डोनाल्ड ट्रम्प २७ मिनिटांच्या भाषणात भारताबद्दल काय काय बोलले?

२४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया आज दीड दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम इथं नमस्ते ट्रम्प इवेंटमधे ट्रम्प यांनी भाषण दिलं. या भाषणातून अमेरिकन माणसाला भारताविषयी काय वाटतं तेच ट्रम्प यांनी बोलून दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुद्देसुद भाषण.

नमस्ते! नमस्ते! असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. अहमदाबादमधल्या मोटेरा स्टेडियम इथे २४ फेब्रुवारी २०२० ला आयोजित भव्यदिव्य अशा नमस्ते ट्रम्प या जंगी इवेंटमधे ते बोलत होते.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची बायको मिलेनिया ट्रम्प हे दोघं आज आपली मुलगी आणि जावयाला घेऊन दीड दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी साडेअकराला त्यांचं एअरफोर्स वन हे खासमखास विमान भारताभूमीवर उतरलं. तिथून त्यांनी गांधीजींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. आणि मग नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी नव्यानं डागडुजी करण्यात आलेलं जगातलं सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडिअम म्हणजेच मोटेरा स्टेडियमकडे रवाना झाले.

ट्रम्प यांना ऐकण्यासाठी मोटेरा स्टेडियममधे लाखभर लोक जमले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आणि भारताच्या या नव्या दोस्ताचं म्हणजेच ट्रम्प यांचं मनापासून स्वागत केलं. या स्वागताचा वाकून नमस्कार केल्यानंतर ट्रम्प बोलू लागले. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच आपला दोस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच भारताविषयी आणि भारत-अमेरिका संबंधांविषयी ते बोलले. त्यांच्या भाषणातले भारताविषयीचे महत्त्वाचे मुद्दे.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?

ही आहे, भारत देशाची कहाणी

ट्रम्प यांनी आपल्या २७ मिनिटांच्या भाषणात अमेरिकन माणसाला भारताबद्दल काय वाटतं याचं एक चित्रच मांडलं. पंतप्रधान मोदींच्या कामाचं आणि चहावाल्यापासून ते पंतप्रधान पदापर्यंत पोचण्याच्या त्यांच्या प्रवासाचं कौतुक केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणाचा मोर्चा भारताकडे वळवला. पंतप्रधान मोंदीप्रमाणेच भारतही वर येणारा, विकसित झालेला देश आहे.

मी आणि फर्स्ट लेडी म्हणजे मिलेनिया ट्रम्प पृथ्वीभोवती फेरी मारत ६००० किलोमीटरचा प्रवास करून फक्त एक संदेश देण्यासाठी इथे आलोय. अमेरिकेला भारताविषयी आदर आहे. अमेरिकेचं भारतावर प्रेम आहे. अमेरिका भारताचा एक विश्वासू मित्र राहील.

भारत देशाची कहाणी सांगायची म्हटलं तर भारतानं साध्य केलेल्या विकासाचा तोंडात बोटं घालायला लावणारा प्रवास सांगावा लागेल. भारत म्हणजे लोकशाहीचा एक चमत्कारच आहे. जगात दुसरीकडं कुठंही नाही अशी विविधता इथं सापडते. हा देश ताकदवान आणि सभ्य लोकांचा आहे. सगळ्या मानवतावादासाठी भारत एक आशा आहे.

दहा वर्षांत संपेल गरिबी

फक्त ७० वर्षांत भारतानं जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमधे आपलं स्थान मिळवलंय. जगातल्या सगळ्यात भारी देशांपैकी एक भारत आहे. नव्या दशकात प्रवेश केल्यापासून भारताची अर्थव्यवस्था ही आधीपेक्षा ६ पट जास्त वाढलीय. गेल्या एकाच दशकात भारतानं २ हजार मिलियन लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढलंय. दर एका मिनिटात १२ भारतीय गरिबीतून बाहेर पडताहेत.

नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना भारतातल्या गावागावात वीज पोचली. जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालेलं दिसून येतं. सध्या भारतातली ३२० मिलियन माणसं इंटरनेटशी जोडली गेलीत. ७० मिलियन घरांना अन्न शिजवण्यासाठी चांगल्या प्रतीचं इंधन वापरता येणं शक्य झालंय. ६०० पेक्षा जास्त लोकांपर्यंत स्वच्छतेच्या मुलभूत सोयी पोचल्यात.

