाला शोभेसा जंगी कार्यक्रम झाला. १५ ऑक्टोबर १९१८ला साईबाबांनी समाधी घेतली. त्यानिमित्ताने गेली दोन वर्षं संस्थानाने कार्यक्रमांची रेलचेल केलीय. त्यांना ते करावंच लागणार होतं. कारण गेल्या चार वर्षांत शिर्डीला येणाऱ्या भक्तांमधे घट होऊ लागली होती.

चार वर्षांपूर्वी म्हणजे २५-२६ ऑगस्ट २०१४ला छत्तीसगढमधल्या कवर्धा शहरात एक धर्मसंसद भरवण्यात आली होती. त्यात देशभरातले स्वतःला संत म्हणवणारे महामंडलेश्वर वगैरे साधूसंन्याशी जमले होते. त्यात द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांवर जोरदार टीका केली होती. साईबाबा देव, अवतार किंवा गुरू नाहीत, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर धर्मसंसदेने तर ठराव करून साईबाबांना हिंदूंनी पुजू नये असा फतवाच काढला होता. जणू काही ही धर्मसंसद फक्त साईबाबांना नाकारण्यासाठीच आयोजित केली होती. 

धर्मसंसदेने काढला होता साईंना न पूजण्याचा फतवा

आता विकीपीडियावर सर्च केल्यास शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींच्या पानावर त्यांनी साईबाबांवर केलेले आरोप दिसतात. ते असे आहेत, शास्त्रांत आणि वेदांत साईबाबांचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांची हिंदू देवांसोबत पूजा करण्यात येऊ नये. ते काही देव नव्हते. ते फक्त मुस्लिम फकीर होते. मांसाहारी आणि अल्लाला भजणारे साईबाबा हिंदूंचे देव होऊच शकत नाहीत. ते गंगेत आंघोळ करण्याची गरज नसल्याचं सांगायचे. साईबाबांची पूजा ही हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे. साईबाबांची पूजा करणाऱ्यांना रामाची पूजा करायला देऊ नये. आता नरेंद्र मोदी शिर्डीला येऊन साईबाबांना नमस्कार करून गेले असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या उमा भारतींनाच स्वरूपानंद सरस्वतींनी साईबाबांविषयी उघडपणे गौरवोद्गार काढण्याबद्दल फटकारलं होतं. त्यांनी उमा भारतींना एक पत्रं लिहून साईबाबांवर अनेक आरोप केले होते.

पत्रकार रवी आमले यांनी ३१ ऑगस्ट २०१४ला लोकसत्तेत एक लेख लिहून साईबाबांवर टीका करणाऱ्या धर्मसंसदेचा बुरखा टराटरा फाडला होता. त्यात ते लिहितात, `द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटलं. साईबाबांच्या भक्तांना ‘संक्रामक बिमारी’ झाली आहे, अशी टीका केली. शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचं पालन केलं जातं. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.`

साईबाबांना नाकारण्यामागे हिंदुत्ववादी राजकारण असल्याचा दावा रवी आमलेंच्या या लेखात करण्यात आलाय, `मुळात धर्मसंसद हे विश्व हिंदू परिषदेचे अपत्य आहे, ही गोष्ट येथे सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. या परिषदेने १९८३ साली देशात एकात्मता यात्रा काढली. त्या यात्रेत प्रथम धर्मसंसदेची कल्पना पुढे आली आणि १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात अशी धर्मसंसद भरविण्यात आली. त्या संसदेत रामजन्मभूमी मुक्तीची हाक देण्यात आली. पुढे १९९१ मध्ये झालेल्या धर्मसंसदेत या आंदोलनाची पुढची दिशा निश्चित झाली.` 

धर्माच्या पलीकडचे साई

साईबाबा हे आज सर्वधर्म समभावाचं प्रतीक बनलेत. हिंदू आणि मुस्लिमच नाही, तर पारशी, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, शीख, ज्यू असे सगळ्या धर्मांचे लोक त्यांचे भक्त आहेत. साईबाबांचा वेश मुस्लिम फकीराचा आहे. त्यांची भाषाही तशीच आहे. आशीर्वाद देताना ते `अल्लाह भला करेगा` असं म्हणत. शिवाय `यादे हक` म्हणजे परमेश्वराचं स्मरण करा असं म्हणत. असे उल्लेख साईसच्चरित्राच्या प्रस्तावनेतच आहेत. त्यांच्या समाधीचा आकारही दर्ग्यामधल्या कबरीसारखाच आहे. ही सारी सुफी संप्रदायाची ओळख आहे. 

मात्र तेच साईबाबा दत्ताचे अवतार मानले जातात. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज सद्गुरू साईनाथ महाराज म्हणून त्यांची पूजा होते. ते दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. दत्त, नाथ, वारकरी अशा सगळ्याच सांप्रदायिकांशी त्यांचं नातं आहे. ते मुसलमानांसाठी मुसलमान आणि हिंदूंसाठी पूर्णपणे हिंदू आहेत. अभिषेक, पारायण, पालखी, यज्ञयागापर्यंत सगळं साईबाबांच्या नावाने होतं. साईबाबांचे दर गुरुवारी उपवास करणारे तर लाखो भक्त आहेत. त्या कोणाच्याच डोक्यात साईबाबांचा धर्म येत नाही. हे कट्टर सनातन्यांना खुपणारं आहे. कारण त्यांच्या एकसाची धर्मात हे बसणारं नाही. 