लवकरच भारत हा जगात सगळ्यात जास्त मध्यमवर्गीय कुटुंब असलेला देश होईल. पुढच्या दहाच वर्षांत देशातूनच गरिबी पूर्णपणे निघून जाईल. भारताकडे अद्भूत ताकद आहे. एक संपन्न आणि स्वतंत्र देश म्हणून भारत हा जगातल्या सगळ्याच देशांसाठी आदर्श असावा असा आहे. या दशकातली ही सगळ्यात अभूतपूर्व गोष्ट आहे.

हेही वाचा : नमस्ते ट्रम्पसाठी सजलेलं मोटेरा क्रिकेट स्टेडिअम आतून दिसतं तरी कसं?

म्हणून भारत एक महान देश आहे

तुम्ही जे मिळवलंय ते सगळं एक स्वतंत्र आणि लोकशाहीवादी, शांततापुर्ण, सहिष्णू देशाच्या रूपानं कमवलंय. जुलूम, जबरदस्ती आणि हिंसा करून हे सगळं मिळवणाऱ्या आणि शांततापूर्ण मार्गाने मिळवणाऱ्या देशांत खूप फरक असतो. म्हणूनच भारत हा एक महान देश आहे.

भारताचा स्वातंत्र्यावरचा विश्वास, स्वतःच्या नागरिकांवर असलेला आत्मविश्वास आणि प्रत्येक माणसाविषयी वाटणारा सन्मान या गोष्टींमुळे भारत आणि अमेरिकेतली मैत्री ही एक नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट बनलीय. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश अनेक बाबतीत वेगळे असले तरी एका मुलभूत सत्याने ते जोडले गेलेत. ज्याच्या आशिर्वादानं आपण सगळेच धन्य झालो आहोत असं हे सत्य स्वामी विवेकानंद यांनीच सांगितलंय.

भारत म्हणजे क्रिएटिव हब

इतकंच नाही, तर भारतानं जगातला सगळ्यात उंच पुतळा बांधून हा देश ज्याच्यासाठी ओळखला जातो त्या एकतेला प्रतिक मिळवून दिलंय. आज मी जिथं भाषण करतोय त्या मोटेरा स्टेडियमलाही या सरदार पटेलांचं नाव देण्यात आलंय.

अंधारावर उजेडाचं आणि दुर्जनांवर चांगल्या लोकांचा विजय होतो याची खात्री पटवणारा रोषणाईचा दिवाळी सण भारतात साजरा केला जातो. आता याच भारतात काही दिवसांनी रंगांची उधळण होईल. सगळा देश होळीच्या रंगात माखून जाईल. भारत क्रिएटीव हब म्हणजे सृजनशीलतेची जणू फॅक्टरीच आहे.

बॉलिवूडच्या माध्यमातून दरवर्षी दोन हजारांहून जास्त सिनेमे भारतात तयार केले जातात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणजेच डीडीएलजे आणि शोलेसारखे जुने, प्रसिद्ध सिनेमे आणि बॉलिवूडच्या इतर सिनेमांमधला भांगडा डान्स पाहायला जगभरातल्या सगळ्या लोकांना आवडतं. भारतात सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहली यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंची कामगिरीची साजरी केली जाते.

थॅंक्यू भारतीयांनो!

आपल्या नागरिकांजवळ अधिकार आहेत असं गर्वानं सांगू शकणारा हा देश आहे. इथं प्रत्येक धर्माचे लोक राहतात. शेकडो भाषा बोलल्या जातात. असं असूनही भारतात एकता आहे. भारतीय भरपूर कष्टाळू असतात. भारतात कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे.

भारत सर्वधर्मसमभावाचं प्रतीक आहे. भारतात, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या धर्मांचे लोक एकत्र नांदतात. भारतात १०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. २४ हून अधिक राज्य आहेत. तरी भारत एक आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे ४० लाख नागिरक राहतात. त्यापैकी २५ टक्के गुजराती आहेत. आणि ते सगळेच अमेरिकेच्या भरभराटीसाठी खूप मेहनत करतात. प्रत्येक क्षेत्रात भारतीय व्यक्ती काम करते. आज मला या सगळ्या भारतीयांना थॅंक्यू म्हणायचंय.

हेही वाचा : 

डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?

ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!