रवी आमले लेखात पुढे म्हणतात, `राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्त्वासमोर जागतिकीकरण आणि जात ही दोन मोठी आव्हानं असल्याचंही स्पष्ट झालं. त्यांचा मुकाबला करायचा तर त्या आड येत होते ते हिंदू धर्माचं मूळचं स्वरूप. सर्वसमावेशक आणि म्हणून अनाक्रमक. घाव घालायचा तर त्यावर. त्यासाठी हिंदू धर्माचं रेजिमेन्टीकरण करण्याची आवश्यकता आहे हे या धर्मातील हुशार मंडळींनी बरोबर ताडले. कवर्ध्यातील धर्मसंसद हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. साईबाबांच्या देवत्त्वाविषयी प्रश्न निर्माण करून एका प्रयोगाला सुरवात करण्यात आली आहे. हिंदू धर्मात मूलभूत बदल करण्याचा हा प्रयोग आहे.` 

साईंना विरोध हा असहिष्णुतेचा अाविष्कार

साईबाबांसारख्या अनेक संतांची, फकीरांची उपासना करणारा आपला हिंदू धर्म आहे. तो साधा सोपा आहे. तो भक्ती सांगतो. त्याला देवाला मिळवण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. तो सत्पुरुषाचा धर्म पाहत नाही आणि जातही पाहत नाही. त्याची ही सहिष्णुता अनेकांना खटकते.

रवी आमले त्याविषयी लिहितात, `साईबाबा ज्यांना खटकतात, अशा लोकांपुढे आदर्श दिसतात ते किताबी धर्मांचे. अशा धर्मांत धार्मिकांच्या कवायती फौजा तयार करणं सोपं असतं. आज तसेच प्रयत्न सनातन वैदिक धर्माची उपासना करणाऱ्या मंडळींकडून सुरू आहेत. धर्माचं अत्यंत किरटं आणि कठोर रूप समोर ठेवून त्याच्या रक्षणासाठी ही मंडळी आग्रही असतात. याच लोकांनी असहिष्णुतेचं एक वेगळंच पर्व हिंदू धर्मात आणलंय. साईबाबांना देवत्व नाकारणं हा याच असहिष्णुतेचा अाविष्कार आहे. हिंदू धर्म म्हणजे केवळ सनातन वैदिक धर्म असं नवं समीकरण लादलं जातंय.` 
साईबाबांना सहजपणे स्वीकारणाऱ्यांचा हिंदू धर्म हा कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या धर्मापेक्षा वेगळा आहे, अशी महत्त्वाची मांडणी आमले यांच्या लेखात आहे,

`हिंदू धर्माला किताबी धर्माप्रमाणे बनविण्यासाठी चाललेली ही तयारी आहे. यातून तुमचा आमचा हिंदू धर्म, जो आपल्याला आचाराचं, उपासनेचं, श्रद्धेचं, एवढंच नव्हे तर अश्रद्धेचंही स्वातंत्र्य देतो, तोच आज संकटात आलेला आहे. आज हे संकट धर्मसंसदीय आहे. उद्या त्याचं स्वरूप आणखी वेगळेही असू शकेल. पण या उपद्व्यापांतून नक्कीच इथं नव्या स्वरूपातला हिंदू धर्म निर्माण होणार आहे. विविध मार्गांनी आपण तिकडंच चाललो आहोत. एक मात्र खरं की त्यातून जो धर्म आपल्यासमोर येणार आहे, तो अन्य कोणताही असेल, तुमचा-माझा हिंदू धर्म नसेल.`

कट्टरतेवर चमत्कारांचा उतारा 

साईबाबांना नाकारण्याचा विरोध साईभक्तांनी नेहमीच केलाय. कवर्धाच्या धर्मसंसदेच्या स्टेजवर जाऊनही एक साईभक्त बोलू पाहत होता. पण त्याला बोलू दिलं नाही. तेव्हा त्यांनी मारामारीही केली. काही साईभक्त तर कोर्टातही गेले. त्यामुळे स्वरूपानंद सरस्वतींना माफीही मागावी लागली. पण सोशल मीडियातून सनातन्यांचा विखारी प्रचार सुरूच राहिला. साईबाबांच्या मूर्ती फोडण्याचे वीडियो बनवण्यात आले. त्यांना मुसलमान ठरवून हिंदूंना फूस लावण्याचे प्रयत्न झाले. त्याचा परिणाम शिर्डीतल्या गर्दीवर झाल्याचं शिर्डीचे पत्रकार सांगत होते. 

धर्मवाद्यांच्या विखाराची मात्रा साईभक्तांनी गेल्या दोनेक वर्षांत उतरवण्याचा चूपचाप पद्धतशीर प्रयत्न केल्याचं दिसतं. साईबाबांच्या द्वारकामाईच्या भिंतीवर अचानक साईबाबा दिसत असल्याचा चमत्कार घडला. सगळ्या टीवी चॅनल्सवर त्याची जाहिरात झाली. नंतर तर थेट चंद्रामध्ये साईबाबा दिसले होते म्हणं. साईबाबांचे इतरही चमत्कार चर्चेत येतच राहिले. काही लोकप्रिय टीवी सिरियल्समधेही शिर्डीची यात्रा घडवण्यात आली.

साईबाबांच्या चमत्कारांचं मार्केटिंग करण्यात साईभक्त आता वाकबगार झालेत. कारण साईबाबांच्या देहांतापासून गेली शंभर वर्षं सातत्याने चालू आहे. त्याच मार्गाने त्यांनी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींसारख्या साधूबाबाला बेअसर ठरवून टाकलंय. पुन्हा कोणत्याही धर्मसंसदेने साईंच्या विरोधात आदेश काढलेले नाहीत. हे चमत्कारांच्या उपायामुळे आहेच. पण कट्टरतावाद्यांच्या प्रयत्नांनंतरही हिंदू धर्माची सहिष्णुता अजून खंबीर असल्याचंही ते लक्षण मानायला हवं.